केर कधी आणि कसा काढावा ?

Article also available in :

प्रस्तूत लेखात आपण केर काढणे या कृतीमागील शास्त्र जाणून घेऊया. याअंतर्गत ‘केर काढतांना केरसुणीला भूमीला बडवू का नये’; ‘शक्यतो सायंकाळी केर काढणे टाळावे’; ‘पूर्व दिशा सोडून इतर कोणत्याही दिशेकडे केर काढत जावे’ यांसारख्या विविध कृतींमागील अध्यात्मशास्त्रीय कारणमिमांसा विशद करण्यात आली आहे.

अनुक्रमणिका

१. केर कधी काढावा ?
अ. सकाळीच केर का काढावा ?

आ. सायंकाळी केर न काढण्यामागील शास्त्र
इ. तिन्हीसांजेपूर्वी केर काढणे
२. केरसुणीने केर कसा काढावा ?
२ अ. केर काढतांना कटीत (कमरेत) उजव्या अंगाला झुकून उजव्या हातात केरसुणी धरून केर मागून पुढच्या दिशेने ढकलत न्यावा.
२ आ. पूर्व दिशा सोडून इतर कोणत्याही दिशेकडे केर काढत जावे.
२ इ. केर काढतांना तो आतून बाहेरच्या दिशेने, म्हणजे दाराच्या दिशेने पुढे पुढे ढकलत न्यावा.
२ ई. केर पुढे ढकलल्यावर केरसुणी भूमीला उलट्या दिशेने घासत न आणता उचलून मागे आणून भूमीला टेकवून मग केर काढावा.
२ उ. केरसुणी भूमीवर बडवू नये किंवा ती भूमीवर बळ लावत घासून केर काढू नये.


केर काढण्याच्या संदर्भातील आचार

१. केर कधी काढावा ?

अ. सकाळीच केर का काढावा ?

‘घर घाण झाले असेल, तर भावपूर्णरीत्या नामजप करत क्षात्रभाव ठेवून कुठल्याही वेळी केर काढावा. असे केले, तरच केर काढण्याच्या कृतीतून निर्माण होणार्‍या त्रासदायक स्पंदनांचा देहावर प्रभाव पडणार नाही. स्वतःला कर्मबंधनाचा आचाररूपी नियम लागू करून सकाळीच, म्हणजेच रज-तमात्मक क्रियेला अवरोध करणार्‍या वेळेतच हे कर्म उरकून घ्यावे़

आ. सायंकाळी केर न काढण्यामागील शास्त्र

सकाळी एकदाच केर काढावा. सायंकाळी केर काढू नये; कारण या वेळी वायूमंडलात रज-तमात्मक स्पंदनांचा संचार मोठ्या प्रमाणात चालू असल्याने केर काढण्याच्या रज-तमात्मक क्रियेशी संबंध असलेल्या या प्रक्रियेतून वाईट शक्तींचा घरात शिरकाव होण्याची शक्यता अधिक असते. सकाळचे वायूमंडल सत्त्वप्रधान असल्याने हे वायूमंडल केर काढण्याच्या रजतमात्मकदर्शक क्रियेतून निर्माण होणार्‍या त्रासदायक स्पंदनांवर यथायोग्य अंकुश ठेवते; म्हणून या क्रियेचा कुणालाच त्रास होत नाही.

इ. तिन्हीसांजेपूर्वी केर काढणे

संकलक : दिवसभर घरात आलेला कचरा संध्याकाळी काढल्यास नंतर येणारी रज-तमात्मक स्पंदने वास्तूत अल्प प्रमाणात आकृष्ट होतात. यासाठी संध्याकाळीही कचरा काढतात. आपण ‘सायंकाळी केर काढू नये’, असे का सांगितले आहे ?

