
म्हणे, वटसावित्रीचे व्रत अडाणी आणि रानटी आहे !
ज्येष्ठ पौर्णिमेला नदीतिरावरील एका विशाल वटवृक्षाच्या पाराभोवती शे-सव्वाशे स्त्रिया पूजासाहित्यासह एकत्र आल्या. पुरोहितांनी पूजा सांगितल्यावर सर्व स्त्रियांनी वटवृक्षाला एकामागून एक दोरा गुंडाळला. पूजा करून निरंजन आणि उदबत्ती लावून वटवृक्षासमोर फळ अन् दक्षिणा ठेवली. पुरोहितांनाही दक्षिणा दिली. वटसावित्रीचे, म्हणजे पातिव्रत्याचे व्रत करणार्या सर्व स्त्रिया विवाहित होत्या.
टीका :
`जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे’, अशी प्रार्थना असलेले वटसावित्रीचे व्रत अडाणी, रानटी आहे. ते वर्तमानाशी पूर्णपणे विसंगत आहे. ते झुगारून द्या’, असे आधुनिक म्हणतात. व्यक्तीस्वातंत्र्याचे मूल्य श्रेष्ठ मानणार्या आधुनिक स्त्रियांच्या कपाळावर वटसावित्री व्रताचे नाव कानी येताच आठ्या पडतात आणि त्यांचा तोंडवळा तांबडा-लाल होऊन कानशिले ताडताड उडू लागतात.
जिज्ञासू : `जन्मोजन्मी हाच पती मिळावा’, अशी प्रार्थना करणार्या या स्त्रिया अडाणी नाहीत का ?
गुरुदेव : आंग्लछायेच्या पुरोगामी स्त्रिया सोडल्या, तर सर्व हिंदु स्त्रिया हे व्रत कटाक्षाने पाळतात.
जिज्ञासू : या स्त्रियांत अनेक स्त्रिया अशा असतील की, ज्यांना पती छळत असेल, त्यांच्यात भांडणे असतील.
खंडण :
गुरुदेव : वर्षानुवर्षे श्रद्धेने वटसावित्रीचे व्रत आचरणार्या या स्त्रियांच्या अंतःकरणाचा आपण शोध घेतला आहे का ? या जन्मी हाच नवरा आपल्या प्रारब्धात असेल, तर त्याची वागणूक सुधारून जीवन सुसह्य व्हावे; म्हणून त्या वटसावित्रीचे व्रत आणि प्रार्थना करत असतील. त्यांचा अनंत जन्मांवर विश्वास असल्याने दुःख झाले, तरी ‘ते आपल्याच पूर्वकर्मांचे फळ आहे. भोगून संपवून टाकू, या धर्माचरणाचे फळ परमात्मा परलोकी देईलच’, असे त्या मानतात. त्यामुळे साहजिकच त्यांच्यात कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची शक्ती येते. तो नवरा सोडून दुसरा नवरा किंवा इतर काही मागण्याची आमच्यात परंपरा नाही. हिंदु विवाहामध्ये ‘समानी व आकूतिः समाना हृदयानि वः । समानमस्तु वो मनो यथा वः सुसहासति ।।’ हा श्लोक म्हणण्यात येतो. याचा अर्थ ‘तुमचे संकल्प एकसमान असोत. तुमची हृदये एक होवोत. तुमची मने एकसमान होवोत आणि त्यामुळे तुमचे परस्पर कार्य पूर्णरूपाने संघटित होवो.’ यामुळे त्या पती-पत्नीमध्ये संकटे सहन करण्याची शक्ती आणि सर्व सामावून घेण्याची वृत्ती येते. त्यांची त्याग करण्याची वृत्ती वाढते, हेच तर आमच्या संस्कृतीचे मूळ सूत्र आहे.
नवर्याचा जाच सहन करणारी स्त्री श्रेष्ठ कि थोड्याशा कारणाने भांडणारी आणि घटस्फोट घेऊन नवरे पालटणारी स्त्री श्रेष्ठ ?
