‘केसांचे सौंदर्य राखणे, यासह केसांवर होणारी वाईट शक्तींची आक्रमणे टाळण्यासाठी केसांची काळजी घेणे आवश्यक आहे. केवळ केसांच्या सौंदर्याची जोपासना करतांना ती रज-तम पद्धतीने केल्यास केसांची नैसर्गिकता नष्ट होऊ शकते. केसांची नैसर्गिकता जपून त्यांचे सौंदर्यवर्धन करणे, म्हणजे केसांची सात्त्विक पद्धतीने जोपासना करणे होय. हिंदु संस्कृतीमध्ये केसांची सात्त्विक पद्धतीने जोपासना करण्याविषयी सांगितले आहे. शिकेकाई, रिठा, लिंबू, आवळा आणि फळांच्या वाळलेल्या साली यांचा केस धुण्यासाठी वापर केल्याने केसांतील रज-तम उणावून केस सात्त्विक होण्यास साहाय्य मिळते. केसांतील सात्त्विकतेचे प्रमाण वाढल्यामुळे त्यांची प्रतिकारक्षमताही वाढते आणि त्यामुळे केसांवर वाईट शक्तींच्या आक्रमणांचे प्रमाण घटते.’
– ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, १७.५.२००७, दुपारी ३.४९)
निरोगी केसांची काळजी कशी घ्याल ?
- अंघोळीपूर्वी केस विंचरावेत.
- स्त्रियांनी मध्यभागी भांग पाडावा.
- आंबाडा किंवा वेणी अशी सात्त्विक केशरचना करावी.
- अमावास्या आणि पौर्णिमा या दिवशी केस धुऊ नयेत.
- केस धुण्याच्या पाण्यात गोमूत्र किंवा विभूती टाकावी.
- प्राणायाम, शीर्षासन, मत्स्यासन यांमुळे डोक्याकडे रक्तप्रवाह जाऊन केसांचे आरोग्य सुधारते.
- मानसिक ताणाने केस गळत असतील तर शवासन करणे उपयुक्त ठरते.
- रसायनमिश्रित द्रव्याने केस धुण्याऐवजी नैसर्गिक द्रव्यांनी (शिकेकाई, रिठा, लिंबू, आवळा, जास्वंद, कोरफड) केस धुवावेत.
- केस निरोगी रहाण्यासाठी आहारात तिळाचे किंवा खोबरेल तेल, आवळा, भोकर, आंबा, नारळ, चोळी यांचा समावेश करावा, अतिरिक्त मीठ खाणे टाळावे.
केसांची आध्यात्मिक निगा कशी राखाल ?
आध्यात्मिदृष्ट्या केसांची काळजी कशी घ्यावी, याविषयी या लेखातून जाणून घेऊ.
केसांची रचना सात्त्विक असणे, केसांची निगा व्यवस्थित ठेवणे, नामजप करत केस विंचरणे, गोमूत्र, तसेच विभूतीच्या पाण्याने केस धुणे, कापराच्या तेलाने केसांच्या मुळांना मर्दन (मालीश) करणे, तसेच बसून केस विंचरणे, यांसारख्या कृती केसांच्या आचाराअंतर्गत मानल्या जातात. यांमुळे केसांचे आध्यात्मिक आरोग्य चांगले राहिल्याने त्या जिवाला केसांच्या माध्यमातून वाईट शक्तींचा त्रास होण्याची शक्यता उणावते.
– सूक्ष्म-जगतातील ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, कार्तिक शुद्ध सप्तमी, कलियुग वर्ष ५१११ (२५.१०.२००९), सकाळी ११.४६)
केसांतील रंगद्रव्यरूपी चेतना नष्ट झालेली असल्यास
मेंदी लावल्यावर केस तांबूस होणे आणि चेतना नष्ट झालेली नसल्यास केस काळे होणे
‘ज्या केसांतील रंगद्रव्यरूपी चेतना नष्ट झालेली असते, ते केस बाह्यतः मेंदीचा नैसर्गिक रंगरूपी गुणधर्म ग्रहण करतात; म्हणून ते कृत्रिम रंगाचे, म्हणजेच चेतनाहीन रूपात तांबूस रंगाचे दिसतात; परंतु ज्या केसांमध्ये थोडीतरी रंगद्रव्यरूपी चेतना शिल्लक असते, त्यांच्यातील कार्यकारी रजोगुण मेंदीतील रजोगुणाच्या साहाय्याने वाढल्याने केसांतील रंगद्रव्यात वृद्धी होऊन हे केस कालांतराने काळे दिसू लागतात. रंगद्रव्यरूपी चेतना केसांत शिल्लक असेल, तरच त्यात अंतर्गत पालट घडतो आणि ते काळ्या रंगाचे दिसतात. नाहीतर आधीच मृतवत् झालेले केस मेंदीच्या बाह्य रंगात्मक गुणस्वरूप स्पर्शाने तांबूस रंगाचे दिसतात.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, भाद्रपद कृष्ण एकादशी, कलियुग वर्ष ५११०, २४.९.२००८, सायं. ६.४५)
केसांना तेल लावणे
अंघोळ झाल्यावर केसांना तेल लावावे. केस किंचित ओले असतांना तेल लावल्यास ते चांगले लागते. तेल लावतांना ते केसांच्या मुळांना लागेल असे लावावे. यामुळे केस गळणे आणि केस पांढरे होणे न्यून होते. सध्या पेठेत (बाजारात) तेलकटपणा नसलेली केसांसाठीची तेले मिळतात. त्यांमध्ये वनस्पती तेल नसून खनिज तेल असते. अशा तेलांचा केसांसाठी काहीही लाभ नसतो. ‘डबल रिफाइण्ड’, ‘ट्रिपल रिफाइण्ड’ यांसारखी तेलेही केसांना अपायकारक असतात. त्यांपेक्षा घाण्यावर काढलेले शुद्ध खोबरेल, तिळाचे किंवा सरकीचे तेल केसांना लावावे.
