गीतेतील शिकवणीच्या संदर्भात श्री. अनंत आठवले यांनी स्वतः केलेले विवेचन येथे दिले आहे. – संकलक
अर्जुनाला गीता लगेच कळली !
आपल्याला गीता अनेकदा वाचूनही कळत नाही. काही काळाने आपण गीतेचा अभ्यास करणे सोडून देतो; मात्र श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता एकदाच सांगितली. त्याला ती कळली आणि त्याने तिच्यातील शिकवणीनुसार आचरण केले. यावरून हे लक्षात येते की, आपण अर्जुनासारखा भाव ठेवला, तरच आपल्याला गीता कळेल. – (प.पू.) डॉ. आठवले
॥ श्रीकृष्णाय नमः ॥
१. तत्त्वज्ञान
१ अ. ब्रह्म
ब्रह्म अक्षर, म्हणजे क्षरण (हळूहळू नाश) न होणारे (नाश न पावणारे) आहे. जे अविकारी, अविनाशी आहे, ते ब्रह्म आहे.
१ आ. अध्यात्म म्हणजे काय ?
अध्यात्म म्हणजे स्वभाव. शरिराला आश्रय बनवून अंतरात्मभावाने त्यात रहाणारा. वस्तुतः जो ब्रह्मच आहे, तो जीवात्मा ब्रह्माप्रमाणे शाश्वत आहे. त्याचे असणे हेच अध्यात्म. प्रत्येक शरिरात ब्रह्माचा जो अंतरात्मभाव आहे, त्याला स्वभाव म्हणतात. त्या स्वभावालाच अध्यात्म म्हणतात.
१ इ. विसर्ग म्हणजे त्याग आणि त्याग म्हणजे कर्म
भुतांची (प्राणीमात्रांची) सत्ता म्हणजे अस्तित्व, याला भूतभाव म्हणतात. त्या भूतभावाचा उद्भव करणारा विसर्ग (त्याग) म्हणजे कर्म. यज्ञ, दान इत्यादी शास्त्रविहित कर्मांत द्रव्य इत्यादींचे जे त्यागरूपी कर्म होते, त्याला विसर्ग म्हणतात. सत्कर्मासाठी द्रव्य, वस्तू इत्यादींचा त्याग करणे, या त्यागरूपी यज्ञाला कर्म म्हणतात. देवतांसाठी चरु (शिजवलेला भात), पुरोडाश (हविर्द्रव्य) इत्यादींचा त्याग करणे, या बीजरूपी यज्ञापासूनच वृष्टी (पाऊस) इत्यादी क्रमाने स्थावर, जंगम आणि समस्त प्राणी उत्पन्न होतात.
२. अधिभूत
अधिभूत म्हणजे उत्पत्ती आणि विनाश होणारे सर्व पदार्थ नाम आणि रूप धारण करणारे प्रत्येक पदार्थाचे शरीर.
३. अधिदैव
अधिदैव म्हणजे पुरुष सर्व प्राण्यांच्या इंद्रियादी करणांचा अनुग्राहक (म्हणजे इंद्रियादी करणांपासून मिळणार्या भोगांचा समष्टी ज्ञाता) ब्रह्मदेव. अध्याय १३ मधील श्लोक २० मध्ये स्पष्ट केले आहे की, पुरुष सुख-दुःखांचा भोग घेणारा आहे.
४. अधियज्ञ
या देहात जो यज्ञ आहे, तो विष्णु हा अधियज्ञ होय. अध्याय ४ मध्ये सांगितलेले वेगवेगळे यज्ञ शरिरानेच संपन्न होतात; म्हणून यज्ञाचा शरिराशी नित्य संबंध आहे. देहातील जाणीवशक्ती आणि चैतन्यरूपी ईश्वर हा अधियज्ञ आहे.
५. सदासर्वकाळ भगवंताचे स्मरण करण्याचे महत्त्व !
मरणसमयी जो भाव (देवताविशेष) मनात असतो, त्या भावालाच मनुष्य प्राप्त होईल; पण केवळ अंतकाळी तसा भाव होणे कठीण आहे; कारण ऐन वेळी इष्टदेवतेचे स्मरण होणार नाही; म्हणून आधीही दीर्घकाळ त्या भावाशी तल्लीनता असावी लागते; म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की, ‘सदासर्वकाळ माझे स्मरण ठेवलेस, तर अंतकाळीही माझे स्मरण राहून मला प्राप्त होशील’.
विवेचन
अंतकाळी कोणत्याही रूपाचे स्मरण केले, तरी तो त्याच भावाला प्राप्त होईल. जे असेल, ते भगवंताचेच रूप असते; परंतु गुणांशी संबंध ठेवणारे गुणांना सन्मुख होतात, म्हणजे गुणांचे जे कार्य जन्ममरण, त्याला प्राप्त होतात. निर्गुण, निष्काम, अव्यक्त ईश्वराचे, श्रीकृष्णाचे स्मरण ठेवणारे जन्ममरणाच्या फेर्यातून मुक्त होतात.