आणखी एक सूत्र (मुद्दा) म्हणजे स्त्री केवळ एकाच मनुष्याला सर्वस्व अर्पण करून त्याच्यावर एकदाच प्रेम करू शकते. तो कसाही वागला, तरी तिचे लक्ष दुसरीकडे जात नाही. खरे सांगायचे, तर दुसर्यांदा लग्न करणारी स्त्री केवळ सुडाने तसे करते, दुसर्या नवर्यावरील प्रेमामुळे नव्हे ! हिंदु स्त्रीची ‘नवरा पालटला की, सुख मिळते’, अशी खुळचट आत्मकेंद्री समजूत नसते. दुसरा नवरा केल्याने का दुःखक्षय होतो ? तिथे नवे दुःख ! आजच्या युगातील किती स्त्रिया एकाच जन्मात अनेक नवरे करून सुखी झाल्या आहेत ? पत्नी पतीच्या देहावर नाही, तर त्याच्या हृदयातील परमेश्वरावर प्रेम करते; म्हणून ती त्याला ‘पतीपरमेश्वर’ म्हणते. तिलाच पतीव्रता म्हणतात. पतीव्रतेच्या सामर्थ्याच्या अनेक कथा आहेत. सावित्रीने आपल्या पातीव्रत्याच्या सामर्थ्याने यमाकडून आपल्या पतीचे प्राण परत आणले. हे व्रत म्हणजे त्या पातीव्रत्याच्या सामर्थ्याचे प्रतिकात्मक पूजन आहे. या सामर्थ्याची आधुनिक विचारसरणीच्या स्त्रियांना काय कल्पना येणार ? विवाहातील सप्तपदी म्हणजे सात जन्मांचे प्रतीक आहे. ती सात वचने एकनिष्ठतेसाठी घेतली जातात. हे कपड्यांप्रमाणे नवरे पालटणार्या आजच्या आधुनिक स्त्रियांना कसे कळणार ?’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, १२.६.२००८)
सौभाग्यप्राप्तीसाठी करावयाच्या वटसावित्रीच्या पूजेविषयी (अ)ज्ञानप्रबोधिनी
संस्कारमालेचे टीकात्मक भाष्य आणि प.पू. पांडे महाराजांनी त्याचे केलेले खंडण !
१. प्राणवायूमुळे नव्हे, तर सावित्रीच्या पातिव्रत्याच्या बळावर सत्यवानाला जीवदान मिळाले !
टीका :
ज्ञानप्रबोधिनीमधील वटसावित्री या पोथीमध्ये प्रारंभीच म्हटले आहे, पर्यावरणपरिरक्षणासाठी वटसावित्रीची पूजा ! वटवृक्षाच्या शुद्ध आणि निरोगी वार्यामुळे सत्यवान हलकेचजागा झाला. त्यामुळे सावित्रीला आनंद झाला. तिने मृत्यूचा पराभव केला, म्हणजे वटवृक्षाकडूनमिळालेल्या प्राणवायूमुळे त्याच्यात चेतना आली.
खंडण :
१. मूळ कथेत सावित्रीने पातिव्रत्याच्या बळावर यमधर्माच्या हातून सत्यवानाला मुक्तकरूनजीवदान दिल्याचा उल्लेख असणे
वटसावित्री व्रताच्या पूजेमध्ये सावित्रीच्या पातिव्रत्याचे महत्त्व सांगितले आहे. सत्यवानाचे लग्न झाल्यावर एका वर्षाने त्याचा मृत्यूयोग होता. सावित्रीनेतिच्या पातिव्रत्याच्या बळावर यमधर्माच्या हातून सत्यवानाला मुक्त करून जीवदान दिले. हीघटना वटवृक्षाखाली घडली.
२. स्कंदपुराणातील कथेप्रमाणे सावित्रीने बुद्धीचातुर्याने यमराजाकडून ५ वर मागून घेऊनसत्यवानाचे प्राण वाचवणे
स्कंदपुराणातील वटसावित्रीच्या कथेत सावित्रीचे पावित्र्य आणि तपःसामर्थ्य यांच्या बळावर तिला सत्यवानाची प्राणज्योत घेऊन जातांना यमराज दिसला; म्हणून तिने यमराजासमवेत जाऊन आपल्या बुद्धीचातुर्याने त्याच्याकडून ५ वर मागून घेतले आणि सत्यवानाचे प्राणही वाचवले. ज्ञानप्रबोधिनीने असे म्हणणे म्हणजे एकप्रकारे सावित्रीच्या पातिव्रत्याचा अपमानच असून तो धर्मद्रोह आहे.
