अनुक्रमणिका
‘जे अमर्याद आणि अनंत आहे, तेच खर्या सुखाचे, म्हणजेच आनंदाचे उत्पत्तीस्थान असते. ते सतत टिकणारा आनंद देते आणि दुःखापासून आपली नित्याची सुटका करते.’ आपण अशाश्वत (किंवा अनित्य) गोष्टींपासून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो. अशाश्वत (किंवा अनित्य) गोष्टी मर्यादित किंवा परिवर्तनशील असल्यामुळे त्या गोष्टींमध्ये निरंतर टिकणारे सुख नसते. आपल्यातील शाश्वताला (किंवा चिरंतन तत्त्वाला) जाणून न घेताच अशाश्वत (किंवा अनित्य) गोष्टींपासून कितीही सुख, शांती मिळवण्याचा प्रयत्न केला, तरी त्याचा उपयोग होत नाही. आपला आनंद आपल्यामध्येच आहे. त्यामुळे दुसरा आपल्याला आनंद देईल, अशी अपेक्षा करू नये. आपण जीवनाचे सुशाश्वत मूल्य जाणले, तर अशाश्वत गोष्टींपासूनही आपल्याला आनंदप्राप्ती करून घेता येईल. सुशाश्वत मूल्य समजून घेण्याच्या पुढील पद्धती आहेत.
१. धर्माचे पालन
सुखार्थाः सर्वभूतानां मताः सर्वाः प्रवृत्तयः ।
सुखं च न विना धर्मात् तस्माद्धर्मपरो भवेत् ।। – वाग्भट (अष्टाङ्गहृदय, सूत्रस्थान, अध्याय २, श्लोक १९)
अर्थ : सर्व प्राणीमात्रांच्या प्रवृत्ती या सुखप्राप्तीसाठीच असतात (येथे सुख हा शब्द आनंद या अर्थाने वापरला आहे.); पण त्यांना अपेक्षित असे सुख धर्मपरायण झाल्यासच मिळते; म्हणून धर्मपरायण असावे. धर्माचरणी मनुष्य ज्ञानी किंवा अज्ञानी कसाही असो, त्याला सुख मिळणारच.
२. साधना
चित्तावरची वासना, आवड-नावड, स्वभावदोष इत्यादी संस्कार नाहीसे केले, अविद्येचा नाश केला, तरच आपल्यात असलेल्या आनंदाची अनुभूती आपल्याला मिळू शकते. हे संस्कार, अविद्या नाहीशी करण्याच्या पद्धतीला ‘साधना’ असे म्हणतात.
नामस्मरण, सत्संग, सत्सेवा, सत् साठी त्याग आणि सर्वांवर प्रीती ही व्यष्टी साधनेची प्रमुख अंगे होत. साधनेमुळे चित्तावरचे संस्कार नाहीसे होतात, त्याचप्रमाणे संचित कर्म न्यून होते आणि प्रारब्धातील दुःख भोगण्याची क्षमता वाढते. साधनेमुळे क्रियमाणातील चुकाही व्यक्ती टाळू शकते; कारण साधनेने सात्त्विकता वाढल्याने निर्णय योग्यच असतात.
३. संतसहवास
१. ‘स्त्रीसंगात सामान्य मनुष्याला जो आनंद होतो, तो आनंद जीवन्मुक्ताला नेहमीच होत असतो; म्हणून त्याला कामवासना नाही.’ – संत एकनाथ महाराज
‘माणसामध्ये वासना जेवढी अल्प तेवढा त्याचा सहवास आनंदाचा. वासना बीजरूपाने असूनही लहान मूल आपल्याला हवेहवेसे वाटते. हे जर खरे, तर ‘भगवंताच्या कृपेने ज्याचा समूळ वासनाक्षय होतो, त्याचा सहवास आनंददायी होतो’, असे म्हटले, तर ते अशक्य का वाटावे ?’
संतांकडून आनंदाच्या लहरी प्रक्षेपित होत असतात. पंचज्ञानेंदि्रये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडचे सूक्ष्मातील कळायला लागले की, त्या आनंदलहरींची अनुभूती प्रत्येक साधकाला येतेच.
