अनुक्रमणिका
प्रत्येकाचे जीवन सुखदु:खात हेलकावे खात असते. सर्वांना सुख हवेहवेसे वाटते; तर दु:ख आपला शत्रू असल्यासारखे वाटते. एखाद्याच्या पुढ्यात आलेले ‘दु:ख पूर्णत: टाळता येईल का’, हे अनुभवणे तर सोडाच, परंतु सहसा कोणी त्याची कल्पनाही करू शकत नाही. या लेखात नेमके हेच साध्य कसे करावे, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे.
दुःख पूर्णतः टाळणे
दुःख कधीच नको असले, तर सुखदुःखाच्या पलीकडे जावे लागते. दुःख ‘नको’ म्हणून जात नाही आणि सुख ‘ये’ म्हणून येत नाही; म्हणून सुखदुःखाचा विचार करू नये. सुखदुःखाच्या वरच्या अवस्थेचे नाव चित्ताची संतुलित अवस्था’, असे आहे. या अवस्थेत व्यक्तीला जगताच्या विषयांच्या आधारावर सुख अथवा दुःख यांची अनुभूती येत नाही, म्हणजे व्यक्ती सुखाने सुखी आणि दुःखाने दुःखी होत नाही. उलट ती आपल्या अंतरातील आत्मानंदाच्या धुंदीतच हरवून गेलेली असते.
१. सुखदुःख, जडवादी आणि उन्नत
अ. जडवादी (सर्वसाधारण) माणसाला सुखदुःख दोन्ही आहेत; कारण त्याला अनादीभ्रम आहे. अनादीभ्रम म्हणजे ‘मायेला सत्य समजणे’. साधनेने हा भ्रम दूर होतो.
आ. फलभूमिकेतील, म्हणजे ७० प्रतिशतपेक्षा जास्त आध्यात्मिक पातळीच्या उन्नतांना केवळ सात्त्विक सुखाचा अनुभव असतो. त्यांना शारीरिक आणि मानसिक दुःख नाही; कारण केवळ आदीभ्रम आहे. आदीभ्रम म्हणजे ‘माया मिथ्या आहे’, हे समजणे. गुरुकृपेने हा भ्रम दूर होतो, म्हणजेच मायेतील ब्रह्माची जाणीव होते, म्हणजेच साधक अद्वैतापर्यंत पोहोचतो. ९० प्रतिशतच्या पुढील आध्यात्मिक पातळीला असलेले ज्ञानी, योगी, भक्त, सिद्ध, परमानंद इत्यादींना केवळ आनंदच आहे; कारण त्यांचा आदीभ्रम गेलेला असतो.
इ. स्वस्थ आणि अस्वस्थ : सुख आणि दुःख यांच्या पलीकडे गेला तो स्वस्थ अन् सुखदुःख भोगणारा तो अस्वस्थ होय.
२. दुःखस्वीकार
दुःखावर दान, यज्ञ इत्यादी उपाय नव्हेत, दुःखस्वीकारच हवा. दुःखोद्भवी विकारापासून सुटण्यासाठी त्या विकाराचा वेग सहन करण्याची सवय लावून घ्या आणि हे जडात आहात तोपर्यंतच करा. अतीसुख म्हणजे परमसुख, हे दुःखस्वीकाराच्या सवयीने मिळते. हठयोगाने हेच साध्य केले जाते.
अ. दुःखस्वीकाराचे मार्ग
महावीर तपानेच मुक्त झाले. तप म्हणजे दुःखस्वीकार. मागील कर्मांच्या शुद्धीकरणाचे महाविराचे २२ उपाय आहेत. त्या प्रत्येकात दुःखस्वीकार आहे.
१. तपाचे प्रकार
अ. बाह्यतप
१. अनशन (न खाणे)
२. ऊनोदरिका (अल्प खाणे)
३. भिक्षाचर्या (मिळेल तेवढेच खाणे)
४. रसपरित्याग (स्निग्ध पदार्थ न खाणे)
५. कायाक्लेश (उष्णता, थंडी इत्यादी शरिराचे त्रास सोसणे)
६. संलीनता : काम-क्रोध जिंकून इंद्रीयदमन करणे आणि अशुभ विचार, उच्चार अन् आचार यांचा त्याग करणे
आ. अंतर्तप
१. प्रायश्चित्त
२. विनम्रता
३. वैयावृत्य (सेवाधर्म)
४. स्वाध्याय (शास्त्रांचे मनन आणि पठण)
५. ध्यानव्युत्सर्ग (शरीरममत्वाचा त्याग)
३. नामजपाने दुःखपरिहार
‘नामाने भवरोग नाहीसा होतो. भव म्हणजे विषय. विषयाची आसक्ती हा सर्व रोगांचा पाया आहे. नाम घेतल्याने भगवंताविषयी प्रेम वाटू लागते आणि इतर ठिकाणची आसक्ती सुटते. नामाने सर्व दुःखे नाहीशी होतात. सर्व दुःखांचे मूळ विषयाच्या आसक्तीमध्ये आहे. नामाने आसक्ती आपोआप सुटते; म्हणून दुःख नाहीसे होते. तसेच भगवंत हा आनंदरूप असल्याने त्याला नामाने घट्ट धरले की, दुःख त्या ठिकाणी कसे राहू शकेल ?’
४. सहजावस्था
उन्नत विषयाचा आनंद उपभोगत असतांनाही स्वरूपापासून च्युत होत नाहीत. विषय असतांना वा नसतांनाही ते निर्विषय आनंदात असतात. यालाच ‘सहजावस्था’ म्हणतात.
५. धर्म
दुःखाचे पूर्ण निवारण आणि आत्यंतिक सुखाची (आनंदाची) प्राप्ती, याला वेदान्त अन् सांख्यदर्शने ‘परमपुरुषार्थ’ मानतात.
६. बौद्ध पंथ
गौतम बुद्धाने दुःखाला केंद्रभूत मानून आपला अष्टांगिक मार्ग पुढील चार आर्यसत्यांच्या द्वारे सांगितला आहे – दुःखाचे सर्वव्यापी अस्तित्व, दुःखाची सार्वत्रिक कारणे, संपूर्ण दुःखनिरासाची शक्यता आणि दुःखनिरासाचा मार्ग.
७. तत्त्वज्ञानाची आवश्यकता
दुःखत्रयाभिघातात् जिज्ञासा तदपघातके हेतौ ।
दृष्टे साऽपार्था चेत् नैकान्तात्यन्ततोऽभावात् ।। – साङ्ख्यकारिका, कारिका १
अर्थ : आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक या तीन दुःखांनी दुःखनाशाची जिज्ञासा उत्पन्न होते. जर दृश्य उपायांनी ती जिज्ञासा पूर्ण होत असेल, तर अदृश्य तत्त्वज्ञानाचे उपाय कशाला ?
तसे होत नाही; म्हणून तत्त्वज्ञान आवश्यक आहे.
अर्थात् साधना करणे हाच दु:खनिवारण म्हणजे दु:खाच्या पलिकडे असलेल्या चिरंतन आनंदाची प्राप्ती करून घेण्यासाठी एकमेव उपाय आहे. आणि यानेच दु:ख पूर्णत: टळू शकते.