३. मानसपूजा करणे

३ अ. चित्र काढतांना साधिकेने अनुभवलेली भावावस्था
‘मी फार लहान असल्याने षोडषोपचार पूजा करू शकत नाही, तरीसुद्धा माझ्या ईश्वराची पूजा मला करायची असल्याने मी ती मानसरित्या केली. त्या वेळी काही भक्तांच्या कथा आठवून त्यानुसार मानसपूजा करण्याचा प्रयत्न केला.
१. श्रीकृष्णाला फुले वाहतांना शिवभक्त कण्णप्पा नायनारप्रमाणे भाव असणे
श्रीकृष्णाला फुले वाहतांना माझा भाव कण्णप्पा नायनारप्रमाणे होता. कण्णप्पा नायनार हा भिल्ल शिवाचा अनन्यभक्त असल्याने त्याला पूजा कशी करायची, हे ठाऊक नव्हते. त्याच्या हातात नैवेद्यासाठी मांस असल्याने पूजेसाठी आवश्यक ती फुले तो डोक्यात घालायचा आणि मंदिरात आल्यावर ती फुले तो शिवाला वाहायचा.
२. श्रीकृष्णाला तुळशीचा हार घालतांना साधिकेचा श्रीकृष्णभक्त आंडाळप्रमाणे भाव असणे
श्रीकृष्णाला तुळशीचा हार घालतांना माझा भाव श्रीकृष्णभक्त आंडाळप्रमाणे होता. ही कृष्णवेडी पूजा करतांना रंगनाथाच्या (श्रीकृष्णाच्या) मूर्तीला तुळशीचा हार घालण्यापूर्वी तो स्वतः घालून ‘रंगनाथाला तो हार कसा दिसेल’, ते आरशात पहात असे. तिच्या वडिलांना हे कळल्यावर त्यांनी तिला तसे करणे अयोग्य असल्याचे सांगितले आणि दुसर्या दिवशी तिने न घातलेला हार त्यांनी रंगनाथाच्या मूर्तीला घातला. त्या रात्री त्यांना स्वप्नात रंगनाथाने ‘मला आंडाळने घातलेला हारच हवा !’ असे सांगितले. त्या वेळी आंडाळ ही सामान्य बालिका नसून रंगनाथाची अनन्य भक्त असल्याचे वडिलांना कळले.
३. श्रीकृष्णाला नैवेद्य अर्पण करतांना माझा भाव श्रीरामभक्त शबरीप्रमाणे होता.
४. आरती करतांना माझा भाव कौसल्यामातेप्रमाणे होता.’
– सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई
४. श्रीकृष्णाच्या सगुण रूपासमोर, म्हणजेच प.पू. डॉक्टरांसमोर आत्मनिवेदन करणे

‘मला शारीरिक आणि मानसिक त्रास जाणवत होता, त्या वेळी मी हे चित्र काढले. चित्र काढतांना मला पुष्कळ शांत वाटत होते.’ – सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई (१.८.२०१२)
५. श्रीकृष्णाच्या चरणी क्षमायाचना करतांना
स्वतःचा स्वीकार करण्यासाठी साधिकेने विनवणी करणे

‘हे श्रीकृष्णा, मी तुझ्या चरणी क्षमायाचना करत आहे. मी आतापर्यंत किती चुका केल्या, हे माझे मलाच ठाऊक नाही; परंतु तू सर्व काही जाणतोस. माझ्यासाठी माझे आई-वडील आणि गुरु असे सर्व काही तूच आहेस. माझ्या सर्व चुकांसाठीही तूच उत्तरदायी आहेस. मी एवढ्या चुका करत असतांना तू कधीही माझ्यावर अप्रसन्न झाला नाहीस. मी तुझ्या चरणी शरण आले आहे. हे भगवंता, कृपया माझा स्वीकार कर !’ – सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई (२८.८.२०१२)
५ अ. ‘श्रीकृष्णचरणी आपले स्वभावदोष आणि अहं अर्पण करणे, हे काटे अर्पण
करण्यासारखेच असून ते त्याला टोचू शकतात’, याची प.पू. डॉक्टरांनी जाणीव करून देणे
‘मी माझ्यातील बालकभावासंबंधीची सूत्रे लिहून पाठवल्यानंतर प.पू. डॉक्टरांनी दिलेली ‘साधकांसाठी सूचना’ मला कळली. या सूचनेमध्ये त्यांनी ‘ईश्वराला आपले स्वभावदोष आणि अहं अर्पण करणे, हे काटे अर्पण करण्यासारखे असून ते त्याला टोचू शकतात’, असे सांगितले आहे. क्षमायाचना करतांना मी माझे स्वभावदोष आणि अहंरूपी काटे श्रीकृष्णाला अर्पण करत होते; परंतु माझ्याकडून अशी चूक होऊ नये, याची प.पू. डॉक्टरांनाच काळजी आहे, याची मला जाणीव झाली. त्यांनी मला माझी चूक त्वरित लक्षात आणून दिली.’ – सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई (२८.८.२०१२)
५ आ. चित्राची वैशिष्ट्ये
१. चित्रातील राजसिंहासनावर बसलेल्या भगवंताचा राजयोग सिद्ध करण्यासाठी त्याच्या पायांत नूपुर दाखवलेले असणे
‘या चित्रात भगवंताच्या पायांत नूपुर दाखवले आहेत; कारण तो येथे राजसिंहासनावर बसला असून त्याचा राजयोग सिद्ध करण्यासाठी असे अलंकारासहित चित्र रेखाटले आहे. इतर चित्रांत तो क्षात्रभावात किंवा इतर भावांत, म्हणजेच वात्सल्य, करुणा आदी भावांत असल्याने त्याच्या पायांमध्ये काहीच दाखवलेले नाही किंवा काही चित्रांत पायांत कडी दाखवली आहेत.
२. श्रीकृष्णापुढे क्षमायाचना करतांना बालकभावातील साधिकेचे गुडघेही नम्रतेने श्रीकृष्णासमोर झुकले आहेत, असे जाणवणे
श्रीकृष्णापुढे क्षमायाचना करतांना बालकभावातील साधिकेचे गुडघेही नम्रतेने श्रीकृष्णासमोर झुकले आहेत, असे जाणवते. परकरातूनही गुडघ्यांचा हा नम्रतेने झुकलेला बाक साधिकेने चित्रातून अत्यंत सुंदरतेने स्पष्ट करून दाखवला आहे. वस्त्रामागे दडलेल्या एखाद्या घटकातून भाव प्रकट करून दाखवणे, हे भल्याभल्या चित्रकारांनाही जमत नाही, ते साधिकेने देवाच्या आशीर्वादामुळे शक्य करून दाखवले आहे.’
– सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.९.२०१२)