प्रस्तूत लेखात आपण केस विंचरण्याची योग्य पद्धत, केस विंचरण्यासाठी कंगव्यापेक्षा फणी उपयुक्त का इत्यादींविषयी जाणून घेऊ.
केस विंचरणे
१. केस विंचरण्यापूर्वी तेलाने तीन बोटांनी मंडल काढणे
म्हणजे रज-तमात्मक प्रक्रियेत होणार्या वाईट शक्तींच्या हस्तक्षेपाला अवरोध करणे
‘केस विंचरायला बसण्यापूर्वी पूर्वीच्या काळी पाटावर बसून पाटाच्या चारही कोपर्यांत कुलदेवतेचा नामजप करून तेलाचे मधल्या तीन बोटांनी तीन ठिपके दिले जात असत. या तीन ठिपक्यांतून एक प्रकारे पाटाभोवती रजोगुणी लहरींचे मंडल घालून ‘केस विंचरणे’, या रज-तमात्मक प्रक्रियेत होणार्या वाईट शक्तींच्या हस्तक्षेपाला अवरोध केला जात असे.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २९.१०.२००७, सकाळी ९.४६)
२. केस विंचरण्याची योग्य पद्धत
‘पूर्वीच्या स्त्रिया आंघोळ करण्यापूर्वी स्वतःच्या फणीघरापुढे (कुंकू, मेण, फणी ठेवण्याची आरसा असलेली लाकडी पेटी) बसून उजवा गुडघा पोटाशी घेऊन थोडे पुढे झुकून मगच फणीने केस व्यवस्थित विंचरत असत. पुढे झुकून फणी फिरवल्याने देहातील पंचप्राणही सतत जागृत अवस्थेत रहात. आंघोळ झाल्यानंतर कुंकू लावणे आणि विस्कटलेल्या केसांवरून फणी फिरवणे, या उद्देशाने आरशात पाहिल्याने स्वतःवर आरशाचे उपाय होऊन स्त्रीमध्ये रज-तमात्मक स्पंदने येण्याचे प्रमाण उणावत असे.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २९.१०.२००७, सकाळी ९.४६)
(सध्याच्या काळात ‘स्त्री फणीघरासमोर बसून फणीने केस विंचरत आहे’, हे दृश्य तसे दुर्मिळच आहे. वरील चित्रात ‘आई मुलीचे केस कंगव्याने विंचरत आहे’, अशी कल्पना केली आहे. सर्वसाधारणतः आजकाल केस विंचरण्यासाठी फणीपेक्षा कंगवाच वापरला जातो. त्यामुळे प्रचलित पद्धतीप्रमाणे या चित्रात मुलीचे केस कंगव्याने विंचरतांना दाखवले आहे. अर्थात कंगव्यापेक्षा फणीने केस विंचरणे उत्तमच आहे. याचे शास्त्रीय कारण या लेखात पुढे दिले आहे. – संकलक)
कंगवा नियमित धुणे आणि एकमेकांचा कंगवा न वापरणे यांचे महत्त्व
१. न धुतलेल्या कंगव्याने केस विंचरल्यास डोके आणि केस यांत काळी शक्ती येणे,
कपड्याच्या साबणाने कंगवा धुतल्यावर तो सूक्ष्मातून स्वच्छ झाल्याचे न वाटणे अन्
विभूतीच्या पाण्याने कंगवा धुतल्यावर त्यातील काळी शक्ती नष्ट होऊन त्यात चैतन्य निर्माण होणे
‘केस धुतल्यावर माझे डोके आणि शरीर यांतील काळी शक्ती नष्ट व्हायची. त्यामुळे त्रास न्यून व्हायचा. केस धुतल्यावर न धुतलेल्या कंगव्याने परत केस विंचरल्यास डोके आणि केस यांत पुन्हा काळी शक्ती येऊन त्रास होत असे. तेव्हापासून केस धुतल्यावर मी लगेच कंगवाही धुवू लागले. कपड्याच्या साबणाने कंगवा स्थुलातून स्वच्छ केला, तरी तो सूक्ष्मातून तितका स्वच्छ वाटायचा नाही. विभूतीच्या पाण्याने धुतल्यावरच त्यातील काळी शक्ती माझ्या शरिरातील काळ्या शक्तीसह नष्ट होत असल्याचे जाणवायचे. मग तो कंगवा पूर्ण स्वच्छ झाल्याचे वाटायचे. विभूतीच्या पाण्याने कंगवा धुतल्यामुळे त्यातील काळी शक्ती नष्ट होते आणि त्यात चैतन्य निर्माण होते. केस धुतल्यावर कंगवाही विभूतीच्या पाण्याने धुवावा, हे साधनेत आल्यावर माझ्या लक्षात आले.
