गीतेतील शिकवणीच्या संदर्भात श्री. अनंत आठवले यांनी स्वतः केलेले विवेचन खाली दिले आहे. या लेखमालिकेत काही ठिकाणी परिशिष्ट पहा असे म्हटले आहे. परिशिष्ट गीताज्ञानदर्शन या ग्रंथात दिले आहे. त्यावरून वाचकांना विषय अधिक सुस्पष्ट होईल. – संकलक
अर्जुनाला गीता लगेच कळली !
आपल्याला गीता अनेकदा वाचूनही कळत नाही. काही काळाने आपण गीतेचा अभ्यास करणे सोडून देतो; मात्र श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता एकदाच सांगितली. त्याला ती कळली आणि त्याने तिच्यातील शिकवणीनुसार आचरण केले. यावरून हे लक्षात येते की, आपण अर्जुनासारखा भाव ठेवला, तरच आपल्याला गीता कळेल. – (प.पू.) डॉ. आठवले
॥ श्रीकृष्णाय नमः ॥
१. तत्त्वज्ञान
१ अ. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ
शरीर क्षेत्र आहे आणि त्याला जाणणारा जीवात्मा क्षेत्रज्ञ आहे. सर्व क्षेत्रांमधला क्षेत्रज्ञ, म्हणजे सर्व प्राणीमात्रांमधील जीवात्मा हा ईश्वरच (ईश्वराचा अंश) आहे.
१ आ. क्षेत्र
पंचमहाभूते (पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश), अहंकार, बुद्धी, अव्यक्त (मूळ प्रकृती, त्रिगुणमयी माया), ५ ज्ञानेंद्रिये, ५ कर्मेंद्रिये, मन आणि ज्ञानेंद्रियांचे ५ विषय (एकूण २४ तत्त्वे) हे क्षेत्र आहे. ज्ञानेंद्रियांचे ५ विषय म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. यांना पंचतन्मात्राही म्हणतात.
१ इ. क्षेत्राचे विकार
इच्छा, द्वेष, सुख, दुःख, शरीर आणि इंद्रियांचा संघात (पिंड), चेतना, धृती (भगवंताविषयीची (सात्त्विक) धारणा; धर्म, अर्थ आणि काम यांची (राजसिक) धारणा, निद्रा, भय, शोक, उन्मत्तता इत्यादींची (तामसिक) धारणा), हे विकार आहेत.
१ ई. ज्ञान (ज्ञानप्राप्तीसाठी आवश्यक गुण)
मोठेपणाच्या अभिमानाचा अभाव; दंभाचरणाचा अभाव; अहिंसा; क्षमाशीलता; सरळपणा (कुटिलतेचा अभाव); गुरूंची सेवा; अंतर्बाह्य शुद्धी; मनाची अचंचलता; इंद्रियांच्या विषयांमध्ये वैराग्य (आसक्तीचा अभाव); क्षेत्रामधील मृत्यू, वृद्धत्व, रोग इत्यादी दोषांचे सदैव भान असणे; पुत्र, पत्नी, घर यांमध्ये आसक्ती नसणे; प्रिय-अप्रिय यांच्या प्राप्तीमध्ये समचित्तत्व; ईश्वराची अविचल भक्ती; पवित्र स्थानी एकांतवास; जनसमुदायात अरुची; नित्य अध्यात्मज्ञानात स्थित रहाणे आणि तत्त्वज्ञानाच्या अर्थाकडे, म्हणजे ईश्वराकडे लक्ष असणे, हे ज्ञानप्राप्तीसाठी आवश्यक गुण आहेत.
