बालकभावाची चित्रे काढण्याच्या प्रक्रियेसंदर्भात मिळालेले ज्ञान

बालकभावात असतांना सौ. उमाक्कांनी काढलेल्या भावपूर्ण चित्रांविषयी मिळालेले ज्ञान आपण प्रस्तूत लेखात जाणून घेऊया. कोणतीही कृती भावपूर्ण झाल्यास सभोवतालची सूक्ष्म-स्पंदने कशी पालटतात याविषयीच्या अनुभूतीसह सौ. उमाक्कांनी श्रीकृष्णाचे चित्र काढत असतांना होणारी सूक्ष्मातील प्रक्रिया दर्शवणारे सूक्ष्म-चित्रही लेखात पाहूया.

१. सौ. उमा रविचंद्रन् यांनी काढलेल्या चित्रांतील
श्रीकृष्ण आणि बालिका यांच्या देहबोलीतून व्यक्त होणारे विविध प्रकारचे भाव

देहबोली व्यक्त होणारे विविध प्रकारचे भाव
१. ‘पाणीदार नेत्र व्यक्त कृतज्ञताभावयुक्त वंदनभक्ती
२. स्थिर नेत्र अव्यक्त कृतज्ञताभावयुक्त स्मरणभक्ती
३. गंभीर मुख अंतर्मुखभावयुक्त दास्यभक्ती
४. हसतमुख तोंडवळा प्रांजळभावातून साकारणारी उत्कट आनंदभावयुक्त मधुराभक्ती
५. किंचित स्मित निर्मळभावातून प्रगटणारी प्रसन्न वंदनभक्ती
६. पूर्ण स्मित कर्तेपणाच्या अभावातून ‘भगवंतच कर्ता करविता आहे’, याची तीव्र जाणीव अंतर्मनात उमटून प्रकटणारी हर्षोल्हासयुक्त निरागस-बालकभावमय सख्यभक्ती
७. नमस्काराच्या मुद्रेत जोडलेले हात समर्पण भावयुक्त वंदन आणि पादसेवन भक्ती
८. नेत्र बंद करून शांत बसणे जागृत ध्यानावस्थेतील भावानुसंधान आणि काही अंशी स्मरणभक्ती
९. साधकांशी संभाषण करणे सहजभावयुक्त आणि प्रेमभावयुक्त कीर्तनभक्ती
१०. समाजात जाऊन अध्यात्मप्रसार करणे समष्टी दास्यभावयुक्त आणि वात्सल्यभावयुक्त धर्मसंकीर्तनभक्ती
११. भगवंताच्या स्मरणात गुंग होऊन बसणे, झोपणे किंवा विचारमग्न असणे अजागृत ध्यानावस्थेतील अव्यक्त भावानुसंधान, नामसंकीर्तन भक्ती आणि आत्मनिवेदनभक्ती
१२. भगवंताच्या चरणांजवळ बसून चित्र किंवा लिखाण यांद्वारे मनातील भाव व्यक्त करणे शरणागतभावयुक्त अर्चनभक्ती आणि बालकभावयुक्त समर्पणभक्ती
१३. ग्रंथांच्या भाषांतराची सेवा करणे सेवाभाव आणि अव्यक्त-व्यक्त कृतज्ञताभाव
१४. धर्मविरोधी वार्ता ऐकणे, धर्मविरोधी
कृत्याचा निषेध करणे आणि शासनाच्या
अधर्मी आदेशांना विरोध करणे
शिष्यभाव आणि सेवाभावयुक्त क्षत्रीय दास्यभक्ती

 

२. श्रीकृष्णाने भक्तांना दिलेली वचने सौ. उमाक्कांच्या संदर्भात सत्य झाल्याची प्रचीती येणे

२ अ. श्रीकृष्णाने भक्तांना दिलेले प्रथम वचन

‘माझ्या कीर्तनात रंगून तर जा, नाही तुला जगाचा विसर पाडला, तर सांग !’

