अमावास्या अथवा पौर्णिमेला केस कापू नये’ ही काहींना अंधश्रद्धा वाटते; परंतु यामागील अध्यात्मशास्त्रीय कारण समजून घेतल्यास ते लक्षात येईल.‘स्त्रियांनी भुवया का कोरू नयेत’, ‘केस कापल्यावर ते मोकळे का सोडू नयेत’, हिंदु धर्माने ‘पुरुषांनी केस कापावे’ तर ‘स्त्रियांनी कापू नये’, असे का सांगितले आहे, यांविषयीचे अध्यात्मशास्त्रीय विवेचन प्रस्तूत लेखात पाहू.
१.पुरुषांनी केस कापणे
१ अ. केस कापणे ही पुरुषत्वाचे संवर्धन करण्यासाठी पूरक कृती असणे
‘पुरुषत्व म्हणजेच सत्त्वशीलरूपी गंभीरता, तर स्त्रीत्व म्हणजेच रजोगुणरूपी कार्यरत शक्तीरूपी गतीमानता. पुरुष हे शिवस्वरूपाचे द्योतक आहे. शिवस्वरूपता म्हणजेचअंतर्मुखता. अंतर्मुखतेत अकार्यरत शक्तीचे प्रमाण जास्त असते. या अवस्थेत प्रक्षेपणात्मक कार्याचे प्रमाण असते. पुरुषांमध्ये स्त्रीपेक्षा मुळातच रजोगुणाचे प्रमाण अल्प असते. हिंदु धर्मात स्वतःतील शिवत्वाचे, म्हणजेच पुरुषत्वाचे संवर्धन करण्यास पूरक कृती, म्हणजेच केस न वाढवणे असे सांगितले आहे.
१ आ. कोणत्या दिवशी केस कापावेत अन् कोणत्या दिवशी कापू नयेत ?
१ आ १. शक्यतो अशुभ दिवशी, पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना, टळटळीत दुपारी, सायंकाळी, तसेच रात्रीच्या वेळी केस न कापण्यामागील शास्त्र
अ. शक्यतो अशुभ दिवशी, तसेच पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना केस कापू नयेत; कारण या दिवशी वायूमंडलात रज-तमात्मक लहरींच्या कार्याचे प्रमाण अधिक असते.
आ. केस कापल्यानंतर त्यांची टोके उघडी झाल्याने केशनलिकांतून रज-तमात्मक लहरी सहज केसांत संक्रमित होऊन केसांच्या मुळाशी घनीभूत होऊन राहू शकतात.
इ. यामुळे केसांच्या मुळांशी वाईट शक्तींच्या स्थानांची निर्मिती होते; म्हणून रज-तमाचे प्राबल्य असलेल्या दिवशी जाणूनबुजून केस कापू नयेत.
ई. शक्यतो सायंकाळच्या वेळी किंवा रात्री, तसेच टळटळीत दुपारच्या वेळी केस कापू नयेत; कारण हा काळही रज-तमात्मक लहरींना जागृती देणारा असतो.
१ आ २. रामनवमी, हनुमानजयंती यांसारख्या उत्सवांच्या दिवशी केस कापू नयेत !
रामनवमी, हनुमानजयंती यांसारख्या उत्सवांच्या दिवशी केस कापू नयेत; कारण या दिवशी वायूमंडलात सात्त्विक लहरींचे प्रमाण अधिक असल्याने केस कापण्यासारखी अशुभ कृती करून वायूमंडलात रज-तम पसरवण्याचे कार्य करणे, यातून जिवाला समष्टी पापाला सामोरे जावे लागते.
१ आ ३. जन्मवार आणि जन्मतिथी या दिवशी केस कापू नयेत !
