पूज्यपाद संत श्री आसारामजी बापू यांच्या भक्ताने सनातन संस्था,
हिंदू जनजागृती समिती आणि सनातन प्रभात यांच्याप्रती व्यक्त केलेली पत्ररूपी कृतज्ञता !
निष्काम आणि निर्भिक सनातन संस्था !
मा. संपादक,
नमस्कार ! गेल्या साडेपाच मासांपासून खोट्या आरोपांखाली कारागृहात असलेले आमचे सद्गुरु देव परम पूज्य संत श्री आसारामजी बापू यांना सनातन परिवाराकडून (सनातन संस्था, हिंदू जनजागृती समिती, सनातन प्रभात यांच्याकडून) जे समर्थन लाभत आहे, त्यासाठी बापूजींचे आम्ही सर्व साधक सनातनप्रती कृतज्ञ आहोत. आपले स्वतःचे महत्त्व इतरांपेक्षा अधिक व्हावे; म्हणून इतर संस्था, संप्रदाय, व्यक्ती किंवा संतांना खुले समर्थन न देणार्यांपैकी सनातन नाही. तसेच इतरांना खुश करण्यासाठी किंवा इतरांकडून काहीतरी मिळवण्यासाठी समर्थन देणार्यांपैकीही सनातन नाही, तर केवळ सत्यस्वरूप ईश्वराच्या प्राप्तीची साधना म्हणून सत्यासाठी सत्यासमवेत रहाणारी निष्काम आणि निर्भिड सनातन संस्था आहे.
सनातन संस्था आपलीच वाटते !
मला सनातन संस्थेकडून विदर्भस्तरीय हिंदु अधिवेशानात सहभागी होण्याची आणि आपले विचार मांडण्याची संधी देण्यात आली. तसेच प्रत्येक आंदोलनात समितीकडून योग वेदांत सेवा समितीचे सर्व कार्यकर्ते आणि साधक परिवारासह येण्याविषयीचे आदेश मला प्राप्त होतात. त्या वेळी आपण इतर कुठल्या संस्थेकडून निमंत्रित आहोत, असे कधीच वाटत नाही, तर सनातनच्या प्रत्येक उपक्रमात जातांना असे वाटते की, आपण आपल्याच संस्थेच्या कार्यासाठी जात आहोत. अर्थात सनातनचा प्रत्येक उपक्रम हा धर्मासाठीच असतो. त्यामुळे प्रत्येक आंदोलन, उपक्रम हे प्रत्येक हिंदु धर्माभिमान्याला आपले वाटावे, यात नवल नाही; परंतु सनातन संस्थाही आपलीच संस्था आहे, अशी भावना संस्थेच्या संपर्कात येणार्या प्रत्येक धर्माभिमान्याच्या मनात निर्माण झाल्याविना रहात नाही.
अन्य संस्था आणि संघटना
यांच्या धर्मरक्षणाच्या कार्यातही सहभाग !
सनातन संस्थेचे साधक आणि हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते इतर संस्था-संघटना करत असलेल्या धर्मरक्षणाच्या कार्यातही मनःपूर्वक सहकार्य करतात आणि सहभागी होतात. २९ डिसेंबर या दिवशी अमरावती येथील संत श्री आसारामजी आश्रमात आम्ही संस्कृती रक्षा सभेचे अयोजन केले होते. या कार्यक्रमात महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे जिल्हाप्रमुख आणि एक हिंदुत्ववादी अधिवक्ता यांना वक्ता म्हणून आमंत्रित करायचे होते. त्यांना भेटण्यासाठी मी हिंदू जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांना समवेत येण्याची विनंती केली. तेव्हा त्यांनी ठरलेल्या वेळेत माझ्या समवेत येऊन वक्त्यांना कार्यक्रमाची माहिती दिली. त्याचा सकारात्मक परिणाम झाला.
हिंदू जनजागृती समितीच्या समन्वयकांचे धर्मप्रेम !
हिंदू जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांतजी पिसोळकर यांना त्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले असता त्यांनी समितीच्या दुर्ग येथील सभेसाठी जात असल्यामुळे अकोला येथील श्री. धीरज राऊत यांना पाठवत असल्याचे सांगितले. नंतर कार्यक्रमाच्या दिवशी संस्कृती रक्षा सभा चालू होण्यापूर्वी भ्रमणभाषद्वारे विचारपूस केली आणि शुभेच्छा दिल्या, तसेच कार्यक्रम झाल्यावर दैनिक सनातन प्रभातच्या संगणकीय पत्त्यावर वृत्त पाठवण्यास सांगितले.
