अनुक्रमणिका
१ अ. सात्त्विक, राजसिक आणि तामसिक
१ इ. इंद्रियांनुसार (आनंद आणि सुख यांचे) प्रकार
२. निरनिराळ्या देहांवाटे मिळणार्या सुखाचे प्रमाण
२ आ. सूक्ष्मदेहाने (वासनादेहाने, मनोदेहाने) मिळणारे सुख
२ इ. कारणदेहाने (बुद्धीने) मिळणारे सुख
२ ई. इंद्रियांकडून मिळणार्या सुखाचे प्रमाण
२ ऊ. निरनिराळे देह आणि सुखदुःखाची प्रत अन् प्रमाण
पृथ्वीतलावरील प्रत्येक व्यक्ती जीवनात सुख प्राप्त करण्यासाठी धडपडते, अक्षरश: जीवाचे रान करते; प्रत्यक्षात ते मिळते का आणि मिळाल्यास ते किती काळ टिकते हा भाग निराळाच ! या लेखात आपण सुखाचे प्रकार; शरीर, मन, बुद्धी यांना मिळणार्या सुखांचे प्रमाण, प्रत यांविषयी पहाणार आहोत. ‘स्वर्गसुख’ म्हणजे काय, त्याची मर्यादा आणि थोडेफार खरे सुख तरी कसे मिळवायचे; तसेच प्राणी आणि मानव यांना मिळणार्या सुखातील भेद यांसारखी वैशिष्ट्यपूर्ण सूत्रही समजून घेणार आहोत.
१. सुखाचे प्रकार
१ अ. सात्त्विक, राजसिक आणि तामसिक
१. सात्त्विक
स्वतःच्या सुखदुःखाचा विचार न करता दुसर्याला सुख देणे. दुसर्यांना सुख देऊन स्वतःचे अल्प होत नाही, ते खरे १०० प्रतिशत सुख होय. हे मनाचे सुख असते.
२. राजसिक
दुसर्यांना दुःख न देता केवळ स्वतःसाठी सुख मिळवणे. ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये यांच्याद्वारे मिळणार्या सुखाला ‘राजसिक सुख’ असे म्हणतात, उदा. चविष्ट पदार्थ खाणे. येथे तात्काळ सुख किंवा तृप्ती मिळते; परंतु अंततः पुढील कारणांमुळे त्याचे पर्यवसान दुःखातच होते.
अ. अमाप सुख उपभोगता येत नाही, उदा. पदार्थ अधिक खाल्ल्याने पोटदुखी होऊ शकते.
आ. इच्छा होईल त्या क्षणी पदार्थ उपलब्ध होऊ शकत नाही, उदा. मिठाईचे दुकान बंद असणे किंवा आपली आवडती मिठाई दुकानात उपलब्ध नसणे.
इ. कधी कधी सुखाचे आवश्यकतेमध्ये रूपांतर होते, उदा. गाडीने प्रवास करणे आवडू लागल्यावर तो गाडीनेच करण्याची सवय लागते. त्यानंतर एखादा दिवस जर गाडी उपलब्ध नसेल, तर दुःख होते.
३. तामसिक
दुसर्यांना दुःख देण्याने आणि जीवनातील कष्टांपासून दूर पळण्याने व्यक्तीला सुख मिळते, उदा. मद्य पिणे, अमली पदार्थांचे सेवन करणे.
१ अ १. बौदि्धक सुख
सर्वसाधारणतः बौदि्धक सुख हे सात्त्विक, मानसिक सुख हे राजसिक आणि स्थूलदेहाचे सुख हे तामसिक स्वरूपाचे असते. ज्ञान झाल्याने बुद्धीला मिळणारे सुख हे केवळ अज्ञान, म्हणजे जडत्व नाहीसे झाल्याने मिळणारे सुख असते. मनाला सुख मिळते, तेव्हा त्याचेही जडत्व न्यून झालेले असते.
१ आ. प्रिय, मोद आणि प्रमोद
मनाला सुख देणारी वस्तू दिसली की, मनात प्रिय वृत्ती उत्पन्न होते. ती वस्तू प्राप्त झाली की, मोद होतो आणि त्या वस्तूचा उपभोग घेतांना प्रमोद होतो.
१ इ. इंद्रियांनुसार (आनंद आणि सुख यांचे) प्रकार
सर्व सुखांची उत्पत्ती ब्रह्मापासून होते.
१. ब्रह्मानंद (आत्मानंद, अद्वैतानंद)
शुद्ध स्वरूपातील सुखाला ब्रह्मानंद किंवा अद्वैतानंद असे म्हणतात. असे सुख म्हणजेच ब्रह्मसुख किंवा अद्वैत.
२. विद्यानंद (ज्ञानानंद)
बुद्धीद्वारे होणार्या सुखाला ‘विद्यानंद किंवा ज्ञानानंद’, म्हणजे ‘ज्ञानाचे सुख’ म्हणतात. हा विज्ञानमय कोषात होतो.
३. वासनानंद
मनुष्याच्या मनातील आशा-आकांक्षा, तसेच क्रोध, अहंकार, मत्सर इत्यादींच्या तृप्तीमुळे मिळणार्या सुखाला ‘वासनानंद’ म्हणतात. हा मनोमय कोषाला अनुभवास येतो.
४. विषयानंद
ज्ञानेंद्रियांद्वारे मिळणार्या सुखाला (भौतिक सुख किंवा विषयसुख) ‘विषयानंद’ म्हणतात. हा अन्नमय कोषाला अनुभवास येतो.