३. सत्यवान जागा झाल्यावर त्याने सावित्रीच्या व्रताचे फळ मी स्वत: पाहिले, असे सांगणे आणि शिवाने सौभाग्य देणारे वटसावित्रीचे व्रत सर्व महिलांनी करावे, असे सांगणे
सत्यवान जागा झाल्यावर त्याने आतापर्यंत जे घडले, ते मी स्वप्नात पाहिले, असे म्हटले. वरीलप्रमाणे पुढे घटना घडल्यावर मुनीजनांना विचारल्यावर सत्यवान म्हणतो, हे सर्व सावित्रीच्या तपाचे फळ आहे; कारण तिच्या व्रताचे फळ मी स्वत: पाहिले. यावर शिव म्हणतात, हे सनत्कुमारऋषी, या व्रताच्या प्रभावाने सावित्रीचा पती क्षीणायु असूनही दीर्घायु झाला. तेव्हा असे सौभाग्य देणारे व्रत सर्व महिलांनी अवश्य करावे.
पतिव्रता सावित्रीच्या तपामुळे तिला यम दिसला आणि तिने यमासह जाऊन आपले साध्य प्राप्त केले, या सत्यकथेतून सर्व स्त्रियांना आदर्श मिळून तिच्याप्रमाणे व्रत करून आपले साध्य प्राप्त करून घ्यावे, या हेतूनेच ती स्कंदपुराणात दिली आहे; परंतु सध्याच्या विज्ञानयुगात रज–तमाचा प्रभाव असल्यामुळे त्यावर विश्वास बसत नाही.
२. व्रतवैकल्ये करतांना पूजा ही श्रद्धा आणि भक्तीने केली जातात,
यात पर्यावरणाचे सूत्र घुसडणे म्हणजे मूळ व्रताला बगल देण्यासारखे असून हा अधर्म आहे !
टीका :
वृक्षांची स्वच्छता टिकवणे, हाच पूजेचा खरा अर्थ आहे. सावित्रीने पतीचे प्राण वाचवायचे अवघड काम स्वतःतील पर्यावरणाचे ज्ञान, चिकाटी आणि दुर्दम्य इच्छाशक्ती यांनी करून दाखवले.
खंडण :
१. व्रताचे अयोग्य उद्देश सांगून समाजाला श्रद्धाहीन आणि दिशाहीन करण्यासारखे असणे
वास्तविक पूजा हा शब्द संस्कृत भाषेत आहे. संस्कृत भाषेत पूज् – पूजयति । म्हणजे पूजा करणे असे दिले आहे. प्रत्येक योगमार्गानुसार पूजा या शब्दाचा अर्थ भिन्न होऊ शकतो, उदा. कर्मयोगी म्हणेल, कर्म हीच माझी पूजा होय. वटपौर्णिमा या व्रताचा उद्देश सावित्रीने जसे आपल्या तपसामर्थ्याने अल्पायुषी पतीचे प्राण वाचवले, तसेच सर्व महिलांनी दृढ श्रद्धेने हे व्रत करून शिवाचे आशीर्वाद मिळवावेत, हा आहे.
प्राणवायूमुळे नव्हे, तर सावित्रीच्या पातिव्रत्याच्या बळावर सत्यवानाला जीवदान मिळाले ! ज्ञानप्रबोधिनीने सावित्रीच्या पातिव्रत्त्य धर्मापेक्षा वडाचेच माहात्म्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे. वृक्षांची स्वच्छता म्हणजे पूजा किंवा सावित्रीने पतीचे प्राण वाचवायचे अवघड काम स्वतःतील पर्यावरणाचे ज्ञान, चिकाटी आणि दुर्दम्य इच्छाशक्ती यांनी करून दाखवले, हे व्रताचे उद्देश सांगून समाजाला श्रद्धाहीन आणि दिशाहीन करण्यासारखे आहे.