जन्मवार आणि जन्मतिथी या दिवशीही केस कापू नयेत; कारण या दिवशी आपल्या प्रकृतीशी संबंधित जोडल्या गेलेल्या ग्रह, नक्षत्र, तसेच तारका मंडलातून येणार्या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची आपली क्षमता न्यून होऊन या दिवशी उपास्यदेवतेकडून मिळणारा चैतन्याचा लाभ उणावतो आणि आपली आध्यात्मिक स्तरावर हानी होते. तसेच इतरांच्या आशीर्वादातून मिळणार्या शुभफलातही न्यूनता येते.
१ आ ४. निष्कर्ष
शुभदिनी केस कापण्यासारखी कृती करू नये; कारण या दिवशी अशुभ कृत्य केल्याचे समष्टी पातक लागते, तसेच अशुभ दिनीही अशी कृती करू नये; कारण या कृतीतून रज-तमात्मक लहरी देहात येण्याचे प्रमाण अधिक असते. इतर वेळी अशुभ वेळ टाळून केस कापण्यास धर्माने संमती दिली आहे.
१ इ. संन्याशाने अमावास्या किंवा पौर्णिमा या दिवशी क्षौरकर्म करण्याचे महत्त्व
अमावास्या किंवा पौर्णिमा या दिवशी संन्याशाने मात्र क्षौरकर्म करण्यास सांगितले आहे; कारण क्षौरामुळे मस्तकावरील रज-तमात्मक अशा केशसंभाराचे ओझे उतरण्यास साहाय्य मिळते. तसेच मस्तकावरील केशरंध्रांची क्षौरविधी कर्मात म्हटल्या जाणार्या मंत्रांमुळे मुळापासून शुद्धी होण्यास साहाय्य मिळाल्याने संन्याशातील तेजतत्त्वात वृद्धी होण्यास साहाय्य होते; कारण संन्यासधर्मात सतत केलेल्या मंत्रोक्त आचरणानेच हे शक्य होते. यासाठी संन्यासधर्माचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. सर्वसामान्यांना मात्र हा नियम लागू नाही.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, अधिक वैशाख कृ. १, कलियुग वर्ष ५११२ ड२९.४.२०१०़, दुपारी १.५१)
२. स्त्रीने केस कापणे
२ अ. स्त्रियांनी केस कापल्यामुळे आखुड झालेल्या
केसांमुळे होणारी हानी – वायूमंडलातील त्रासदायक स्पंदने आकृष्ट होणे
खालील सूक्ष्म-चित्र मोठ्या आकारात पहाण्यासाठी चित्रावर ‘क्लिक’ करा !
‘स्त्रियांनी केस कापले असता केसांच्या बोथट टोकांच्या हालचालींतून निर्माण होणारी त्रासदायक कंपनशक्ती वायूमंडलातील त्रासदायक स्पंदनांना आकृष्ट करून स्वतःत घनीभूत करते. या घनीभूत काळ्या शक्तीमुळे कालांतराने स्त्रीला वाईट शक्तींच्या त्रासाला सामोरे जावे लागते.’- एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १०.७.२००६, सायं. ७.२३ आणि २१.५.२००८, दुपारी १२.०७)
२ अ १. स्त्रीने कापलेले केस मोकळे सोडणे
`केस मोकळे सोडण्यामुळे केसांच्या हालचालीतील रजोगुणी नादस्पंदनांकडे वायूमंडलात रज-तम कण, तसेच त्रासदायक लहरी आकृष्ट होतात आणि त्या काही प्रमाणात केसांत घनीभूत होऊन लगेचच बाह्य वायूमंडलात प्रक्षेपित होतात. त्यामुळे केस मोकळे सोडलेल्या जिवाभोवतीचे वायूमंडल अतिशय त्रासदायक असते. अशा जिवाच्या सहवासात इतरांनाही या त्रासदायक स्पंदनांचा त्रास होण्याची शक्यता असते.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ज्येष्ठ कृष्ण द्वादशी, कलियुग वर्ष ५११०, १.७.२००८, सकाळी ११.१४ आणि आषाढ शुद्ध चतुर्थी, ६.७.२००८, सकाळी ११.२० आणि सायं. ७.४३)