२. वाईट व्यक्तींच्या सहवासात व्यक्ती दुःखाला सुख मानते, उदा. चोरी करणे, मद्य पिणे यांना सुख मानते. संतसहवासात सुख हे दुःख वाटायला लागते. ते खरे वैराग्य होय. संत सुखाची इच्छाच नष्ट करतात. तसेच संतसहवासात दुःख हेही सुख वाटायला लागते; कारण दुःख भोगण्याची क्षमता प्राप्त होते; म्हणून दुःख होत नाही आणि सहवासातील आनंद तर मिळतोच. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ‘सद्गुरुविणे सापडेना सोय । धरावे ते पाय आधी आधी ।।’ यातील पहिला ‘आधी’ म्हणजे अगोदर आणि दुसरा ‘आधी’ म्हणजे मानसिक दुःख. म्हणजे दुःख मनावर जाण्यापूर्वी तुम्ही संतांना शरण जा.’ – प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.
३. काही किरणांनी जशा कर्करोगाच्या पेशी नाश पावतात, तसे संतसहवासात अधिक काळ राहिल्यास त्यांच्याकडून येणार्या लहरींनी मनोलय आणि बुद्धीलय होतो, म्हणजेच सूक्ष्मदेह अन् कारणदेह नाश पावतात, अविद्येचा नाश होतो आणि ती व्यक्ती आत्मानंद अनुभवते.
४. सुखाचा त्याग
जीवनात आपण भौतिक सुखांचा त्याग जितका जास्त करू, तितके आपल्या दुःखाचे प्रमाण उणावण्यासह आध्यात्मिक सुखाचे, अर्थात आनंदाचे प्रमाण वाढते; म्हणून ‘प्रापणात् सर्व भोगानाम् परित्यागो विशिष्यते ।’, म्हणजे ‘सर्व भोग उपभोगण्यापेक्षा त्यांचा त्याग विशेष महत्त्वाचा आहे’, असे म्हटले आहे. भोगात तात्काळ सुख मिळते, तर त्यागात प्रथम दुःख आणि नंतर आनंद आहे.
५. शक्तीचा अपव्यय टाळणे
जी शक्ती सुखाची इच्छा करण्यात व्यय होत असते, ती निखळ शक्तीच आनंदस्वरूप असते. ते कळले, तर इच्छाच निर्माण होणार नाही.
६. प्रेमरूप होणे
व्यक्तीचे सुखदुःख हे कर्मजन्य असल्यामुळे सर्वांना समान सुख कधीही मिळू शकत नाही, अशी आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. सुखदुःख हे कर्मजन्य असले, तरी प्रेम हे कर्मजन्य नसल्यामुळे आपण दुसर्याला त्याच्या दुःखात सहानुभूती दर्शवू शकतो. त्यामुळे त्या दुःखी जिवाचे मनोबल वाढून त्याला ते दुःख सुसह्य होते. हेच आपल्या धर्माचे वैशिष्ट्य आहे. अशा प्रेम करण्यामुळे मनुष्याची वृत्ती सात्त्विक आणि त्यागी होऊन हळूहळू त्याच्या आवश्यकताही अल्प होत जातात आणि पुढे तो आत्मलाभ करून घेऊ शकतो.
७. अहंभाव नष्ट करणे
आनंद म्हणजे ‘स्व’ ला विसरणे. ‘ब्रह्मात विलीन झाले की, शाश्वत सुख मिळते, असे धर्म सांगतो. ते जर खरे असेल, तर व्यक्तीच्या दृष्टीने ‘मोक्ष म्हणजे आत्मा ब्रह्मात विलीन होणे’, हेच परमोच्च साध्य होय. ‘देह तर सोडायचाच; पण ‘मी’ ही जाणीवही नष्ट करून टाकायची. त्यानंतरही मला सुख मिळेल’, असे धर्म सांगतो. सुख भोगणाराच नाहीसा झाला की, मग त्याला सुख लागेल, अशी ही विचित्र कल्पना (वस्तूस्थिती) आहे.’ (‘मी’पणा संपला की, ब्रह्मच उरते. ते सत्-चित्-आनंदमयी असल्याने आनंदाची अनुभूती येते. तेव्हा अनुभूती घेणारा आणि त्याची अनुभूती असे द्वैत नसते.)
त्यामुळे या शाश्वत आनंदाची अवीट गोडी चाखण्यासाठी ‘योग्य साधना’च करायला हवी ! ती जाणून घेण्यासाठी ‘गुरुकृपायोग’ यावर ‘क्लिक’ करा !