२ अ १. श्रीकृष्णाने सौ. उमाक्कांना बालकभावयुक्त आत्मनिवेदन भक्ती प्रदान करणे

श्रीकृष्णाने भक्तांना दिलेल्या या वचनाप्रमाणे सौ. उमाक्कांनी भावपूर्ण, श्रद्धायुक्त आणि तळमळीने साधना केल्यामुळे श्रीकृष्णाने त्याच्या वचनांचे पालन करत सौ. उमाक्कांवर कृष्णकृपावर्षाव करून बालकभावयुक्त आत्मनिवेदन भक्ती प्रदान केली आहे. या भक्तीच्या बळावर त्यांना गुरुकृपेने प्राप्त झालेली चित्रकला सहजावस्थेत साकारली जाऊन अनुपम भावचित्रांच्या रूपाने फलद्रूप होत आहेत.

२ अ २. चित्रे पाहून भगवंताप्रतीचा समर्पण भाव जागृत होणे

सौ. उमाक्कांनी काढलेली बालकभावाची चित्रे पहातांना प्रत्येक चित्र म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण झालेले कोमल भावसुमन असल्याचे जाणवून भगवंताप्रतीचा समर्पण भाव जागृत होण्यास साहाय्य होते. सौ. उमाक्कांनी रेखाटलेले प्रत्येक भावचित्र म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या चरणकमलांवर वाहिलेले पारिजातकाचे सुवासिक कोमल समर्पित बालफूल होय.

२ आ. श्रीकृष्णाने भक्तांना दिलेले द्वितीय वचन

‘माझ्यावर श्रद्धा ठेवून तर बघ, नाही तुझ्यासाठी ज्ञानाचे मोती उधळले तर सांग !’

२ आ १. एका गीतातून कवीने केलेले कलियुगाचे वर्णन

रामचंद्र कह गए सिया से ऐसा कलजुग आएगा ।
हंस चुगेगा दाना-तिनका कौआ मोती खाएगा ।।

अ. अर्थ –
१. शब्दार्थ

श्रीराम सीतेला सांगतो, ‘‘कलियुगात इतका वाईट काळ येईल की, हंस दाणे आणि कावळा मोती खाईल.’’

२. भावार्थ

श्रीराम सीतेला सांगतो, ‘‘कलियुगात इतका वाईट काळ येईल की, अत्याचारी, भ्रष्टाचारी, बलात्कारी, चोर आदी वाईट माणसे सुख उपभोगतील आणि सदाचारी अन् प्रामाणिक माणसे सुख-सुविधांपासून वंचित होतील.’’

या गीतातील शब्दार्थ कलियुगातील मानवाने प्रमाणित करून दाखवला आहे. पात्र व्यक्ती ज्ञान असूनही दुर्लक्षित राहून घरोघर भटकत रहाते अन् अपात्र व्यक्ती ज्ञान नसतांनाही शक्तीच्या बळावर पैसा आणि प्रसिद्धी मिळवतात. बहुतांश क्षेत्रांत वरील विदारक दृश्य आढळते. पात्र व्यक्तींना हीन पद आणि अपात्र व्यक्तींना श्रेष्ठ पद प्राप्त झाल्यामुळे संपूर्ण देशाचे वाटोळे झाले आहे.

२ आ २. कुणाची तुलना होऊ शकत नाही ?

हंस आणि कावळा या दोन्ही पक्षांची कोणत्याच आधारे तुलना होऊ शकत नाही, तसेच पात्र-अपात्र, ज्ञानी-अज्ञानी, आस्तिक-नास्तिक, सेवक-विरोधक आणि भक्त-अभक्त यांची तुलना करणे अयोग्य असून त्यांची कधीच तुलना होऊ शकत नाही.

२ आ ३. राजहंसभक्तीचे महत्त्व

भगवंताचे विरोधक, नास्तिक ‘काव काव’ ओरडणार्‍या कावळ्याप्रमाणे आहेत आणि भगवंताचे भक्त आस्तिक राजहंसाप्रमाणे संयमी, शांत आणि स्थिर आहेत. कलियुगी अधर्म बळावल्याने भगवंताच्या खर्‍या भक्तांना क्षणोक्षणी कठोर परीक्षेला सामोरे जावे लागते. भगवंतावर दृढ श्रद्धा ठेवून भक्तीची परीक्षा उत्तीर्ण करणार्‍या राजहंसरूपी भक्तांवर कृपासिंधू भगवान श्रीकृष्ण ज्ञानाच्या मोत्यांची उधळण करतो. ज्ञानाच्या मोत्यांची उधळण करून राजहंसाची भक्ती भगवंताच्या विशेष कृपेचा अधिकारी असल्याचे भगवंत संपूर्ण विश्वाला दाखवून देतो.

