संधीकालात आचारपालनाचे महत्त्व आणि शास्त्रात सांगितलेल्या सायंकालातील निषिद्ध गोष्टी

अनुक्रमणिका

१. संधीकाल आणि संधीकालात आचारपालनाचे महत्त्व

१ अ. संधीकालाची व्याख्या

१ आ. संधीकालाचा समानार्थी शब्द

१ इ. संधीकालात आचारपालनाचे महत्त्व

२. सायंकाळच्या (दिवेलावणीच्या) वेळी घरातील सर्वांनी उपस्थित रहावे.

२ अ. सध्याची स्थिती

३. तिन्हीसांजेला लहान मुलांची दृष्ट काढावी

४. शास्त्रात सांगितलेल्या सायंकालातील (संधीकालातील) निषिद्ध गोष्टी


आज सर्वसाधारणपणे घरांतील चित्र पाहिल्यास सायंकाळी सर्वजण दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पहाण्यात गर्क असतात. याऐवजी हिंदु धर्मशास्त्रानुसार संधीकालात अर्थात सायंकाळी आचारपालन करणे अनिवार्य का आहे; शास्त्रात सांगितलेल्या सायंकालातील निषिद्ध गोष्टी कोणत्या इत्यादी माहिती प्रस्तूत लेखातून करून घेऊया.

 

१. संधीकाल आणि संधीकालात आचारपालनाचे महत्त्व

१ अ. संधीकालाची व्याख्या

‘सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर ४८ मिनिटांच्या (दोन घटिकांच्या) काळाला ‘संधीकाल’, असे म्हणतात.

१ आ. संधीकालाचा समानार्थी शब्द

पर्वकाल

१ इ. संधीकालात आचारपालनाचे महत्त्व

संधीकाल हा वाईट शक्तींच्या आगमनाचा काळ असल्याने त्यांच्यापासून रक्षण होण्यासाठी या काळात धर्माने आचारपालनाला महत्त्व दिले आहे. यांत धूप दाखवणे, देवाजवळ आणि तुळशीसमोर दिवा लावणे, श्लोकपठण करणे इत्यादी कृतींचा अंतर्भाव आहे. पर्वकालात कोणतीही हिंसात्मक कृत्ये करत नाहीत.

 

२. दिवेलावणीच्या वेळी घरातील सर्वांनी उपस्थित रहावे.

२ अ. सध्याची स्थिती

सायंकाळी दिवेलागणीच्या वेळी होणार्‍या प्रार्थनेच्या निमित्ताने कुटुंबातील सर्वच व्यक्तींनी एकत्र येणे महत्त्वाचे आहे. या वेळी लहानांनी मोठ्यांना नमस्कार करणे, एकमेकांची विचारपूस करणे, एखादा सण असल्यास त्याचे महत्त्व लहान मुलांना कळणे इत्यादींमुळे घराचे घरपण टिकून रहायला साहाय्य होते; मात्र आजची स्थिती बहुतांश घरांमध्ये वेगळी दिसून येते.

आज दूरचित्रवाणीवरील धांगडधिंग्यात स्तोत्रपठणाचा ध्वनी कुठेतरी लोप पावला आहे. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे होत असलेली हानी आपण पहातच आहोत. याला उत्तरदायी कोण ? दूरचित्रवाणी, आई-वडील, अध्यात्माची जोड नसलेली शिक्षणपद्धती, समाज कि प्रत्येक व्यक्ती ?’

 

३. तिन्हीसांजेला लहान मुलांची दृष्ट काढावी

लहान मुलांना दृष्ट लवकर लागते. दृष्ट लागलेल्याच्या देहातील त्रासदायक स्पंदने विशिष्ट पदार्थांमध्ये खेचून, त्यायोगे त्याचा त्रास दूर करणे म्हणजे दृष्ट काढणे. दृष्ट काढण्यासाठी खडे मीठ-मोहरी, खडे मीठ-मोहरी-लाल मिरच्या, पाणी असलेला नारळ इत्यादींचा उपयोग करतात. वाईट शक्तीचा त्रास असलेल्याचीही दृष्ट अशाच पद्धतीने काढता येते.

