ज्योतिषशास्त्रानुसार प्रभु श्रीरामाच्या कुंडलीचा अभ्यास संक्षिप्त स्वरूपात देत आहे. प्रभु श्रीरामाच्या कुंडलीविषयी अनेक मते असल्याने भिन्न कुंडल्या आहेत. प्रभु रामचंद्रांची अभ्यासण्यासाठी घेतलेली कुंडली महाराष्ट्राचा कुंडली-संग्रह (लेखक म.दा. भट, व.दा. भट) या ग्रंथातून घेतली आहे.
प्रभु श्रीरामाचा जन्म त्रेतायुगात चैत्र शुक्ल पक्ष नवमी या तिथीला अयोध्या नगरीत झाला.
१. प्रभु श्रीरामचंद्रांच्या जन्मवेळेचे नक्षत्र, रास आणि तिथी
प्रभु श्रीरामचंद्रांचा जन्म माध्यान्हकाळी पुनर्वसु नक्षत्रात चतुर्थ चरणात, कर्क राशीत, चैत्र शुक्ल पक्ष नवमी या तिथीला झाला.
२. प्रभु श्रीरामचंद्रांच्या कुंडलीतील महत्त्वाचे ग्रहयोग
प्रभु श्रीरामचंद्रांच्या कुंडलीत बुध ग्रह वगळता इतर ग्रह स्वराशीत आणि उच्च राशीत असून केंद्रस्थानात आहेत. कुंडलीतील चंद्र, राहू, केतू हे स्वराशीत आणि रवि, मंगळ, गुरु, शुक्र, शनि हे ग्रह उच्च राशीत आहेत.
३. प्रभु श्रीरामचंद्रांच्या कुंडलीतील बारा स्थानांतील ग्रहांचे वर्णन
अ. प्रथम स्थानाचा अधिपती प्रथम स्थानात लग्नेश चंद्र लग्नात स्वराशीत उच्च गुरुने युक्त आहे. अशांची प्रकृती चांगली, सुदृढ असते. ते कीर्तीमान होतात. सर्वगुणसंपन्न असतात. वृत्ती धार्मिक असते. प्रभु श्रीरामांनी सदैव धर्ममर्यादांचे पालन केले; म्हणून त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात. लग्नेश (प्रथम स्थानाचा अधिपती) चंद्र, भाग्येश (नवव्या स्थानाचा अधिपती) गुरु युक्त असल्याने गुरु वसिष्ठाच्या आज्ञेनुसार राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी केलेल्या यज्ञानंतर प्रभु श्रीरामांचा जन्म झाला.
आ. द्वितीयेश (द्वितीय स्थानाचा अधिपती) रवि दशम स्थानात उच्च राशीत असल्याने राजघराण्यात जन्म, कुटुंबात प्रेम, नेत्र सुंदर, दूरदृष्टी, एकवचनी आणि बोलण्यात माधुर्य होते.
इ. तृतीयेश (तृतीय स्थानाचा अधिपती) तृतीय स्थानात स्वराशीतील राहू, बुध दशमांत उच्च रवि युक्त असल्याने बंधुप्रेम उत्तम. या स्थानावरून प्रवासाचाही बोध होतो. वनवास प्रवासातही बंधू लक्ष्मणाचा सहवास लाभला. वनवास काळात बंधू भरताने बंधूप्रेमामुळे आणि आदरभावाने श्रीरामांच्या पादुका सिंहासनावर ठेवून दास्यभावाने राज्यकारभार पाहिला.
ई. चतुर्थात (सुखस्थान, मातृस्थान) उच्च शनि, शनि-रवि समसप्तक योग असल्याने सावत्र आईमुळे सर्व सुखांचा त्याग करावा लागला. शनि-रवि उच्च राशीत असल्याने मातेवर न रागवता आनंदाने आज्ञापालन म्हणून सर्वस्वाचा त्याग केला. चतुर्थेश (चतुर्थ स्थानाचा अधिपती) शुक्र भाग्यस्थानात उच्च राशीचा असल्याने बालपण ऐश्वर्यात, राजप्रासादात गेले.