२. त्रास नसलेल्या साधक मैत्रिणीचा कंगवा वापरणे, तो कंगवा वापरल्यावर
तिलाही त्रास होणे आणि त्या वेळी एकमेकांचे कंगवे किंवा वस्तू न वापरण्याचे महत्त्व लक्षात येणे
मार्च २००८ मध्ये माझा कंगवा हरवला. तेव्हा त्रास नसलेल्या साधक मैत्रिणीचा कंगवा मी २-३ दिवस वापरला. ती जेव्हा त्या कंगव्याने केस विंचरत असे, तेव्हा तिचे डोके जड होऊन तिला अस्वस्थ वाटायचे. त्रास असणार्या साधिकांच्या केसांमध्ये प्रचंड प्रमाणात काळी शक्ती साठत असल्याने त्यांनी केस विंचरलेला कंगवाही काळ्या शक्तीने भारित होतो, हे सिद्ध झाले. आध्यात्मिक त्रास असणार्यांनी एकमेकांचे कंगवे किंवा वस्तू का वापरू नयेत, हे त्या वेळी माझ्या लक्षात आले.
कंगवा (फणी) चैतन्यमय कसा करावा ?
१. कंगव्याची शुद्धी करण्याची आवश्यकता
केसांमधील रजतमात्मक लहरींचा प्रभाव कंगव्यावरही होत असतो; म्हणून कंगवा नेहमी स्वच्छ आणि चैतन्यमय ठेवावा. डोक्यावरून आंघोळ केल्यावर न धुतलेल्या किंवा शुद्धी न केलेल्या कंगव्याने केस विंचरू नयेत. कंगवा पुढील पद्धतीने स्थूल आणि सूक्ष्म दृष्ट्या स्वच्छ करावा.
१. केस विंचरून झाल्यावर कंगवा नेहमी पाण्याने धुवावा.
२. डोक्यावरून आंघोळ केलेल्या दिवशी केस विंचरण्यापूर्वी कंगवा साबण लावून धुवावा. त्यानंतर तो खडे मीठ, गोमूत्र किंवा विभूती यांचे मिश्रण असलेल्या पाण्याने धुऊन उन्हात वाळवावा.
३. कंगवा उदबत्तीच्या वेष्टनात ठेवावा.
४. प्रतिदिन कंगव्याला विभूती लावावी.
५. कंगवा आणि तो ठेवत असलेल्या उदबत्तीच्या वेष्टनाला उदबत्तीचा धूर दाखवावा.
५ अ. केस विंचरल्यावर कंगवा काळ्या शक्तीने भारित होणे आणि तो उदबत्तीच्या वेष्टनात ठेवल्यावर चैतन्यमय झाल्याने पुन्हा वापरता येणे : केस विंचरल्यावर माझा कंगवा काळी शक्तीने भारित झाल्याचे जाणवते. त्या कंगव्याने पुन्हा केस विंचरतांना केसांत काळी शक्ती येते. यावर उपाय म्हणून केस विंचरल्यावर मी कंगवा ‘उदबत्ती’च्या वेष्टनात (पाकिटात) ठेवते. तेव्हा कंगव्यातील काळी शक्ती नष्ट होऊन त्यात चैतन्य निर्माण होते. पुन्हा केस विंचरतांना कंगव्यातील चैतन्य केसांमध्ये जाऊन त्यांतील काळी शक्ती बाहेर पडू लागते. तेव्हा मला डोके हलके झाल्याचे जाणवते. ३-४ दिवसांनी मात्र त्या उदबत्तीच्या वेष्टनावरही काळ्या शक्तीचे आवरण येते. अशा वेळी ते विभूती लावून किंवा देवांच्या चित्रांजवळ ठेवून भारित केल्यास त्यात चैतन्य निर्माण होते.
५ आ. उदबत्तीचा धूर दाखवण्याचे महत्त्व
१. कंगवा उदबत्तीतून निघणार्या धुरावर धरल्यावर वाईट स्पंदने आणि काळी शक्ती नष्ट होत असल्याचे जाणवणे : ऑक्टोबर २००९ मध्ये मी वापरत असलेला कंगवा उदबत्तीतून निघणार्या धुरावर धरला. कंगव्याच्या प्रत्येक दात्याला धुराचा स्पर्श होईल, अशा पद्धतीने तो उदबत्तीतून निघणार्या धुरावर फिरवला. तेव्हा त्या कंगव्यातील माझ्याशी संबंधित वाईट स्पंदने आणि काळी शक्ती नष्ट होत असल्याचे जाणवले.
