समाजातील बर्याच जणांनाच नव्हे, तर काही संतांनाही सनातन संस्थेचे साधक करत असलेल्या प्रगतीबद्दल आश्चर्य आणि कौतुक वाटते. कार्याला यश मिळावे आणि साधकांची प्रगती व्हावी; म्हणून सनातनमध्ये वापरण्यात येणारी कार्यपद्धत पुढीलप्रमाणे आहे.
१. कार्यपद्धत
एखाद्यात पालट घडवायचा असेल, त्याला काहीतरी शिकवायचे असेल, तर एक व्याख्यान, काही दिवसांचे किंवा आठवड्याचे शिबिर घेऊन काही उपयोग नाही. त्याला आपल्याबरोबर वर्षानुवर्षे ठेवल्यानेच त्याच्यात पालट होऊ शकतो. गुरु हेच करतात. ते शिष्याला आपल्याबरोबर ठेवून त्याची साधनेत प्रगती करवून घेतात. सनातनमध्ये हेच केले जाते; म्हणून साधकांची प्रगती जलद गतीने होते.
१ अ. सकाम साधना करणार्यांना सनातनमध्ये प्रवेश नाही. केवळ ईश्वरप्राप्ती करू इच्छिणार्यांसाठी सनातन आहे.
१ आ. प्रतिदिन किंवा प्रत्येक आठवड्याला प्रत्येक साधकाचा आढावा घेतला जातो.
१ आ १. आढावा घेण्याच्या कार्यपद्धतीचे प्रकार
अ. कार्याच्या फलनिष्पत्तीचा आढावा : साधकांनी केलेल्या सेवांच्या आणि एकंदरित कार्याच्या / उपक्रमाच्या फलनिष्पत्तीचा आढावा घेतला जातो. साधक त्यांच्या सेवेतील कौशल्य विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत ना, याचाही आढावा घेतला जातो.
आ. व्यष्टी साधनेचा आढावा : साधकांच्या व्यष्टी साधनेचा सामूहिक आढावा घेतला जात असल्याने साधकांना साधनेचे पुढचे पुढचे प्रयत्न करण्याची दिशा मिळते, तसेच एकमेकांकडून शिकण्याचा भागही होतो.
२. सनातनचे आश्रम
घरी राहून पूर्णवेळ साधना करणे कठीण असते. ज्यांना पूर्णवेळ साधना करून ईश्वरप्राप्ती करायची आहे, त्यांच्यासाठी सनातनच्या आश्रमांचे दरवाजे अखंड उघडे असतात.
२ अ. आश्रमात राहून साधना करण्याचे लाभ
१. आश्रमात साधक अनेक साधकांसोबत रहातात; त्यामुळे त्यांच्यात कुटुंबभावना लवकर निर्माण होते. यामुळे सारे विश्वच माझे कुटुंब, या साधनेतील ध्येयापर्यंत त्यांना लवकर जाता येते.
२. आश्रमात राहिल्याने आपोआपच मायेपासून निवृत्त व्हायला साहाय्य होते.
३. व्यष्टी आणि समष्टी साधना
३ अ. व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग
या सिद्धांतानुसार प्रत्येकाला त्याची प्रकृती पाहून साधना सांगण्यात येते.
३ आ. आवड आणि कौशल्य यांनुसार सेवा (साधना)
३ आ १. आवडीनुसार सेवा : साधकाला आवडीनुसार सेवा दिल्याने तो ती मनापासून करतो. सेवा मनापासून झाल्याने ती परिपूर्ण होऊन त्याद्वारे साधकाची प्रगती लवकर होते.
३ आ २. कौशल्यानुसार सेवा : साधकाला त्याच्या कौशल्यानुसार सेवा दिल्याने त्याच्यातील कौशल्य विकसित होण्याला वाव मिळतो. समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपापले कौशल्य समाजासाठी अर्पण केले, तर समाजातील प्रत्येकालाच एकमेकांमधील कौशल्याचा लाभ होतो.
