जीवन म्हणजे पदोपदीचा संघर्ष ! संतांनी त्याला ‘एक संग्राम’च म्हटले आहे. असे हे सुखदु:खाने नटलेले जीवन ! या लेखात आपण मनुष्य त्याच्या जीवनात सुखप्राप्ती आणि दु:खनिवृत्ती यांसाठी करत असलेले प्रयत्न कसे निष्फळ ठरतात, सुखदु:खाची अपरिहार्यता आणि त्यांचा परमावधी यांविषयी जाणून घेऊया.
१. सुखप्राप्ती आणि दुःखनिवृत्ती यांचे प्रयत्न
१ अ. सुखप्राप्तीचे प्रयत्न
शाळा, महाविद्यालय इत्यादी ठिकाणी इतिहास, भूगोल, गणित इत्यादी विषय शिकवतात; पण आनंद कसा मिळवायचा, हे मात्र शिकवत नाहीत; म्हणून प्राणीमात्र पंचज्ञानेंदि्रये, मन आणि / किंवा बुद्धी यांद्वारे मिळवता येईल तेवढे सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो. मनुष्य विषयसुख भोगण्यासाठी लग्न करतो. पुढे दुःख विसरण्यासाठी विषयसुख भोगतो. विषयसुख भोगून दुःख तात्पुरते विसरले जाते; पण नाहीसे होत नाही.
१ आ. दुःखनिवृत्तीचे प्रयत्न
यनि्नमित्तं भवेच्छोकस्तापो वा दुःखमेव च ।
आयासो वा यतो मूलमेकाङ्गमपि तत्त्यजेत् ।।
– महाभारत, सभापर्व, अध्याय १७४, श्लोक ४३
अर्थ : ज्याच्यामुळे शोक, ताप, दुःख किंवा कष्ट होतात, ते कारण जरी आपल्या शरिराचा एक अवयव असले, तरी त्याचा त्याग केला पाहिजे.
सुखप्राप्तीच्या प्रयत्नांपेक्षा मानवाचे बहुतेक प्रयत्न दुःख न्यून करण्याच्या संदर्भात असतात. प्रकृती चांगली नसली, तर डॉक्टरकडे जाणे; आकाशवाणी संच, मोटार इत्यादी वस्तू बिघडल्या, तर ठीकठाक करून घेणे, यांसारख्या गोष्टी करून त्या त्या गोष्टींमुळे होणारे दुःख मानव न्यून करत रहातो. प्रकृती चांगली रहावी; म्हणून व्यायाम करणे, मोटार बिघडू नये; म्हणून तिची काळजी घेणे, यांसारख्या गोष्टी फारच थोडे जण नियमितपणे करतात. दुःख नाहीसे करण्याचे प्रयत्नही नेहमीच यशस्वी होत नाहीत. बरे न होणारे रोग, म्हातारपण आणि मृत्यू या गोष्टी अशा आहेत की, त्यांमुळे होणारे दुःख दूर करण्यासाठी सर्वसाधारण माणूस काहीएक करू शकत नाही.
थोडक्यात, आनंद कसा मिळवायचा, हे ज्ञात नसल्याने थोडा वेळ टिकणारी लहान लहान सुखे मिळवणे अन् दुःख दूर करणे, यातच बहुतेकांचे जीवन जाते.
२. सुखदुःखाची परमावधी
‘सुखाची परमावधी म्हणजे मैथून अन् दुःखाची परमावधी म्हणजे ईश्वरप्राप्ती न झाल्याने साधकाला होणारे दुःख. मैथुनाने होणारे सुख स्थूलदेहाने मिळत असल्याने ते तम प्रवृत्तीत येते, तर साधकाला होणारे दुःख हे सत्त्वगुणामुळे होते.’ – प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.
३. काळ आणि सुखदुःख
‘दुःखात देहाची जाणीव असते; म्हणून त्याचा काळ जास्त वाटतो. याउलट सुखात देहाची जाणीव नसते; म्हणून त्याचा काळ अल्प वाटतो; म्हणजे देहभावामुळे आपल्याला काळ भासतो. वास्तविक काळ असे काही नाहीच.’ – प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.
३ अ. ग्रह आणि सुखदुःख
जे भोग भोगायचे असतील, त्यांना पोषक अशा ग्रहांच्या सि्थतीच्या वेळी व्यक्ती जन्माला येते; म्हणून ग्रहांमुळे व्यक्ती सुखदुःख भोगते, असे नसते.
४. सुखदुःखाची अपरिहार्यता
संसार हे सुखदुःखाचे मिश्रण आहे. हे पुढील उदाहरणांवरून लक्षात येईल. घर बांधले की, सुख होते; पण घराचा कर भरण्याची वेळ आली किंवा घर ठीकठाक करण्याचे काम निघाले की, दुःख होते. मुलगा झाला की, सुख होते; पण तो ऐकेनासा झाला की, दुःख होते. मुलीचे लग्न झाले की, सुख होते; पण तिचा पती तिच्याशी नीट वागला नाही की, दुःख होते. अशा प्रकारे बहुतेक सर्व जण सुखदुःखरूपी भवसागरात गटांगळ्या खात असतात. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत या देहाला अनेक यातनाही आहेत. अशा या सुखदुःखांच्या मिश्रणाला ‘संसारबिंब’ असे म्हणतात. म्हणूनच समर्थ रामदासस्वामींनी म्हटले आहे,
परम मूर्खांमाजी मूर्ख । जो संसारीं मानी सुख ।
या संसारदुःखा ऐसें दुःख । आणीक नाहीं ।।
– दासबोध, दशक २, समास १०, ओवी ४०
सुखस्यान्तरं दुःखं दुःखस्यानन्तरं सुखम् ।
द्वयमेतदि्ध जन्तूनां अलङ्घ्यं दिनराति्रवत् ।।
– अध्यात्मरामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग ६, श्लोक १३
अर्थ : जशी दिवसानंतर रात्र आणि रात्रीनंतर दिवस येतो, तसेच सुखानंतर दुःख अन् दुःखानंतर सुख येते. ही शृंखला अटळ आहे.
यामुळेच या सर्वांच्या पलिकडे असलेला शाश्वत आनंद मिळवण्यासाठी योग्य साधना करणे हे प्रत्येक मनुष्यासाठी क्रमप्राप्त आहे !