४. बालकभावातील चित्र काढतांनाच्या चित्रीकरणाच्या वेळी उपनेत्र घातले नसल्याने स्पष्ट न दिसताही, तसेच चित्राविषयी कोणतीच मूर्त कल्पना मनात नसतांनाही श्रीकृष्णाने उंच उचलल्याचे चित्र शांतपणे साकारले जाणे
‘१५.९.२०१२ या दिवशी मी बालकभावातील चित्र काढतांनाचे चित्रीकरण करायचे असल्याने कागद आणि पेन्सिल देऊन मला चित्र काढण्याच्या मुद्रेत बसायला सांगितले होते. मी त्यानुसार बसून चित्र काढू लागले; परंतु त्या वेळी मी उपनेत्र (चष्मा) घातले नसल्याने मला काहीच स्पष्टपणे दिसत नव्हते. माझे मन अत्यंत शांत होते आणि मी ही अवस्था प्रथमच अनुभवत होते. याच अवस्थेत मी ते चित्र पूर्ण केले.
एरव्ही मी चित्र काढण्यापूर्वीच ते अनुभवलेले असते; मात्र या वेळी चित्र काढतांना ‘मी काय काढत आहे’, याची पुसटशी कल्पनाही माझ्या मनात नसतांना ते चित्र पूर्ण झाले. त्या चित्रामध्ये ‘श्रीकृष्णाने मला उंच उचलले आहे’, हे मला नंतर समजले. श्रीकृष्णाने माझी स्थिती किती उंचावली आहे, हे त्याने स्वतः काढलेल्या या चित्राच्या माध्यमातून व्यक्त केल्याचे मला जाणवले.’
– सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई
५. चित्रीकरणाच्या वेळी काढलेले बालकभावातील चित्र श्रीकृष्णानेच काढले असल्याची साक्ष असून स्वतः त्याकडे आश्चर्याने पहात असणे
‘सनातनच्या रामनाथी येथील आश्रमातील ध्वनीचित्रीकरण विभागात अनुभवायला आलेल्या अनुभूतीचे हे चित्र आहे. उपनेत्र (चष्मा) न घालता आणि यापूर्वी न अनुभवलेल्या अनुभूतीचे बालकभावातील हे चित्र श्रीकृष्णानेच काढले असल्याची ही साक्ष असून मी त्याकडे आश्चर्याने पहात आहे.’ – सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई.
५ अ. चित्राचे वैशिष्ट्य
‘कर्तेपणाच्या जाणिवेविना चित्रकलेची साधना समर्पणभावाने होत असल्याने साधनेच्या कर्मात न अडकता कर्मापासून निराळे असल्याचे साधिकेला जाणवले.
‘हें मजचिस्तव जाहलें । परि म्यां नाहीं केलें ।’ या संत ज्ञानेश्वरांच्या उक्तीप्रमाणे चित्र काढण्याची साधनामय कृती भगवान श्रीकृष्णाने केली आहे. साधिकेतील कर्तेपणाच्या अभावामुळे चित्र काढण्याच्या कर्मापासून ती निराळी असल्याने काढत असलेले चित्र पहात शेजारी श्रीकृष्ण बसल्याचे तिला जाणवते. ‘स्वतःला चित्रकलेचे ज्ञान नाही आणि स्वतः काहीही करू शकत नाही’, याची आंतरिक तीव्र जाणीव अन् ‘भगवंताची कलाकृती किती सुंदर अन् अपूर्व आहे’, हा कौतुकाचा भाव एकाच वेळी अंतःकरणात जागृत असल्याने मनात आश्चर्याचे भावतरंग उमटून मनदर्पण नेत्रांद्वारे आश्चर्य व्यक्त झाले आहे.’
– (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून मिळालेले ज्ञान, १८.७.२०१३, रात्री १०.५०)
६. ‘प्रत्यक्ष श्रीकृष्ण चित्र काढून घेण्यासाठी पुढ्यात उभा आहे’, असे चित्र
६ अ. देवतेचे चित्र काढण्याची इच्छा होणे आणि कृष्णाला
समोर उभा रहाण्यासाठी विनंती करताच तो अत्यानंदाने श्रीविष्णूच्या रूपात उभे रहाणे
मला श्रीकृष्णाचे चित्र काढायचे होते. त्यामुळे मी त्याला ‘कृष्णा, मला तुझे चित्र काढायचे असल्याने कृपया माझ्यासाठी तू उभा रहा, केवळ अर्ध्या घंट्यासाठी…’, अशी विनंती केली. यावर श्रीकृष्ण अत्यानंदाने शंख, चक्र आणि गदा यांसहित श्रीविष्णूच्या रूपात माझ्यासमोर त्वरित उभा राहिला. तो माझ्यासमोर प्रामाणिकपणे उभा असतांना मी मात्र पोटावर छान झोपून त्याचे दिव्य चित्र काढत आहे.’ – सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई