ज्ञानयोगानुसार आणि भक्तीयोगानुसार नामजपाचे लाभ

अनुक्रमणिका

१. नामजपामुळे अंतःकरण ज्ञानबीज रुजण्यास योग्य (लायक) होणे

१ आ. नामामुळे ज्ञानप्राप्ती होणे

२. भक्तीयोगानुसार लाभ

२ अ. अनेक तीर्थे आणि यज्ञ यांचे फल एकट्या नामजपाने मिळणे

२ आ. नामामुळे देवतेप्रती श्रद्धा आणि भाव निर्माण होणे

२ इ. नामामुळे देवता प्रसन्न होणे

२ ई. नामामुळे ईश्वरी कृपा होण्याची प्रक्रिया

३. नामजप केल्याने होणारे सूक्ष्मातील लाभ दर्शवणारे चित्र


 

या लेखात आपण नामजपाचे ज्ञानयोग आणि भक्तीयोगानुसार काय लाभ आहेत यांविषयीची वैशिष्ट्यपूर्ण माहिती पहाणार आहोत. तसेच लेखाच्या शेवटी ‘नामजप केल्यामुळे होणारे सूक्ष्मातील लाभ’ याविषयीचे सूक्ष्म-चित्रदेण्यात आले आहे.

१. ज्ञानयोगानुसार नामजपाचे लाभ

१ अ. नामजपामुळे अंतःकरण ज्ञानबीज रुजण्यास योग्य (लायक) होणे

‘सततच्या नामजपाने माणसाचे अंतःकरण शुद्ध होऊन ते ज्ञानबीज पेरण्यास योग्य (लायक) होते. जसे शेतीकरता भूमी उत्तम नांगरून, कष्ट (मेहनत) आणि मशागत केल्याविना त्यात उत्तम पीक येत नाही, त्याचप्रमाणे माणसाने आपले अंतःकरण शुद्ध केल्याविना त्याच्या ठिकाणी ज्ञानबीज रुजत नाही. यासाठी कर्म, उपासना, ईशपूजन, कीर्तन, भजन इत्यादीकांची कास धरणे आवश्यक आहे.’

१ आ. नामामुळे ज्ञानप्राप्ती होणे

‘आपल्याला अक्षरांच्या माध्यमातून ज्ञान आत घेण्याची (ग्रहण करण्याची) सवय आहे; पण नाम हा भगवंताचा, म्हणजे आत्मज्ञानाचा संकेत आहे.’

 

२. भक्तीयोगानुसार लाभ

२ अ. अनेक तीर्थे आणि यज्ञ यांचे फल एकट्या नामजपाने मिळणे

१. कृष्ण कृष्णेति कृष्णेति कलौ वक्ष्यति प्रत्यहम् ।
नित्यं यज्ञायुतं पुण्यं तीर्थकोटिसमुद् भवम् ।। – स्कंदपुराण, द्वारकामाहात्म्य

अर्थ : कलियुगात जो प्रतिदिन ‘कृष्ण, कृष्ण, कृष्ण’ असे उच्चारण करतो (अखंड नामसाधना करतो), त्याला प्रतिदिन दहा सहस्त्र यज्ञांचे आणि कोट्यवधी तीर्थांच्या सेवनाचे फळ मिळते.

२. कुरुक्षेत्रेण किं तस्य किं काश्या विरजेन वा ।
जिह्वाग्रे वर्तते यस्य हरिरित्यक्षरद्वयम् ।। – नारदपुराण, उत्तरखण्ड, अध्याय ६, श्लोक ४

अर्थ : (ब्रह्मदेव म्हणतात,) ज्याच्या जिभेच्या अग्रभागी ‘हरि’ ही दोन अक्षरे विराजमान आहेत (ज्याच्या मुखी अखंड नाम आहे), त्याला कुरुक्षेत्र, काशी आणि विरज या तीर्थक्षेत्री जाण्याची काय आवश्यकता आहे ?

३. तन्मुखं तु महत्तीर्थं तन्मुखं क्षेत्रमेव च ।
यन्मुखे राम रामेति तन्मुखं सार्वकामिकम् ।। – पद्मपुराण, उत्तरखण्ड, अध्याय ७२, श्लोक ३२

अर्थ : ज्याच्या मुखाद्वारे ‘राम, राम’ असा जप होत असतो (जो अखंड नामसाधना करतो), त्याचे मुखच महान तीर्थ आहे. तेच प्रधान (पवित्र) क्षेत्र असून, सर्व कामना पूर्ण करणारे आहे.

२ आ. नामामुळे देवतेप्रती श्रद्धा आणि भाव निर्माण होणे

नामावर विश्वास ठेवून नाम घेत राहिल्यास पुढे आध्यात्मिक अनुभूती येतात. त्यामुळे नामाप्रती, तसेच देवतेप्रती श्रद्धा निर्माण होते. नामच सर्वकाही साध्य करून देणारे आहे, अशी श्रद्धा जितकी जास्त, तितक्या तळमळीने साधक देवतेचे नाम घेतो. त्यामुळे देवतेप्रती भाव लवकर निर्माण होण्यास साहाय्य होते. अध्यात्मात ‘भाव तेथे देव’, असे असल्याने भाव निर्माण होण्याला फार महत्त्व आहे.

