प.पू. रामानंद महाराजांच्या ‘अज्ञातवासा’चा अर्थ !
‘प.पू. रामानंद महाराज कुठे जाणार असले, तर ते सर्वांनाच त्याची पूर्वसूचना देतात; मात्र ऑगस्ट २०१० मध्ये त्यांनी कोणाला त्यांच्या दौर्याचा पत्ता लागू दिला नाही. त्यांनी इंदूर येथील भक्तवात्सल्याश्रमात निरोप ठेवला, ‘मी अज्ञातवासात जात आहे.’त्यांच्याबरोबर असलेल्यांनाही त्यांनी ‘ते कोठे जात आहेत, हे कोणाला सांगायचे नाही’, असे सांगितले होते. दौरा संपून प.पू. महाराज इंदूरला परतल्यावर ९.९.२०१० पासून त्यांची प्रकृती ढासळली. त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. तरीही त्यांनी रुग्णालयात जायला नकार दिला. ‘उपचार आश्रमातच करा’, असे त्यांनी सांगितले. ११.३.२०१४ या दिवशी त्यांनी देहत्याग केला. त्याच्यानंतर आम्हाला उलगडा झाला की, ते ‘अज्ञातवासात जातो’, असे का सांगत होते ?’ – डॉ. आठवले (११.३.२०१४)
प.पू. रामानंद महाराज
प.पू. रामानंद महाराज (परिचय)
शिरोभाग
‘मंगलातझाले मंगल, नाथ गेले सदन सोडून ।’ इंदूर येथील थोर संत प.पू. भक्तराज महाराज यांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज (प.पू. रामजीदादा) यांचे ११.३.२०१४ या दिवशी महानिर्वाण झाले. संत भक्तराज महाराज (प.पू. बाबा) म्हणजे सनातन संस्थेचे श्रद्धास्थान, तर प.पू. रामानंद महाराज (प.पू. रामजीदादा) म्हणजे सनातनचे स्फूर्तीस्थान ! प.पू. बाबांचे भक्त आणि सनातनचे साधक यांना प.पू. दादांनी भरभरून प्रेम दिले. बाबांच्या निर्वाणानंतर प.पू. दादा सर्वांचे पालक झाले ! आज हा आधारवृक्ष हरपला ! त्यांची प्राणज्योत मावळली असली, तरी आत्मज्योत आम्हाला गुरुचरणी नेईलच, याची सर्वांना निश्चिती आहे. त्यांच्या चरणी वाहिलेली ही सुमनाजंली !
संतांविषयी सांगायचे झाले, तर ‘वर्णू किती महती’, असा प्रश्न त्यांच्या भक्तांना पडतोच. एकदा डॉ. (सौ.) मंगला वेरेकर यांनी प.पू. दादांविषयी पुढील ओळी लिहिल्या.
प.पू. रामानंद महाराज गुरु-शिष्य दोन्हींचे प्रतीक ।
सामावून नाही घेऊ शकले माझ्या अपुर्या शब्दांत ।।
१. व्यावहारिक जीवन
प.पू. रामानंद महाराज यांचे व्यावहारिक नाव श्री. रामचंद्र लक्ष्मण निरगुडकर. ते लहानपणापासून स्वभावाने शांत, नम्र, प्रेमळ आणि मितभाषी होते. राष्ट्रप्रेमी असल्यामुळे १९४८ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक होण्यासाठी त्यांनी शासकीय नोकरी सोडली. १९४८ ते १९६४ त्यांनी संघाचे पुष्कळ कार्य केले. त्यांचे बालपणातील सहकारी श्री. बाबा यावलकर यांनी सांगितलेले त्यांच्याविषयीचे काही प्रसंग पुढीलप्रमाणे आहेत.
