गीतेतील शिकवणीच्या संदर्भात श्री. अनंत आठवले यांनी स्वतः केलेले विवेचन खाली दिले आहे. – संकलक
अर्जुनाला गीता लगेच कळली !
आपल्याला गीता अनेकदा वाचूनही कळत नाही. काही काळाने आपण गीतेचा अभ्यास करणे सोडून देतो; मात्र श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता एकदाच सांगितली. त्याला ती कळली आणि त्याने तिच्यातील शिकवणीनुसार आचरण केले. यावरून हे लक्षात येते की, आपण अर्जुनासारखा भाव ठेवला, तरच आपल्याला गीता कळेल. – (प.पू.) डॉ. आठवले
॥ श्रीकृष्णाय नम: ॥
१. तत्त्वज्ञान
१ अ. जीवात्मा कर्ता नसून अंती सर्व भोग दुःखदायक असणे
मनुष्य म्हणजे जीवात्मा काहीही करत नसतो. तो कर्ता नसतो, तर केवळ इंद्रिये त्यांच्या विषयांच्या ठायी वहिवाट करतात, म्हणजे त्यांच्या विषयांचे भोग घेतात. इंद्रिये विषयांचे भोग घेतात. सर्व भोग परिणामी दुःखदायक असतात. त्यांचा आरंभ होतो आणि अंतही होतो. ते भोग सदैव आपल्यासमवेत रहात नाहीत.
१ आ. आसक्तीरहित कर्म
१ आ १. आत्मशुद्धीसाठी कर्म
कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि ।
योगिनः कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये ॥ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ५, श्लोक ११
अर्थ : योगी केवळ अंतःकरणाच्या शुद्धीसाठी आसक्ती सोडून इंद्रिये, शरीर, मन आणि बुद्धी यांच्याद्वारे कर्म करतात.
स्पष्टीकरण : कायिक, मानसिक आणि बौद्धिक कर्मे आसक्ती सोडून केल्याने आत्मशुद्धी होते म्हणजे स्वभावातील दोष जातात.
१ आ २. कर्मयोगाने ब्रह्मप्राप्ती लवकर होणे
सांख्य (संन्यास) आणि योग (कर्मयोग) हे वेगळे नाहीत. कुठल्याही एकाच्या आश्रयाने दोन्हींचे फळ मिळते; पण संन्यास घेणे अवघड आहे, तर कर्मयोगाने ब्रह्मप्राप्तीला अधिक वेळ लागत नाही.
१ आ ३. ईश्वर लोकांचे कर्तृत्व आणि कर्मे ठरवत नसणे
ईश्वर लोकांचे कर्तृत्व आणि कर्मे ठरवत नाही अन् पाप-पुण्यही घेत नाही; पण लोकांना तसे वाटते; कारण त्यांचे ज्ञान अज्ञानाने झाकले गेलेले असते. (अध्याय ५, श्लोक १५)
१ आ ४. सम बुद्धीने रहाणे
आवडती गोष्ट मिळाली, तर हर्षभरित होऊ नये आणि नावडती गोष्ट प्राप्त झाली, तरी उद्वीग्न होऊ नये.
२. स्वत:ला कर्मांचा कर्ता न मानणे
२ अ. सर्व कर्मांचे कर्तेपण आपले नाही, असे मानणे, हा कर्मसंन्यासयोग !
कर्मसंन्यासयोगाची साधना ही आहे की, पहाणे, ऐकणे, स्पर्श करणे, वास घेणे, खाणे, जाणे, झोपणे, बोलणे, देणे, घेणे, अगदी डोळ्यांची उघडझाप करणे इत्यादी सर्व कर्मे करतांना ती मी करत नसून इंद्रिये त्यांच्या विषयांत रममाण आहेत, असे मानणे. सर्व कर्मांचे कर्तेपण आपले नाही, असे मानणे. यामुळे पुढील लाभ होतात.
