जैनमुनी पू. विनम्रसागरजी महाराज यांची देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमास मंगलभेट !

प.पू. डॉ. आठवले यांनी दिलेले
दायित्व आणि कार्य सनातनच्या साधकांनी
चांगल्या प्रकारे पार पाडल्यास विश्‍वाचे कल्याण होईल !

 पू. विनम्रसागरजी महाराज यांचे <br/> स्वागत करतांना देवद आश्रमातील साधक
पू. विनम्रसागरजी महाराज यांचे स्वागत करतांना देवद आश्रमातील साधक

 

परिचय

जैनमुनी पू. विनम्रसागरजी महाराज यांनी वयाच्या १० व्या वर्षी जैन मुनी आचार्य पूज्य हर्षसागर पुरीश्‍वरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दीक्षा घेतली. वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी सूरत येथे ५० सहस्र भक्तांसमोर मातृवंदनेचा कार्यक्रम घेतला. नुकताच मोर्बा (रायगड) येथील पशुवधगृह बंद करण्याच्या विरोधात त्यांनी अतिशय प्रभावीपणे आंदोलन केले. रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ५० सहस्र ग्रामस्थांचे संघटन करून मोर्चा काढला आणि पशुवधगृह बंद करण्यास शासनास भाग पाडले. जीवदया आणि गोरक्षण यांसाठी ते तरुणांना मार्गदर्शन करून कृतीशील करत आहेत.

 

देवद (पनवेल), १९ फेब्रुवारी (वार्ता.) – सनातनचे साधक करत असलेली साधना अतिशय महान आहे. तुम्ही संपूर्ण समाजाला मुक्तीच्या मार्गावर घेऊन जात आहात. त्यामुळे तुमच्याकडे संपूर्ण समाजाचे दायित्व आहे. तुम्ही साधना करणारे सर्वजण संपूर्ण भारतवासियांचे चालक आहात. तुम्ही चूक केली, तर त्याचा परिणाम संपूर्ण भारतवासियांना भोगावा लागणार आहे. भारतातील ९० ते १०० कोटी हिंदू तुमच्या पाठीशी आहेत. तुम्हाला प.पू. डॉ. आठवले यांनी जी साधना आणि कार्य सांगितले आहे, जे दायित्व दिले आहे, ते त्यांना अपेक्षित असे अधिक चांगले करायचे आहे. ते चांगल्या प्रकारे केल्यास तुमच्यातील सज्जन तत्त्व उदयास येईल, दुष्ट प्रवृत्तींचा नाश होईल आणि विश्‍वाच्या कल्याणाचा मार्ग अजून प्रशस्त होईल !, असे उद्गार जैनमुनी पू. विनम्रसागरजी महाराज यांनी काढले. १८ फेब्रुवारीला येथील सनातन आश्रमात सकाळी ११ वाजता त्यांचे आगमन झाले. या वेळी सत्कारप्रसंगी ते बोलत होते.

 

जैनमुनी पू. विनम्रसागरजी महाराज यांचा सन्मान करतांना <br/> श्री. शिवाजी वटकर आणि पू. महाराजांच्या उजवीकडे पू. विमलसागरजी महाराज
जैनमुनी पू. विनम्रसागरजी महाराज यांचा सन्मान करतांना
श्री. शिवाजी वटकर आणि पू. महाराजांच्या उजवीकडे पू. विमलसागरजी महाराज

पू. विनम्रसागरजी महाराज यांचा सन्मान हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक श्री. शिवाजी वटकर यांनी केला. सन्मानाच्या वेळी त्यांना सनातन-निर्मित ग्रंथ भेट देण्यात आले. या वेळी त्यांच्या समवेत जैनमुनी पू. विमलसागरजी महाराजही उपस्थित होते. सन्मानानंतर त्यांनी उपस्थित साधकांना मार्गदर्शनही केले. सनातनचे प्रवक्ते श्री. आनंद जाखोटिया यांनी पू. विनम्रसागरजी महाराज यांना आश्रमातील विविध विभागांत चालणार्‍या सेवांविषयी माहिती दिली.

दैनिक सनातन प्रभातविषयीचे कार्य सांगतांना डावीकडून श्री. आनंद जाखोटिया,<br/> जैन कार्यकर्ते श्री. संग्राम, जैनमुनी पू. विनम्रसागरजी महाराज आणि जैनमुनी पू. विमलसागरजी महाराज
दैनिक सनातन प्रभातविषयीचे कार्य सांगतांना डावीकडून श्री. आनंद जाखोटिया,
जैन कार्यकर्ते श्री. संग्राम, जैनमुनी पू. विनम्रसागरजी महाराज आणि जैनमुनी पू. विमलसागरजी महाराज

 

१. जैनमुनी पू. विनम्रसागरजी महाराज यांचे मौलिक विचार

१ अ. सनातन आश्रमातील व्यवस्था
प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचायला हवी !