१. केसांना नियमित तेल लावण्याने होणारे लाभ
अ. ‘ज्ञानतंतूंचे बल, इच्छावर्ती स्नायू आणि अवयवांची शक्ती वाढते.
आ. दृष्टी सुधारते, गाल आणि डोळे यांस बलप्राप्ती होते.
इ. शिरोरोग आणि मज्जारोग यांवर उपयुक्त आहे.
ई. डोक्यावरील केसांची वाढ चांगली होऊन ते लांब, काळे मृदु आणि सशक्त होतात.
उ. मुखाची कांती टवटवीत होते. तेथील सुरकुत्या नाहीशा होऊन त्वचारोग आणि तारुण्यपीटिका उद्भवत नाहीत.
ऊ. अकाली केस पिकणे आणि टक्कल पडणे यांस आळा घातला जातो.
ए. डोकेदुखी होत नाही.
ऐ. डोक्यामध्ये खवडे होत नाहीत आणि खाज सुटत नाही.
ओ. निद्रा चांगली / शांत लागते.’
२. न्हायल्यानंतर लगेच तेल लावण्याचे लाभ
अ. केसांना तेल लावल्यामुळे केशवाहिन्यांतून होणार्या आपतत्त्वात्मक लहरींच्या संक्रमणाला जडत्व प्राप्त होणे, तसेच केसांच्या मुळांशी मारक तत्त्व निर्माण झाल्याने वाईट शक्तींचा त्रास होण्याची शक्यता उणावणे
संकलक : सध्या स्त्रिया न्हायल्यावर केस सुकल्यानंतर केसांना तेल लावतात; मात्र पूर्वी स्त्रिया न्हायल्यावर केसांना लगेच तेल लावत असत, यामागचे कारण काय ?
एक विद्वान :
१. केस बराच काळ ओले राहिल्यास वाईट शक्तींचा त्रास होण्याची शक्यता वाढणे
‘न्हायल्यावर पाण्यातील आपतत्त्वाच्या स्पर्शाने केस बाह्य वायूमंडलातील स्पंदने ग्रहण करण्यात अतिशय संवेदनशील बनतात. यामुळे बराच काळ केस ओले राहिल्यास शरीर बाह्य वायूमंडलातील त्रासदायक स्पंदने वेगाने ग्रहण करून वाईट शक्तींच्या त्रासाला बळी पडू शकते.
२. केसांना तेल लावल्यावर वाईट शक्तींचा त्रास होण्याची शक्यता उणावणे
केसांना तेल लावल्यावर केशवाहिन्यांतून होणार्या आपतत्त्वात्मक लहरींच्या संक्रमणाला जडत्व प्राप्त झाल्याने देहाच्या, तसेच केसांच्या बाह्य वायूमंडलातील त्रासदायक स्पंदनांना त्वरित प्रतिसाद देण्याच्या क्षमतेत घट झाल्याने वाईट शक्तींचा त्रास होण्याची शक्यता उणावते.
३. केसांना तेल चोळून लावल्याने केसांच्या मुळांशी मारक तत्त्व निर्माण होण्यास साहाय्य मिळणे
केसांना तेल चोळून लावल्याने तेलाच्या घर्षणाने केसांच्या मुळांशी उष्णता निर्माण झाल्याने केसांत मारक तत्त्व निर्माण होण्यास साहाय्य मिळते. मारक तत्त्वाच्या निर्मितीमुळे वाईट शक्तींच्या त्रासापासून केसांना सुरक्षित ठेवणे शक्य होते; म्हणून पूर्वीच्या स्त्रिया न्हायल्यावर लगेचच केसांना तेल लावत असत.’
