मुंज झाल्यावर प्रतिदिन संध्या करावी, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. या लेखात आपण संध्या करण्याचे महत्त्व आणि लाभ काय आहेत, हे जाणून घेऊया.
अनुक्रमणिका
२ अ. संध्या न करणारा ब्राह्मण मृत्यूनंतर श्वान होणे
२ आ. संध्यावंदन केल्यामुळे ऋषींना दीर्घ आयुष्य, प्रज्ञा, यश, अक्षय कीर्ती आणि दिव्य तेज प्राप्त होणे
२ इ. संध्यावंदनापूर्वी पाय धुण्याचे महत्त्व
१. संध्येच्या संदर्भातील आचार
सकाळी स्नानानंतर, माध्यान्हकाळी आणि सायंकाळी, अशा तीन वेळा ब्राह्मणाला ‘संध्या’ हे आन्हिक कृत्य करण्यास शास्त्राने सांगितले आहे.
२. संध्या करण्याचे महत्त्व
२ अ. संध्या न करणारा ब्राह्मण मृत्यूनंतर श्वान होणे
सन्ध्यां नोपासते यस्तु ब्राह्मणो हि विशेषतः ।
स जीवन् चैव शूद्रः स्यान्मृतः श्वा चैव जायते ।।
अर्थ : जो ब्राह्मण संध्या करत नाही, तो जिवंतपणीच शूद्र समजला जाऊन मृत्यूनंतर श्वान होतो.
विवरण : ‘अहरहः सन्ध्यामुपासीत् ।’ म्हणजे ‘रोज संध्या केलीच पाहिजे’, अशी श्रुतीची आज्ञा आहे. संध्या न करणार्या ब्राह्मणाचे प्रत्येक दिवसाचे पाप एकत्रित होऊन त्याला या जन्मीच शूद्राचारी बनवते आणि मृत्यूनंतर स्वैराचार करता येईल, अशा कुत्र्याच्या योनीत जन्माला घालते.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
२ आ. संध्यावंदन केल्यामुळे ऋषींना दीर्घ आयुष्य, प्रज्ञा, यश, अक्षय कीर्ती आणि दिव्य तेज प्राप्त होणे
ऋषयो दीर्घसन्ध्यत्वाद्दीर्घमायुरवाप्नुयुः ।
प्रज्ञां यशश्च कीर्तिं च ब्रह्मवर्चसमेव च ।। – मनुस्मृति, अध्याय ४, श्लोक ९४
अर्थ : संध्या म्हणजे संध्यासमयी होणारे जपादी कर्म. दीर्घकाळ संध्यावंदन केल्यामुळे ऋषींना दीर्घ आयुष्य, प्रज्ञा, यश, अक्षय कीर्ती आणि ब्रह्मवर्चस (दिव्य तेज) प्राप्त होते.
२ इ. संध्यावंदनापूर्वी पाय धुण्याचे महत्त्व
‘एकदा कामाच्या गडबडीत संध्याकाळी नलराजा घाईघाईने पाय धुऊन संध्यावंदनाला बसला. त्याचा पायाचा अंगठा शुष्कच राहिला. कलीला अवसर मिळाला. त्या अंगठ्यातून कलीने नलराजाच्या शरिरात प्रवेश केला.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
३. संध्येची कृती
पूजाविषयक ग्रंथांत दिल्यानुसार संध्या करावी.
४. संध्येसारखी कृती
‘सकाळी स्नान झाल्यानंतर पूर्वेकडे तोंड करून बसावे. प्राणायामानंतर सर्व पापांचा (वाईट वासनांचा) क्षय व्हावा; म्हणून उदकाने मार्जन करावे (अंगावर पाणी शिंपडावे). उदक पापांचा नाश करते. अघमर्षणानंतर (अघ म्हणजे पाप ± मर्षण म्हणजे निःसारण) जिने आपल्याला धारण केले आहे, त्या पृथ्वीचे पूजन करावे. त्यानंतर ज्या शरिराने जप करायचा आणि ज्या शरिरात तो रुजवायचा आहे, ते शरीर शुद्ध करण्यासाठी आणि बुद्धीला सत्प्रवृत्त करण्यासाठी गायत्री मंत्राचा जप करावा आणि शेवटी प्रार्थना करावी.’ – प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.