२. स्वतःच्या मनाने कथा रचणे, हे अधर्मकार्य वटसावित्रीच्या कथेद्वारे ज्ञानप्रबोधिनीने केलेले असल्याने ज्ञानप्रबोधिनीकडून विकृत विचारांनी अधर्माचा प्रसार होणार असणे
ज्ञानप्रबोधिनीने मूळ पुराणातील कथेत पालट केला आहे. वडालाही पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्व आहे; परंतु या कथेत सावित्रीचे पातिव्रत्ये आणि तप:सामर्थ्य यांचे महत्त्व विदित केले असतांना कथेत पालट करून आपल्या मनाने कथा रचणे, हे धर्मकार्य नसून अधर्मकार्य आहे अन् हे अधर्मकार्य वटसावित्रीच्या कथेद्वारे ज्ञानप्रबोधिनीने केले आहे. मनुस्मृतीत अशा चार्वाक वृत्तीच्या विद्वानांना बहिष्कृत करावे, असे म्हटले आहे. वटसावित्रीची मूळ कथा पालटलण्याचा यांना कुणी अधिकार दिला ? अशा रितीने समाजात चांगल्या धारणा प्रस्तुत करण्याचा जो धर्माचा हेतू आहे, तोच हरवून या विकृत विचारांनी अधर्माचा प्रसार होईल.
३. सावित्रीचे महत्त्व डावलून केवळ वडाचे महत्त्व वाढवणे अयोग्य !
वडाचे महत्त्व कथन करण्यासाठी ते म्हणतात, वृक्ष हे सत्पुरुषासारखे आहेत. त्यांच्या दातृत्वाचा गुण आपल्यात उतरवला पाहिजे; म्हणूनच या भावनेने आपण वडाची पूजा करावी, हे मान्य आहे. त्यामुळेच सावित्रीच्या माहात्म्यासह वडाचीही पूजा करतात. या कारणाने सावित्रीचे महत्त्व डावलून केवळ वडालाच महत्त्व देणे योग्य नाही. कथेत पूजेच्या दृष्टीने जे सांगितले आहे, त्याप्रमाणे प्रबोधन केल्यास धर्मकार्य होते. आपल्या मनाप्रमाणे त्याला कलाटणी देऊन कार्य केल्यास तो अधर्म होतो, हे ज्यांना कळत नाही, त्यांना काय म्हणावे ?
४. अष्टमहासिद्धी प्राप्त झालेले संत आजही अस्तित्वात असल्याने सावित्रीची कथा सत्य असणे आणि ती नाकारणार्या ज्ञानप्रबोधिनीला महत्त्व लाभणे, हे समाजाच्या दृष्टीने हानीकारक असणे
तपश्चर्या आणि साधना यांमुळे अष्टमहासिद्धी प्राप्त केलेले संत आजही आहेत. मुंबईजवळ असलेले ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे प.पू. योगतज्ञ दादाजी वैशंपायन हे थोर संत आहेत. ते सूक्ष्मातून हिमालयात जातात. तेथील महात्म्यांना भेटून कार्य करून परत येतात.
विशेष म्हणजे ज्ञानप्रबोधिनीसारख्या शास्त्रपंडितांना याविषयी शंका असल्यामुळे वटसावित्रीच्या कथेला पर्यावरणाशी जोडले आणि ते समाजासमोर आणले, याचे आश्चर्य वाटते.
वरील सूत्रांवरून समाजात धर्मशिक्षणाची आवश्यकता स्पष्ट होते. समाजधुरीण म्हणवणारी आणि शास्त्रोक्त विधी करणारी ब्राह्मण मंडळी यांनी यासाठी पुढाकार घेऊन ज्ञानप्रबोधिनी शिकवत असलेल्या अयोग्य गोष्टी बंद पाडल्या पाहिजेत.
३. ज्ञानप्रबोधिनीने हिंदु धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे पूजा न करता
स्वतःच्याच मनाने पूजेतील कृती ठरवणे आणि त्यातही अनेक त्रुटी असणे
टीका :
हा प्रसंग वटवृक्षाखाली घडला; म्हणून हे व्रत वटसावित्री या नावाने ओळखले जाते. अखंड सौभाग्य मिळावे, यासाठी भारतीय स्त्रिया या दिवशी वडाची पूजा करून सावित्रीची प्रार्थना करतात.
खंडण :
१. केवळ प्रसंगाच्या ठिकाणाला धरून विधीचे नाव ठरवले, असे म्हणणे चुकीचे !
वटसावित्रीच्या स्कंदपुराणातील कथेमध्ये म्हटले आहे, सावित्रीचे लग्न झाल्यावर नारदाच्या सांगण्यावरून तिने वटसावित्रीचे व्रत करणे चालू केले. ज्या दिवशी सत्यवानाचा शेवटचा दिवस होता, त्याच्या आदल्या दिवशीच तिने व्रत पूर्ण करून त्या दिवशी तिला पारणे फेडायचे होते; परंतु ज्ञानप्रबोधिनी म्हणते की, सत्यवानाचा प्रसंग वटवृक्षाखाली घडला. त्यामुळे हे व्रत
वटसावित्री म्हणून ओळखले जाते. यावरून त्यांचे म्हणणे कितपत अयोग्य आहे, हे दिसून येते.
२. सावित्रीची पूजा न सांगता स्वतःच्या मनाने पोथीत पालट करणे, हा अधर्म असणे
ज्ञानप्रबोधिनीच्या म्हणण्याप्रमाणे, वडाची पूजा झाल्यावर महिला सावित्रीची केवळ प्रार्थना करतात. असे नसून वटसावित्रीच्या पूजेमध्ये ध्यान करतांना ब्रह्मसावित्रीचे ध्यान करावे, असे म्हटले आहे.
वटमूले ब्रह्मसावित्रीभ्यां नम:। ध्यायामि । (अक्षता वहाव्यात.)
अर्थ : वडाच्या मुळाशी असणारा ब्रह्मदेव आणि सावित्री यांना नमस्कार असो. मी त्यांचे ध्यान
करतो.
देवि देवि समागच्छ प्रार्थयेऽहं जगन्मये ।
इमां मया कृतां पूजां गृहाण सुरसत्तमे ?
ब्रह्मसावित्रीभ्यां नम: । आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि ?
अर्थ : हे विश्वस्वरूपिणी देवी, मी तुला येथे येण्याची प्रार्थना करतो. हे सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ असणार्या देवी, तू येथे येऊन मी केलेली ही पूजा अर्पण करून घे.
ब्रह्मदेव आणि सावित्री यांना नमस्कार करून त्यांच्या आवाहनासाठी मी अक्षता समर्पित करतो. (स्वयंपुरोहित, प्रमुख व्रते – वटसावित्रीची पूजा, पृष्ठ ४६)
पूजेमध्ये पतिव्रता सावित्रीच्या पूजेला महत्त्व दिले आहे. यावरून वडाची पूजा करतांना सावित्रीच्या पूजेला महत्त्व आहे.
एवढेच नव्हे, तर सावित्रीच्या व्रतामध्ये अथांग पूजेचे मंत्र सांगितले आहे. स्त्रियांच्या सौभाग्यासाठी वटसावित्रीची पूजा आहे. असे असतांना तिच्या यथासांग पूजेचे माहात्म्य न सांगता केवळ वडाची पूजा झाल्यावर आता पतिव्रता सावित्रीची प्रार्थना करू की, हे सावित्री, तुला मनोभावे नमस्कार असो, एवढ्या एका वाक्याने त्यांनी वटसावित्रीच्या पोथीमध्ये समारोप केला आहे.
वैदिक काळापासून केवळ हिंदु संस्कृतीनेच निसर्गाचे सर्वाधिक संवर्धन करून प्रसंगी नदी, सूर्य, डोंगर इत्यादींना देवता मानून त्यांच्या रक्षणार्थ कृती केल्याचे दिसून येते. आज ज्या विज्ञानाचा ज्ञानप्रबोधिनी टेंभा मिरवत आहे, ते विज्ञान भोवतालच्या परिस्थितीत सुधारणा सांगतांना वनांची मोडतोड करते; मात्र सनातन हिंदु धर्म भोवतालची परिस्थिती कशीही असली, तरी अंतस्थिती कशी सुधारावी, म्हणजे भोवतालच्या स्थितीचा आपल्याला त्रास होणार नाही, असे शिकवते. पर्यावरणप्रेमाचा कांगावा करणार्या विज्ञानवाद्यांनी आजवर कधी नव्हते, इतके वातावरणात प्रदूषण करून ठेवले आहे. वाहनांचे धूर, कारखान्यांचे रासायनिक पाणी, नद्यांचे प्रदूषण, जैविक कचरा आदी त्याची उदाहरणे आहेत. असे असतांना हिंदूंना धर्मभ्रष्ट करणारी ज्ञानप्रबोधिनी समाजहित न करता समाजाला रसातळाला नेत आहे; म्हणून अशा आधुनिक विद्वानांना मनुस्मृतीत सांगितल्याप्रमाणे वाळीत टाकणेच योग्य आहे.
– प.पू. परशराम पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल
स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देण्यासाठी पुरुषांनी साजरी केली वटपौर्णिमा
धर्मशिक्षणाच्या अभावी जन्महिंदूंकडून केली जाणारी अयोग्य आणि हास्यास्पद कृती !