१ उ. ज्ञेय परम ब्रह्म जाणल्याने अमरत्व प्राप्त होणे
अनादी परम ब्रह्म ज्ञेय (जाणण्याजोगे) आहे. त्याला जाणून (आणि त्याच्याशी तद्रूप होऊन) अमरत्व प्राप्त होते (कारण ब्रह्म जन्म-मरणरहित आहे). त्याने सर्व (विश्व ) व्यापलेले आहे. विभागलेले नसूनही ब्रह्म प्राणीमात्रांमध्ये वेगवेगळे प्रतीत होते. ते लय आणि उत्पत्ती यांचे कारण आहे. ब्रह्म बोधस्वरूप, जाणण्यायोग्य आणि तत्त्वज्ञानाने जाणले जाणारे आहे. (अध्याय १३, श्लोक १७)
१ ऊ. प्रकृती आणि पुरुष
प्रकृती आणि पुरुष दोन्ही अनादी आहेत. गुण आणि विकार प्रकृतीपासून उत्पन्न होतात, तसेच कार्य आणि करणही (कार्याचे साधनही) (पहा : परिशिष्ट क्रमांक १, सूत्र १०) प्रकृतीपासून उत्पन्न होतात. पुरुष, म्हणजे जीवात्मा सुख-दुःखाचा भोग घेण्याचे कारण आहे. पुरुष प्रकृतीत राहून प्रकृतीमुळे उत्पन्न झालेले गुण भोगतो. गुणांच्या संगामुळे चांगल्या-वाईट योनींमध्ये जन्म होत रहातो. पुरुष देहात राहून पहाणारा, जाणणारा, संमती देणारा, धारण करणारा आणि जीवरूपाने भोक्ता आहे.
१ ए. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ संयोगाने उत्पत्ती होणे
जे काही स्थावर-जंगम उत्पन्न होते, ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगाने होते.
२. साधना
२ अ. क्षेत्रामध्ये न गुंतणे
याचा अर्थ आहे, ज्ञानप्राप्तीसाठी वर सांगितलेले गुण अंगी बाणवून क्षेत्रामध्ये न गुंतता वर सांगितलेले ज्ञेय जाणणे
२ आ. प्रकृतीच्या पदार्थांचा त्याग करणे
सर्व विकार हे प्रकृतीचे कार्य असून ते नाशवान, जड आणि अनित्य आहेत अन् जीवात्मा पुरुष नित्य, चेतन, निर्विकार, अविनाशी, बोधस्वरूप परमात्म्याचा अंश आहे. हे जाणून प्रकृतीच्या पदार्थांचा (मनाने) त्याग करून परमपुरुष परमात्म्यात एकीभावाने रहाणे (अध्याय १३, श्लोक २२ आणि २३)
२ इ. आपल्या आत्म्यातच परमात्म्याचा अनुभव करणे
कोणी ध्यानयोगाने, कोणी सांख्ययोगाने, तर कोणी कर्मयोगाने आपल्या आत्म्यातच परमात्म्याचा अनुभव करतात. काही जण दुसर्यांकडून ऐकून, जाणून घेऊन उपासना (श्रद्धेसहित साधना) करतात, तेही जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून सुटतात. (अध्याय १३, श्लोक २५)
२ ई. आत्म्याला जाणणे
वेगवेगळ्या प्राणीमात्रांमध्ये एकच आत्मा स्थित आहे आणि सर्व प्रपंचविस्तार त्या आत्म्यापासूनच झाला आहे, हे स्पष्टपणे पहाणे, म्हणजे जाणणे (अध्याय १३, श्लोचक ३०)
३. फळ
अ. क्षेत्र, ज्ञान आणि ज्ञेय जाणून क्षेत्रज्ञाची कास धरल्याने भगवत्प्राप्ती होते. (अध्याय १३, श्लोक १८)
आ. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांमधील अंतर, तसेच विकारांसहित भूतांच्या (प्राणिमात्रांच्या) प्रकृतीपासून सुटण्याचे उपाय (मनाने यांना महत्त्व न देणे आणि त्यांच्यात आसक्ती न ठेवणे) जे जाणतात, ते ब्रह्माला प्राप्त होतात. (अध्याय १३, श्लोक ३४)
४. अध्यायाचे नाव क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग असण्याचे कारण
या अध्यायात क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ कसे वेगवेगळे आहेत, ते सांगितले आहे. याच्या प्रत्यक्ष अनुभवाने क्षेत्रज्ञाचा, म्हणजे जीवात्म्याचा परमात्म्याशी असलेल्या नित्य योगाचा अनुभव येतो; म्हणून अध्यायाचे नाव क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग आहे.
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
– अनंत बाळाजी आठवले, बी.ई. (सिव्हिल), शीव, मुंबई. (१०.१२.२०१३)