प.पू. डॉ. जयंत आठवले
महिलांना पुरुष पुजार्यांच्या बरोबरीने गाभार्यातून महालक्ष्मीचे दर्शन घडले पाहिजे, अशी मागणी करत १४.४.२०१२ या दिवशी कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्यात मनसेचे आमदार राम कदम यांनी महिलांसह प्रवेश केला होता. ५.९.२०१३ या दिवशीही याच मागणीसाठी मनसेच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्यात घुसल्या. दोन्ही घटनांच्या वेळी श्री महालक्ष्मी मंदिरातील पुरोहितवर्गाने गाभार्यात महिलांना प्रवेश देण्यास विरोध केला होता. कुठल्याही देवतेच्या देवळाच्या गाभार्यात कोणी आणि कधी प्रवेश करावा, याविषयी अध्यात्मशास्त्र काय सांगते, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
१. देवी असो कि देवता त्यांच्या कुठल्याही देवळाच्या गाभार्यात महिलांनी मासिक पाळीच्या वेळी जाऊ नये; कारण त्या वेळी महिलांमधील रजोगुण जास्त प्रमाणात वाढलेले असतो. परिणामी त्यांना गाभार्यातील सात्त्विकतेमुळे सूक्ष्मातून त्रास होण्याची शक्यता असते.
२. गाभार्यातील प्रवेशाचे पारंपरिक नियम आहेत. तेथील सोवळे कडक आहे. त्यामुळे स्त्रियांनी कडक सोवळे पाळले, तरच त्या जाऊ शकतात. सोवळे न पाळणार्या स्त्रियांनी गाभार्यात प्रवेश करू नये. पुरुषांनीही आंघोळ करून सोवळ्याविना गाभार्यात जाऊ नये. गाभार्यातील प्रवेशासंबंधीचे अध्यात्मशास्त्रानुसारचे पारंपरिक नियम पाळल्याने तेथील सात्त्विकता आणि पावित्र्य टिकून रहाते. हे नियम न पाळल्यास तेथील सात्त्विकता आणि पावित्र्य यांची हानी होते.
३. प्रत्येक पिठाचे ठरलेले नियम पाळणे आवश्यक असते; कारण त्यामागे विशिष्ट आध्यात्मिक हेतू असतात.
४. सध्या व्यवहारातही आपण कोणाकडे किंवा एखाद्या कार्यालयात गेलो, तर तेथील नियम पाळतो. तसेच देवळातील नियमही पाळणे आवश्यक आहे.
– (प.पू.) डॉ. आठवले, (२.४.२०१४)