अयोग्य विचार :
वटपौर्णिमा म्हणजे वडाची पूजा करून त्याला सूत गुंडाळून पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा, यांसाठी पत्नी प्रार्थना करते. हे व्रत महिला घेतात; पण पुणे येथील नवी सांगवी भागात मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेच्या वतीने स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देण्यासाठी पुरुषांनी ८ जून या दिवशी वटपौर्णिमा साजरी केली. या वेळी अनेक पुरुषांनी हा सण साजरा केला.
या उपक्रमाची माहिती देतांना मानवी हक्क संरक्षणचे अण्णा जोगदंड यांनी सांगितले की,
१. वास्तवात हे व्रत म्हणजे एक मानसशास्त्रीय विधी आहे.
२. ज्यामुळे भारतामधील संस्कृती टिकवून समाजाचा समतोल राखला जात आहे. मुळात सारे सणवार हे प्रतिके आहेत.
३. कायद्याने स्त्री-पुरुष समानता दिली असल्याने पुरुषाने पत्नीच्या आयुष्यासाठी वटपौर्णिमा साजरी करण्यात काहीही वावगे नाही.
खंडण :
हिंदूंना धर्मशिक्षण न दिले गेल्यामुळे या व्रताचा उद्देश आणि महत्त्व हिंदूंना समजत नाही. या व्रताला स्त्री-पुरुष समानतेच्या अतिशय उथळ आणि तथाकथित संकल्पनांशी जोडले जाते. शिवस्वरूपरूपी वटवृक्षाची पूजा करणे म्हणजे ‘आयुष्यातील प्रत्येक कर्माला पतीची साथ मिळावी, यासाठी ईश्वीराची पूजा करणे’ असते. त्यामुळे स्त्रीची आयुष्याची कर्म साधना म्हणून होण्यास त्याचा लाभ होतो. हिंदु धर्मातील या व्यापक धर्मसंकल्पनांचा अभ्यास हिंदूंनी करायला हवा.
१. हा मानसशास्त्रीय नसून धार्मिक विधी आहे.
२. सणवार प्रतिके वगैरे नसून त्या वेळी केले जाणारे धार्मिक विधी हे मानवाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी अतिशय उपयुक्त असल्यानेे ते एकप्रकारे चैतन्य प्रदान करणारे सत्याचे प्रयोग आहेत !
३. व्यवहारात आपण अभियंत्याने रुग्णाची शस्त्रक्रिया करावी, असे कधी म्हणतो का ? मग धर्माच्या संदर्भातील निर्णय स्वतःच्या मनाने का पालटले जातात ? धर्मशास्त्रात पालट करण्यासाठीचे अधिकार शंकराचार्य, धर्माचार्य आणि संत यांना असतांना अशी कृती करणे, हे स्वतःला त्यांच्यापेक्षा शहाणे समजण्यासारखेच आहे.
वटपौर्णिमेच्या केकवर सुरी फिरवणे

सध्या सामाजिक संकेतस्थळावर मोठ्या प्रमाणात वटपौर्णिमेचा केक फिरत आहे. हा केक सिद्ध केला असून त्यावर पूजलेले वडाचे झाड, खाली पडलेली फुले, पूजेचे तबक, त्यात निरांजन, उदबत्त्या, हळद-कुंकू, कलश आणि अन्य पूजेचे साहित्य साकारले आहे. आता हा केक कापला, तर या सर्व प्रकारच्या पूजासाहित्यावर सुरी फिरवली जाईल !
केकवर सुरी फिरवणे, हे अशुभ क्रियेचे प्रतीक आहे. हे एकप्रकारे धर्मविघातक प्रवृत्तीचेच लक्षण आहे. अशा कृतींमुळे धर्मही नष्ट होऊ पहात आहे. हे गंभीर आहे. धर्म नष्ट झाल्यास विनाशच ओढवेल. अशा कृती करून आपणच एकप्रकारे आपत्काळाला आमंत्रण तर देत नाही ना, याचा विचार सर्वांनी करायला हवा.
वटपौर्णिमा ही केक कापून साजरी करण्याची गोष्ट नसून ती धर्मशास्त्रानुसारच करणे आवश्यक आहे. तसे केल्यासच खर्याच अर्थाने पती आणि पत्नी यांना निश्चितच लाभ होईल !