१. भगवान श्रीकृष्णाने मुरुगादेवाला (कार्तिकस्वामीला) स्वतः दुग्धाभिषेक करणे
‘२४.९.२०१२ या दिवशी चेन्नई येथील साधिका सौ. रागिणी प्रेमनाथ (श्रीकृष्णाची चित्रे काढणारी बालसाधिका कु. रंजनीची आई) यांनी त्यांना आलेली अनुभूती मला सांगितली आणि माझ्या पुढील चित्राला प्रेरणा मिळाली.
१ अ. चित्राचे विवरण
१. मुरुगा देवावर भक्ती असल्याने आणि प्रयत्न करूनही श्रीकृष्णाप्रती भावजागृती होत नसल्याने साधिकेला निराशा येणे
सौ. रागिणी यांची देव मुरुगा (कार्तिकस्वामी) याच्यावर अपार भक्ती आहे. त्यामुळे त्यांनी कितीही प्रयत्न केले, तरी श्रीकृष्णाप्रती त्यांची भावजागृती होत नव्हती. त्यामुळे त्यांना निराशा आली होती.
२. साधिकेने श्रीकृष्णाला आर्ततेने प्रार्थना करणे आणि मुरुगादेवाचे एक भक्तीगीत लागल्यामुळे भावाश्रू येऊन ‘श्रीकृष्णानेच उत्तर दिले’, असे वाटून मन शांत होणे
१९.९.२०१२ या दिवशी श्री गणेशाच्या मंदिरात एका सेवेसाठी गेले असता सौ. रागिणी यांनी श्रीकृष्णाला त्यांच्या मनातील व्यथा सांगून योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आर्ततेने प्रार्थना केली. तसेच त्यांची भक्ती मुरुगावरून श्रीकृष्णाकडे वळवण्यासही सांगितले. त्या वेळी मंदिराबाहेर श्री गणेशाचे भक्तीगीत मोठ्या आवाजात चालू होते. सौ. रागिणी मंदिराबाहेर येताच अकस्मात् ते गाणे बंद होऊन त्यांच्या आवडीचे (‘तुझ्याविना अन्य देव कोणी नाही’ या आशयाचे तामिळ भाषेतील) मुरुगादेवाचे गाणे लागले. त्याक्षणी त्या भावविभोर होऊन त्यांच्या डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागले. सध्याच्या कलियुगामध्ये श्रीकृष्णतत्त्व अधिक प्रमाणात असल्याने त्यांना श्रीकृष्णानेच तत्परतेने उत्तर दिल्याचे जाणवले. त्यांचे मन एकदम शांत झाले आणि ‘भाव सर्वांत महत्त्वाचा’, हे त्यांना कळून चुकले.
या चित्रामध्ये श्रीकृष्ण मुरुगादेवाला दुग्धाभिषेक घालत आहे. मुरुगाचे वाहन असलेला मोर त्याकडे प्रेमपूर्वक दृष्टीने पहात आहे. तसेच छोट्या रागिणीने देव मुरुगाचे पाय घट्ट पकडले आहेत.’
– सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई (२५.९.२०१२, सकाळी ६.४५)
१ आ. चित्राची वैशिष्ट्ये
१. बालकभाव असलेल्या साधकांचे तोंडवळे एकसारखेच दिसत असल्याने ‘रागिणी उमासारखीच’ दिसत असणे
‘या चित्रात रागिणीही उमासारखीच दिसते. सौ. उमाक्कांना यामागचे कारण विचारल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘चेन्नईतील साधिका सौ. रागिणी प्रेमनाथ यांच्यामध्ये मुरुगादेव (कार्तिकस्वामी) याच्याप्रती बालकभाव आहे. ज्या साधकांमध्ये बालकभाव असतो, त्या सर्वांचे तोंडवळे एकसारखेच दिसतात. यामुळे या चित्रात सौ. रागिणी यांचा तोंडवळासुद्धा उमासारखाच काढला आहे.’ – कु. प्रियांका लोटलीकर
२. ‘उपास्यदेवतेची पूजा-अर्चा करण्यामागील बालकभावातील साधिकेचा भाव लक्षात घेऊन आणि ‘उपास्यदेवतेची भक्ती कशी करायची, हे मला कळत नाही. मी लहान मुलगी पूजा-अर्चा करू शकत नाही’, असा बालिकेच्या मनातील शरणागतभाव ओळखून श्रीकृष्णाने तिच्यासाठी तिच्या उपास्यदेवतेला दुग्धाभिषेक केला. बालकभावातून श्रीकृष्णाशी असणारी साधिकेची जवळीक आणि त्या भावातून केलेली अर्चनभक्ती यांच्या मधुर संगमाचे दर्शन या चित्रातून होत आहे.’ – (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून मिळालेले ज्ञान, १८.७.२०१३, रात्री १०.५०)
२. भगवंताच्या चरणी केलेल्या चित्ररूप प्रार्थना !
२ अ. चित्राचे विवरण
१. पू. सत्यवानदादा (सनातनचे पाचवे संत पू. सत्यवान कदम) करत असलेल्या प्रार्थनेचे भाषांतर करतांना प्रार्थनेतील भावार्थ अंतर्मनापर्यंत पोहोचून भावजागृती होणे आणि त्यातून बालकभावाचे चित्र साकारणे
‘एकदा मी पू. सत्यवानदादांनी श्रीकृष्णाला केलेली प्रार्थना ऐकली होती. या प्रार्थनेतून ते ‘माझ्यामध्ये माता यशोदेचा वात्सल्यभाव (चित्र १), राधेचे निरपेक्ष प्रेम (प्रीती) (चित्र २), मीरेचा समर्पणभाव (चित्र ३), द्रौपदीचा याचकभाव (चित्र ४) आणण्यास मला शिकव, तसेच तू धनुर्धारी अर्जुनाला (चित्र ५) जसे मार्गदर्शन केलेस, तसे आम्हाला या धर्मयुद्धात मार्गदर्शन कर’, अशी श्रीकृष्णाला आळवणी करायचे. या प्रार्थनेचे तामिळ भाषेत भाषांतर करतांना तिच्यातील भावार्थ माझ्या अंतर्मनापर्यंत पोहोचून माझी पुष्कळ भावजागृती झाली. बालकभावाचे हे चित्र म्हणजे भगवंताच्या चरणी केलेल्या चित्ररूप प्रार्थनाच होत.’ – सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई