अनुक्रमणिका
१. उदयकालीन सूर्याच्या किरणांचा स्पर्श का होऊ देऊ नये ?
१ अ. उदयकालीन सूर्याच्या किरणांचा स्पर्श होऊ न देण्यामागील शास्त्र
२. सूर्याचा उदयकाल आणि सूर्यास्ताची वेळ या दोन्ही संधीकालांत साधना करण्याचे महत्त्व
३. उषःकाली झोपल्याने सकाळच्या सात्त्विक लहरींचा लाभ न घेण्याचे पाप लागणे
१. उदयकालीन सूर्याच्या किरणांचा स्पर्श का होऊ देऊ नये ?
उदयकालीन सूर्याच्या किरणांपेक्षा त्या वेळी वातावरणात रजतमात्मक कणांचे
प्रमाण जास्त असल्याने उदयकालीन सूर्याच्या किरणांचा स्पर्श होऊ न देणे जास्त आवश्यक असणे
आरोहणं गवां पृष्ठे प्रेतधूमं सरित्तटम् ।
बालातपं दिवास्वापं त्यजेद्दीर्घं जिजीविषुः ।। – स्कन्दपुराण, ब्राह्मखण्ड, धर्मारण्यमाहात्म्य, अध्याय ६, श्लोक ६६, ६७
अर्थ : जो दीर्घकाळ जिवंत राहू इच्छितो त्याने गाय-बैल यांच्या पाठीवर चढू नये, चितेचा धूर आपल्या अंगाला लागू देऊ नये, (कातरवेळी गंगेव्यतिरिक्त दुसर्या) नदीच्या तटावर बसू नये, उदयकालीन सूर्याच्या किरणांचा स्पर्श होऊ देऊ नये आणि दिवसा झोपणे सोडावे.
१ अ. उदयकालीन सूर्याच्या किरणांचा स्पर्श होऊ न देण्यामागील शास्त्र
‘उदयकालीन सूर्याच्या किरणांच्या आगमनाने पृथ्वीवरील वातावरणात रात्रीच्या वेळी निर्माण झालेल्या रज-तमात्मक कणांचे विघटन होण्यास आरंभ होतो. त्यामुळे या कालावधीत वातावरणात घर्षणयुक्त उष्ण ऊर्जा निर्माण होण्यास आरंभ होतो. या वेळी उदयकालीन सूर्याच्या किरणांपेक्षा वातावरणात रज-तमात्मक कणांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे या किरणांच्या साहाय्याने थोड्याफार प्रमाणात रज-तमात्मक लहरींचे संक्रमणही होत असल्याने शक्यतो या किरणांच्या संपर्कात जास्त येऊ नये. एकदा सूर्याच्या किरणांतील तेजतत्त्वाचे प्राबल्य वाढले की, वातावरणातील रज-तमात्मक लहरींचे संक्रमण अतिशय न्यून होते आणि वातावरण शुद्ध बनते.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २१.३.२००५, दुपारी १.५६)
कु. युवराज्ञी शिंदे (सनातनच्या साधिका) : ‘शक्यतो उदयकालीन किरणांच्या संपर्कात जास्त येऊ नये’, असे आपण सांगितले आहे. याउलट उदयकालीन उपासनेत सूर्याच्या किरणांचा स्पर्श होऊ देतात, तसेच त्याच्याकडे पहातातही. असे असतांना या दोन गोष्टींचा समन्वय कसा साधायचा ?
एक विद्वान : तेजतत्त्वावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्राटक किंवा देहाला त्रास करून घेऊन मुद्दाम सूर्याच्या किरणांच्या संपर्कात येऊन शक्ती-उपासक अशी साधना करतात; परंतु सहजयोगामध्ये असे करण्याचे कारण नाही. उदयकालीन उपासना, म्हणजे सूर्याच्या किरणांच्या संपर्कात न येता या काळात जास्तीतजास्त नामसाधना करायला हवी.
(सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २२.३.२००५, सायं. ७.३२)
२. सूर्याचा उदयकाल आणि सूर्यास्ताची वेळ या दोन्ही संधीकालांत साधना करण्याचे महत्त्व
सूर्याचा उदयकाल आणि सूर्यास्ताची वेळ या दोन्ही संधीकालांत
रज-तमात्मक लहरींचे सामर्थ्य जास्त असल्याने साधना करणे आवश्यक असणे
‘सूर्याच्या उदयकालामध्ये वातावरणातील रज-तमात्मक लहरींचे वाढते सामर्थ्य उणावण्यास आरंभ होतो, तर सूर्यास्ताच्या वेळेपासून रज-तमात्मक लहरींचे सामर्थ्य वाढण्यास आरंभ होतो. रज-तमात्मक लहरींच्या संदर्भातील ही दोन प्रमुख स्थित्यंतरे असल्याने या स्थित्यंतरांचा विपरीत परिणाम जिवावर होऊ नये यासाठी उदयकाल आणि सूर्यास्ताची वेळ या दोन्ही संधीकालांत साधना करून स्वतःतील सात्त्विकतेचे प्रमाण वाढवण्यास सांगितले जाते. एकदा स्वतःतील सात्त्विक लहरींच्या संक्रमणाचे प्रमाण वाढले की, जिवाभोवती या लहरींचे संरक्षककवच निर्माण झाल्याने जिवावर वातावरणातील रज-तमात्मक स्थित्यंतराचा परिणाम अल्प प्रमाणात होतो.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २२.३.२००५, सायं. ६.१९)
उषःकाली झोपून रहाणारा नरकगमनास प्राप्त होणे
‘उषःकाल हा सात्त्विक लहरींचा भूतलाकडे होणार्या आगमनाचा काळ असतो. या काळात अनेक देवता गंधरूपे भूतलावर येत असतात. अशा वेळी जीव साधना न करता झोपून राहिल्यास तो अनेक कनिष्ठ देवतांच्या कोपाला बळी पडण्याची शक्यता असते; कारण झोपून राहिल्याने जिवाचा देह पाताळातून येणार्या त्रासदायक स्पंदनांनी भारित झाल्याने तो वायूमंडलात रज-तम कणांचे प्रक्षेपण करून सात्त्विक लहरींच्या आगमनात बाधा आणू लागतो. यासाठी ‘जीव पापकर्मास, म्हणजेच नरकगमनास प्राप्त होतो’, असे म्हणतात.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २.६.२००७, दुपारी १२.०६)
३. उषःकाली झोपल्याने सकाळच्या सात्त्विक लहरींचा लाभ न घेण्याचे पाप लागणे
‘उषःकाली झोपणे म्हणजे सकाळच्या सात्त्विक लहरींच्या संक्रमणाचा लाभ उठवून नामजप न करता निद्रेच्या अधीन होणे, हे पापकर्मच मानले आहे.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २२.२.२००५, सायं. ७.२२)