६. ईश्वराचे स्थान आणि त्यासाठी आवश्यक असणारी अनन्यभक्ती
ब्रह्मदेवाचा एक दिवस एक सहस्र चतुर्युगांचा (मनुष्याची ४३२ कोटी वर्षे) असतो. तितक्याच समयावधीची एक रात्र असते. ब्रह्मदेवाचा दिवस चालू झाला की, अव्यक्तातून सर्व प्राणी उत्पन्न होतात आणि रात्र झाली की, त्यांचा अव्यक्तात विलय होतो. असे पुनःपुन्हा होत रहाते. या अव्यक्ताच्या पलीकडची सनातन, अव्यक्त आणि अक्षर अशी परम गती हे ईश्वराचे स्थान आहे अन् ते अनन्य भक्तीने प्राप्त होते.
७. मृत्यूच्या वेळच्या स्थितीनुसार जिवांची पुढील गती
अ. ज्योतिर्मय अग्नी, दिवस, शुक्लपक्ष आणि उत्तरायणाचे सहा मास अशा समयात मृत झालेले, तसेच ब्रह्माचे परोक्ष ज्ञान असलेले (म्हणजे प्रत्यक्ष अनुभव न झालेले) लोक क्रमाक्रमाने ब्रह्म प्राप्त करतात. (त्या त्या काळाच्या अधिष्ठात्री देवता क्रमाक्रमाने वरवरच्या लोकांत घेऊन जातात.)
आ. धूम, रात्र, कृष्णपक्ष आणि दक्षिणायनामध्ये (दक्षिणायनाच्या सहा मासांमध्ये) मृत्यू पावलेले मनुष्य चंद्रमाच्या ज्योतीला प्राप्त होऊन (शुभकर्मांचे भोग भोगून संपल्यावर) पुन्हा जन्म घेतात.
८. साधना
८ अ. ईश्वराचे सर्वकाळ स्मरण करणे
जो सदा तद्भावभावित रहातो, त्यालाच अंतकाळीही भगवंताचे स्मरण राहील. त्यासाठी मनावर नियंत्रण ठेवून ईश्वराचे नित्य स्मरण ठेवण्याची सतत पुनरावृत्ती करावी लागते.
८ आ. मरणसमयी सुषुम्ना नाडीद्वारे करायचा धारणायोग !
मरणसमयी भृकुटीमध्यात प्राण केंद्रित करणे हा सुषुम्ना नाडीद्वारे धारणायोग आहे. याचा अर्थ आहे, सर्व इंद्रियांचा निग्रह करून, मनाचे चंचलत्व थांबवून, प्राणांना भृकुटीमध्यात केंद्रित करून ॐचा उच्चार करत आणि त्याच्या अर्थरूप ईश्वराचे स्मरण करत प्राण सोडणे. अशा वेळी यज्ञाचा अग्नी, दिवस, शुक्ल पक्ष, उत्तरायण यांच्या देवता क्रमोमुक्तीमार्गाने नेतात.
क्रममुक्तीचे विवेचन
ज्यांचा उद्देश परमात्माप्राप्तीचा आहे आणि त्यासाठी ज्यांनी साधना केली आहे; पण सुखोपभोगाची सूक्ष्म वासना नाहीशी झालेली नाही, ते हे शरीर सुटल्यावर क्रमाक्रमाने वरच्या लोकांतील भोग भोगत ब्रह्मलोकात (सत्यलोकात) जातात. त्यांच्यात नवीन वासना निर्माण होत नाहीत. भोग भोगून आधीच्या वासना समाप्त होतात आणि पुढे ते मुक्त होतात.
९. फळ
क्रमाक्रमाने उन्नती होत मुक्ती मिळते.
१०. अध्यायाचे नाव अक्षरब्रह्मयोग असण्याचे कारण
अध्यात्म, अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ ही सर्व भगवंताचीच स्वरूपे आहेत. कोणत्याही स्वरूपाचे चिंतन केले, तरी न्यूनाधिक समयाने मुक्ती मिळणारच; पण निर्गुण, निराकार अक्षरब्रह्माचे चिंतन करून त्याच्याशी योग (एकात्मता) साधल्याने मुक्ती लवकर मिळते; म्हणून या अध्यायाचे नाव अक्षरब्रह्मयोग आहे.
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
– अनंत बाळाजी आठवले, बी.ई. (सिव्हिल), शीव, मुंबई. (१०.१२.२०१३)
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘गीताज्ञानदर्शन’