२. डोके आणि केस यांतील काळी शक्ती बाहेर पडून हलके वाटू लागणे : कंगव्याची शुद्धी झाल्यावर त्याचा परिणाम म्हणून माझ्यातील मांत्रिकाचे प्रकटीकरण होऊन तो मान हलवत होता. माझे डोके आणि केस यांतील काळी शक्ती बाहेर पडत होती. तेव्हा डोके थरथर कापत होते. नंतर मला हलके वाटू लागले.
३. प.पू. डॉक्टरांनी उपायांसाठी दिलेल्या कंगव्यालाही धूर दाखवल्यावर काळ्या शक्तीच्या आवरणाचे विघटन होणे : प.पू. डॉक्टरांनी मला त्यांनी वापरलेला कंगवा उपायांसाठी दिला आहे; परंतु मला त्रास देणारा मांत्रिक त्यावरही काळ्या शक्तीचे आवरण आणतो. त्यामुळे मी उपायांसाठी दिलेल्या कंगव्यालाही वरीलप्रमाणे धूर दाखवला. त्यामुळे कंगव्याच्या भोवती मांत्रिकाने निर्माण केलेल्या काळ्या शक्तीच्या आवरणाचे विघटन होत असल्याचे मला जाणवले.
६. कंगवा ठेवण्याच्या उदबत्तीच्या वेष्टनाची शुद्धी का करावी ?
अ. कंगव्यातील काळी शक्ती उदबत्तीच्या वेष्टनातही साठत असल्याने त्याचीही शुद्धी करणे आवश्यक असणे : मी माझा कंगवा उदबत्तीच्या वेष्टनात ठेवते. वेष्टनाची शुद्धी करण्याच्या उद्देशाने त्यालाही उदबत्तीचा धूर दाखवला. तेव्हा वेष्टनाच्या कडेने धूर दाखवण्यापेक्षा त्याच्या पोकळीत धूर दाखवल्यावर वरीलप्रमाणेच अनुभूती आली. यावरून कंगव्यातील काळी शक्ती उदबत्तीच्या वेष्टनातही साठत असल्याने त्याचीही शुद्धी करणे आवश्यक आहे, हे सिद्ध झाले.’
– कु. गायत्री बुट्टे, गोवा.
कंगव्यापेक्षा फणी उपयुक्त
१. कंगवा
‘आता सगळीकडे कंगवेच प्रचलित असल्याने आणि कंगवा मध्यभागी पकडून केस विंचरावे लागत असल्याने केसांतून उसळणार्या रजतमात्मक लहरी हातांवर येऊन संपूर्ण देहच रज-तमाने भारित होत आहे.
२. फणी
पूर्वीच्या काळी कंगवा न वापरता फणी वापरली जात असे. फणी दोन्ही हातांच्या पोकळीत धरायला सोपी असल्याने केसांवर फणी फिरवतांना आपला हात त्या फणीच्या दात्यांच्या कार्यक्षेत्रात न आल्याने केसांतून प्रक्षेपित होणार्या रजतमात्मक लहरींचा उत्सर्जकयुक्त संपर्क आपोआपच टाळला जात असे.
(सध्या फणीचा उपयोग केवळ उवा काढण्यासाठी करतात. – संकलक)
३. फणीने केस विंचरल्यावर काळी शक्ती वेगाने खेचली जाऊन बाहेर टाकली जाणे
आणि काळ्या शक्तीचे आवरण न्यून होणे; परंतु मांत्रिकाने तशी कृती करण्यास टाळाटाळ करणे
`कंगव्याने केस विंचरण्यापेक्षा फणीने केस विंचरल्यावर काळी शक्ती वेगाने खेचली जाऊन बाहेर टाकली जाते. त्यामुळे मन, बुद्धी आणि डोके यांवरील काळ्या शक्तीचे आवरण न्यून होऊन सुचण्याचे प्रमाण वाढते. कंगव्याने केस विंचरल्यावर काळ्या शक्तीचे आवरण न्यून होण्याचे प्रमाण फणीने केस विंचरल्याच्या तुलनेत अल्प आहे. हे अनुभवल्यामुळे मी फणीनेच केस विंचरण्याचे ठरवले; पण मांत्रिक मला तसे करू देत नाही. माझ्याकडून टाळाटाळ होते आणि कंगव्यानेच केस विंचरले जातात.’
– कु. गिरिजा, गोवा.
१. लाकडी फणीघराचे महत्त्व
‘लाकडी फणीघरातच ही सामुग्री (कुंकू, मेण, फणी) ठेवल्याने लाकडातील सुप्त अग्नीमुळे ती सामुग्री शुद्धही रहात असे.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २९.१०.२००७, सकाळी ९.४६)