ब्रह्मानंदाव्यतिरिक्त इतर सुखे अशुद्ध स्वरूपातील असतात आणि त्यांतून पूर्ण तृप्ती होऊ शकत नाही. सर्व सुखांचा उगम जरी ब्रह्मापासून असला, तरी सुख अनुभवणार्याच्या शुद्धतेवर त्या सुखाची गुणवत्ता अवलंबून असते. स्वच्छ पाण्यात एखाद्या वस्तूचे प्रतिबिंब स्पष्ट दिसते; परंतु गढूळ पाण्यात प्रतिबिंब दिसत नाही. तसेच अहं शुद्ध असेल, तरच ब्रह्माच्या सर्वोच्च आनंदाची अनुभूती येते, अन्यथा नाही.
२. निरनिराळ्या देहांवाटे मिळणार्या सुखाचे प्रमाण
वेदनानाम् अधिष्ठानं मनो देहश्च सेनि्द्रयः ।
केशलोमनखाग्रान्नमलद्रवगुणैर्विना ।। – चरकसंहिता, शारीरस्थान, अध्याय १, श्लोक १३६
अर्थ : मन, देह आणि इंद्रिये ही वेदनांची अधिष्ठाने होत. (म्हणजे यांना वेदनांची जाणीव होते.) देहातील केस, लोम (लव), नखाग्र (नखांची टोके), द्रव आणि घन मल यांना दुःख नाही.
२ अ. प्रत्येक सुखात दुःख असणे
आवडती गोष्ट खाणे, गाणे ऐकणे, चित्रपट पहाणे, इत्यादी गोष्टी आरंभी सुख देतात; पण त्याच गोष्टी पुनःपुन्हा केल्यास त्यापासून मिळणारे सुख अल्प होत जाते आणि शेवटी त्या गोष्टी दुःखच देतात; म्हणून गीतेत म्हटले आहे,
मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः । – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्लोक १४
अर्थ : इंद्रियांचे (विषयांशी होणारे) संयोग शीत-उष्ण, सुख-दुःख देणारे आहेत.
आवडीची गोष्ट, उदा. आईस्क्रीम खायला आरंभ केला, तर एखादा माणूस पहिल्या २-४ ताटल्या (प्लेट) आवडीने खाईल. नंतरच्या २-४ ताटल्या अल्प आवडीने खाईल. नंतर दिले तर ‘नको’ म्हणेल आणि बळजबरीने खाऊ घातले, तर त्याला त्यापासून दुःख होईल. हीच गत एखादे गाणे पुनःपुन्हा ऐकले किंवा चित्रपट पुनःपुन्हा पाहिला तर होते. एक गोड पदार्थ (उदा. लाडू) खाल्ल्याने सुख मिळते; पण तसे २० पदार्थ खाल्ल्याने पोट दुखू लागते किंवा अतिसार होतो. याचा अर्थ प्रत्येक गोड पदार्थ खाण्यात १/२० भाग दुःख लपलेले असते. म्हणूनच अध्यात्मरामायणात म्हटलेले आहे की, प्रत्येक सुखात दुःख असतेच.
२ आ. सूक्ष्मदेहाने (वासनादेहाने, मनोदेहाने) मिळणारे सुख
एखाद्यावर प्रेम करणे, इत्यादी मनाने मिळणारे सुख हे पंचज्ञानेंद्रियांनी मिळणार्या सुखापेक्षा जास्त प्रतीचे आणि जास्त प्रमाणात असते. तसेच ते जास्त काळ टिकते. पुढे प्रेमपूर्ती झाली की, त्यापासून मिळणारे सुख अल्प होते.
२ इ. कारणदेहाने (बुद्धीने) मिळणारे सुख
एखाद्या विषयाचा अभ्यास करणे, अभ्यास केल्यावर एखादा विषय समजणे, एखादे कठीण गणित सुटणे, संशोधन करून नवीन शोध लावणे, इत्यादींनी मिळणारे सुख हे मनाने मिळणार्या सुखापेक्षा जास्त प्रतीचे आणि जास्त प्रमाणात असते; पण ते सुखही थोडा काळच टिकते.
२ ई. इंद्रियांकडून मिळणार्या सुखाचे प्रमाण
एखाद्याचे एखादे ज्ञानेंद्रिय किंवा कर्मेंद्रिय कार्यरत नसले, तरी त्याने निराश होण्याची आवश्यकता नाही, उदा. एखादा पूर्णपणे बहिरा असला किंवा दोन्ही पायांनी लुळा असला, तरी त्याला इतरांपेक्षा केवळ २ प्रतिशत अल्प सुख मिळेल. असे असले, तरी बरेच जण आपल्या अपंगत्वामुळे न्यूनगंड येऊन जास्त दुःखी होतात.
२ उ. शारीरिक आणि मानसिक सुख
शारीरिक सुखाचा आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. मानसिक सुखाने तसे होत नाही.
२ ऊ. निरनिराळे देह आणि सुखदुःखाची प्रत अन् प्रमाण
स्थूलदेह (पंचज्ञानेंद्रिये), सूक्ष्मदेह (प्राण आणि मन) आणि कारणदेह (बुद्धी) यांद्वारे होणार्या सुखदुःखाची प्रत अन् प्रमाण यांत भेद आहे, उदा. स्थूलदेहाच्या वेदना दुखर्या ठिकाणीच असतात, तर मनोदेहाच्या वेदना सर्वत्र वाटतात. पुढील आकृतीवरून निरनिराळ्या देहांना होणार्या सुखाचे प्रमाण लक्षात येईल.
या लेखाचा दुसरा भाग वाचण्यासाठी ‘सुख (भाग २)’ यावर क्लिक करा !