२ आ. लाभ
२ आ १. अलिप्तता येणे
इंद्रियांनी घडलेल्या कर्मांच्या फळांपासून साधक पद्मपत्राप्रमाणे (कमळाच्या पानाप्रमाणे) अलिप्त राहील.
२ आ २. आत्मशुद्धी होणे
कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि ।
योगिनः कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये ॥ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ५, श्लोक ११
अर्थ : कर्मयोगी केवळ अंतःकरणाच्या शुद्धीसाठी आसक्ती सोडून इंद्रिये, मन, बुद्धी आणि शरीर यांच्याद्वारे कर्म करतात.
२ आ ३. अढळ शांती मिळणे
युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् ।
अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते ॥ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ५, श्लोक १२
अर्थ : निष्ठेने भक्ती करणारा आपल्या सर्व कर्मांच्या फळांचा त्याग करून ज्ञाननिष्ठेने मिळणारी परम शांती प्राप्त करतो; परंतु कामना असलेला पुरुष कामनांच्या प्रेरणेमुळे फळात आसक्त होऊन बद्ध होतो.
स्पष्टीकरण : अशा प्रकारे कर्मफलाचा त्याग केल्याने ज्ञाननिष्ठेने मिळणारी मोक्षरूपी परमशांती मिळते.
विवेचन
येथे कर्मातील कर्तेपण सोडले, हा कर्मसंन्यास झाला. सांख्यशास्त्रातील योगी संन्यास घेऊन घरदार सोडून जातो; पण ज्याप्रमाणे आपण घरात रहातो, त्याचप्रमाणे आपण, म्हणजे आपला आत्मा देहात रहातो. या नवद्वारमय पुरीला सोडून कुठे जाऊ शकतो ?
कर्मसंन्यास अशासाठी म्हटले आहे की, यात संन्याशाप्रमाणे कर्मयोगी घरदार सोडून जात नाही, तर येथे कर्माच्या कर्तेपणाचाच त्याग असतो. अशा कर्मसंन्यासाने ज्ञाननिष्ठ संन्यास (सांख्य) आणि कर्मयोग या दोन्हींचे फळ मिळते.
३. संन्यास आणि कर्मयोग यांपैकी
कोणत्याही मार्गाने साधना केल्यास मोक्ष मिळणे
ज्ञाननिष्ठ संन्यास आणि कर्मयोग वेगळे आहेत, असे अज्ञानी मानतात, ज्ञानी नाही; कारण दोन्ही योगांचे फळ एकच, म्हणजे मोक्ष आहे. दोन्हींपैकी एकानुसार साधना केली असता दोन्हींचे फळ मिळते. ज्ञाननिष्ठ संन्यासाने जे स्थान (मोक्ष) मिळते, तेच कर्मयोगानेही मिळते. (अध्याय ५, श्लोक ४ आणि ५)
विवेचन
कर्मसंन्यासयोग हा कर्ममुक्तीचा मार्ग आहे. कर्मांमधील कर्तेपणा सोडल्याने आत्मशुद्धी होते. पुढे ज्ञानप्राप्ती होऊन मोक्षरूप परमशांती मिळते.
४. सर्वव्यापी परमात्म्याचे स्वरूप
नादत्ते कस्यचित्पापं न चैव सुकृतं विभुः । (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ५, श्लोक १५), म्हणजे विभु (सर्वव्यापी परमात्मा) कोणाचेही पाप ग्रहण करत नाही आणि कोणी अर्पण केलेले सुकृतही घेत नाही.
४ अ. शांकरभाष्य
किमर्थं तर्हि भक्तैः पूजादिलक्षणं (चांगली कर्मे) यागदानहोमादिकं च सुकृतं प्रयुज्यते ।
अर्थ : मग पूजा, यज्ञ, दान, होम इत्यादी चांगली कर्मे का केली जातात ?
४ आ. भगवंताने सांगितलेले कारण
अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः ॥ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ५, श्लोक १५
अर्थ : मनुष्याचे ज्ञान अज्ञानाने झाकले गेले आहे. त्यामुळे अविवेकाने मोहित होऊन मनुष्य ईश्वराप्रीत्यर्थ अशी कर्मे करतो.
