देवतांच्या चरणी किंवा तीर्थक्षेत्री जाऊन केशविमोचन (मुंडण) करणे या कृतीमागील अध्यात्मशास्त्र या लेखात पाहू.
३. केशविमोचन, केशवपन आणि केस न कापणे
३ अ. देवतेच्या चरणी केशविमोचन (मुंडण) करणे,
हा क्षुद्रदेवतांना प्रसन्न करण्यासाठीचा अघोरी विधी असणे
‘देवतेच्या चरणी मुंडण करणे, हा एक कनिष्ठ साधनेचा प्रकार आहे. अघोरी विधी करणारे जीव असे मुंडण करून देवतेच्या चरणी केस अर्पण करून तिच्या चरणी रज-तमात्मक शक्तीचे कार्य करण्यासाठी बळ मागतात. केस हे रज-तमात्मक लहरींच्या प्रभावी संक्रमणाचे प्रतीक असल्याने या माध्यमातून देवतेची ती ती स्पंदने आकृष्ट करून त्या योगे आपल्या कार्याला गती मिळण्यासाठी बळ मागितले जाते. देवतेच्या चरणी मुंडण करणे, हे एक प्रकारे कनिष्ठजन्यतेच्या स्तरावर क्षुद्रदेवतांकडून सकाम साधनेद्वारा अघोरी विद्येच्या माध्यमातून आपल्या इच्छांची पूर्ती करून घेण्याचे माध्यम आहे.
उच्च देवतांच्या चरणी सहसा केस अर्पण करत नाहीत, तर क्षुद्रदेवता, ग्रामदेवता, स्थानदेवता यांच्या चरणी असे कनिष्ठजन्य उपासनेचे विधी केले जातात. त्या त्या इच्छेशी साधर्म्य दर्शवणार्या स्पंदनांशी निगडित ती ती वस्तू देवतेला अर्पण केली, तर त्या माध्यमातून जिवाला त्या त्या इच्छेशी निगडित स्पंदनांच्या स्तरावर इच्छित फलप्राप्ती होणे सुकर होते.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १५.५.२००७, सायं. ७.०३)
३ आ. तीर्थस्थळी जाऊन मुंडण करणे
३ आ १. क्षणिक पाप निर्दालनाच्या प्रक्रियेचे एक प्रतीक असणे
‘तिरुपति बालाजीला केस अर्पण करणे, ही एक पूर्वापार चालत आलेली घटना आहे. यामध्ये केस अर्पण करणे, म्हणजे आपले रज-तमात्मक पापच तिरुपतीच्या चरणी अर्पण करून पापमुक्त होण्याचा संकल्प करण्याचे ते प्रतीक आहे. केस काढणे, ही रजतमापासून मुक्त होण्याची एक प्रक्रिया आहे, म्हणजेच ते क्षणिक पाप निर्दालनाच्या प्रक्रियेचे एक प्रतीक आहे.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १६.५.२००७, दुपारी ४.२४)
३ आ २. अहंभाव अर्पण होऊन साधनेतील अडथळे दूर होणे
‘काही लोक डोक्यावरच्या केसांचे तीर्थस्थळी जाऊन मुंडण करतात, उदा. तिरुपति. ‘असे केल्यास त्या देवतेच्या चरणी स्वतःतील अहंभाव अर्पण होण्यास साहाय्य मिळते. त्यामुळे त्या व्यक्तीच्या साधनेतील अडथळे दूर होतात’, असे समजले जाते. यासाठी काही देवतांच्या चरणी स्त्री, पुरुष आणि लहान मुले यांनी मुंडण करण्याची प्रथा आहे. सध्याच्या काळात देवतेला ‘मी तुझ्या चरणी येऊन मुंडण करीन’, अशा प्रकारचा नवसही केला जातो.’
– ब्रह्मतत्त्व (सौ. पाटील यांच्या माध्यमातून, २९.३.२००६, सकाळी ११.१८)
३ इ. पतीच्या निधनानंतर पत्नीने केशवपन करण्याचे लाभ
३ इ १. पतीच्या आसक्तीदर्शक आठवणीतून मुक्त होणे आणि पुढे पतीलाही चांगली अन् लवकर गती प्राप्त होणे
‘यमपाशाने पुरुषाला जवळ केल्यावर त्याच्या अर्ध्याअधिक आसक्तीजन्य इच्छा पत्नीच्या कर्मात अडकलेल्या असल्याने या आसक्तीजन्य इच्छाशक्तीचे बंध सूक्ष्म लहरींच्या माध्यमातून सतत पत्नीच्या देहवास्तव्याकडे येत असतात. पत्नीच्या केसांतून प्रक्षेपित होणार्या रजोगुणी लहरींतील आकर्षणयुक्त शक्तीमुळे हे इच्छाशक्तीचे सूक्ष्म बंध तिच्या केसांत घनीभूत होऊ लागतात. अशा प्रकारे तिच्या केसांत नवर्याच्या अस्तित्वाचे एक सूक्ष्म स्थानच बनल्याने ही पुरुषप्रकृती सतत लिंगदेहाच्या रूपात त्या दिशेने ओढली जाऊन त्या जिवाचीही पुढे जाण्याची गती अवगुंठित होते आणि पत्नीलाही सतत नवर्याच्या मायापाशाची आठवण होऊन तिचीही पुढच्या वैराग्यदर्शक भावनेतून होत जाणारी आध्यात्मिक उन्नती खुंटू शकते. पतीच्या निधनानंतर ती स्त्री जर सती गेली नसेल, तर पतीच्या आसक्तीदर्शक आठवणीतून मुक्त होण्यासाठी आणि पुढे पतीलाही चांगली अन् लवकर गती प्राप्त होण्यासाठी तिचे केशवपन करण्यास शास्त्रात सांगितले आहे.
