गीतेतील शिकवणीच्या संदर्भात श्री. अनंत आठवले यांनी स्वतः केलेले विवेचन खाली दिले आहे. – संकलक
अर्जुनाला गीता लगेच कळली !
आपल्याला गीता अनेकदा वाचूनही कळत नाही. काही काळाने आपण गीतेचा अभ्यास करणे सोडून देतो; मात्र श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता एकदाच सांगितली. त्याला ती कळली आणि त्याने तिच्यातील शिकवणीनुसार आचरण केले. यावरून हे लक्षात येते की, आपण अर्जुनासारखा भाव ठेवला, तरच आपल्याला गीता कळेल. – (प.पू.) डॉ. आठवले
॥ श्रीकृष्णाय नम: ॥
१. तत्त्वज्ञान
१ अ. प्राण्यांची उत्पत्ती कशी होते ?
‘महत् ब्रह्म’ म्हणजे प्रकृती, म्हणजे त्रिगुणात्मक माया. ही योनी आहे आणि तिच्यात ईश्वर चेतनरूपी बीज स्थापित करतो. त्यापासून (जड-चेतनाच्या संयोगापासून) सर्व प्राण्यांची उत्पत्ती होते.
१ आ. त्रिगुणांची उत्पत्ती आणि कार्य
प्रकृतीपासून सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण उत्पन्न होतात. ते शरीरधारी पुरुष (जीवात्मा) अविकारी असूनही त्याला शरिरात (स्वरूपाच्या भानाच्या अभावी) बांधतात, आसक्त ठेवतात. तो देहात आणि देहामुळे प्राप्त होणार्या भोगांत गुंततो. (अध्याय १४, श्लोक ५)
१ आ १. सत्त्वगुण
हा ज्ञानग्राही आणि उपद्रवरहित आहे. तो विषयसुखाच्या आसक्तीने आणि ज्ञानाच्या आसक्तीने, अभिमानाने जीवात्म्याला बांधतो. सत्त्वगुण जीवात्म्याला सुखात गुंतवतो. तो रज-तम गुणांवर वरचढ होतो. सर्व इंद्रियांमध्ये जेव्हा सजगता (जागरुकता) आणि बोधशक्ती उत्पन्न होतात, तेव्हा समजावे की, सत्त्वगुण वाढला आहे. सत्त्वगुण वाढलेला असतांना मृत्यू झाला, तर मनुष्य वरच्या चांगल्या लोकांत जातो. त्याला सात्त्विक कर्मांचे सात्त्विक फळ (सुख, ज्ञान, वैराग्यादी) मिळते.
१ आ २. रजोगुण
हा अभिलाषा आणि आसक्ती यांतून उत्पन्न होऊन जीवात्म्याला (कामनापूर्तींसाठी) कर्मांच्या आसक्तीने बांधतो आणि कर्मांमध्ये प्रवृत्त करतो. हा सत्त्व-तम गुणांवर वरचढ होतो. रजोगुणामुळे लोभ, सांसारिक प्रयत्न, लालसा आणि मनाची चंचलता वाढते. रजोगुणी मनुष्य मृत्यूनंतर कर्मांमध्ये आसक्त असलेल्या मनुष्यांमध्ये जन्मतो. रजोगुणाचे फळ आहे दुःख !
१ आ ३. तमोगुण
मोहित करणारा तमोगुण अज्ञानामुळे उत्पन्न होतो. तो प्रमादाला (कर्तव्यकर्म न करणे आणि निरर्थक कर्मे करणे यांत प्रवृत्त करतो. तो सत्त्व-रज गुणांना दाबतो. तमोगुण वाढला असता अविवेक, कर्तव्यांची टाळाटाळ, प्रमाद, निद्रा इत्यादी मोहिनी वृत्ती उत्पन्न होतात. मृत्यूनंतर तमोगुणी मनुष्याचा कीटक, पशू इत्यादी मूढ योनीत जन्म होतो.
१ इ. गुण कर्मांचा कर्ता असणे आणि जीवात्मा गुणातीत असणे
सर्व कर्मांचे कर्ते गुण आहेत आणि आपण, म्हणजे जीवात्मा गुणातीत आहे. (अध्याय १४, श्लोक २०)
२. साधना
२ अ. त्रिगुणांपासून मनाने अलिप्त होणे
त्रिगुणमयी प्रकृतीच्या गुणांमुळे अंतःकरणासह इंद्रिये आपापल्या विषयांमध्ये रत आहेत. ते गुणच कर्ता असून आपण जीवात्मा कर्ता नाही, तर गुणांच्या पलीकडे आहोत, हे जाणणे आणि त्रिगुणांपासून मनाने अलिप्त होणे.
२ आ. त्रिगुणांविषयी उदासीन रहाणे
प्रकाश (ज्ञान, सत्त्वगुण), कर्मप्रवृत्ती (रजोगुण) आणि मोह (तमोगुण), हे तीन गुण प्रवृत्त झाले, तरी वाईट न मानणे आणि निवृत्त झाले, तरी त्यांची आकांक्षाही न करणे, तर उदासीन रहाणे.
२ इ. समभाव ठेवणे
मान-अपमान, प्रिय-अप्रिय, सुख-दुःख, शत्रू-मित्र इत्यादी द्वंद्वांमध्ये सम रहाणे.
२ ई. कर्मफळांचा त्याग करणे
सर्व शारीरिक आणि मानसिक कर्मांचा, म्हणजे त्यांच्या फळांचा मनाने त्याग करणे. यामुळे त्रिगुणांना पार करता येते.
२ उ. श्रद्धेने भक्ती करणे
श्रीकृष्णांची अनन्यतेने, श्रद्धेने भक्ती करणे यामुळे त्रिगुणांचे उल्लंघन करून ब्रह्मप्राप्तीची योग्यता येते. (अध्याय १४, श्लोमक २६)
३. फळ
त्रिगुणातीत भक्त मोक्षप्राप्तीसाठी योग्य होतो. (अध्याय १४, श्लोक २० आणि २६)
४. अध्यायाचे नाव गुणत्रयविभागयोग असण्याचे कारण
तीन गुणांचे वर्णन करून त्रिगुणांच्या पलीकडे गेल्यावर परमात्म्याशी योग होतो, असे सांगितले आहे; म्हणून अध्यायाचे नाव गुणत्रयविभागयोग आहे.
विवेचन
मनुष्य स्वतःच गुणांमध्ये गुंतणे
वस्तुतः गुण मनुष्याला बांधत नाहीत, तर मनुष्यच ज्ञान झाल्याचा आनंद (सत्त्व), कर्मे करून मिळणारे सुखोपभोग (रज) आणि आळस, झोप (तम) यांसारखे सुख मिळवण्यासाठी स्वतःच गुणांमध्ये गुंततो.
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
– अनंत बाळाजी आठवले, बी. ई. (सिव्हिल), शीव, मुंबई. (१६.१२.२०१३)