आपल्याला हे माहीत आहे का की, श्राद्ध अथवा उपवासाच्या दिवशी दात घासू नयेत ? प्रस्तूत लेखात यांमागील अध्यात्मशास्त्र विशद करण्यात आले आहे; ते लक्षात घेतल्यास आपल्याला हिंदू धर्माची महनीयता प्रत्ययास येईल.
१. दात कधी घासू नयेत ? त्यामागील शास्त्र काय ?
अ. उपवासाच्या दिवशी दात घासू नयेत.
१ अ. शास्त्र
उपवासाच्या दिवशी जठराग्नी प्रदिप्त होऊन देहाचे शुद्धीकरण होणे, त्यात अडथळा येऊ नये म्हणून दात घासू नयेत; कारण दात घासल्यावर चूळ भरल्याने अग्नीची तीव्रता घटणे
‘उपवासाच्या दिवशी लंघन केल्यामुळे शरिरातील आंतर्-पोकळ्यांमध्ये अनेक टाकाऊ वायू उत्सर्जित केले जातात. तसेच या दिवशी पेशींच्या मलनिःसारणाची क्षमता वाढलेली असते. लंघनामुळे शरिराला होणारा बाह्यऊर्जेचा पुरवठा बंद झाल्याने जिवाच्या देहातील जठराग्नी प्रदिप्त होतो. हा अग्नी त्याच्यातील तेजतत्त्वात्मक लहरींच्या बळावर संपूर्ण देहातील रज-तमात्मक वायूंचे, तसेच कणांचे विघटन करतो. थोडक्यात म्हणायचे तर, उपवास म्हणजे एक प्रकारे देहातील सुप्त आंतरिक अग्नी प्रदिप्त करून त्या बळावर पंचप्राणांना जागृत करून त्यांच्या शरीरभर केलेल्या वहनात्मक प्रक्रियेतून देहातील आंतर्-कोषांची शुद्धी करणे.
या दिवशी दात न घासण्यामागील कारण हे की, ‘दात घासल्यावर चूळ भरावी लागते. चूळ भरण्यासाठी जिवाच्या देहाचा पाण्याशी संपर्क येतो. या पाण्यातून प्रक्षेपित होणार्या आपतत्त्वात्मक लहरींमुळे शरिरात वाढलेल्या आणि रज-तमकणांचे विघटन करण्यास उपयुक्त असलेल्या अग्नीची (जठराग्नीची) तीव्रता न्यून (कमी) होण्याची शक्यता असते. असे असल्याने ‘या दिवशी दात घासू नयेत’, असे म्हटले जाते.’
– एक विद्वान (सौ. गाडगीळ यांच्या माध्यमातून, २०.७.२००५, दुपारी १२.२१)
आ. श्राद्धाच्या दिवशी दात घासू नयेत.
२ आ. शास्त्र
श्राद्धाच्या दिवशीच्या विधीतील मंत्रांमुळे तेजतत्त्व कार्यरत होणे, त्यात अडथळा येऊ नये म्हणून दात घासू नयेत; कारण दात घासल्यावर चूळ भरल्याने तेजतत्त्व घटणे
‘श्राद्धाच्या दिवशी पूर्वजांचे लिंगदेह पृथ्वीच्या कक्षेत येऊन संबंधित वास्तूत भ्रमण करत असतात. यामुळे वातावरणातील रज-तमात्मक लहरींचे प्रमाण वाढलेले असते. श्राद्धाच्या दिवशी केल्या जाणार्या आवाहनात्मक मंत्रोच्चाराच्या नादाचा परिणाम प्रत्यक्ष श्राद्धविधीकर्मात सहभागी असणार्या जिवावर होत असतो. त्याचे पंचप्राण जागृत झालेले असतात; तसेच तेजलहरींचे संक्रमण त्याच्या देहात चालू होते. या सर्वाचा परिणाम म्हणून त्याचे रज-तमात्मक वातावरणापासून रक्षण होत असते. या तेजतत्त्वात्मक लहरींची तीव्रता घटू नये, यासाठी श्राद्धाच्या दिवशी जेवल्यानंतरही चूळ भरत नाहीत. यामध्ये पाण्याचा संपर्क न्यूनतम येऊन देहातील आंतरिक अग्नीची तीव्रता टिकवण्याचा प्रयत्न केला जातो.
दात घासण्यासाठी मंत्रोच्चाराने भारित पाणी चालते; कारण या पाण्यात मंत्रांमुळे आधीच तेजलहरींचे संवर्धन झालेले असते; म्हणून पूर्वीच्या काळी तेजाचे संवर्धन करणार्या कडुनिंबाची पाने पाण्यात घालून त्या पाण्याने स्नान करून, तसेच कडुनिंबाच्या काडीने दात घासून, चूळ न भरता त्याची काडी चावून तो रस गिळून शरिरातील तेजतत्त्व टिकवले जात होते आणि त्यानंतरच श्राद्धादीकर्म किंवा उपवासकर्म केले जात होते.
श्राद्धाच्या दिवशी पितर भूमंडलाच्या अगदी जवळ आलेले असतात. पूर्वी पितरही साधना करणारे, म्हणजेच सात्त्विक असल्याने त्यांच्याकडून येणार्या तेजदायी आशीर्वादातील सात्त्विकता घटू नये, यासाठी ‘श्राद्धाच्या दिवशी दात घासू नयेत’, असे धर्मशास्त्रात सांगितले होते. पितरांच्या आशीर्वादातील तेजतत्त्व तोंडाच्या पोकळीत घनीभूत होऊन ते वायूतत्त्वाच्या किंवा थुंकीतील आपतत्त्वाच्या साहाय्याने देहाच्या पोकळीत जाण्यास या कर्माने साहाय्य होत असे.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २०.७.२००५, दुपारी १२.२१ आणि ३.१०.२००८, रात्री ९.०४)
आचारांच्या क्रमाच्या संदर्भात सूचना
मलमूत्रविसर्जन, हात-पाय धुणे आणि चूळ भरणे अन् नंतर दंतधावन करणे, असा क्रम आचारांच्या दृष्टीने दिला आहे. एखाद्याला वयोमानानुसार वा प्रकृतीनुसार प्रथम दंतधावन करून नंतर मलमूत्रविसर्जन, हात-पाय धुणे अन् चूळ भरणे, अशा क्रमानेही कृती करता येतात. या कृती करतांना मूळ हेतू ‘शरिराची शुद्धता’ हा असल्याने वर दिलेल्या क्रमात पालट करता येतो.