३ इ २. पती-पत्नीतील देवाणघेवाणसंबंधयुक्त कर्मापासून मुक्तता
पती आणि पत्नी यांच्यात सर्वांत जास्त प्रमाणात देवाणघेवाण असते. केशवपन हा एक पती-पत्नीतील देवाणघेवाणसंबंधयुक्त कर्मापासून मुक्तता मिळवण्याचा उत्तम आचार आहे.
३ इ ३. पत्नीच्या मनात अल्पावधीत वैराग्यदर्शक भाव रुजणे
हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शुद्ध, तसेच वैराग्यदर्शक आचारधर्म आहे. या आचाराने पत्नीच्या मनात अत्यंत अल्प कालावधीत वैराग्यदर्शक भाव रुजून तिची पुढील आध्यात्मिक उन्नती होते. हिंदु धर्माने आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी विविध नियम त्या त्या टप्प्यावर कसे सांगितले आहेत, हेच यातून लक्षात येऊन आचारधर्माचे महत्त्व पटते.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ७.९.२००७, दुपारी २.५६)
३ उ. कुटुंबीय मृत झाल्यास पुरुषांनी केस पूर्णपणे का कापावेत आणि स्त्रियांनी का कापू नयेत ?
(मृताचा लिंगदेह केसांच्या काळ्या रंगाकडे आकर्षिला जाऊ नये; म्हणून कुटुंबातील क्रियाकर्म करणार्या पुरुषांनी केस कापावेत. स्त्रियांनी केस कापू नयेत; कारण ते हिंदु धर्माच्या विरुद्ध आहे.)
कुटुंबीय मृत झाल्यास घरातील वातावरण रज-तमात्मक बनते. मृत जिवाचा लिंगदेह काही काळ त्या वास्तूत किंवा कुटुंबियांभोवतीच फिरत रहातो. मृताच्या लिंगदेहाकडून प्रक्षेपित होणार्या वेगवान रज-तमात्मक लहरी या कुटुंबियांच्या केसांच्या काळ्या रंगाकडे आकर्षिल्या जातात. केस वातावरणातील रज-तमात्मक लहरी शोषून घेण्याचे कार्य करतात. यामुळे कुटुंबियांना डोके दुखणे, अस्वस्थता येणे असे त्रास होऊ शकतात. मृत्यूनंतरचे क्रियाकर्म करणार्या पुरुषांचा प्रत्यक्ष विधीत सहभाग असल्याने त्यांना त्रास होण्याची शक्यता जास्त असते. हा त्रास होऊ नये, यासाठी त्यांनी केस पूर्णपणे कापणे आवश्यक असते.
संकलक : ‘मृत जिवाच्या लिंगदेहाकडून प्रक्षेपित होणार्या वेगवान रज-तमात्मक लहरी या कुटुंबियांच्या केसांच्या काळ्या रंगाकडे आकर्षिल्या जातात’, असे वरील उत्तरात सांगितले आहे; पण अध्यात्मशास्त्रानुसार ‘काही ठराविक मर्यादेपर्यंत केसांमुळे वाईट शक्तींपासून रक्षण होते’, असेही आहे. या दोन्ही विधानांचा समन्वय कसा साधायचा ?
उत्तर : ‘वातावरणातील रज-तमाचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यास जिवाला वाईट शक्तींचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे काही ठराविक मर्यादेपर्यंतच जिवाचे केसांमुळे वाईट शक्तींपासून रक्षण होते.
हिंदु धर्मामध्ये स्त्रीला आदिशक्तीच्या अप्रकट शक्तीचे प्रतीक मानले आहे. त्यामुळे हिंदु धर्मामध्ये स्त्रीला मानाचे स्थान दिले जाते. स्त्रियांचे केस लांब असणे, हे शालीनतेचे द्योतक असल्याने स्त्रियांनी केस कापणे, हे हिंदु धर्माच्या विरुद्ध आहे. सत्त्वगुणप्रधान असणार्या स्त्रीचे केस बहुतांशी लांब असतात. केसांच्या टोकांतून प्रक्षेपित होणार्या शक्तीरूपी सत्त्व-रजोलहरींमुळे एक प्रकारे स्त्रीचे वाईट शक्तींपासून रक्षणच होत असते; म्हणून सहसा स्त्रियांनी केस कापणे, हे निषिद्ध किंवा अपवित्र मानले जाते.
याउलट ‘पुरुष’ हे कार्यरत शक्तीचे प्रतीक असल्याने कुटुंबीय मृत झाल्यानंतर त्याच्या क्रियाकर्माचे उत्तरदायित्वही सर्वथा पुरुषांकडेच येते; म्हणून पुरुष पूर्णतः केस कापतात.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ९.८.२००४, दुपारी २.५१)