अनुकमणिका
१. शरिरावर वस्त्र असतांना आणि मस्तकावर वस्त्र गुंडाळलेले असतांना मलमूत्रविसर्जन करावे
२. लघवी आणि शौचविधी करायला जाण्यापूर्वी जानवे उजव्या कानाला अडकवावे
३. काळ, दिशा आणि मलमूत्रविसर्जन
४. उकिडवे बसून मल-मूत्रविसर्जन करावे
५. लघवी आणि शौचविधी करतांना मौन पाळावे
६. मल-मूत्रविसर्जन झाल्यानंतर ते ते इंद्रिय पाण्याने धुवावे
७. मूत्रविसर्जनाची हिंदूंची पद्धत उत्तम आणि आरोग्यदायक असल्याचे फ्रेंच शास्त्रज्ञाने संशोधनाअंती सांगणे
आज पाश्चात्त्यांनुसार ‘कमोड’चा मलमूत्रविर्सजनासाठी उपयोग करणे, पुरुषांनी उभे राहून मूत्रविसर्जन करणे यांसारख्या कृती भारतीयांमध्ये रूढ झाल्या आहेत. प्रत्यक्षात उकिडवे बसून मलमूत्रविसर्जनाची क्रिया का करावी, पुरुषांनी बसूनच मूत्रविसर्जन का करावे, कोणत्या दिशेकडे तोंड करून मलमूत्रविसर्जन करावे यांसारख्या कृतींमागील अध्यात्मशास्त्र आपण या लेखातून जाणून घेऊया. या लेखातून मलमूत्रविसर्जन यासारख्या कृतीविषयीही हिंदु धर्माने केलेले मार्गदर्शन आणि सांगितलेले शास्त्र लक्षात येऊन हिंदु धर्माची सूक्ष्म आणि अफाट विचार करण्याची क्षमता आपल्याला निश्चितच लक्षात येईल.
१. शरिरावर वस्त्र असतांना आणि मस्तकावर वस्त्र गुंडाळलेले असतांना मलमूत्रविसर्जन करावे
१ अ. शास्त्र : मलमूत्रविसर्जनातील रज-तमात्मक लहरींचा थेट संसर्ग
शरिरास होऊ नये, यासाठी मस्तक आणि शरीर वस्त्राने झाकणे आवश्यक
‘मलमूत्रविसर्जन ही रज-तमदर्शक प्रक्रिया असल्याने तिच्यातील रज-तमात्मक लहरींचा थेट संसर्ग शरिरास होऊ नये, यासाठी मस्तक आणि शरीर वस्त्राने झाकणे योग्य ठरते. मस्तकावर धारण केलेल्या वस्त्रामुळे ब्रह्मरंध्र काही प्रमाणात सुरक्षित रहाण्यास साहाय्य होते. वस्त्राच्या माध्यमातून दिवसभरात होणार्या रज-तमात्मकरूपी आक्रमणांपासून जिवाचे थोड्याफार प्रमाणात रक्षण होऊ शकते.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ११.१२.२००७, दुपारी १.४३)
२. लघवी आणि शौचविधी करायला जाण्यापूर्वी जानवे उजव्या कानाला अडकवावे.
२ अ. मलमूत्रविसर्जनाच्या वेळी जानवे उजव्या कानावर ठेवण्यामागील शास्त्र
१. आपली अशुची अवस्था सूचित करण्यासाठी ही कृती उपयोगी पडते. हातपाय धुऊन चूळ भरल्यावर जानवे कानावरून काढावे. यामागील शास्त्रीय कारण म्हणजे, शरिराचा नाभीप्रदेशापासून वरचा भाग धार्मिक क्रियांसाठी पवित्र, तर त्याखालील भाग अपवित्र मानला गेला आहे.
२. आदित्य, वसु, रुद्र, अग्नि, धर्म, वेद, आप, सोम, अनील इत्यादी सर्व देवतांचा वास उजव्या कानात असल्यामुळे उजव्या कानाला उजव्या हाताने नुसता स्पर्श केला, तरी आचमनाचे फळ (आचमनाने अंतर्शुद्धी होते.) मिळते. अशा पवित्र उजव्या कानावर यज्ञोपवित ठेवल्यास अशुचित्व येत नाही.
३. ‘उजव्या कानाला जानवे अडकवल्याने जानव्यातील ब्राह्मतेजाच्या कानाच्या पोकळीला होणार्या स्पर्शाने जिवाची उजवी नाडी कार्यरत होते अन् जिवाभोवती अल्प कालावधीत तेजोमय लहरींचे संरक्षणात्मक वायूमंडल बनते. लघवी आणि शौच विधींसारखे रज-तमात्मक विधी करतांना अल्प कालावधीत संरक्षणात्मक स्तरावर कार्य करणारी सूर्यनाडी जागृत करण्यासाठी जानवे उजव्या कानाला अडकवतात.
