लादी शास्त्रानुसार कशी पुसावी याविषयी हिंदु धर्माने सांगितलेले शास्त्र प्रस्तूत लेखात विशद करण्यात आले आहे. यानुषंगाने यंत्राने लादी पुसल्याने होणारे तोटेही आपल्याला लक्षात येतील.
लादी पुसण्याच्या संदर्भातील आचार
१. लादी कधी पुसावी ?
केर काढून झाल्यावर लगेच लादी पुसावी.
२. लादी कशी पुसावी ?
२ अ. लादी पुसण्यासाठी वापरायच्या पाण्यात चिमूटभर विभूती घालावी.
२ अ १. शास्त्र : विभूतीतील सात्त्विक शक्तीमुळे विभूतीयुक्त पाण्याने लादी पुसल्यावर वाईट शक्तींमुळे लादीवर आलेले त्रासदायक शक्तीचे थर नष्ट होण्यास साहाय्य होते.
२ आ. लादी पुसण्यापूर्वी ‘वाईट शक्तींमुळे भूमीवर आलेले त्रासदायक शक्तीचे आवरण पाण्यातील चैतन्याने नष्ट होऊ दे’, अशी जलदेवतेला प्रार्थना करावी.
२ इ. खाली वाकून उजव्या हाताने ओल्या कापडाने लादी पुसावी.
२ इ १. वाकून उजव्या हाताने लादी पुसण्याने होणारी प्रक्रिया : ‘वाकून उजव्या हाताने लादी पुसण्यातून निर्माण होणार्या मुद्रेतून मणिपूरचक्राशी असलेले पंचप्राण कार्यरत स्थितीत आल्याने अल्प कालावधीत देहातील तेजरूपी चेतना कार्य करण्यास सिद्ध होते. या सिद्धतेतूनच सूर्यनाडी जागृत होऊन उजव्या हातातून तेजाचा प्रवाह लादी पुसण्याच्या कापडात संक्रमित होऊन तो पाण्यातील आपतत्त्वाच्या स्तरावर भूमीशी संलग्न असे तेजाचे कवच निर्माण करतो. म्हणूनच ‘लादी पुसणे’ ही प्रक्रिया एकप्रकारे भूमीवर तेजाचे कवच निर्माण करणारी असल्याने पाताळातून प्रक्षेपित होणार्या त्रासदायक स्पंदनांना अवरोध केला जाऊन वास्तूचे रक्षण होण्यास साहाय्य होते.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २५.१२.२००७, सायं. ७.३२)
२ ई. केर काढतांना जसे तो आतून बाहेरच्या दिशेने, म्हणजे दाराच्या दिशेने पुढे पुढे ढकलत नेतात, त्याचप्रमाणे लादीही दाराच्या दिशेने पुसावी.
२ उ. लादी पुसण्यासाठी वापरत असलेले ओले कापड मधे मधे स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे.
३. लादी पुसल्यावर सात्त्विकता टिकून रहाण्यासाठी काय करावे ?
लादी पुसल्यावर उदबत्ती लावून घरात निर्माण झालेली सात्त्विकता टिकून रहाण्यासाठी वास्तूदेवतेला प्रार्थना करावी.
४. यंत्राच्या साहाय्याने लादी पुसण्याने होणारे तोटे
४ अ. वास्तू दूषित होणे
‘यंत्राच्या साहाय्याने लादी पुसतांना भूमीशी संलग्न होणार्या घर्षणात्मक नादाकडे पाताळातील त्रासदायक लहरी वेगाने आकृष्ट होतात आणि त्या पाण्यातील आपतत्त्वाच्या साहाय्याने भूमीवर पसरवल्या जातात. यामुळे यांत्रिक पद्धतीने लादी पुसण्यातून त्रासदायक लहरींचे आवरण भूमीवर निर्माण होऊन भूमी या लहरी स्वतःत घनीभूत करून ठेवण्यास सिद्ध होते. यामुळे वास्तू दूषित होते.
४ आ. हाडे आणि स्नायू यांचे विकार होणे
यांत्रिक पद्धतीने भूमी पुसण्यातून निर्माण होणार्या त्रासदायक लहरींमुळे पायांच्या स्नायूंचे विकार, हाडांचे विकार, हाडे झिजणे, सांधेदुखी असे त्रास होऊ शकतात.
४ इ. वाईट शक्तींचा जास्त त्रास होऊ शकणे
यांत्रिक पद्धतीने भूमी पुसतांना ती शक्यतो वाकून न पुसता उभ्या स्थितीतच पुसली गेल्याने विशिष्ट मुद्रेच्या अभावामुळे सूर्यनाडी जागृत न झाल्याने यांत्रिक पद्धतीने लादी पुसण्यातून निर्माण झालेल्या त्रासदायक लहरींपासून देहमंडलाचेही रक्षण होऊ शकत नाही. त्यामुळे जिवाला वाईट शक्तींचा जास्त त्रास होऊ शकतो; म्हणून वाकून यंत्रविरहित, म्हणजेच उजव्या हाताने लादी पुसणे जास्त लाभदायक आहे.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २५.१२.२००७, सायं. ७.३२)