२ आ ४. श्रीकृष्णाचे वचन आणि एका काव्यातील प्रभु श्रीरामाने सीतेला सांगितलेले सत्यवचन कलियुगात सनातनच्या साधिका सौ. उम्माक्का यांच्या उदाहरणाद्वारे सप्रमाण सिद्ध होणे

घोर कलियुगात श्रीकृष्णाने सौ. उम्माक्कांवर ज्ञानमोत्यांची केलेली उधळण म्हणजे कलियुगातील इतर जिवांप्रमाणे त्या ‘कावळा’ नसून ‘पक्षीश्रेष्ठ राजहंस आहेत’, हेच सिद्ध केले आहे. जसा रत्नपारखी कोळशाच्या खाणीतून अनमोल हिर्‍यांना अचूक निवडू शकतो, तसेच अधर्मी काकरूपी मनुष्यांच्या घोळक्यातून धर्मस्वरूप राजहंसाला केवळ परात्परगुरु आणि भगवंतच ओळखू शकतात. श्रीकृष्णाच्या भावपूर्ण स्मरणात सौ. उम्माक्का यांना ध्यानसमाधी लागून विश्वाचा विसर पडतो. भगवान श्रीकृष्णावरील अढळ श्रद्धेमुळे त्यांच्यावर अतींद्रिय ज्ञानमोत्यांचा वर्षाव होतो. धन्य तो भक्तांना दिलेली वचने सत्य करणारा भगवंत अन् धन्य ते भगवद्वचनावर अढळ श्रद्धाभाव असणारे सौ. उम्माक्कांसारखे भक्त !’

– (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून मिळालेले ज्ञान, १६.३.२०१३, दुपारी २.५० आणि ३.३०)

 

३. सौ. उम्मा रविचंद्रन् यांच्यातील आत्मनिवेदनभक्तीतून
अव्यक्त मधुराभक्तीकडे वाटचाल होऊन त्यांच्यात बालकभक्ती
जागृत झाल्याने त्यांच्या चित्रांद्वारे भावभक्तीच्या असंख्य रंगांची
उधळण लालित्यपूर्ण, सौंदर्यजन्य आणि माधुर्यमय रितीने मुक्तहस्ते होणे

‘प.पू. डॉक्टरांच्या कृपेने सौ. उम्माक्कांना ‘चित्रकला’ प्राप्त झालेली असल्याचे तिचे स्वरूप परिपूर्ण आहे. पूर्ण स्वरूपातील चित्रकलेमुळे रेखीव आकृत्या, बोलके डोळे, तोंडवळ्यावरील हावभाव इत्यादी अचूक टिपले जाऊन चित्ररूपाने साकार रूप धारण करतात. इतकेच नव्हे, तर अंतःकरणातील भगवंताप्रतीच्या निस्सीम आत्मनिवेदन भक्तीचे विविध भावतरंग भावचित्रांद्वारे कागदावर उमटून भक्तीची शुभचिन्हे दर्शवतात. सौ. उम्माक्कांची भक्ती वैविध्यपूर्ण नटलेल्या राधेप्रमाणे सुंदर, रूपवान आणि अनुपम आहे. कृष्णकमळाप्रमाणे सौ. उम्माकांची भक्ती सर्वांगीण अन् परिपूर्ण आहे. त्यांच्या मधुराभक्तीत नवविधा भक्तीची प्रतिबिंबे आढळतात, संगीताचे सप्तस्वर झंकारतात आणि नृत्याचे नवरस उलगडतात. कृष्णभावरसामृताने ओतप्रोत असणारी त्यांची चित्रे म्हणजे त्यांच्या भावपूर्ण अंतःकरणाचे जणू सगुण साकार दर्पण-प्रतिबिंबच होय.