४. जानवे हे कटीच्या (कमरेच्या) मंडलाला स्पर्श करणारे असते. लघवी आणि शौचविधीसारख्या प्रक्रियांमध्ये देहांतर्गत होणार्या रज-तमात्मक लहरींच्या रूपांतरात्मक पालटामुळे कटीमंडल अशुद्ध बनते. या अशुद्धतेच्या संसर्गाने जानव्याचे पावित्र्य घटते. तसे होऊ नये; म्हणून लघवी आणि शौचविधी यांच्या वेळी जानवे उजव्या कानाला अडकवण्याचा आचार आहे.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ११.१२.२००७)
३. काळ, दिशा आणि मलमूत्रविसर्जन
३ अ. पहिली विचारसरणी
मलमूत्रविसर्जन करतांना दिवसा आणि संध्यासमयी उत्तरेला अन् रात्री दक्षिणेला तोंड करावे.
३ अ १. शास्त्र
अ. उत्तरेकडील सर्वसमावेशक अशा घनीभूतकारी शक्तीधारणेत मलमूत्रविसर्जन कर्मातील रज-तमात्मक लहरींचे विलीनीकरण करणे शक्य होणे
‘उत्तरेला गुरुधारणा वास करत असते. ही धारणा सर्वसमावेशक असल्याने कोणत्याही प्रकारच्या पापयुक्त धारणेला सहज स्वतःत सामावून घेणारी आहे. या धारणेलाच ‘जनकधारणा’ किंवा ‘पितृधारणा’ असेही म्हणतात. सकाळपासून संध्याकाळच्या प्रहरापर्यंत हळूहळू रज-तमाचे अधिक्य वाढत जाते. या कालावधीत उत्तर दिशेला स्थित असणार्या, तसेच घटनेतील त्या त्या क्रियेचे उत्थापन करून त्यातून त्या त्या घटकातील रज-तमात्मक धारणेला विसर्जन प्रक्रियेकडे नेणार्या लहरीही उत्तेजित स्थितीत असतात; म्हणून या काळात या विसर्जनात्मक प्रवाही जनकधारणेत आपले मलमुत्रादी विसर्जनरूपी रज-तमात्मक कर्म पापमुक्त करण्यासाठी ते उत्तर दिशेला तोंड करून त्या त्या धारणेला साक्षी ठेवून केले जाते. या प्रहरांमध्ये उत्तरधारणा ही सर्व दिशांमध्ये जास्त प्रमाणात घनीभूतकारी शक्तीधारणा दर्शवत असल्याने कर्मातील सर्व रज-तमात्मक लहरींचे या धारणेत विलीनीकरण करणे शक्य होते.
आ. वायूमंडलात आधिक्य असणार्या यमलहरी रज-तमात्मक लहरींना घनीभूत करून स्वतःत सामावून घेऊ शकणे
रात्रीच्या प्रहरी वायूमंडलात यमलहरींचे आधिक्य असते. या वेळी यमदिशा ही मोठ्या प्रमाणात स्वतःत रज-तमात्मक लहरींना घनीभूत करून सामावून घेऊ शकते. याच तत्त्वाचा लाभ उठवून ‘रात्रीच्या वेळी केवळ मलमूत्रविसर्जनाचे कर्म दक्षिण दिशेला साक्षी ठेवून करावे’, असे म्हटले आहे. रात्रीच्या प्रहरी पूर्व, पश्चिम आणि उत्तर या दिशांच्या माध्यमातून काही दिव्यात्मे त्या त्या सत्त्व-रजात्मक कार्यकारी लहरींच्या माध्यमातून दिशामंडलांचे रक्षण करत असल्याने मलमूत्रविसर्जनासारखी कृती त्या दिशांना करणे, हे पापयुक्त धारणेचे लक्षण बनते.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ७.१२.२००७, सायं. ६.५९)
३ आ. दुसरी विचारसरणी
दक्षिणेला तोंड करून मलाचा आणि उत्तरेला तोंड करून मुत्राचा त्याग करावा.
