सनातन संस्था आणि प.पू. डॉक्टरांचे श्रेष्ठत्व अन् महत्त्व

सर्वाश्रम वैश्‍विक ऊर्जा संशोधन केंद्राचे श्री. संतोष जोशी
यांना जाणवलेले सनातन संस्था आणि प.पू. डॉक्टरांचे श्रेष्ठत्व अन् महत्त्व

सर्वाश्रम वैश्‍विक ऊर्जा संशोधन केंद्र या संस्थेचे श्री. संतोष जोशी हे पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) आणि आर्.एफ्.आय्. (रेझोनन्ट फिल्ड इमेजिंग) या उपकरणांच्या माध्यमातून अध्यात्मशास्त्रीय संशोधन करण्याचे मोलाचे कार्य करत आहेत. पिपच्या तंत्रज्ञानाद्वारे एखाद्या वस्तूभोवती असणारी स्पंदनांची गती आणि प्रभावळ (ऑरा), तर आर्.एफ्.आय्.च्या साहाय्याने आपण वातावरणातील वैश्‍विक ऊर्जा मोजू शकतो. प्रत्यक्ष प्रमाण मानणार्‍या बुद्धीप्रामाण्यवाद्यांना अध्यात्मशास्त्राचे महत्त्व कळावे, तसेच समाजालाही धर्मशिक्षण मिळावे, हा यामागील हेतू आहे. सनातनच्या आश्रमात या कार्याला शुभारंभ झाला आहे. हे कार्य करतांना प.पू. डॉक्टर, सनातनचा आश्रम, साधक आणि संस्थेचे कार्य यांचे श्री. जोशी यांना जाणवलेले श्रेष्ठत्व आणि महत्त्व अन् त्यांना आलेलीअनुभूती येथे देत आहोत.

 

 

१. सूर्याप्रमाणे तेजस्वी प्रकाश देऊन साधकांना
अज्ञानाच्या अंधःकारातून बाहेर काढणारे प.पू. डॉक्टर !

प.पू. डॉक्टरांनी मला ही अल्पशी सेवा उपलब्ध करून दिली आणि ती करवूनसुद्धा तेच घेत आहेत, याची अनुभूतीही तेच मला देत आहेत. सर्वज्ञानी, सर्वव्यापी, निरपेक्ष आणि निःस्वार्थ असे प.पू. डॉक्टर सूर्याप्रमाणे तेजस्वी प्रकाश देऊन अज्ञानाच्या अंधःकारातून सर्वांना बाहेर काढत आहेत. प.पू. डॉक्टर सर्वांना स्वस्वरूपाची आणि स्वधर्माची जाणीव करून देत आहेत.

 

 

२. पिप आणि आर्एफ्आय् या उपकरणांच्या
माध्यमातून अध्यात्मशास्त्राची महती विश्‍वाला करून
देण्याचा मानस ठेवून श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांनी ही उपकरणे विकत घेणे

पिप (पॉली कॉन्ट्रास्ट इंटरफेअरन्स फोटोग्राफी) आणि आर्एफ्आय् (रेझोनेन्ट फील्ड इमेज) ही उपकरणे वातावरणात असणार्‍या सकारात्मक आणि नकारात्मक वलयांची व्याप्ती दर्शवतात. ही उपकरणे वस्तूच्या स्पंदनांनुसार गतीच्या द्वारे रंगांच्या माध्यमातून वलये दाखवतात. अध्यात्मशास्त्रीय संशोधनासाठी या उपकरणांचा उपयोग करून अध्यात्मशास्त्राची महती विश्‍वाला करून द्यावी, असा पितांबरी प्रॉडक्टस् लिमिटेडचे मालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांचा मानस होता. त्याप्रमाणे ही उपकरणे विकत घेण्यात आली आणि कार्य चालू झाले.

 

 

३. वरील उपकरणांद्वारे आजपर्यंत कोणालाही न मिळालेले
अध्यात्मशास्त्राविषयीचे निष्कर्ष रामनाथी आश्रमात संशोधन करतांना मिळणे

आम्ही २०१२ या वर्षी रामनाथी आश्रमात येऊन या उपकरणांद्वारे ८०० जी.बी. माहिती संकलित केली होती. त्या वेळी या उपकरणांद्वारे आजपर्यंत कोणालाही न मिळालेले चांगले निष्कर्ष (रिझल्ट) मिळाले. आश्रमात पुरातन वस्तूंचे जतन फार सुंदर रीतीने केले आहे. पुढे याचा लाभ समस्त जनांना व्हावा आणि त्याविषयीचे योग्य ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचावे, अशा सकारात्मक दृष्टीकोनातून या कार्याचा आरंभ झाला आहे.