२ इ. नामामुळे देवता प्रसन्न होणे

एखाद्या देवतेचा जप केल्यास ती देवता प्रसन्न होते. व्यवहारात आपण एखाद्या व्यक्तीच्या सतत संपर्कात असलो, तर ती व्यक्ती आपणाला विसरत नाही; त्याप्रमाणेच नामजपाने आपण देवाच्या संपर्कात राहिलो की, देवही आपली आठवण ठेवतो.

‘अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ।। – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ९, श्लोक २२

अर्थ : जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत मला भजतात, त्यांचा योगक्षेम मी वहातो. यात हे भक्तीरहस्य श्लोकबद्ध केले आहे. आपण भगवंताच्या नामात तल्लीन रहायचे आणि आपल्या योगक्षेमाची चिंता त्याने वाहायची, यालाच ‘राजयोग’ असे म्हणतात. कोणी काही म्हणो, मी यालाच ‘राजयोग’ म्हणतो. श्री गुरुचरित्रात नामधारकालाच श्रीमंताची पदवी सिद्धांनी बहाल केली आहे; म्हणून खराखुरा श्रीमंत नामजपीच (नामधारकच) असतो.’ – प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.

२ ई. नामामुळे ईश्वरी कृपा होण्याची प्रक्रिया

‘ताकात लोणी (मिसळलेले) असते. लोणी वर दिसत नाही; पण ताक घुसळल्यावर ते वर येते. त्याचप्रमाणे भगवंताचे नाम आपण सारखे घेतले की, त्याचे प्रेम आपोआप (आपल्याला) दिसू लागते.’

 

३. नामजप केल्याने होणारे सूक्ष्मातील लाभ दर्शवणारे चित्र

खालील सूक्ष्म-चित्र मोठ्या आकारात पहाण्यासाठी चित्रावर क्लिक करा !

३ अ. चित्रातील चांगली स्पंदने : ३ टक्के’ – प.पू. डॉ. जयंत आठवले

३ आ. ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीच्या चित्रातील स्पंदनांचे प्रमाण : भाव १ टक्का,
देवतातत्त्व २ टक्के, चैतन्य २ टक्के आणि शक्ती १.५ टक्का

३ ई. इतर सूत्रे

१. नामजप केल्यामुळे व्यक्तीचे अनावश्यक विचार न्यून होऊन तिला मनःशांती अनुभवता येते, तसेच एकाग्रतेने ईश्वराशी अनुसंधान साधता येते.

२. नामजप केल्यामुळे व्यक्तीमधील रज-तम अल्प होऊन चैतन्य वाढते.

३. सतत नामात राहिल्यामुळे व्यक्तीचे अनेक जन्मांचे संस्कार नष्ट होण्यास साहाय्य होते.’

– पू. (सौ.) योया वाले, युरोप, एस्.एस्.आर्.एफ्. (वैशाख शुद्ध द्वादशी, कलियुग वर्ष ५११३ १४.५.२०११)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘नामजपाचे महत्त्व आणि लाभ’

 

प्रधान गुण आणि भक्तीयोग यांनुसार पूरक साधना

तमप्रधान

अशी व्यक्ती आळशी असून ती नामस्मरण करण्यास कंटाळा करते. अशा व्यक्तीला अवतारांच्या गोष्टी, गुरुचरित्र, शिवलीलामृत इत्यादी मोठ्याने वाचण्यास सांगावे. तिला समजेल अशा सोप्या गोष्टी किंवा भाग वाचण्यास सांगावे, तसेच प्रतिदिन एक सहस्र वेळा नामजप किंवा एकदा विष्णुसहस्रनाम लिहिण्यास सांगावे.

रजप्रधान

अशी व्यक्ती नामावर मन एकाग्र करू शकत नाही. तिने विष्णुसहस्रनाम, गणेशसहस्रनाम किंवा पुरुषसूक्त इत्यादी मोठ्याने वाचावे किंवा श्रीमद्भगवदगीतेतील एखादा अध्याय वाचावा.

सत्त्वप्रधान

अशा व्यक्तीची एखाद्या ठिकाणी लक्ष केंद्रित करण्याची क्षमता असते; म्हणून तिने एखादे नाम किंवा गुरुमंत्र यांचा जप करावा. सात्त्विक व्यक्तीमध्ये कधीकधी रज-तम गुण उफाळून येतात, त्या वेळी नामस्मरण करणे कठीण जाते. अशा वेळी नाम किंवा गुरुमंत्र मोठ्याने म्हणावा किंवा विष्णुसहस्रनाम म्हणावे. सत्त्वगुण वाढल्यावर पूर्ववत नामाचा किंवा गुरुमंत्राचा जप करावा.

– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (वर्ष १९८१)

Leave a Comment