प्राङ्मुखोऽन्नानि भुञ्जीत्तोच्चरेद्दक्षिणामुख: ।
उदङ्मुखो मूत्रं कुर्यात्प्रत्यक्पादावनेजनमिति ।। – आपस्तम्बधर्मसूत्र, प्रश्न १, पटल ११, काण्डिका ३१, सूत्र १
अर्थ : पूर्वेला तोंड करून अन्न ग्रहण करावे; दक्षिणेला तोंड करून मलाचा आणि उत्तरेला तोंड करून मुत्राचा त्याग करावा अन् पश्चिमेला तोंड करून पाय धुवावेत.
३ आ १. दक्षिणेला तोंड करून मलाचा आणि उत्तरेला तोंड करून मुत्राचा त्याग करण्यामागील शास्त्र
‘धर्माचाराप्रमाणे त्या त्या दिशेला त्या त्या वायूमंडलात ती ती कृती केल्याने वायूमंडलाचे स्वास्थ्य न बिघडता ब्रह्मांडातील त्या त्या शक्तीरूपी गतीलहरींमध्ये योग्य संतुलन राखले जाते.
अ. मलाचा त्याग
दक्षिण दिशा ही अशुभ कर्मास सामावून नेणारी आहे. मल हे जडत्वदर्शक अशुभ धारणेशी संबंधित असल्याने ते यमलहरींनी युक्त आणि जडत्वधारणेशी संलग्न असणार्या वायूमंडलात त्या त्या ठिकाणीच त्यागल्याने वायूमंडलातील त्या त्या स्तरावरील शक्तीलहरींचे भ्रमणात्मक संतुलन बिघडत नाही.
आ. मुत्राचा त्याग
उत्तर दिशा ही अशुभ कर्माचा लय करणारी आहे. मूत्र हे रज-तमात्मक लहरींच्या संक्रमणात मलापेक्षा जास्त सूक्ष्म आणि संवेदनशील असल्याने ते आपला परिणाम वायूमंडलात अल्प कालावधीत जास्त परिणामकारक-रीत्या उमटवू शकते. म्हणून गुरुधारणेला पूरक असणार्या, म्हणजेच सर्वांनाच ‘आपले’ म्हणून स्वतःत त्या त्या गोष्टीचा लय साधून देणार्या उत्तर दिशेकडे मुत्राचा त्याग करतात. त्या त्या दिशेला तोंड करून त्या त्या लहरींच्या स्पर्शाच्या स्तरावर ते ते कर्म केल्याने पापाचे मार्जन आणि पुण्याचे प्राप्तन होण्यास साहाय्य होते.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २.६.२००७, दुपारी १.५९)
४. उकिडवे बसून मल-मूत्रविसर्जन करावे
४ अ. उकिडवे बसून मल-मूत्रविसर्जन करण्यामागील शास्त्र
१. ‘उकिडवे बसण्यातून होणार्या मुद्रेमुळे कटीबंधातील अधोगामी दिशेने वहाणारे टाकाऊ उत्सर्जक वायू कार्यरत होऊन देहातील अधोगामी वहाणार्या प्रवाहाच्या बळावर देहातील मल-मूत्रादी टाकाऊ घटकांना त्वरित बाहेरच्या दिशेने ढकलून कटीबंधातील पोकळी स्वच्छ होण्यास साहाय्य होते.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २९.१०.२००७, सकाळी ९.४६)
२. शौच करतांना निर्माण झालेल्या देहाच्या विशिष्ट रचनेमुळे देहातील उपपंचप्राणांना आधार मिळून त्रासदायक वायू मलमुत्रावाटे बाहेर पडून देहात असलेली त्रासदायक शक्ती नष्ट होणे : ‘भारतीय संस्कृतीत सांगण्यात आलेल्या शौचपद्धतीमुळे जिवाच्या देहात निर्माण झालेल्या त्रासदायक घटकांचे ३० टक्के विघटन होण्यास साहाय्य होते. शौच करतांना निर्माण झालेल्या देहाच्या विशिष्ट रचनेमुळे देहातील उपपंचप्राणांना आधार मिळून त्रासदायक वायू मल-मूत्रावाटे बाहेर पडतात. तसेच देहातील सूक्ष्म-शुद्धीचक्र हेही चक्राकार दिशेने फिरण्यास आरंभ होते. त्यामुळे जिवाच्या देहात असलेली त्रासदायक शक्ती नष्ट होते.’ – एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, १९.६.२००७, दुपारी ३.५१)
४ आ. पुरुषांनी उभ्याने मूत्रविसर्जन (मूत्रपुरीषोत्सर्ग) करू नये.