एक विद्वान : कलियुगातील जीव हे रज-तमप्रधान असल्याने त्यांच्या हातून घडणारे, तसेच रज-तमात्मक स्पंदनांना आकृष्ट करणारे कर्म शक्यतो सायंकाळी करू नये. सायंकाळी रज-तमात्मक लहरींचे वायूमंडलात संचारण वाढते. केर काढणे, या कृतीतून भूमीशी संलग्नता साधून होणार्‍या घर्षणात्मक कृतीतून पाताळातील त्रासदायक स्पंदनांची गती आणखी वाढते आणि केर काढून बाहेर टाकण्याच्या कृतीपेक्षा नादाच्या स्तरावर सूक्ष्म स्वरूपात वास्तूत रज-तमात्मक स्पंदने फिरत रहाण्याचेच प्रमाण वाढते.

यासाठी शक्यतो तिन्हीसांजेची वेळ टळून गेल्यावर केर काढू नये. म्हणून ‘शक्यतो सायंकाळी केर काढणे टाळावे’, असे सांगितले आहे. तिन्हीसांजेपूर्वी केर काढणे हे त्यातल्यात्यात नादातून अल्प रज-तमात्मक लहरी आकृष्ट करणारे असते. ‘तिन्हीसांजेला घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते’, असे सांगितले जाते. म्हणजेच तिन्हीसांजेपूर्वी केर काढून तिन्हीसांजेला तुळशीजवळ दिवा लावल्यास शक्तीरूपी लहरी दिव्याकडे आकृष्ट होऊन वास्तूत प्रविष्ट होतात. या तेजदायी देवत्वामुळे वास्तूचे सायंकाळच्या त्रासदायक स्पंदनांपासून रक्षण होते.’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २६.१०.२००७, दुपारी ५.२०)

२. केरसुणीने केर कसा काढावा ?

२ अ. केर काढतांना कटीत (कमरेत) उजव्या अंगाला झुकून
उजव्या हातात केरसुणी धरून केर मागून पुढच्या दिशेने ढकलत न्यावा

२ अ १. कटीत वाकण्याने होणारी प्रक्रिया : ‘केर काढतांना कटीत वाकल्याने नाभीचक्रावर दाब येऊन पंचप्राण जागृत अवस्थेत रहातात. (वाकून केर काढतांना देहात शक्तीच्या लहरी अधिक प्रमाणात निर्माण होतात. – संकलक) केर गुडघ्यात वाकून काढल्यामुळे गुडघ्याच्या पोकळीत साठलेल्या किंवा घनीभूत झालेल्या रजतमात्मक वायूधारणेला गती मिळू शकते. अशा प्रकारे केर काढतांना पाताळातून वायूमंडलात ऊत्सर्जित होणारी त्रासदायक स्पंदने देहाकडे आकृष्ट होण्याची भीती असते; म्हणून रज-तमात्मकतेचे देहात संवर्धन करणारी अशी कृती टाळावी.

२ अ २. उजव्या अंगाला झुकल्याने होणारी प्रक्रिया : उजव्या अंगाला झुकून केर काढल्याने देहातील सूर्यनाडी जागृत रहाते आणि तेजाच्या स्तरावर देहाचे भूमीतून उत्सर्जित होणार्‍या त्रासदायक स्पंदनांपासून रक्षण होते.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २६.१०.२००७, दुपारी ५.२०)

२ आ. पूर्व दिशा सोडून इतर कोणत्याही दिशेकडे केर काढत जावे

२ आ १. केर काढत पूर्व दिशेला गेल्यास केरातील रज-तम कण आणि लहरी यांमुळे पूर्वेकडून येणार्‍या देवतांच्या लहरींच्या मार्गात अडथळा निर्माण होणे : ‘पूर्व दिशेकडून देवतांच्या सगुण लहरींचे पृथ्वीवर आगमन होत असते. कचरा हा रज-तमात्मक असल्यामुळे पश्चिमेकडून पूर्वेकडे केर काढतांना कचरा आणि धूळ यांचे पूर्व दिशेने वहन होऊन त्यांद्वारे रज-तम कण आणि लहरी यांचे प्रक्षेपण होऊन पूर्व दिशेकडून येणार्‍या देवतांच्या सगुण तत्त्वाच्या लहरींच्या मार्गात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे केर काढत पूर्वेकडे जाणे अयोग्य आहे. पूर्व दिशा सोडून इतर कोणत्याही दिशेकडे केर काढत जाऊ शकतो.’
– ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, २८.११.२००७, रात्री १०.५५)

२ इ. केर काढतांना तो आतून बाहेरच्या दिशेने,म्हणजे दाराच्या दिशेने पुढे पुढे ढकलत न्यावा

२ इ १. केर दाराच्या दिशेने नेल्याने खोलीतील त्रासदायक स्पंदने दारातून बाहेर पडणे

केर काढत तो दाराच्या दिशेने नेण्याची पद्धत आहे. हे भौतिक आणि मानसिक दृष्टीने सोयीचे आहे. अध्यात्माच्या दृष्टीने पाहिल्यास खोलीतील शक्ती (त्रासदायक स्पंदने) दारातून बाहेर पडते; म्हणून तसा केर काढतांना सोपे वाटते. उलट दिशेने केर काढतांना त्रास जाणवतो.

२ ई. केर पुढे ढकलल्यावर केरसुणी भूमीला उलट्या दिशेने
घासत न आणता उचलून मागे आणून भूमीला टेकवून मग केर काढावा

२ ई १. शास्त्र : ‘केर काढतांना तो पुढे पुढे ढकलत न्यावा. एकदा केर पुढे ढकलल्यावर केरसुणी परत मागे घासत आणून केर काढू नये; कारण या घर्षणात्मक क्रियेतून भूमीवर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरणार्‍या गतिमान भोवर्‍यांची निर्मिती होते आणि केर काढतांना भूमीलगतच्या पट्ट्यात पाताळातून उत्सर्जित होणारी त्रासदायक स्पंदने या भोवर्‍यांत घनीभूत होतात. त्यामुळे केर काढून झाला, तरी सूक्ष्मातून मात्र वास्तूत अशांतताच रहाते; म्हणून केरसुणी उलट्या दिशेने मागे घेऊन केर काढण्याची कृती टाळावी. प्रत्येक वेळी पुढून मागे येतांना केरसुणी भूमीला उलट्या दिशेने घासत न आणता उचलून मागे आणून भूमीला टेकवून मग केर काढावा.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २६.१०.२००७, दुपारी ५.२०)

२ उ. केरसुणी भूमीवर बडवू नये किंवा ती भूमीवर बळ लावत घासून केर काढू नये

२ उ १. शास्त्र : ‘केर काढतांना केरसुणी भूमीवर बडवणे किंवा ती भूमीवर बळाने घासून केर काढणे यांसारख्या त्रासदायक नाद उत्पन्न करणार्‍या कृतींमुळे पाताळातील तसेच वास्तूतील त्रासदायक स्पंदने कार्यरत होतात आणि कालांतराने या लहरींचे वातावरणात प्रक्षेपण चालू झाल्यामुळे वास्तूतील वाईट शक्तींचा संचारही वाढतो; त्रासदायक स्पंदनात वाढ होते; म्हणून शक्यतो अशा गोष्टी टाळाव्यात. वरील सर्व कृती तमोगुणी वृत्तीचे निदर्शक आहेत.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २८.१.२००५, रात्री ८.२०)

(‘२००४ साली गोव्यातील फोंडा येथील सनातनच्या आश्रमात केर काढण्याच्या संदर्भात विविध प्रयोग केले होते. तेव्हा वर सांगितलेल्या कृतींनी केर काढल्यास जास्त लाभ होतो, हे अनुभवास आले होते. प्रत्येक वेळी ईश्वर आधी अनुभूती देतो आणि मग ज्ञान देतो. २६.१०.२००७ या दिवशी मिळालेले ज्ञान हे याचे आणखी एक उदाहरण आहे.’ – डॉ. आठवले)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘दिनचर्येशी संबंधित आचार आणि त्यांमागील शास्त्र’

Leave a Comment