सनातन संस्थेचे कार्य आणि आश्रमातील सर्व व्यवस्था पाहून जैनमुनी पू. विनम्रसागरजी महाराज अतिशय प्रभावित होऊन म्हणाले, कोणाला एम्बीएचा कोर्स करायचा असेल, तर त्याने महाविद्यालय सोडून येथे यायला हवे.

येथील संपूर्ण व्यवस्था चैतन्य, शक्ती आणि ईश्‍वरी अनुसंधानासमवेत अतिशय सुंदररित्या कार्यान्वित केलेली आहे. एका शाळेत ५० मुलांना एकत्रित बसवायचे, तर शक्य होत नाही आणि येथे तर सर्व साधक वेगवेगळ्या ठिकाणाहून येऊन एका कुटुंबाप्रमाणे रहात आहेत, हे अतिशय कौतुकास्पद आहे. तुम्ही जो काही प्रयत्न करत आहात, हे अतिशय प्रशंसनीय आहे. आश्रम हे एक मॉडेल असून ते प्रत्येक घराघरामध्ये कृतीत आणायला हवे.

 

१ आ. सनातनचे साधक साधना करत असल्याने भाग्यवान आहेत !

दुर्योधनासारख्या दृष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तीला वेळीच सुधारले असते, तर महाभारत झाले नसते. यामुळे भारताची मोठ्या प्रमाणात हानी झाली आणि भारत अनेक पटीने मागे पडला. यावरून आपण हे लक्षात घेऊ शकतो की, दुर्जनांचे वेळीच दमन आणि शमन करायला हवे. आजही अनेक दुर्योधन या देशामध्ये जन्मले आहेत. त्यांचा नाश करायला हवा. दुर्जनांच्या दुर्जनतेमुळे जेवढी देशाची हानी झालेली आहे, त्यापेक्षा अधिक हानी सज्जनांच्या शांत बसण्याने आणि त्यांच्या आळसाने झाली आहे. तुम्ही सर्वजण भाग्यवान आहात, तुम्ही आळस सोडून जागृत होत आहात आणि साधना करत आहात !

 

२. प्रत्येक भारतियाने आपल्या देशासाठी काम करायला हवे !
– भारतातील युवकांसाठी पू. विनम्रसागरजी महाराज यांचा संदेश

२ अ. विश्‍वातील सर्वाधिक युवा शक्ती भारतात आहे. भारतातील युवाशक्ती भारतात काम करण्याऐवजी विदेशातील आस्थापनांसाठी काम करत आहे. त्यांना परदेशामध्ये रहाणे अधिक प्रिय असते; पण एक काळ असा होता की, संपूर्ण विश्‍वातील लोक नालंदा, तक्षशीला या विद्यापिठांमध्ये येऊन शिक्षण घेत होते. भारतासाठी काम करून युवकांनीच तो काळ पुन्हा निर्माण करायला हवा.

 

२ आ. भारताकडे काम करणारे कामगार अधिक आहेत, या दृष्टीने संपूर्ण जग भारताकडे पहात आहे. संपूर्ण भारत त्यांना नोकर दिसत आहे. भारतियांची मानसिकता जॉब ओरिएंटेड झाली आहे. प्रत्येक भारतियाने देशासाठी काम करायला हवे. आपण केलेल्या कामाचा लाभ आपल्या नागरिकांना मिळायला हवा. हा संदेश संपूर्ण युवा शक्तीपर्यंत पोहोचायला हवा.

 

३. पू. विनम्रसागरजी महाराज यांनी केलेली मंगल प्रार्थना !

सनातन संस्थेच्या कार्याला माझे मनापासून आशीर्वाद आहेत. तुम्ही सर्वजण अजून तळमळीने साधना करा. एक दिवस नक्की येणार आहे की, आपण पुन्हा पूर्व सांस्कृतिक युगाला आरंभ करणार आहोत. महर्षि आर्यचाणक्यांनी प्रस्थापित केलेली धार्मिक व्यवस्था, सामाजिक व्यवस्था, आध्यात्मिक व्यवस्था आणि आर्थिक व्यवस्था यांना पुन्हा प्राप्त करणार आहोत. हीच भेट संपूर्ण विश्‍वाला आदर्शाच्या रूपात देणार आहोत. यासाठी सर्वांनी सहभागी होऊया, हीच एक मंगल प्रार्थना !

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’

Leave a Comment