उ. पंचमेश (पंचम स्थानाचा अधिपती) मंगळ सप्तम स्थानात उच्च राशीत असल्याने, तसेच चंद्र-मंगळ आणि गुरु-मंगळ समसप्तक योग असल्याने संतती साहसी, कर्तव्यनिष्ठ आणि पराक्रमी होती. शनि-मंगळ केंद्रयोगामुळे संततीच्या जन्मवेळी अनुपस्थित.
ऊ. षष्ठस्थानाचा अधिपती षष्ठस्थानात धनु रास आणि षष्ठेश गुरु लग्नी (प्रथम स्थानात) उच्च राशीत चंद्र युक्त असल्याने स्पर्धा जिंकतात. राजा जनक आणि महर्षि परशुराम यांनी सीता स्वयंवरासाठी ठरवलेला शिवधनुष्याला प्रत्यंचा लावण्याचा पण जिंकला. शत्रूवर विजय मिळवतात. युद्धकौशल्य निपुण असल्याने त्यांनी सुबाहु आणि मारिच या राक्षसांचा, तसेच त्राटिका राक्षसिणीचा वध केला. इंद्रपुत्र वालीचा वध केला. सूर्यपुत्र सुग्रीवाचे रक्षण केले आणि रावणाचा पराभव केला.
ए. सप्तमांत उच्च राशीचा मंगळ, गुरुची सप्तम दृष्टी आणि सप्तमेश (सप्तमस्थानाचा अधिपती) शनि चतुर्थात उच्च राशीत केंद्रस्थानात असल्याने पत्नीवियोग, पत्नीविरह सहन करावा लागला. शनि ग्रह उच्च राशीत असल्याने एकपत्नीव्रत आचरले.
ऐ. अष्टमांत कुंभ रास आणि अष्टमेश (अष्टम स्थानाचा अधिपती) शनि चतुर्थांत उच्च राशीत असल्याने अयोध्यावासियांनी श्रीरामाच्या देहत्यागानंतर देहत्याग केला.
ओ. भाग्यस्थानी (नववे स्थान) उच्च राशीचा शुक्र, स्वराशीच्या केतू युक्त असल्याने महान गुरूंकडून विद्या संपादन केली; परंतु तारुण्यात भाग्यात असूनही सुख भोगता आले नाही. भाग्येश (भाग्यस्थानाचा अधिपती) गुरु लग्नस्थानात (प्रथम स्थानात) उच्च राशीचा चंद्राने युक्त स्वराशीतील असल्याने धर्मकर्म, दूरचे प्रवास, परोपकार, तसेच गुरुकृपा संपादन केली. कीर्तीमान झाले
औ. कर्मस्थानात (दशम स्थान) उच्च राशीचा रवि, बुध युक्त असल्याने आदर्श राज्य केले. स्वतःच्या प्रत्येक कृतीतून समाजासमोर आदर्श मांडला. आदर्श राजा म्हणून मान्यता मिळाली. रवि ग्रहावर शनि ग्रहाची पूर्ण दृष्टी असल्याने पितृसुखास मुकावे लागले. परिटामुळे राज्य भोगण्याचे सुख मिळाले नाही. दशमेश (दशम स्थानाचा अधिपती) मंगळ सप्तमांत उच्च राशीचा असल्याने स्वपराक्रमाने (पण जिंकल्याने) पत्नी लाभली.
अं. लाभेश (एकादश स्थानाचा अधिपती) शुक्र भाग्यस्थानात उच्च राशीचा; परंतु केतूयुक्त असल्याने सर्व ऐश्वर्य, वैभव असतांना त्यांचा पूर्णतः उपभोग घेता आला नाही.
क. व्ययेश (व्ययस्थानाचा अधिपती) बुध दशमांत उच्च रवि युक्त असल्याने सांसारिक सुख त्यागून लोककल्याणासाठी झटले.
– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.३.२०१६)
वरील लेख लिहितांना आलेल्या अनुभूती
१. लेखाच्या आरंभापासून नकळत श्रीरामाचा नामजप एका लयीत होत होता.
२. टंकलेखन करतांना संगणकाच्या कळफलकावरील श्रीराम हा शब्द संगणकाच्या ज्या कळांवर दाबल्यावर येते (E H J K A ही अक्षरे), केवळ त्या अक्षरांवर सोनेरी आणि निळे दैवी कण आले.
– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.३.२०१६)