२ आ. तमोगुणी वृत्तीमुळे काही स्त्रियांकडून पुरुषांप्रमाणे केस कापण्याची कृती होणे
आणि त्या कृतीचा त्यांचे आचार-विचार, तसेच वागणे-बोलणे-चालणे यांवर परिणाम होणे
‘व्यक्तीच्या वृत्तीप्रमाणे तिच्याकडून कृती घडते, तसेच त्या कृतीचा तिचे मन आणि बुद्धी यांवर तसाच परिणाम होतो अन् तिची तशी वृत्ती बनते. यानुसार तमोगुणी वृत्तीमुळे स्त्रियांकडून पुरुषांप्रमाणे केस कापण्याची कृती होते आणि त्या कृतीचा तिचे मन अन् बुद्धी यांवर परिणाम होतो. त्यामुळे त्यांचे आचार-विचार, तसेच वागणे-बोलणे-चालणे हे हळूहळू पालटत (बदलत) जाते. मी हे प्रत्यक्षात अनुभवले आहे. पूर्वी मी पुरुषांप्रमाणे केशरचना करत असे. त्यामुळे माझे विचार-चालणे-बोलणे यांमध्ये मुलांप्रमाणे पालट होऊ लागले; पण मला प्रत्यक्षात तसे आवडत नसे.’ -कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था (श्रावण शु. ६, कलियुग वर्ष ५१११, २७.७.२००९)
२ आ १. स्त्रीने केस कापल्यामुळे होणारी सूक्ष्मातील हानी दर्शवणारे चित्र
टीप – चैतन्यकण सूक्ष्म असल्याने ते न कापलेल्या केसांत प्रवेश करू शकतात, तर काळ्या शक्तीचे कण चैतन्यकणांच्या मानाने मोठे असल्यामुळे त्यांना न कापलेल्या केसांत प्रवेश करता येत नाही. काळ्या शक्तीचे कण कापलेल्या केसांच्या टोकांतून प्रवेश करू शकतात.
२ इ. गुरूंनी सहज बोलण्यातून धर्माचरणाचा संदेश देणे
आणि साधिकेने त्यानुसार कधीही केस न कापता धर्मपालन करणे
‘१९९५ मध्ये प.पू. भक्तराज महाराज यांच्या देहत्यागापूर्वी आम्ही काही साधक पन्हाळा, मंडल (जिल्हा) कोल्हापूर येथे त्यांच्या दर्शनास गेलो होतो. त्या दिवसांत माझे केस पुष्कळ गळत होते. माझे यजमान आधुनिक वैद्य (डॉ.) पांडुरंग मराठे यांनी यावर उपाय म्हणून केस कापण्यास सांगितले; म्हणून मी केस खांद्यापर्यंत कापले होते. आमच्यासमवेत असलेल्या दुसर्या एका साधिकेने केस कानापर्यंत कापले होते. यावरून बोलता बोलता प.पू. डॉक्टर सहज म्हणाले, ‘‘स्त्रिया सोयीसाठी केस कापले म्हणतात; पण ते ‘फॅशन’साठीच कापलेले असतात.’’ त्यानंतर मी पुन्हा कधीही केसांना कात्री लावली नाही.’
– सौ. मंगला पांडुरंग मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(केस न कापण्याविषयीचे सूत्र समजल्यावर सौ. मराठे यांनी नंतर कधीही केस कापले नाहीत. धर्माचरणाविषयी प्रत्येक हिंदु स्त्रीने असा निश्चय करायला हवा. – संकलक)
३. स्त्रियांनी भुवया का कोरू नयेत ?