विवेचन
आद्य शंकराचार्य त्यांच्या भाष्यात सांगतात, करोमि कारयामि भोक्ष्ये भोजयामि इति एवं मोहं गच्छन्ति अविवेकिनः संसारिणो जन्तवः ।, म्हणजे अविवेकी संसारी जीव मी करीन, करवून घेईन, मी जेवीन, वाढीन, अशा प्रकारे (कर्तेपणाचा विचार करून) मोहाच्या अधीन होतात.
स्वतः कर्ता असल्याच्या अज्ञानाने विवेकज्ञान झाकलेले असल्याने मनुष्य पूजायज्ञादी सुकृत ईश्वराला अर्पण करतो. मग सुकृत करणे व्यर्थ आहे का ?
नाही. योगिनः कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये ॥ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ५, श्लोक ११), म्हणजे ती कर्मे निष्काम असली, तर आत्मशुद्धी होते, असे भगवंत सांगतात. कर्मे सकाम असली, तर त्यांचे वांछित फळ मिळते.
५. भगवंत सकाम कर्मांचे फळ का देतात ?
भगवान मनुष्याची श्रद्धा वाढवण्यासाठी सकाम कर्मे करणार्यांना त्या कर्मांची फळे देतात; पण ती फळे सदैव रहात नाहीत. त्यांचा अंत होतो.
विवेचन
रामदासस्वामी म्हणतात –
कामनेनें फळ घडे । निःकाम भजनें भगवंत जोडे ।
फळभगवंता कोणीकडे । महदांतर ॥ – दासबोध, दशक १०, समास ७, ओवी २०
अर्थ : सकाम भजनाने वांछित फळ मिळेल. निष्काम भजनाने भगवंतच मिळतील. फळ मिळणे आणि भगवान मिळणे यांत किती अंतर आहे !
६. साधनेने चित्तशुद्धी होऊन आत्मज्ञान
मिळणे आणि समत्वबुद्धी निर्माण होणे
अ. अशा कर्मसंन्यासाने चित्तशुद्धी झाली की, मन परमात्म्यातच लागते. आत्मज्ञान प्राप्त होऊन सर्व दोष नाहीसे होतात. त्याचे फळ आहे अपुनरावृत्ती, म्हणजे पुन्हा जन्म न होणे
आ. असा योगी विनम्र ज्ञानी ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ यांना सारखेच मानतो.
इ. ज्यांची अशी समत्वबुद्धी झाली आहे, त्यांनी इथेच, या जन्मीच, उत्पत्तीवर जय मिळवला आहे आणि ते ब्रह्मातच स्थित आहेत; कारण ब्रह्मही निर्दोष अन् सम आहे.
विवेचन : शांकरभाष्य
उत्पन्नविवेकज्ञानस्य सर्वकर्मसंन्यासिनः अपि गेहे इव देहे एव नवद्वारे पुरे आसनम् प्रारब्धफलकर्मसंस्कारशेषानुवृत्या देहे एव विशेषविज्ञानोत्पत्तेः ।
अर्थ : ज्याला विवेकज्ञान झाले आहे, अशा सर्वकर्मसंन्याशाचेही एखाद्या घरात राहिल्याप्रमाणे नवद्वारवाल्या शरीररूपी पुरीत रहाणे, हे प्रारब्धकर्मांच्या अवशिष्ट संस्कारांच्या अनुवृत्तीने (प्रारब्धकर्मांचे फळ भोगणे शिल्लक राहिल्याने) होऊ शकते; कारण शरिरातच प्रारब्धफळ भोगाचे विशेष ज्ञान होणे शक्य आहे.
स्पष्टीकरण : शरिरात राहून कर्मसंन्यास घेतला, तरी प्रारब्धाचे सुख-दुःख भोगावे लागते.
७. मनुष्याचे कर्तृत्व आणि कर्म ईश्वर ठरवत नाही
मनुष्याचे कर्तृत्व आणि कर्म ईश्वर ठरवत नाही. तर स्वभाव-अविद्या, माया-प्रकृती कर्म करवून घेते.
