सनातन-निर्मित शिष्य ग्रंथाचे
प्रकाशन करतांना प.पू. रामानंद महाराज
सनातनचे कार्य म्हणजे प.पू. बाबांचेच (प.पू. भक्तराज महाराज यांचे) कार्य, असे मानून प.पू. रामानंद महाराजांनी या कार्यासाठी भरभरून आशीर्वाद दिले. सनातनच्या आश्रमांना नियमित भेटी देऊन साधकांना मार्गदर्शन करत आणि पुढील साधनेसाठी आशीर्वाद देत. बहुतांश साधकांनी प.पू. बाबांना पाहिले नसल्याने प.पू. दादा आश्रमात आले की, साधकांना प.पू. दादांच्या रूपात प.पू. बाबा भेटल्याचा आनंद मिळायचा ! सनातनचा गुरुपौर्णिमा महोत्सव असो, एखाद्या ग्रंथाचे वा उत्पादनाचे प्रकाशन असो कि सनातन प्रभातच्या नियतकालिकांचे आरंभदिन असो, कार्याला आरंभ व्हायचा, तो प.पू. रामानंद महाराजांच्या साधकांना शुभाशीर्वाद देणार्या संदेशानेच ! इंदूरच्या भक्तवाल्सल्याश्रमात कोणी साधक गेला आणि प.पू. रामजीदादांचा प्रसाद अन् प्रेम घेऊन आला नाही, असे कधीही घडले नाही !
पुष्प मनाचे कर जोडोनिया । अर्पी तव चरणा ॥
प.पू. डॉक्टरांचे आजारपणाने होणारे कष्ट न्यून व्हावेत, यासाठी त्यांनी विविध आध्यात्मिक उपाय केले. सनातनवर बंदीचे संकट फेर धरीत असतांना ते सनातनच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. प.पू. रामानंद महाराज आणि सनातन परिवार यांचे ऋणानुबंध शब्दांत व्यक्त करणे केवळ अशक्य आहे. तथापि रामानंद महाराज आणि सनातन यांचा संबंध असलेल्या लिखित स्वरूपातील काही नोंदींद्वारे हे ऋणानुबंध सांगण्याचा अल्पसा प्रयत्न येथे केला आहे.
सनातनला विविध वेळी दिलेले आशीर्वाद
अ. निष्ठा, त्याग, सेवा आणि सदाचार
यांमुळे सनातन संस्था व्यापक रूप धारण करील !
सनातनचे स्फूर्तीस्थान प.पू. रामानंद
महाराज आणि प.पू. डॉ. जयंत आठवले (उजवीकडे)
सनातन संस्थेची स्थापना श्रीमद् सद्गुरु भक्तराज महाराज यांच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने झाली. त्यांच्या आशीर्वादाने आज छोट्या रोपाचे रूपांतर एका विशाल वटवृक्षाच्या रूपात झालेले दिसते आहे. त्याचे एकच कारण आहे आणि ते म्हणजे साधकांनी सर्वस्वाचा त्याग करून संस्थेचे कार्य निष्ठेने आणि प्रेमाने केले आणि करीत आहेत. सनातन संस्था दिवसेंदिवस व्यापक रूप धारण करील. फक्त निष्ठा, त्याग, सेवा आणि सदाचार या चार गोष्टींमुळेच हे साध्य होणार आहे, अशी माझी खात्री आहे. गुरुचरणी हीच प्रार्थना आणि गुरुपौर्णिमेनिमित्त हाच संदेश ! – प.पू. रामानंद महाराज, इंदूर, मध्यप्रदेश. (सनातनच्या गुरुपौर्णिमा १९९७ च्या महोत्सवासाठी दिलेला संदेश)
आ. दैनिक सनातन प्रभातद्वारे जनतेत
धर्मजागृती होईल आणि वाईट विचारांचा नाश होईल !
हरि ॐ तत्सत् ।
प.पू. रामानंद महाराज यांचा
आशीर्वाद घेतांना प.पू. डॉ. जयंत आठवले
आणि पाठीमागे प.पू. रामानंद महाराजांचे भक्तगण
५.१२.१९९९ या दिवशी दैनिक सनातन प्रभातची सांगली आवृत्ती काढण्याचे नियोजन झालेले ऐकून आनंद वाटला. दैनिक वर्तमानपत्राचे नावच मुळी सनातन प्रभात आहे. प्रभात झाल्यावर रात्रीचा अंधःकार नष्ट होतो, तसेच या दैनिकाद्वारे जनतेत धर्मजागृती होईल आणि वाईट विचारांचा नाश होईल. प.पू. भक्तराज महाराजांचेच हे कार्य चालू आहे, तेव्हा यात यश येईल. हा मार्ग कंटकाकीर्ण आहे; परंतु परमेश्वेराचे अधिष्ठान असल्याने घाबरण्याचे कारण नाही.
सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयांचे ।
परंतु तेथे अधिष्ठान पाहिजे भगवंताचे ॥
असे समर्थांनी लिहून ठेवले आहे. सनातन प्रभातची दिवसेंदिवस प्रगती होवो, हीच गुरुचरणी प्रार्थना.
– रामानंद (रामजीदादा), भक्तवात्सल्याश्रम, राजेंद्रनगर, इंदूर. (२८.११.१९९९) (दैनिक सनातन प्रभातच्या सांगली आणि कोल्हापूर आवृत्तीसाठी दिलेला संदेश)
इ. वेदपाठशाळेचा आरंभ करण्याविषयी दिला आशीर्वाद !
८.१०.२००६ या दिवशी प.पू. रामानंद महाराज यांच्या दर्शनासाठी इंदूरला गेलो होतो. बोलतांना त्यांना म्हटले, वेदपाठशाळा चालू करण्याचा विचार आहे. त्यावर ते म्हणाले, माझ्याही मनात तोच विचार होता. माझा तुम्हाला वेदपाठशाळेसाठी भरपूर आशीर्वाद आहे.
– (प.पू.) डॉ. आठवले