 

४. शास्त्रात सांगितलेल्या सायंकालातील (संधीकालातील) निषिद्ध गोष्टी

संधीकालात वाईट शक्तींचे प्राबल्य असल्याने या कालात पुढील गोष्टी निषिद्ध सांगितल्या आहेत.

अ. झोपणे, खाणे-पिणे आणि भोजन करणे

आ. शुभ कार्याचा प्रारंभ

इ. वेदमंत्रांचे पठण

ई. दुसर्‍याला पांढरी वस्तू देणे

उ. पैशाची देवाणघेवाण

ऊ. अश्रूमोचन (रडणे)

ए. प्रवासाला निघणे

ऐ. शपथ घेणे; शिवीगाळ करणे; भांडण करणे आणि अभद्र अन् असत्य बोलणे

ओ. गरोदर स्त्रीने न करावयाच्या गोष्टी

१. दारात उभे रहाणे : यामुळे गर्भाला अपाय होतो.

२. सायंकाळी घरी परतणारी गुरे पहाणे : भुतेखेते गुरांच्या पायांत प्रवेश करून घरात शिरण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे सायंकाळी घरी परतणार्‍या गुरांकडे पाहू नये.

औ. अग्नीहोत्र्यांसाठी

अग्नीहोत्री संधीकालापूर्वीच अग्नी प्रज्वलित करतात; पण संधीकाल टळून गेल्यावर होम करतात.

अं. कातरवेळी गंगेव्यतिरिक्त इतर नद्यांच्या तटावर शक्यतो बसू नये.

आरोहणं गवां पृष्ठे प्रेतधूमं सरित्तटम् ।
बालातपं दिवास्वापं त्यजेद्दीर्घं जिजीविषुः । – स्कन्दपुराण, ब्राह्मखण्ड, धर्मारण्यमाहात्म्य, अध्याय ६, श्लोक ६६, ६७

अर्थ : जो दीर्घकाळ जिवंत राहू इच्छितो त्याने गाय-बैल यांच्या पाठीवर चढू नये, चितेचा धूर आपल्या अंगाला लागू देऊ नये, (कातरवेळी गंगेव्यतिरिक्त दुसर्‍या) नदीच्या तटावर बसू नये, उदयकालीन सूर्याच्या किरणांचा स्पर्श होऊ देऊ नये आणि दिवसा झोपणे सोडावे.

अं १. कातरवेळी गंगेव्यतिरिक्त इतर नद्यांच्या तटावर शक्यतो न बसण्यामागील शास्त्र

‘गंगा नदीला ‘गंगोत्री (सात्त्विक लहरींचा शिवरूपी स्त्रोत पुरवणारी)’ असेही म्हणतात. गंगेच्या पाण्यातून प्रक्षेपित होणार्‍या सात्त्विक लहरींमुळे गंगेच्या तटावरील वायूमंडल हे शुद्ध आणि चैतन्यमय बनल्याने या वातावरणात वाईट शक्तींचा त्रास होण्याची शक्यता अतिशय अल्प असते. याउलट इतर नद्यांच्या तटावर त्यामानाने सात्त्विकता न्यून असल्याने वाईट शक्तींच्या संचारामुळे नदीच्या तटावर बसलेल्या जिवाला त्रास होण्याच्या शक्यतेचे प्रमाण जास्त असते. नदीच्या तटावर वावरणार्‍या कनिष्ठ पातळीच्या वाईट शक्तींमध्ये पृथ्वी आणि आप या तत्त्वांचे प्राबल्य अधिक असल्याने या शक्ती पृथ्वी आणि आप या तत्त्वांपासून बनलेल्या मानवी देहाशी अल्प कालावधीत एकरूप होऊ शकतात; म्हणून शक्यतो कातरवेळी नदीच्या काठावर बसू नये आणि नदीच्या काठावर फिरायला जाणे टाळावे.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २१.३.२००५, दुपारी १.४७)

 

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘दिनचर्येशी संबंधित आचार आणि त्यांमागील शास्त्र’

 

Leave a Comment