या अध्यायात श्रीकृष्णांनी ध्यानयोगाचा त्रोटक उल्लेख केला आहे आणि थोड्या अधिक विस्ताराने तो अध्याय ६ मध्ये सांगितला आहे.
८. मुक्त झालेल्याची लक्षणे
इंद्रियांना त्यांच्या विषयांपासून दूर ठेवून; इंद्रिये, मन आणि बुद्धी यांचे नियमन करून; प्राण-अपान वायूंना सम करून इच्छा, भय अन् क्रोध नष्ट झालेला मोक्षपरायण मनुष्य नेहमी मुक्तच असतो. (अध्याय ५, श्लोक २७ आणि २८)
९. साधना
अ. आपण कोणत्याही कर्माचा कर्ता नाही, हे जाणणे, ही भावना दृढ करणे, कर्तेपणा सोडणे
आ. इंद्रियांच्या विषयांशी होणार्या संबंधांपासून मिळणारे भोग शेवटी दुःखदायकच असतात; म्हणून सर्व इंद्रियांच्या विषयांपासून विमुख होऊन मन अंतर्मुख करणे.
इ. आवडती गोष्ट मिळाल्याने हर्षित होऊ नये आणि नावडती परिस्थिती आली, तरी उद्विग्न होऊ नये. सदैव, सर्वत्र आणि सर्व द्वंद्वांमध्ये सम रहाणे
ई. अंतर्मुख होऊन इंद्रिये, मन आणि बुद्धी यांचा संयम करून; प्राण-अपान सम करून; इच्छा, भय आणि क्रोध यांचा त्याग करणे (अध्याय ५, श्लोक २७ आणि २८)
उ. आसक्ती सोडून आत्मशुद्धीसाठी कर्मे करणे
१०. फळ
अशी साधना करणार्याची चित्तशुद्धी होत जाते. कर्माच्या कर्तेपणाचा आणि फळाचा त्याग केल्याने नैष्ठिकी शांती, म्हणजे ज्ञाननिष्ठेत प्राप्त होणारी मोक्षरूप परम शांती मिळते.
११. अध्यायाचे नाव कर्मसंन्यासयोग असण्याचे कारण
स्वतःला कोणत्याही कर्माचा कर्ता न मानल्याने कर्मसंन्यास झाला; म्हणून या अध्यायाचे नाव कर्मसंन्यासयोग आहे.
१२. विवेचन
कर्मयोग, ज्ञानकर्मसंन्यासयोग आणि कर्मसंन्यासयोग यांतील अंतर (अध्याय ३, ४ आणि ५ यांमधील अंतर)
१२ अ. कर्मयोग
यात ज्ञानसाधना सांगितलेली नाही. केवळ कर्मोपासना आहे. ईश्वराप्रीत्यर्थ अथवा इतरांच्या कल्याणासाठी फळाची इच्छा आणि आसक्ती सोडून कर्म करणे
१२ आ. ज्ञानकर्मसंन्यासयोग
या अध्यायात ज्ञानासह कर्मसंन्यास सांगितला आहे. मुख्य ज्ञान हे आहे की, हा सर्व विश्वाचा पसारा ब्रह्मच आहे. कर्मसंन्यास हा आहे की, कर्माच्या फळाची आसक्ती सोडणे. संन्यासात सोडणे असते.
१२ इ. कर्मसंन्यासयोग
यात कर्मोपासना नाही, तर प्राप्त कर्मेसुद्धा मी करतच नाही, मी त्यांचा कर्ता नाही, या भावनेने कर्म हातून घडते. कर्माच्या कर्तेपणाचाच संन्यास.
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
– अनंत बाळाजी आठवले, बी.ई. (सिव्हिल), शीव, मुंबई. (१०.१२.२०१३)
संदर्भ : सनातन-निर्मित आगामी ग्रंथ ‘गीताज्ञानदर्शन’