३. श्रीकृष्णाच्या शेल्याला घट्ट धरून त्याच्या खांद्यावर झोपणे
३ अ. चित्राचे विवरण
‘माता-पिता, सखा, सर्वकाही असलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या कोमल शेल्याला घट्ट धरून सर्व काही त्याच्या चरणी आधीन करून, ‘तोच माझे रक्षण करणार आहे’, या दृढ, परिपूर्ण, शुद्ध श्रद्धेने साधिका झोपली आहे.’
४. साक्षात् श्रीकृष्णाने बालिकेला बालगोपीप्रमाणे सजवणे
४ अ. चित्राचे विवरण
१. स्वभावदोष आणि अहं यांची व्याप्ती काढतांना श्रीकृष्णाला प्रार्थना करणे अन् श्रीकृष्ण मला बालगोपीप्रमाणे बनवत असल्याची अनुभूती येणे
‘काल मी पूर्णपणे अंतर्मुख होऊन माझे स्वभावदोष आणि अहं यांची व्याप्ती काढत होते. ही व्याप्ती काढतांना पुष्कळ विचारप्रक्रिया झाल्यामुळे मी कंटाळले होते. त्यामुळे मी ‘बालकभावाची अनुभूती देऊन तूच मला उत्साही बनव’, अशी प्रार्थना श्रीकृष्णाला केली. त्या वेळी श्रीकृष्णाने ‘तो मला बालगोपीप्रमाणे बनवत आहे’, अशी अनुभूती मला त्वरित दिली. बालगोपीप्रमाणे बनवतांना त्याने मला एक लोण्याने भरलेले लहानसे मटकेही दिले. या अनुभूतीनंतर मी एका नव्या उत्साहाने माझे दोष आणि अहं यांची व्याप्ती काढण्यात मग्न झाले.
४ आ. चित्राचा भावार्थ
१. बालगोपी होण्यासाठी उत्सुक असलेल्या साधिकेला साक्षात् श्रीकृष्णच सजवत असणे
भगवान श्रीकृष्ण मला प्रतिदिन सनातनच्या गोपींविषयी (टीप) सांगत आहे. त्यामुळे बालगोपी होण्यासाठी मी अतिशय उत्सुक बनले आहे. भगवान श्रीकृष्ण मला बालगोपी बनवण्यासाठी पोशाख घालून सजवत आहे. मला पूर्णपणे सजवल्यानंतर ‘मला दृष्ट लागू नये’ यासाठी भगवान श्रीकृष्ण माझ्या हनुवटीवर काजळाची तीट लावत आहे.’
– सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई (६.११.२०१२)
४ इ. चित्राचे वैशिष्ट्य
‘बालकभावातून साकारलेली शुद्धतम मधुराभक्ती म्हणजे ‘बालगोपी’ होय. निर्मळ अंतःकरणातून प्रगटणार्या निरागस निरपेक्ष प्रेमाच्या भावतरंगांची जोड मधुराभक्तीला प्राप्त झाल्यावर तिची शुद्धता परमोच्च अवस्थेला पोहोचून भक्ताचे रूपांतर परम भक्तात होते. सर्व भक्तांमध्ये परम भक्त भगवंताला सर्वाधिक प्रिय असतो आणि तोच भगवंताशी पूर्णपणे एकरूप होऊ शकतो. भगवंताच्या निर्मळ भक्तीरंगात खोलवर जाऊन पूर्णतः भक्तीरंगाने रंगून गेल्यावर भक्तीरस अंतरंगापर्यंत झिरपतो. या अवस्थेत भक्तीचा आनंद, भावाची निर्मळता आणि अज्ञानीपणाची आंतरिक जाणीव यांचा सुवर्ण मिलाप होऊन भगवंताप्रतीच्या उत्कट प्रीतीमय अनोख्या भक्तीचा उदय होतो.
या भक्तीमध्ये प्रेमिकेचा प्रेमरस आहे, कृष्ण प्रियतमाचे विरह दुःख भरले आहे, जिवाला कृष्णभेटीची आस लागल्यामुळे तळमळरूपी अग्नीज्वाळाही अंतरंगात क्षणोक्षणी धगधगत आहे अन् अंतरंगात कृष्णमीलनाच्या आनंदाचा भक्तीरसही ओतप्रोत भरलेला आहे. अशी ही अनोखी भक्ती म्हणजे मधुराभक्ती ! निर्मळ, निश्चल, निरपेक्ष, निरागस आणि निष्पाप प्रीतीच्या समुद्रात न्हाऊन निघालेल्या भक्तीमध्ये प्रीतीची गोडी मुरलेली आहे. अशा प्रीतीच्या गोडीने भरलेल्या, प्रेमरसशृंगाराने नटलेल्या आणि श्रीकृष्णाच्या मधुर मीलनासाठी आसुसलेल्या शुद्धतम मधुराभक्तीमय परमकृष्णसौंदर्याने श्रीकृष्ण बालगोपीला सजवत आहे.’
– (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून मिळालेले ज्ञान, १८.७.२०१३, रात्री १०.५०)
५. श्रीकृष्णाच्या मांडीवर बसून झोका घेणे
५ अ. हे चित्र काढत असतांना साधिकेने स्वतः अनुभवलेली भावावस्था
१. ‘हे चित्र ‘बालकभावा’तील अगदी पहिले चित्र आहे. ‘मी ३ वर्षांची बालिका असून श्रीकृष्ण माझी सर्व काळजी घेत असल्याने मी निर्धास्त आहे’, असा भाव ठेवल्यानंतर मी तसे अनुभवू शकले.
२. झोपाळ्यावर बसून झोका घेणे, म्हणजे आरामात असणे किंवा चिंताविरहित असणे
३. वृंदावनात उडणार्या फुलपाखराच्या समवेत झोपाळ्यावर बसून झोका घेणे, हे अधिक प्रमाणात निश्चिंत रहाणे आहे.
४. श्रीकृष्णाच्या मांडीवर बसून झोका घेणे, ही अत्युच्च भावावस्था आहे.’
– सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई
५ आ. चित्राचे वैशिष्ट्य – या चित्रात स्वतःला प्राप्त झालेला
हलकेपणा दाखवण्यासाठी फुलपाखरू दाखवलेले असणे
‘या चित्रात झोका खेळतांना जो वार्यावरचा हलकेपणा आपल्याला प्राप्त होतो, त्याचे दर्शक म्हणून झोक्याजवळ फुलपाखरू दाखवले आहे. फुलपाखरू हवेतून उडते, म्हणजे त्याच्यात जो हलकेपणा असतो, तोच हलकेपणा श्रीकृष्णासमवेत झोका खेळतांना बालकभावातील साधिकेला प्राप्त झाला आहे.’ – सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.९.२०१२)
टीप –‘द्वापरयुगात गोपी जशा श्रीकृष्णाप्रती भक्तीभाव ठेवायच्या, तसा उत्कट भाव सनातन संस्थेच्या साधिका श्रीकृष्णाप्रती ठेवतात. त्या साधिकांना ‘गोपी’ म्हटले आहे.’ – संकलक (मूळस्थानी)