भगवंताची भक्ती करत आध्यात्मिक जीवनात अग्रेसर होत असतांना चित्तावरील सर्व संस्कार पुसट होऊ लागतात. भक्तीच्या परमोच्च बिंदूला पोहोचल्यावर भक्ताच्या मनातील अहंकारी जडत्वाचा वासनामय अंशही शेवटी गळून पडतो आणि भक्ताचे अंतःकरण निरागस बाळाप्रमाणे शुद्ध, पवित्र अन् निर्मळ बनते. सौ. उम्माक्का यांच्यातील आत्मनिवेदनभक्तीतून अव्यक्त मधुराभक्तीकडे वाटचाल होऊन त्यांच्यात बालकभक्ती जागृत झाल्याने चित्रांद्वारे भावभक्तीच्या असंख्य रंगांची उधळण लालित्यपूर्ण, सौंदर्यजन्य आणि माधुर्यमय रितीने मुक्तहस्ते होते. सौ. उम्माक्का म्हणजे सनातनला लाभलेले अनमोल कृष्णरत्न आहे.’

– (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून मिळालेले ज्ञान, १७.३.२०१३, रात्री ९.०५)

 

४. सनातनच्या ३१ व्या संत सौ. अंजली गाडगीळ यांना
बालकभावाची चित्रे काढण्याच्या प्रक्रियेसंदर्भात जाणवलेली वैशिष्ट्ये

४ अ. सौ. उमाक्कांनी चित्रे काढत असतांना प्रथम श्रीकृष्णाचे डोळे काढणे, तसेच बालकभावातील मुलीचेही
डोळे प्रथम काढून त्यानंतर चेहेरा काढणे, हे तेजतत्त्वाचे बळ घेऊन चित्राला आरंभ करण्याचे दर्शक असणे

‘सौ. उमाक्का चित्रे काढत असतांना प्रथम श्रीकृष्णाचे, तसेच बालकभावातील मुलीचे डोळे काढतात. नंतर चेहेरा, मग देहाची इतर अंगे, कपडे आणि शेवटी दागिने काढतात. प्रथम डोळे रेखाटून त्यानंतर संपूर्ण चित्र काढणे अत्यंत अवघड आहे. डोळे हे तेजतत्त्वाशी संबंधित आहेत. सौ. उमाक्का चित्रे काढत असतांना डोळ्यांच्या माध्यमातून श्रीकृष्णाकडून प्रथम तेजतत्त्वाचे सामर्थ्य घेऊनच चित्रातील रेखाटनाला आरंभ करत असल्याने ही चित्रे सर्वस्वी आध्यात्मिक तेजाने नटलेली दिसतात.

४ आ. चित्रे काढतांना सौ. उमाक्का स्वतःच एक स्थिर चित्र बनून श्रीकृष्णाचे चित्र काढत असल्याचे
जाणवणे आणि त्यांच्यातील समरस होण्याच्या गुणामुळेच त्यांच्या चित्रात सत्त्वगुण अधिक असणे

ज्या वेळी उमाक्का चित्र काढतात त्या वेळी त्यांच्या हाताची हालचाल पुष्कळच अल्प प्रमाणात होते. चित्रे काढतांना सौ. उमाक्का एकदम स्थिर असतात, जणुकाही स्वतःच एक स्थिर चित्र बनून त्या श्रीकृष्णाचे चित्र काढत असतात, इतक्या त्या चित्रातील स्पंदनांशी एकरूप झालेल्या असतात. त्यांच्यातील समरसतेमुळे त्यांच्या चित्रात अधिक सत्त्वगुण आलेला आढळतो.

४ इ. झोपेत असतांना श्रीकृष्णाचे चरण चेपत असल्याचे दृश्य दिसणे
आणि त्याच वेळी सौ. उमाक्कांनी काढलेल्या चित्रातही बालकभावातील साधिका
श्रीकृष्णाचे चरण चेपतांना दाखवलेली असल्याने झोपेत आलेल्या अनुभूतीचा उलगडा होणे