 

 

४. आधुनिक गुरुकुल असणार्‍या रामनाथी आश्रमाची वैशिष्ट्ये

४ अ. संत आणि उच्च पातळीचे अनेक
साधक घडवणारा आणि समाजाला ज्ञान, भक्ती आणि वैराग्य
यांची शिकवण देणारा सनातनचा रामनाथी आश्रम हे आधुनिक गुरुकुलच !

प्रत्येक विषयाचे मूळ ज्ञान प्राप्त होण्यासाठी आपण माध्यम म्हणून कसे शुद्ध, पवित्र आणि सात्त्विक असावे, याचे ज्ञान देऊन प्रत्येकाकडून त्या प्रकारची कृती करवून घेणारा रामनाथी आश्रम हे आधुनिक गुरुकुल आहे. आज संत आणि उच्च पातळीचे अनेक साधक या गुरुकुलातून सिद्ध होत आहेत. ते समाजाला ज्ञान, भक्ती आणि वैराग्य यांची शिकवण देत आहे.

 

४ आ. एकमेकांवर जिवापाड प्रेम करत सर्वस्वाचा
त्याग करून एका परिवाराप्रमाणे रहात असलेले सनातनचे साधक

सनातन संस्थेचे कार्य केवळ देशातच नव्हे, तर परदेशातसुद्धा चालू आहे. सहस्रो साधक तन, मन आणि धन यांचा त्याग करून साधना करत आहेत. सांप्रत काळात भाऊ-भाऊ एकमेकांचे वैरी होत आहेत. अशा काळातसुद्धा साधक एकमेकांवर जिवापाड प्रेम करत सर्वस्वाचा त्याग करून एका परिवाराप्रमाणे रहात आहेत. अशा परिवारात मला सेवा करण्याची संधी मिळाली, याविषयी मी कृतज्ञ आहे.

 

 

५. अनुभूती

५ अ. साहित्य खरेदीसाठी खिशातून पैसे काढत
असतांना अचानक लहानसे सुंदर मोरपीस हातात येणे, वरील अनुभूती
पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांना सांगितल्यावर त्यांनी श्रीकृष्णाने या कार्यासाठी
तुम्हाला आशीर्वाद दिला असून हे कार्य तुमच्या हातून पूर्ण होणार असल्याचे सांगणे

२६.१.२०१४ या दिवशी पू. (सौ.) अंजलीताई गाडगीळ यांच्याशी पिप या उपकरणासंदर्भात चर्चा चालू होती. हे उपकरण अधिक संशोधनासाठी रामनाथी आश्रमात ठेवायचे आहे, असे श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांनी सांगितले. त्यानुसार आमची पुढची वाटचाल चालू होती. मोठ्या प्रमाणावर संशोधन कसे होईल ? याविषयी आमची चर्चा झाली. पू. अंजलीताईंशी बोलणे झाल्यावर मी साहित्य खरेदीसाठी दुकानात गेलो. त्या ठिकाणी मी खिशातून पैसे काढत असतांना अचानक लहानसे मोरपीस हातात आले. ते बघून मला आश्‍चर्यच वाटले. ते मोरपीस श्रीकृष्णाच्या डोक्यात खोवलेल्या मोरपिसाप्रमाणे सुंदर होते. मी ही अनुभूती पू. (सौ.) गाडगीळताईंना सांगितली. त्या म्हणाल्या, दादा, श्रीकृष्णाने तुम्हाला आशीर्वादच दिला आहे. आता हे कार्य तुमच्या हातूनच पूर्ण होईल. ही अनुभूती लिहून ठेवा. तेव्हा मला फार आनंद झाला. या ईश्‍वरी कार्यासाठी आपली निवड व्हावी आणि प्रत्यक्ष ईश्‍वराने त्यासाठी आपल्याला आशीर्वाद द्यावा, यापेक्षा मोठीअनुभूती काय असेल ! हे कार्य पूर्णत्वास जावो आणि त्यासाठी माझ्या हातून सतत सेवा घडत राहो, हीच प्रार्थना !

 

– श्री. संतोष श्यामराव जोशी, संशोधक, सर्वाश्रम वैश्‍विक ऊर्जा केंद्र, डोंबिवली. (७.२.२०१४)

 

Leave a Comment