गीतेतील शिकवणीच्या संदर्भात श्री. अनंत आठवले यांनी स्वतः केलेले विवेचन खाली दिले आहे. – संकलक
अर्जुनाला गीता लगेच कळली !
आपल्याला गीता अनेकदा वाचूनही कळत नाही. काही काळाने आपण गीतेचा अभ्यास करणे सोडून देतो; मात्र श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता एकदाच सांगितली. त्याला ती कळली आणि त्याने तिच्यातील शिकवणीनुसार आचरण केले. यावरून हे लक्षात येते की, आपण अर्जुनासारखा भाव ठेवला, तरच आपल्याला गीता कळेल. – (प.पू.) डॉ. आठवले
॥ श्रीकृष्णाय नमः ॥
१. तत्त्वज्ञान
नवव्या अध्यायाच्या बाराव्या श्लोकात राक्षसी (तामसी) आणि आसुरी राजसी प्रकृतींचा उल्लेख आहे.
१ अ. दैवी आणि आसुरी संपत्ती असणार्यांची लक्षणे
१ अ १. दैवी संपत्ती
निर्भयता, अंतःकरणाची शुद्धता, तत्त्वज्ञानात दृढ स्थिती, दान, इंद्रियदमन, मनाची सरळता, भगवत्पूजा, अग्निहोत्रादी यज्ञ, शास्त्रांचे अध्ययन, तप, अहिंसा, सत्य, अक्रोध, शांती, परनिंदा न करणे, प्राणीमात्रांवर दया, अनासक्ती, कोमलता, दुष्कृत्यांविषयी लज्जा, अनावश्यक क्रिया न करणे, प्रगल्भता, क्षमा, धैर्य, बाह्याभ्यंतर अंतर्बाह्य शुद्धी, दुसर्याचे अनिष्ट न करणे, आपल्या श्रेष्ठत्वाचा अभिमान नसणे.
१ अ २. आसुरी संपत्ती
पाखंड, गर्व, अभिमान, क्रोध, कठोरता, अविवेक, करण्यायोग्य आणि न करण्यायोग्य कार्य न जाणणे, शुद्धता-सदाचार-सत्याचा अभाव, जग ईश्वरामुळे नाही, तर केवळ स्त्री-पुरुष संयोगाने झाले आहे अन् काम हेच त्याचे कारण आहे, असे मानणे, अज्ञानाने चुकीचे सिद्धांत मानणे, भ्रष्ट आचरण, असंख्य चिंता असणे, कामोपभोग हाच परम पुरुषार्थ मानणे, काम, क्रोध, शेकडो इच्छांच्या पूर्तीसाठी अन्यायाने धन कमावणे, हे मिळवले, हे मिळवीन. हा शत्रू मारला, इतर शत्रूंना मारीन, मी ईश्वर आहे, सिद्ध आहे, बलिष्ठ आहे, सुखी आहे, यज्ञदानादी करीन आणि आनंदी होईन, असे मानणे, भ्रम होणे, गर्व, धन-मानाचा मद, परनिंदा.
१ आ. दैवी संपत्तीने होणारे लाभ आणि आसुरी संपत्तीमुळे होणारी हानी
१. दैवी संपत्तीने मुक्ती, तर आसुरी संपत्तीने बंधन प्राप्त होते.
२. आसुरी संपत्तीवाले नराधम पुनःपुन्हा आसुरी योनीतच जन्मतात आणि पुढे अती नीच गतीला प्राप्त होतात.
काम, क्रोध आणि लोभ ही नरकाची तीन द्वारे आहेत; म्हणून या तिघांचा त्याग करावा. या तिघांपासून मुक्त असलेला मनुष्य आपले कल्याण होईल, असे आचरण करतो.
२. साधना
अ. दैवी गुण अंगी बाणवणे आणि आसुरी गुणांचा त्याग करणे.
आ. काम, क्रोध, तसेच लोभ पूर्णपणे सोडणे.
इ. कोणते कार्य योग्य आणि कोणते अयोग्य, हे शास्त्रांमध्ये सांगितलेले आहे. ते जाणून शास्त्रविहित (शास्त्रात सांगितलेले) योग्य कार्यच करणे.
३. फळ
चित्तशुद्धी होत जाऊन पुढे परम गतीला जातो, मोक्ष प्राप्त करतो. (अध्याय १६, श्लोक २२)
४. अध्यायाचे नाव दैवासुरसंपद्विभागयोग असण्याचे कारण
यामध्ये दोन्ही संपत्तींचे वर्णन आहे. दैवी संपत्ती कल्याण करणारी, तर आसुरी संपत्ती नरकात आणि नीच योनीत नेणारी आहे, हे जाणून आसुरी संपत्तीच्या विभागाचा त्याग करून दैवी संपत्तीचा विभाग अंगिकारल्यावर यथासमय परमात्म्याशी योग (संबंध) स्थापित होतो.
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
– अनंत बाळाजी आठवले, बी.ई. (सिव्हिल), शीव, मुंबई. (१०.१२.२०१३)
संदर्भ : सनातन-निर्मित आगामी ग्रंथ ‘गीताज्ञानदर्शन’