१ अ. कबड्डीत तरबेज, सर्व जबाबदार्या संभाळून
प्रथम वर्गात उत्तीर्ण होणे आणि खाण्याची अन् दुसर्यांना
खायला घालण्याची आवड, असे होते प.पू. रामानंद महाराजांचे बालपण
‘रामजी (प.पू. रामानंद महाराज) कबड्डी खेळण्यात असा काही तरबेज होता की, तो ज्या गटाकडून (टीमकडून) खेळत असेल, ती जिंकलीच म्हणून समजावे ! १९४८ मध्ये संघशाखांवर बंदी आली, तरीही तिथे कबड्डीचे सामने सुरू असायचे. त्या निमित्ताने एकत्रीकरण चालू राहिले. आमची ‘कृष्णेश्वर टीम’ सगळीकडे जिंकायची. जवळपासच्या गावांमधून आणि शहरातून खेळण्यासाठी आम्ही सायकलने ४०-५० मैलांचे अंतर सहज जात असू.
रामजी मराठी उत्तम शिकवायचा. दहावी, मॅट्रिकचा अभ्यास केला आणि सगळेजण उत्तम रितीने पास झालो; पण रामजी शासकीय छापखान्याची (प्रेसची) नोकरी, शाळा, संघ-शाखा, घरातील कामे, अशा सर्व जबाबदार्या संभाळून प्रथम वर्गात उत्तीर्ण झाला, यासाठी त्याचे विशेष कौतुक झाले.’
१ आ. लहानपणापासूनच संघटन करणारे, इतरांना
साहाय्य करणारे, अतिशय परिश्रमी,बहुमुखी, प्रतिभासंपन्न,
निष्ठावान आणि उत्तम नेतृत्व असणारे प.पू. रामानंद महाराज
‘लहानपणापासून रामजी (प.पू. रामानंद महाराज) अतिशय विनोदप्रिय आणि हजरजबाबी आहे. त्याला पक्वान्न खाण्याची अन् दुसर्यांना खायला घालण्याची आवड आहे. रामजीच्या अंगात संघाचा स्वयंसेवक म्हणून असेल किंवा अंगचा गुण, स्वभाव म्हणा हवे तर, संघटन करण्याची, मदतीचा हात चटकन पुढे करण्याची वृत्ती जोपासली गेली आहे. तो अतिशय परिश्रमी, बहुमुखी, प्रतिभा संपन्न आणि निष्ठावान आहे.
सायकल सहलीची (ट्रिपची) कल्पना पुढे आली. त्यात रामजीने पुढाकार घेतला आणि सगळ्यांना एकत्र आणले. कुणी स्वतःच्या, तर कुणी भाड्याच्या सायकली घेऊन जवळ-जवळ ३५ जणांचा गट धार-मांडवाच्या सहलीला निघाला. कृष्णपुरा चौकातील रामजीच्या घरासमोरील मारुतीच्या देवळात नारळ फोडला. ‘बजरंग बली की जय’च्या जयघोषाने संपूर्ण गल्ली (मोहला) भरून गेली. ‘रामजी की सेना चली’ असे म्हणत आम्ही रामजीबरोबर धार-मांडवाकडे प्रयाण (कूच) केले. वाटेत सायकली पंक्चर झाल्या, कुणी सायकलवरून पडले, तर कोणी किरकोळ जखमीही झाले. अशात धारला पोचेपर्यंत अंधार झाला. मुक्काम आमच्या घरी केला आणि सकाळी उठून पुढे मांडवला गेलो. रामजीने पुढाकार घेऊन ही सहल आखली होती. शेवटपर्यंत त्याने नेतृत्व केले अन् सगळ्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था जातीने बघितली. दुसर्या दिवशी त्याने स्वतः दाल-बाट्या बनवल्या आणि सगळ्यांना यथेच्छ खाऊ घातल्या.
१ इ. संघकार्यात पुढाकार
पुढे संघावरील बंदी उठल्यानंतर प.पू. गुरुजींच्या पोलोग्राऊंडवरील कार्यक्रमाच्या तयारीसाठीही आम्ही सर्व स्वयंसेवक कंबर कसून पुढे झालो. रामजीचा यात मोठा वाटा होता.’ – श्री बाबा यावलकर, गोविंद नगर, जिल्हा होशंगाबाद, (गुरुपूजा, १८.७.२००८)