३ इ. गुरुकृपायोगानुसार साधना
३ इ १. व्यष्टी साधनेची अंगे : नाम, सत्संग, सत्सेवा, त्याग, प्रीती, स्वभावदोष निर्मूलन, अहं निर्मूलन आणि भावजागृती हे साधनेत अंतर्भूत आहेत.
३ इ २. समष्टी साधनेची अंगे : धर्मप्रसार, हिंदूसंघटन, राष्ट्ररक्षण आणि धर्मरक्षण यांविषयीचे कार्य साधना म्हणून करायचे असते.
बर्याच संप्रदायांत वा संस्थांमध्ये केवळ व्यष्टी साधनाच शिकवली जाते; समष्टी साधना शिकवली जात नाही. ईश्वरप्राप्तीसाठी व्यष्टी साधनेसह समष्टी साधना करणे आवश्यकच असते. सनातनमध्ये साधक समष्टी साधनाही करत असल्याने त्यांची शीघ्र प्रगती होत आहे.
३ ई. घरी रहाणारे
यांनी साधनेसाठी प्रतिदिन ३ ते ४ तास देणे आवश्यक आहे.
३ उ. आश्रमात रहाणारे
यांनी साधनेसाठी प्रतिदिन ८ ते १२ तास देणे आवश्यक आहे.
४. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनावर भर
स्वभावदोष आणि अहं हे ईश्वरप्राप्तीतील मोठे अडथळे आहेत. सनातनमध्ये स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनावर विशेष भर दिला जातो. साधकांना त्यांचे स्वभावदोष आणि अहं यांची जाणीव बैठकांमध्ये पुनःपुन्हा करून दिली जाते, तसेच साधकांमधील स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू आश्रमातील फलकावर लिहिण्यासही सांगितले जाते.
५. साधनेचे गांभीर्य वाढण्याच्या संदर्भात कार्यपद्धत
५ अ. घरी रहाणारे : नियमित साधना न करणार्यांकडे दुर्लक्ष करण्यात येते.
५ आ. आश्रमात रहाणारे : नियमित साधना न करणार्यांना घरी पाठवण्यात येते.
५ इ. प्रायश्चित्त : साधकांकडून होणार्या चुकांमुळे त्यांची साधनेत हानी होते. यासाठी साधकांना बैठकांमध्ये चुका सांगण्यास सांगितले जाते, तसेच त्या आश्रमात फलकावर लिहिण्यासही सांगितले जाते. चुकांसाठी प्रायश्चित्त घेतात.
६. फलनिष्पत्ती
आतापर्यंत ३८७ जणांनी ६० ते ६९ टक्के पातळी गाठली आहे आणि ३९ जणांनी ७० टक्क्यांहून अधिक पातळी गाठली आहे, म्हणजे ते संत झाले आहेत.
– डॉ. आठवले (२३.३.२०१४)
७. गुरुकृपायोगानुसार साधनेने जलद प्रगती होण्याचे कारण
गुरुकृपायोगातील व्यष्टी साधनेतील अष्टांग साधनेत मानसिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही स्तरांवरील साधना आहेत. प्रथम मानसिक स्तरावरील साधना केल्यामुळे पुढे आध्यात्मिक स्तरावरील साधना करणे सुलभ जाते. त्यामुळे गुरुकृपायोगानुसार साधना करणार्या साधकांची साधनेत जलद प्रगती होते.
१. व्यष्टी साधना
स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीसाठीची साधना
१ अ. मानसिक स्तरावरील साधना : १. स्वभावदोष निर्मूलन, २. अहं निर्मूलन
१ आ. आध्यात्मिक स्तरावरील साधना : १. नामस्मरण, २. सत्संग, ३. सत्सेवा, ४. त्याग, ५. भाव ६. प्रीती
२. समष्टी साधना
इतरांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठीची साधना. सत्सेवा आणि प्रीती यामुळे व्यापकत्व येण्यास साहाय्य होते.
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२३.५.२०१९)