प्रस्तूत लेखात आपण होम केल्याने होणारे लाभ, तुळशीला पाणी घालणे, स्नान केल्यावर लगेच देवपूजा का करावी यांविषयी जाणून घेऊयात. तसेच वडीलमंडळींची भेट घेणे, आरसा अथवा तूप यांत आपले प्रतिबिंब पहाणे, केशभूषा करणे, अलंकार धारण करणे, अंजन अथवा काजळ डोळ्यांत घालणे इत्यादी कृत्ये शुभसूचक कशी आहेत हे जाणून घेऊया.
१. होम
१ अ. ‘यज्ञ केल्याने देवांचे ऋण फिटते; म्हणून प्रत्येक मनुष्याने आमरण अग्नीहोत्र (सकाळी आणि सायंकाळी अग्नीमध्ये आहुत्या अर्पण करणे) केले पाहिजे.’ – शतपथ ब्राह्मण, काण्ड १२, अध्याय ४, ब्राह्मण १, खण्ड १
१ आ. ‘प्रत्येक ब्राह्मणाने तीन श्रौत अग्नींपैकी (आहवनीय, गार्हपत्य आणि दक्षिणाग्नी) एका अग्नीचे आधान (अग्नीची उपासना) अवश्य केले पाहिजे.’ – योगवासिष्ठ
गृहस्थाश्रम्याने गार्हपत्य अग्नीची, तर अग्नीहोत्र्याने तिन्ही अग्नींची उपासना करणे आवश्यक आहे.
२. तुळशीला पाणी घालणे आणि नमस्कार करणे
देवपूजेस आरंभ करण्यापूर्वी तुळशीला पाणी घालून तिचे पूजन करावे. या वेळी पुढील श्लोक म्हणावा.
तुलसि श्रीसखि शुभे पापहारिणि पुण्यदे ।
नमस्ते नारदनुते नारायणमनःप्रिये ।। – श्री तुलसीस्तोत्र, श्लोक १५
अर्थ : श्री लक्ष्मीची भगिनी, कल्याणकारी, पाप दूर करणारी, पुण्यदा, नारद जिची स्तुती करतात अन् श्रीविष्णूला जी अतिशय प्रिय आहे, अशा तुलसीमातेला मी नमस्कार करतो.
स्त्रियांनी तुलसीपूजन नित्य करावे. स्त्रियांनी तुलसीपूजन झाल्यानंतर नित्यनैमित्तिक कर्मांना आरंभ करावा. तुळशीला नमस्कार करण्याचे इतके महत्त्व असल्यानेच पूर्वीच्या काळी घरोघरी तुळशीवृंदावन असायचे.
३. देवपूजा
३ अ. स्नान केल्यानंतर शक्यतो
एका घंट्याच्या आत देवपूजा चालू करण्याचे महत्त्व
३ अ १. आंघोळीनंतर जिवाभोवती निर्माण झालेले आपतत्त्वाचे वलय सात्त्विक कणांनी भारित होणे आणि त्यामुळे देवतांच्या तत्त्वांना आकर्षित करणे सोपे जाणे
‘२७.१०.२००५ या दिवशी देवपूजा करत असतांना माझ्या मनात प्रश्न आला, ‘स्नान केल्यावर लगेचच देवपूजा का करावी ?’ त्या वेळी आतून उत्तर आले, ‘स्नान करणे म्हणजे स्थूलदेह आणि सूक्ष्मदेह यांवरील पृथ्वीलहरींचे अन् तमोगुणी आवरणाचे उच्चाटन होय. स्नान केल्यावर जिवाच्या भोवती आपतत्त्वाचे एक वलय निर्माण झालेले असते. ते वलय सात्त्विक कणांनी भारित असल्याने या सात्त्विकतेच्या बळावर देवतांच्या तत्त्वांना आकर्षित करणे सोपे जाते. स्नान केल्यावर जिवाची देवतांचे चैतन्य ग्रहण करण्याची क्षमता वाढलेली असते. या वेळेत जिवाला मिळणारे चैतन्य पूर्ण दिवस टिकू शकते.’ – श्री. निमिष म्हात्रे, कांदिवली, मुंबई.
३ अ २. स्नानामुळे वाढलेल्या सात्त्विकतेचा लाभ होण्यासाठी स्नान केल्यावर एका घंट्याच्या आत देवपूजा चालू करणे आवश्यक असणे
‘स्नान केल्यावर एका घंट्यानंतर स्नानामुळे वाढलेली सात्त्विकता वायूमंडलातून होत असलेल्या रज-तम कणांच्या सततच्या आक्रमणांमुळे क्षीण होण्यास आरंभ होतो. त्यामुळे स्नानामुळे वाढलेल्या सात्त्विकतेचा जिवाला लाभ होत नाही; म्हणून शक्यतो स्नानानंतर एका घंट्याच्या आत देवपूजा चालू करावी.’
– एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, १६.४.२००७, सायं. ६.१३)
३ अ ३. ‘देवपूजेतून मिळणार्या सात्त्विक लहरींद्वारे दिवसभरातील कामे करण्यास आरंभ होतो.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २९.१०.२००७, सकाळी ९.४६)
‘देवपूजे’विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे ‘क्लिक’ करा !