३ अ. स्त्रियांनी भुवया कोरल्यामुळे त्यांना रज-तमात्मक लहरींमुळे विविध त्रास होण्याची शक्यता असणे
१. ‘स्त्रियांनी भुवया कोरल्याने केसांची टोके बोथट होतात. बोथट टोके वेगाने देहातील रज-तमात्मक लहरींचे वायूमंडलात प्रक्षेपण करू शकतात, तसेच तितक्याच संवेदनशीलपणे वायूमंडलातील रज-तमात्मक स्पंदने ग्रहण करून स्वतःत घनीभूत करू शकतात.
२. भुवया कोरतांना उपटून टाकलेल्या केसांची रंध्रे वायूमंडलाच्या जास्त प्रमाणात संपर्कात आल्याने या मोकळ्या केशरंध्रांतून अल्प कालावधीत रजतमात्मक लहरी देहात प्रवेश करू शकतात.
३. सतत भुवया कोरल्याने कालांतराने मस्तिष्कपोकळी रज-तमात्मक लहरींनी भारित होऊ लागते आणि त्या ठिकाणी त्रासदायक स्पंदनांचे स्थान बनते. या त्रासदायक स्पंदनांचा परिणाम होऊन बुद्धीवर सतत आवरण येणे, काहीही न सुचणे, अचानक अस्वस्थ वाटणे, डोळ्यांचे त्रास चालू होणे, तीव्र डोकेदुखी, डोळ्यांच्या वरच्या भागाला सूज येऊन हळूहळू सगळे तोंड सुजणे, असे त्रास होऊ शकतात. कालांतराने मस्तिष्कपोकळीतील त्रिपुटीतून या त्रासदायक लहरी संपूर्ण देहात पसरतात आणि याचा मनोमयकोषावरही परिणाम होऊ लागतो. अशा प्रकारे भुवया कोरल्याने जास्त प्रमाणात वाईट शक्तींच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने स्त्रियांनी भुवया कोरणे टाळावे.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ज्येष्ठ पौर्णिमा, कलियुग वर्ष ५११० १८.६.२००८, दुपारी १.३८)
४. साधिकेने केस वाढवल्यावर तिला आलेल्या अनुभूती
४ अ. ‘धर्मशास्त्रानुसार केस कापणे अयोग्य आहे’, हे कळल्यावर ते वाढवणे
‘वर्ष २००४ मध्ये ‘धर्मशास्त्रानुसार मुलींनी केस कापणे अयोग्य आहे’, हे मला समजले. हे कळल्यावर मी केस वाढवायचे ठरवले. त्या वेळीही केस वाढवणे मला आतून (तीव्र आध्यात्मिक त्रासामुळे) नकोसे वाटत होते. २००९ मध्ये माझे केस कटीच्या (कंबरेच्या) खाली एक वीत अंतरापर्यंत लांब होऊन मी त्याची वेणी घालू लागले.
४ आ. स्वप्नात केस कोणीतरी वेडेवाकडे कापल्याप्रमाणे दिसणे,
ते दृश्य खरे वाटणे आणि मांत्रिकाला केस वाढवलेले आवडत नसल्याचे लक्षात येणे
मी केस वाढवल्यापासून माझ्यातील मांत्रिकाला माझा फार राग यायचा. कधी कधी मांत्रिकाचे माझ्यावरील नियंत्रण वाढल्यावर मला केस कापण्याची तीव्र इच्छा होऊन अस्वस्थ वाटायचे. स्वप्नात माझे केस कोणीतरी वेडेवाकडे कापल्याचे मला दिसायचे. त्यामुळे मी विद्रूप झाल्याचे दिसायचे. काही वेळा मला स्वप्नात ते दृश्य खरे आहे, असे वाटायचे. ‘माझे केस कोणी आणि कधी कापले, याविषयी मला काहीच कसे कळले नाही’, याची मला भीती वाटायची.’
– कु. गिरिजा, गोवा.
या लेखाचा दुसरा भाग वाचण्यासाठी ‘केस कापणे (भाग २)’ यावर ‘क्लिक’ करा !