केसांचे क्षौरकर्म (केस कापणे) या विधीविषयीची माहिती या लेखात पाहू.
धार्मिक संस्कारांच्या दृष्टीने आणि रूढीप्रमाणे बाळ एक वर्षाचे होत असतांना किंवा झाल्यावर त्याचे जावळ काढतात. तसेच तिसर्या, चौथ्या किंवा पाचव्या वर्षी (पाठभेद – पहिल्या, दुसर्या, तिसर्या किंवा पाचव्या वर्षी) शुभघटिका पाहून चौलकर्म (चूडाकर्म, शेंडी ठेवणे) हा सोळा संस्कारांपैकी एक संस्कार करतात.
(जावळ, चौलकर्म, शिखा (शेंडी) ठेवण्याचा उद्देश, तसेच ब्राह्मणाने शेंडीला गाठ मारण्याचे महत्त्व यांविषयी अधिक विवेचन सनातनच्या ‘सोळा संस्कार’ या ग्रंथात केले आहे. – संकलक)
केसांसंबंधीच्या काही कृतींचे विवेचन पुढे केले आहे.
१. क्षौरकर्म (केस कापणे)
१ अ. क्षौरकर्म करण्यासंबंधीचे काही नियम
१. ‘योग्य तिथीला करावे.
२. विधी-अंतर्गत मंत्रोच्चारांसहित करावे.
३. योग्य व्यक्तीकडून करावे.
४. योग्य व्यक्तीचे करावे.
१ आ. क्षौरकर्म का करावे ?
वरील नियमांचे पालन केल्यास केसांच्या मुळांशी असलेली काळी शक्ती जास्त प्रमाणात नष्ट होण्यास साहाय्य होते. व्यक्तीच्या डोक्यावरील त्वचा संवेदनशील असते. केस काढल्यानंतर या त्वचेचा वातावरणाशी सरळ (थेट) संपर्क येतो आणि त्यामुळे वातावरणात कार्यरत असणार्या देवता अन् ईश्वरी चैतन्य यांच्या लहरी सहस्रारचक्रावाटे जास्त प्रमाणात ग्रहण केल्या जातात. देवता आणि चैतन्य यांच्या लहरी ग्रहण केल्यामुळे मन अन् बुद्धी यांची सात्त्विकता वाढण्यास साहाय्य मिळते. त्यामुळे मन आणि बुद्धी यांवर काळ्या शक्तीचे आवरण (टीप १) येण्याची शक्यता उणावते. त्यामुळे धार्मिक विधी लक्षपूर्वक, अचूक आणि भावपूर्णरीत्या करणे यजमानांना शक्य होते; म्हणून मुंज अन् इतर विधी यांच्या वेळी क्षौरकर्म केले जाते.’
– ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, १७.५.२००७, दुपारी ३.४९)
टीप १ – वाईट शक्तींनी काळी शक्ती प्रक्षेपित केल्यामुळे व्यक्तीचे मन आणि बुद्धी यांच्याभोवती त्रासदायक स्पंदनांचे सूक्ष्म-आच्छादन निर्माण होते, त्याला ‘काळ्या शक्तीचे आवरण’ असे म्हणतात.
१ आ १. श्राद्धाच्या वेळी क्षौरकर्म का करतात ? (श्राद्धाच्या वेळी लिंगदेहावरील पापाचा प्रभाव श्राद्धाच्या ठिकाणी पसरणे, पापाच्या भारापासून मुक्त करण्यासाठी आणि वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून जिवाचे संरक्षण होण्यासाठी क्षौरकर्म केले जाणे)
‘ज्या जिवाचे अंत्यसंस्कार अथवा श्राद्ध केले जाते, त्या जिवाच्या लिंगदेहावर पापाचा प्रभाव असतो. श्राद्धाच्या वेळी लिंगदेहावरील पापाचा प्रभाव श्राद्धाच्या ठिकाणी पसरतो. त्यामुळे श्राद्धाच्या ठिकाणचे वातावरण उदास आणि भकास जाणवते. व्यक्तीचे केस रज-तमप्रधान असल्याने ते काळी शक्ती अन् पाप यांच्या लहरी आकृष्ट करण्यात सर्वांत अग्रेसर असतात. पापाच्या लहरी ग्रहण होऊन श्राद्ध करणार्या व्यक्तीच्या डोक्यावरील पापाचा भार वाढतो, तसेच काळ्या शक्तीच्या लहरी केसांत आकृष्ट होऊन वाईट शक्तींच्या आक्रमणांचे प्रमाणही वाढण्याची शक्यता असते. पापाच्या भारापासून मुक्त करण्यासाठी आणि वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून जिवाचे संरक्षण होण्यासाठी धर्मशास्त्रात अंत्यसंस्कार करणार्या अन् श्राद्ध करणार्या व्यक्तीला क्षौरकर्म करण्यास सांगितले आहे.’
– ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, १२.११.२००७, रात्री ११.३०)
१ ई. क्षौरकर्म केल्यानंतर शरिरावरील दाब उणावून ईश्वरी तत्त्व ग्रहण करण्यात वाढ झाल्याचे जाणवणे
‘सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात २७ आणि २८.११.२००६ या दिवशी राक्षोघ्न यज्ञ करण्यात आला. या यज्ञाचे यजमान म्हणून सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली. यज्ञाच्या आधी दोन दिवस, म्हणजे २५.११.२००६ या दिवशी क्षौरकर्म करतांना माझ्या डोक्यावरील वाईट शक्तींची स्थाने नष्ट होत असल्याचे मला जाणवले. क्षौरकर्म केल्यानंतर माझ्या शरिरावरील दाब न्यून (कमी) झाला आणि शरीर हलके होऊन ईश्वरी तत्त्व (चैतन्य) ग्रहण करण्यात वाढ झाल्याचे मला जाणवले.’ – श्री. विनायक आगवेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
२. स्त्रिया आणि पुरुष यांनी केसांचा त्याग करणे
२ अ. स्त्रियांच्या टाळूचा मध्यभाग कोमल
असल्याने त्यावर वाईट शक्तींचे आक्रमण होणे, त्यामुळेच स्त्रियांनी
केसांचा त्याग करण्यास धर्मशास्त्राची मान्यता नसणे आणि पुरुषांना अनुमती असणे
‘स्त्रियांमध्ये प्रतिकारक्षमता अल्प असल्यामुळे त्यांच्यावर होणार्या वाईट शक्तींच्या आक्रमणांचे प्रमाण जास्त असते. त्यांच्या टाळूचा मध्यभाग मऊ असल्यामुळे वाईट शक्तींना टाळूवर आक्रमण करणे सोपे जाते. या आक्रमणांपासून स्त्रियांचे संरक्षण करण्यात केसांचा मोठा वाटा असतो. यामुळे धर्मशास्त्राने स्त्रियांना केस कापण्यास मान्यता दिलेली नाही. पुरुषांमध्ये प्रतिकारक्षमता अधिक असल्यामुळे, तसेच त्यांची टाळू मऊ नसल्यामुळे त्यांच्या डोक्यावर वाईट शक्तींनी आक्रमण करण्याचे प्रमाण अल्प असते. त्यामुळे धर्मशास्त्राने पुरुषांना केस कापण्याची आणि केसांचा त्याग करण्याची अनुमती दिलेली आहे.’
– ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, १२.११.२००७, रात्री ११.३०)
२ आ. संन्यासी आणि विधवा यांनी केस कापण्याचे कारण
‘केस वातावरणातील शिसे (लेड) ग्रहण करतात आणि मेंदूत पाठवतात. तसेच केस वातावरणातील लहरी ग्रहण करू शकतात आणि त्यामुळे उत्तेजना होऊ शकते; म्हणून संन्यासी, तसेच विधवा केस कापायच्या.’ – स्वामी विद्यानंद, मुंबई (वर्ष १९८८)
(संन्यासी वैरागी वृत्तीचे असतात, तर विधवांमध्ये वैराग्यभाव निर्माण होणे त्यांच्या कल्याणाचे असते. केस वातावरणातील रज-तम लहरी ग्रहण करत असल्याने संन्यासी अन् विधवा यांच्या आध्यात्मिक प्रगतीवर त्याचा अनिष्ट परिणाम होऊ नये, यासाठी संन्यासी आणि विधवा केस कापायच्या. – संकलक)