४ आ १. पुरुषांनी उभे राहून मूत्रविसर्जन न करण्यामागील शास्त्र
अ. ‘उभे रहाण्याच्या मुद्रेमुळे देहातील रज-तमात्मक ऊर्जेचा संचय हळूहळू पायांच्या दिशेने होऊन ऊर्जा त्या ठिकाणीच घनीभूत होऊ लागते. त्यामुळे पाताळातून प्रक्षेपित होणारी त्रासदायक स्पंदने पावलांतून लगेच देहात शिरकाव करू शकतात.
आ. उभे राहून मूत्रविसर्जन करण्याच्या प्रक्रियेतून भूमीवर होणार्या मूत्राच्या धारेच्या आघाताने भूमीशी संलग्न त्रासदायक शक्तीचे प्रवाह जागृत स्थितीत आल्याने जिवाचा संपूर्ण देहच रज-तमाने भारित बनतो.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २९.१०.२००७, सकाळी ९.४६)
५. लघवी आणि शौचविधी करतांना मौन पाळावे
५ अ. शास्त्र
‘मौनाच्या माध्यमातून जिवाची मध्यमा वाणी जागृत स्थितीत आल्याने त्याच्या अंतर्मुखतेत वाढ होते. यामुळे जिवाच्या शरिराभोवती संरक्षणात्मक कवच टिकण्याच्या कालावधीतही वाढ होते. या प्रक्रियेमुळे लघवी आणि शौचविधी यांसारख्या रज-तमात्मक कृती करतांना जिवाचे वायूमंडलातून होणार्या वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होते.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ११.१२.२००७, दुपारी २.१९)
६. मल-मूत्रविसर्जन झाल्यानंतर ते ते इंद्रिय पाण्याने धुवावे
६ अ. शास्त्र – शौचाला गेल्यानंतर पाण्याचा वापर केल्यामुळे शौचाचे
पृथ्वीतत्त्वाशी संबंधित रज-तमयुक्त कण लवकर नष्ट होण्यास साहाय्य होणे
‘शौचातून बाहेर पडणारे टाकाऊ पदार्थ पृथ्वीतत्त्वाशी संबंधित रज-तमयुक्त असतात. टिश्यू पेपरमध्ये सात्त्विकता नसते, तसेच तो पृथ्वीतत्त्वाशी संबंधित असल्याने शौचाला गेल्यानंतर टिश्यू पेपरचा वापर केल्यास शौचातील पृथ्वीतत्त्वाशी संबंधित रज-तमयुक्त कण नष्ट होत नाही. पाण्यात आपतत्त्वयुक्त सात्त्विकता अन् चैतन्य असते. शौचाला गेल्यानंतर पाण्याचा वापर केल्यामुळे शौचाचे पृथ्वीतत्त्वाशी संबंधित रज-तमयुक्त कण लवकर नष्ट होण्यास साहाय्य होते.’ – ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, २८.११.२००७, रात्री ८.३२)
(शौच स्वच्छ करण्यासाठी टिश्यू पेपरचा वापर करण्यास शिकवणारी निकृष्ट पाश्चात्त्य संस्कृती कुठे, तर आध्यात्मिकदृष्ट्या योग्य असलेली पाण्याचा वापर करण्याची पद्धत शिकवणारी महान हिंदु संस्कृती कुठे ! – संकलक)
७. मूत्रविसर्जनाची हिंदूंची पद्धत उत्तम आणि
आरोग्यदायक असल्याचे फ्रेंच शास्त्रज्ञाने संशोधनाअंती सांगणे
‘फ्रेंच शास्त्रज्ञ सांगतो, ‘उभ्याने लघवी केली, तर मुत्राचे थेंब पायांवर पडतात आणि खालच्या भागी विखुरतात. बसून लघवी करण्याची हिंदूंची प्रथा अत्यंत उत्तम आणि आरोग्यदायक आहे. लघवीनंतर इंद्रिय धुतले पाहिजे. ते धुतले नाही, तर मूत्र वाळल्यानंतर तिथे मुत्राचे सूक्ष्म-खडे निर्माण होतात आणि ते रोगाला कारणीभूत होतात.’ युरोपियन शास्त्रज्ञ आमच्या लघवी करण्याच्या पारंपरिक पद्धतीचे पूर्ण समर्थन करतात. तरीही ते उभ्यानेच लघवी करतात. त्यांचे पाहून हिंदूही उभ्यानेच लघवी करतात. गोर्यांचे वळण गिरवण्यात आम्हाला धन्यता वाटते. उद्या गोरे लोक खाली बसून लघवी करू लागले की, आम्हीसुद्धा तसे करू आणि त्याला प्रगती म्हणू !’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘दिनचर्येशी संबंधित आचार आणि त्यांमागील शास्त्र’