– (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, आश्विन शुद्ध तृतीया, कलियुग वर्ष ५१११, २१.९.२००९, दुपारी ४.०७)
३. डोक्याला तेल लावल्यावर आलेल्या अनुभूती
अ. डोक्याला तेल लावल्यावर तेथील काळी शक्ती बाहेर पडणे, मांत्रिकाने केसांना तेल लावू न देणे आणि आठवडा किंवा १५ दिवसांतून एकदाच तेल लावल्यावर ब्रह्मरंध्रावर चांगल्या संवेदना जाणवून मनाला स्थिरता लाभणे
‘साधनेत येण्यापूर्वी डोक्याला तेल लावण्यास मला आवडत नव्हते. डोक्याला तेल लावतांना केसांच्या मुळांशी बोटाने मर्दन (मालीश) केल्यामुळे तेथील काळी शक्ती बाहेर पडते. त्यामुळे `डोक्याला तेल लावू नये’, असे मला वाटे. मला त्रास देणारा मांत्रिकच माझ्या मनात तेल लावण्याविषयी नकारात्मक विचार घालून तेल लावण्यास टाळाटाळ करतो. साधनेत आल्यावर मी थोडेसे तेल लावू लागले. अजूनही प्रतिदिन तेल लावणे आवश्यक असतांना मी आठवडा किंवा १५ दिवसांतून एकदाच तेल लावते. तेल लावल्यावर प्रारंभी काळी शक्ती बाहेर पडत असल्याने डोके उष्ण होते आणि चैतन्य मिळू लागल्यावर ते गार अन् शांत होते. ब्रह्मरंध्रावर चांगल्या संवेदना जाणवून चांगली शक्ती केसांतून ग्रहण होत असल्याचे जाणवते. त्यामुळे मनाला स्थिरता मिळाल्याचे वाटते.’ – कु. गिरिजा, गोवा.
आ. केसांना नियमितपणे तेल लावल्याने उपनेत्राचा (चष्म्याचा) क्रमांक अल्प होणे
‘गेली १५ वर्षे मी केसांना तेल लावत नव्हतो. ‘केसांची घ्यावयाची काळजी’, हा ग्रंथ वाचण्यात आला. त्यानंतर प्रतिदिन केस धुवून त्यांना तेल लावण्यास प्रारंभ केला. तेल लावण्यापूर्वी त्यात विभूती मिसळून ‘केसांच्या मुळाशी असलेली अनिष्ट शक्तींची स्थाने नष्ट होऊ दे’, अशी प्रार्थना श्रीकृष्णाच्या चरणी करतो. अशा प्रकारे मी गेल्या २ मासांपासून नियमितपणे तेल लावत आहे. तेल लावून झाल्यावर डोके शांत रहाते. याच कालावधीत उपनेत्राचा क्रमांक पडताळला, तेव्हा क्रमांक ०.५ न्यून झाल्याचे निदर्शनास आले. मी नियमितपणे तेल लावतो, हे माझ्या आई-बाबांना समजल्यावर त्यांनीही आश्चर्य व्यक्त केले. – श्री बळवंत पाठक, नवीन पनवेल, रायगड. (फेब्रुवारी, २०११)
केस निरोगी राखण्यासाठी घ्यावयाचा आहार
केस निरोगी रहाण्यासाठी आहारामध्ये कडधान्ये आणि पालेभाज्या (मुख्यत्वेकरून कांद्याची पात) यांचा वापर करावा. अन्नपदार्थ सिद्ध करण्यासाठी तिळाचे किंवा खोबरेल तेल वापरावे. तसेच आवळा, भोकर, आंबा, नारळ, चारोळी ही फळे खावीत. अतिरिक्त मीठ खाणे हे केसांच्या आरोग्यासाठी हानीकारक असल्याने ते टाळावे.
केस आरोग्यसंपन्न रहाण्यासाठी व्यायाम
१. डोक्याला मर्दन (मसाज) करणे
बोटांच्या टोकांनी किंवा तळहाताने डोक्यावर दाब देत मर्दन करावे. मर्दन करतांना तेल किंवा तत्सम घटकांमध्ये विभूती घालावी आणि ‘केसांच्या मुळांशी असणारी वाईट शक्तींची स्थाने नष्ट होऊ देत’, अशी प्रार्थना करावी. त्यामुळे केसांच्या मुळांशी असणारी काळ्या (त्रासदायक)शक्तींची स्थाने नष्ट होण्यास साहाय्य मिळते आणि त्वचा उत्तेजित होऊन त्या ठिकाणी रक्तप्रवाह वाढतो.
अ. त्वचेच्या स्थितीनुसार / गुणवत्तेनुसार मर्दन करण्यासाठी वापरायचे घटक
त्वचेची स्थिती / गुणवत्ता | मर्दन करण्यासाठी वापरायचे घटक | |
---|---|---|
१. | रुक्ष आणि शुष्क | तिळाचे तेल |
२. | तांबूस झाक आणि पातळ | दुधाची साय |
३. | तेलकट | त्रिफळा चूर्ण |
२. व्यायाम आणि आसने करणे
व्यायामाने पचनशक्ती सुधारते, रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि त्वचा कांतीमान होते. नियमित व्यायामामुळे केस आरोग्यसंपन्न रहातात आणि मनाची स्थिती सुधारून एकाग्रता वाढते. प्राणायामही करावा. शीर्षासनाने डोक्याकडे रक्तप्रवाह वाढतो. शवासनाने मानसिक तणाव उणावतो आणि मानसिक तणावामुळे उद्भवणार्या केसांच्या समस्या सुटू शकतात.