अर्जुनाला गीता लगेच कळली !
आपल्याला गीता अनेकदा वाचूनही कळत नाही. काही काळाने आपण गीतेचा अभ्यास करणे सोडून देतो; मात्र श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता एकदाच सांगितली. त्याला ती कळली आणि त्याने तिच्यातील शिकवणीनुसार आचरण केले. यावरून हे लक्षात येते की, आपण अर्जुनासारखा भाव ठेवला, तरच आपल्याला गीता कळेल. – (प.पू.) डॉ. आठवले
गीतेतील शिकवणीच्या संदर्भात श्री. अनंत आठवले यांनी स्वतः केलेले विवेचन येथे दिले आहे. या लेखमालिकेत काही ठिकाणी परिशिष्ट पहा असे म्हटले आहे. परिशिष्ट गीताज्ञानदर्शन या ग्रंथात दिले आहे. त्यावरून वाचकांना विषय अधिक सुस्पष्ट होईल. – संकलक
॥ श्रीकृष्णाय नमः ॥
१. तत्त्वज्ञान
१ अ. सर्वांच्या उत्पत्तीचे मूळ कारण
ईश्वर अनादि आहे. तो सर्व देवता आणि महर्षी यांच्या उत्पत्तीचे मूळ कारण आहे.
१ आ. सर्व भावांची उत्पत्ती
बुद्धी, ज्ञान, क्षमा, सत्य, सुख, दुःख, अहिंसा, संतोष, समता इत्यादी सर्व भाव ईश्वरापासूनच उत्पन्न होतात.
१ इ. प्रजोत्पत्ती
चार सनकादी कुमार (सनक, सनातन, सनंदन आणि सनत्कुमार), सात महर्षी (भृगु, मरीचि, अत्रि, पुलस्त्य, पुलह, क्रतु आणि वसिष्ठ) आणि चौदा मनु ही ईश्वराची मानस उत्पत्ती आहे. म्हणजे ते ईश्वराने संकल्पाने उत्पन्न केलेले आहेत आणि त्यांच्यापासून पुढे विश्वातील सर्व प्रजा झाली आहे.
२. अर्जुनाने श्रीकृष्णांना सर्व विभूतींविषयी आणि कोणत्या भावामध्ये त्यांचे चिंतन करावे
असे विचारणे, त्यावर त्यांच्या अनंत विभूतींमधील भगवंतांनी कथन केलेल्या मुख्य विभूती
अर्जुन ईश्वराला म्हणाला, तुमच्या सर्व विभूती सांगा आणि कोणत्या भावामध्ये, म्हणजे उत्पत्तीमध्ये तुमचे चिंतन करावे, तेही सांगा. श्रीकृष्ण सांगतात, माझ्या विभूती अनंत आहेत; पण मुख्य विभूती पुढीलप्रमाणे आहेत.
सर्व प्राणीमात्रांच्या अंतःकरणात असणारा सर्वांचा आत्मा मी आहे आणि या भावाने माझे चिंतन, ध्यान करावे; पण ज्यांना हे जमणार नाही, ते पुढील भावांमध्ये चिंतन करू शकतात. आदित्यांमध्ये विष्णु, ज्योतींमध्ये सूर्य, नक्षत्रांमध्ये चंद्र, वेदांमध्ये सामवेद, देवांमध्ये इंद्र, सर्व प्राण्यांमधील चेतना (बुद्धी, ज्ञानशक्ती), रुद्रांमध्ये शंकर, यक्ष आणि राक्षस यांमध्ये कुबेर, अष्टवसूंमध्ये अग्नी, पर्वतांमध्ये मेरू, यज्ञांमध्ये जपयज्ञ, अचलांमध्ये हिमालय, हत्तींमध्ये ऐरावत, मनुष्यांमध्ये राजा, गायींमध्ये कामधेनु, सापांमध्ये वासुकी, नागांमध्ये अनंत, दैत्यांमध्ये प्रल्हाद, पक्ष्यांमध्ये गरुड, जलचरांमध्ये मगर, नद्यांमध्ये गंगा, शास्त्रार्थ करणार्यांचा वाद (परिशिष्ट क्र. १, सूत्र ९), अक्षरांमध्ये अकार, सर्वनाश करणारा मृत्यू, मासांमध्ये मार्गशीर्ष, ऋतूंमध्ये वसंत, छलकपटांमध्ये द्यूत, तेजस्वींचे तेज, विजय, सत्त्वगुण इत्यादी.
प्रत्येक गटामध्ये जे जे विभूतीयुक्त कांतीमान, शक्तीयुक्त आहे, ते मज, श्रीकृष्णाच्या अंशापासूनच उत्पन्न झाले आहे. इतकेच काय, तर श्रीकृष्णरूपी ईश्वर या सर्व जगताला एका अंशाने धारण करून राहिले आहेत.
३. साधना
अ. ईश्वर सर्व जगताच्या उत्पत्तीचे कारण आहे, हे जाणून ईश्वराची भक्ती करणे.
आ. ईश्वरातच मन आणि प्राण लावून एकमेकांना ईश्वराच्या वर सांगितलेल्या रूपांचे ज्ञान देणे, ईश्वराचे गुण आदी सांगून आनंद घेणे.
इ. सर्व वस्तू आणि प्राणी यांसह सर्व जग ईश्वराचाच अंश आहे, हे जाणून मनाने कशाचाही अन् कुणाचाही अनादर न करणे.
४. फळ
४ अ. ईश्वरी तत्त्वाचे यथार्थ ज्ञान मिळणे
प्रेमाने सतत (निष्कामपणे) भजणार्या भक्तांना श्रीकृष्ण बुद्धीयोग, म्हणजे ईश्वरी तत्त्वाचे यथार्थ ज्ञान देतात आणि त्यामुळे भक्त ईश्वराला प्राप्त होतात; म्हणजे पूर्णज्ञानरूपी बुद्धीयोगाने आत्मरूपी परमेश्वराला आत्मरूपाने जाणतात. (अध्याय १०, श्लोक १०)
४ आ. अंतःकरणातील चुकीचे समज नष्ट करणे
आत्म्याचा भाव म्हणजे अंतःकरण. त्यात स्थित ईश्वर अविवेकाने होणार्या चुकीच्या समजांना विवेक आणि बुद्धीने नष्ट करतो. (अध्याय १०, श्लोक ११)
५. अध्यायाचे नाव विभूतीयोग असण्याचे कारण
जेथे जेथे जी काही विशेषता दिसून येते, ती भगवंताची विभूती (प्रत्येक वर्गातील सर्वोत्कृष्ट) आहे. इतकेच काय, तर सर्व जगच ईश्वराच्या एका अंशाने स्थित आहे, ही भावना दृढ झाली की, ईश्वराशी योगाचा, म्हणजे संबंधाचा अनुभव येतो; म्हणून या अध्यायाचे नाव विभूतीयोग आहे.
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
– अनंत बाळाजी आठवले, बी.ई. (सिव्हिल), शीव, मुंबई. (१०.१२.२०१३)
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘गीताज्ञानदर्शन’