४. शुभसूचक कृत्ये करणे किंवा शुभ वस्तूंकडे पहाणे
४ अ. शुभसूचक कृत्ये करणे
‘वडीलमंडळींची भेट घेणे, आरसा अथवा तूप यांत आपले प्रतिबिंब पहाणे, केशभूषा करणे, अलंकार धारण करणे, अंजन अथवा काजळ डोळ्यांत घालणे इत्यादी कृत्ये शुभसूचक असतात.’ – नारद प्रकीर्णक
४ अ १. शास्त्र – शुभसूचक कृतींमुळे देहातील सत्त्वगुणात्मक चेतना काही काळ टिकून रहाण्यास साहाय्य होणे
‘देवपूजा करणे, ही कृती देहात सत्त्वगुण वाढवणारी असल्याने ती झाल्यावर ‘शुभसूचक कर्मे, म्हणजेच सत्त्वगुणाचे प्रक्षेपण करणारी कर्मे करावीत’, असे म्हटले आहे. या शुभसूचक कृतींमुळे देहातील सत्त्वगुणात्मक चेतना काही काळ टिकून रहाण्यास साहाय्य होते. शुभसूचक कृत्ये जास्त एकाग्रतेने केल्यास देहातून सात्त्विक लहरींचे वायूमंडलात प्रक्षेपण होऊन कालांतराने त्याचे देहाभोवती संरक्षकमंडल बनण्यास साहाय्य होते.
४ अ १ अ. वडीलमंडळींची भेट घेणे
यामुळे वडीलमंडळींविषयी नम्रभाव निर्माण झाल्याने सत्त्वगुण टिकून रहातो.
४ अ १ आ. आरसा किंवा तूप यांत स्वतःचे प्रतिबिंब पहाणे
यामुळे देहावर आलेले रज-तमात्मक आवरण आरशातील किंवा तुपातील पारदर्शकतेत सामावून जाण्यास साहाय्य झाल्याने देहातील सत्त्वगुणात्मक क्षमता टिकून रहाते.
४ अ १ इ. केशभूषा करणे
केशभूषा करतांना केस विंचरण्याच्या प्रक्रियेतून निर्माण होणार्या तेजाच्या ऊत्सर्जनातून केसांतील रज-तमात्मक कणांचे उच्चाटन होऊन केसांतील चेतना जागृत होऊन केस बलवर्धक बनतात. अशा पद्धतीने केस वायूमंडलातील त्रासदायक स्पंदनांशी लढण्यास समर्थ बनल्याने देहातील सत्त्वगुण टिकून रहाण्यास साहाय्य होते.
४ अ १ ई. डोळ्यांत अंजन अथवा काजळ घालणे
तुपाच्या ज्योतीवर बनवलेल्या काजळाने आणि तुपाच्या अंजनाने डोळ्यांतील तेजतत्त्वाच्या कार्यास पुष्टी मिळून डोळ्यांतून तेजाचे बाह्य वायूमंडलात होणारे प्रक्षेपण वाढते आणि संपूर्ण देहाचे तेजाच्या स्तरावर रक्षण होण्यास साहाय्य होते. म्हणून ‘ही सत्त्वगुणसंचयास पुष्टी देणारी कृती करावी’, असे म्हटले आहे.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २४.१२.२००७, सायं. ७.३६)
४ आ. शुभ वस्तूंकडे पहाणे
‘ब्राह्मण, राजा, गाय, अग्नी इत्यादी मंगलकारक असतात.’ – नारद प्रकीर्णक
४ आ १. शास्त्र – मंगलकारक व्यक्ती अथवा वस्तू यांच्या दर्शनाने पहाणार्याच्या देहावरील आवरण गळून पडून देहाला सतेजता प्राप्त होणे
‘देवपूजा करणे, ही कृती देहात सत्त्वगुण वाढवणारी असल्याने ती झाल्यावर ‘सात्त्विक घटकांकडे पहाण्यात, म्हणजेच त्यांवर मन एकाग्र करण्यात वेळ व्यतीत करावा’, असे म्हटले आहे. ब्राह्मण, राजा, गाय, अग्नी इत्यादी मंगलकारक असतात; कारण तेजदायिनी किंवा स्वयंतेजाने भारित वस्तूला ‘मंगल’ समजले जाते. ब्राह्मतेजाने भारित ब्राह्मण, स्वयं देवत्वदर्शक तेजाचे ऊत्सर्जन करणारी गाय, प्रत्यक्ष तेजस्वरूप अग्नी आणि क्षात्रतेजाने भारित राजा हे सर्व घटक विविध प्रकारच्या तेजाने परिपूर्ण असल्याने त्यांच्या दर्शनाने पहाणार्याच्या देहावरील आवरण गळून पडून त्याच्या देहाला सतेजता प्राप्त होते. ही सतेजता देहातील सत्त्वगुणात्मक संक्रमणात सातत्य ठेवते.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २४.१२.२००७, सायं. ७.३६)
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘दिनचर्येशी संबंधित आचार आणि त्यांमागील शास्त्र’