बलाढ्य हिंदुत्ववादी संघटनेच्या
जिल्हा प्रमुखांचा संकुचितपणा !
संस्कृती रक्षा सभेसाठी एक बलाढ्य हिंदुत्ववादी संघटनेच्या जिल्हा प्रमुखांना भ्रमणभाषद्वारे संपर्क केल्यावर त्यांनी 'आवाज येत नाही. संपर्कक्षेत्रात आल्यावर संपर्क करतो', असे म्हणून भ्रमणभाष बंद केला. दुसर्या दिवशी मी त्यांना दुसर्या एका क्रमांकावरून संपर्क केला असता आधी आवाज स्पष्ट होता; पण मी 'हरि ॐ' म्हणताच त्यांनी माझा आवाज ओळखून नुसते 'हॅलो हॅलो' उच्चारायला लागले. पुन्हा लगेच भ्रमणभाष लावला, तर कितीतरी वेळापर्यंत त्यांचा भ्रमणभाष व्यस्त असल्याने (मुद्दाम व्यस्त करून ठेवल्याने) संपर्क झाला नाही. ते मुद्दाम टाळाटाळ करत असल्याचे लक्षात आल्याने मग मी त्यांना पुन्हा संपर्क केला नाही. कुठे नुसते सहभागी होणारे नव्हे, तर आयोजनामध्ये धर्मकार्य म्हणून मनःपूर्वक सहकार्य करणारे सनातनचे साधक आणि कुठे धर्म आणि संस्कृतीवरील आपत्काळात एका धर्मकार्यात जाण्यासाठी टाळाटाळ करणारे बलाढ्य हिंदुत्ववादी संघटनेचे बलाढ्य नेते !
व्यापक प्रसार करणारी सनातनची नियतकालिके !
खरोखर आज सनातन परिवार हिंदुत्ववाद्यांसाठी आधारस्तंभ बनला आहे. संस्थेची नियतकालिकही किती उपयोगी पडत आहेत ! याचे एक उदाहरण म्हणजे ११ फेब्रुवारी या दिवशी जम्मूचे माजी मंत्री शबीर खान फरार असल्याविषयीचे वृत्त प्रकाशित झाले होते. ज्यात पूज्यपाद संत श्री आसारामजी बापू कथित फरार झाल्याचे वृत्त दाखवून त्यांची अपकीर्ती करणारी प्रसिद्धीमाध्यमे आता गप्प का आहेत ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. ते वृत्त स्कॅन करून मी माझ्या 'फेसबूक' पानावर ठेवले, तसेच मुख्य आश्रम आणि काही सुप्रचार सेवा समित्यांना ई-मेलद्वारे पाठवले. काही साधकांनी ते वृत्त विशेष संदेश लिहून त्यांच्या खात्यावर टाकले आणि वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रामध्ये सहभागी होणार्या अखिल भारतीय संत सभेचे प्रमुख स्वामी चक्रपाणी महाराजांपर्यंतही पोहोचवले. इतकेच नव्हे, तर त्या साधकांनी ते वृत्त अनेक प्रसारमाध्यमांना ई-मेलद्वारे पाठवून जाबही विचारला.
शेवटी ईश्वरचरणी प्रार्थना करावीशी वाटते की, भगवंता, सनातन संस्था, हिंदू जनजागृती समिती आणि सनातन प्रभात यांच्या माध्यमातून तूच कार्य करत आहेस. तुझ्या या कार्याचा लवकरात लवकर पुष्कळ विस्तार होवो.
'सनातन प्रभात' – धर्मग्रंथ !
गंगाजळ पाणी नाही, ब्रह्मद्रव आहे. तुळस हे रोपटे नाही, तर साक्षात देव आहे आणि गाय ही पशू नसून गोमाता आहे. त्याचप्रमाणे 'सनातन प्रभात' हे वृत्तपत्र नाही तर ६ ते ८ पानी धर्मग्रंथ आहे. हा धर्मग्रंथ सुलभ करून दिल्यासाठी प.पू. डॉ. जयंतजी आठवले आणि भगवंत यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.'
– श्री. मानव बुद्धदेव, प्रसिद्धी आणि जनसंपर्क प्रमुख, योग वेदांत सेवा समिती, अमरावती.