१६.९.२०१२ या दिवशी सौ. उमाक्का चेन्नईला जाणार होत्या. विमानतळावर पोहोचण्यासाठी चारचाकी गाडीतून जाण्यास त्यांना दीड घंटा लागणार होता. त्या वेळी मी सौ. उमाक्कांना म्हटले, ‘‘उमाक्का, गाडीतून जातांना दीड घंट्यात तुमचे अजून एक चित्र काढून पूर्ण होईल.’’ त्या वेळी त्या लगेचच ‘हो’ म्हणाल्या. दुपारी मी झोपले असता झोपेत मी प.पू. डॉक्टरांचे चरण चेपता चेपता श्रीकृष्णाचे चरण चेपण्यास आरंभ केला. मी झोपेतून जागी झाले, त्या वेळी माझ्या डोक्याशी सौ. उमाक्कांनी काढलेले श्रीकृष्णाचे चित्र कुणीतरी साधक ठेवून गेल्याचे आढळले. हे चित्र पाहिले, तर उमाक्कांनीही श्रीकृष्णाचे चरण चेपणारी बालकभावातील साधिका दाखवली होती. त्या वेळी मला झोपेत आलेल्या अनुभूतीचा उलगडा झाला.’

 

५. सौ. उमा रविचंद्रन् या श्रीकृष्णाचे चित्र काढत
असतांना होणारी सूक्ष्मातील प्रक्रिया दर्शवणारे चित्र

५ अ. सौ. उमा रविचंद्रन् यांचे मन शुद्ध (निर्मळ) असू्न श्रीकृष्णाची चित्रे काढतांना त्या स्वतःचे मन आणि बुद्धी यांचे अस्तित्व विसरून केवळ श्रीकृष्णाचेच स्मरण करत सातत्याने श्रीकृष्णाच्या अनुसंधानात असतात.

५ आ. श्रीकृष्णाची चित्रे काढतांना ‘श्रीकृष्ण आपल्यासमवेत आहे’, असा त्यांचा भाव असतो.

५ इ. चित्र काढतांना सौ. उमाक्कांचा श्रीकृष्णाप्रती उत्कट भाव असल्यामुळे त्यांनी काढलेल्या चित्रात जिवंतपणा येऊन त्यात श्रीकृष्णतत्त्व जागृत होते.

५ ई. अनुभूती : सौ. उमा रविचंद्रन् यांना श्रीकृष्णाचे चित्र काढतांना पाहून ‘त्या पृथ्वीतलावर नसून श्रीकृष्णाशी पूर्ण एकरूप झाल्या आहेत’, असे जाणवणे, तसेच त्यांच्याकडे पाहून साधिकेलाही आनंदाची अनुभूती येणे : मला सौ. उमा कला विभागात बसून सेवा करतांना दिसल्या. (सौ. उमा रविचंद्रन् तामिळ ‘सनातन पंचांग’ निर्मितीची सेवा करण्यासाठी ऑगस्ट-सप्टेंबर २०१२ मध्ये काही कालावधीसाठी सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात आल्या होत्या. – संकलक) त्या वेळी मला ‘त्यांच्याकडून भाव प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवले. मी जेव्हा पुन्हा त्यांच्या जवळून गेले, तेव्हाही मला तसेच जाणवले. त्यामुळे ‘त्या काय सेवा करत आहेत’, हे पहाण्यासाठी मी त्यांच्या जवळ गेले. त्या वेळी ‘त्या श्रीकृष्णाचे चित्र काढत असून त्यांचा भाव जागृत झाला आहे’, असे लक्षात आले. त्यांना चित्र काढतांना पाहून ‘त्या पृथ्वीतलावर नसून श्रीकृष्णाशी पूर्ण एकरूप झाल्या आहेत’, असे वाटले. त्या वेळी मला त्यांच्या तोंडवळ्यावर आनंद आणि डोळ्यांत श्रीकृष्णाप्रती असलेला भाव जाणवत होता. त्यांच्याकडे पाहून मलाही आनंद जाणवत होता.’

– (पू.) सौ. योया वाले, युरोप, एस्.एस्.आर्.एफ्. (अधिक भाद्रपद कृष्ण पक्ष द्वादशी, कलियुग वर्ष ५११४ (१२.९.२०१२))

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘‘बालकभावा’तील चित्रे (भाग १) (कृष्णभक्तीचा आनंद देणारी चित्रे त्यांच्या गुणवैशिष्ट्यांसह)’

Leave a Comment