॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय ३ – कर्मयोग

कर्मे करूनही त्यांचे पाप-पुण्य कसे लागू द्यायचे नाही, हे शिकवणारा अध्याय ३ कर्मयोग

श्री. अनंत आठवले
श्री. अनंत आठवले

गीतेतील शिकवणीच्या संदर्भात श्री. अनंत आठवले यांनी स्वतः केलेले विवेचन खाली दिले आहे. या लेखमालिकेत काही ठिकाणी परिशिष्ट पहा असे म्हटले आहे. परिशिष्ट गीताज्ञानदर्शन या ग्रंथात दिले आहे. त्यावरून वाचकांना विषय अधिक सुस्पष्ट होईल. – संकलक

 

अर्जुनाला गीता लगेच कळली !

आपल्याला गीता अनेकदा वाचूनही कळत नाही. काही काळाने आपण गीतेचा अभ्यास करणे सोडून देतो; मात्र श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता एकदाच सांगितली. त्याला ती कळली आणि त्याने तिच्यातील शिकवणीनुसार आचरण केले. यावरून हे लक्षात येते की, आपण अर्जुनासारखा भाव ठेवला, तरच आपल्याला गीता कळेल. – (प.पू.) डॉ. आठवले

 

॥ श्रीकृष्णाय नम: ॥

१. तत्त्वज्ञान

कर्मयोगाचे काही तत्त्वज्ञान अध्याय २ मध्ये बुद्धीयोगात दिले आहे.

१ अ. वेदांपासून कर्माची उत्पत्ती झालेली असणे क्रियारूप कर्म वेदरूप ब्रह्मापासून उत्पन्न झाले आणि वेद अक्षर ब्रह्मापासून !

विवेचन

वेदांमध्ये यज्ञादी कर्मे सांगितली आहेत; म्हणून वेदांपासून कर्म उत्पन्न झाले, असे म्हटले आहे. यज्ञविधीत वेदांची प्रधानता असल्याने ब्रह्म सर्वंगत असण्यासह नेहमी यज्ञात प्रतिष्ठित आहे.

 

२. कर्म का करावे ?

२ अ. केवळ कर्मे सोडून ईश्‍वरप्राप्ती होत नाही

केवळ कर्म करणे थांबवून नैष्कर्म्य (सर्वकर्मपरित्याग) घडत नाही आणि केवळ कर्म करणे सोडून भगवत्प्राप्ती होत नाही.

२ आ. अनिवार्यता

१. प्रकृतीचे गुण कर्म करण्यास भाग पाडतातच. मनुष्य कर्म केल्याविना क्षणभरही राहू शकत नाही.
२. कर्म केल्याविना शरिराचा निर्वाह होणार नाही.

२ इ. देवतांना प्रसन्न करणे

यज्ञ करून देवतांना प्रसन्न करायचे. त्याने वांछित फळ मिळेल. यज्ञकर्मांनी प्रसन्न झालेले देव इष्ट भोग देतील. (टीप – गीतेत दास्यन्ते म्हणजे देतील असे आहे, देतात असे नाही.)

२ ई. कर्म न केल्यास पाप लागणे

देवांप्रीत्यर्थ कर्मे न केली, तर पाप लागेल (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ३, श्‍लोक १६).

विवेचन

देवऋण, पितृऋण इत्यादी ऋण फेडणे ही कर्तव्ये आहेत, असे शास्त्र सांगते.)

२ उ. जनक इत्यादी कर्म करूनच मुक्त झाले.

 २ ऊ. लोकांना योग्य मार्ग दाखवणे

श्रीकृष्ण सांगतात, मला तिन्ही लोकांत कोणतेही कर्तव्य नाही. मला मिळाले नाही आणि मिळवायचे आहे, असे काहीही नाही; पण मी कर्म सोडले, तर लोक माझे अनुकरण करतील अन् नाश पावतील.

विवेचन

कारण ते श्रीकृष्णांसारख्या निष्काम स्थितीत नाहीत. लोक चुकीच्या मार्गाने जाऊ नयेत; म्हणून त्यांच्यासमोर उदाहरण ठेवण्यासाठी श्रेष्ठ लोकांनी प्रवृत्तीमार्गाने जावे.

 

३. कोणते कर्म करावे ?

वाटेल ती कर्मे करायची नसून स्वधर्माचेच कर्म करावे. स्वधर्म म्हणजे वर्णाश्रमोचित आणि शास्त्रविहित धर्म.

 

४. कर्मे कशी घडतात ?

मनुष्य अहंकारामुळे स्वतःला कर्मांचा कर्ता मानतो; पण खरेतर प्रकृतीच्या गुणांमुळे कर्मे होत असतात. हे नीट लक्षात आले, तर कर्मांमध्ये गोडी उरत नाही आणि त्यांच्या फळांमध्ये आसक्ती होत नाही.

 

४. कर्मफळ

४ अ. कोणते कर्म बंधनकारक असते ?

ईश्‍वराप्रीत्यर्थ, ईश्‍वरार्पण करून केलेल्या कर्मांविना इतर कर्मे बंधनकारक असतात, म्हणजे ती पाप-पुण्य देतात आणि त्यांचे फळ भोगावे लागते.

४ आ. कर्माची आसक्ती सुटणे महत्त्वाचे !

केवळ कर्म करणे सोडून नैष्कर्म्य (सर्वकर्मपरित्याग) किंवा संन्यास होत नाही, संन्यासाचे फळ मिळणार नाही (त्यासाठी आणखी काय करावे लागेल, ते पुढे पाचव्या अध्यायात सांगितले आहे.) आणि शरिराने कर्मे सोडली, पण मनात त्यांचे विचार राहिले, तर ते कर्म सोडणे हे ढोंग होईल.

४ इ. कर्मफळाची आसक्ती घालवण्याचा उपाय

सर्व कर्मे प्रकृतीच्या गुणांद्वारे होतात; पण अहंकारामुळे मोहित झालेला मनुष्य स्वतःला कर्ता मानतो; पण गुणविभाग आणि कर्मविभाग यांचे (परिशिष्ट क्र. १, सूत्र ४) तत्त्व जाणणारा गुणांमध्ये, कर्मांच्या फळांमध्ये आसक्त होत नाही.

विवेचन

गुणविभाग आणि कर्मविभाग हे अनित्य असून आत्मा त्यांच्यापासून वेगळा अन् निर्लिप्त आहे. गुणच गुणांमध्ये कार्यरत असून आत्मा त्या कर्मांचा कर्ता नाही, हे जाणणे, म्हणजे गुणकर्मविभागाचे तत्त्व जाणणे आहे.

 

५. मनुष्याच्या कल्याणकारी मार्गातील विघ्ने

५ अ. इंद्रियांच्या अधीन होण्याने हानी

इंद्रियांचा त्यांच्या भोगांमध्ये अनुराग आणि द्वेष असतो. त्यांच्या अधीन होऊ नये; कारण ती (अनुराग आणि द्वेष) कल्याणकारी मार्गातील विघ्ने आहेत.

५ आ. पापाचरणाचे कारण

मनुष्याची इच्छा नसली, तरी त्याला कोण पाप करायला लावते ? श्रीकृष्ण सांगतात की, रजोगुणापासून उत्पन्न झालेले काम आणि क्रोध हेच ते वैरी आहेत. यांची भूक कधीही भागत नाही. ते इंद्रिये, मन आणि बुद्धी यांत राहून मनुष्याच्या विवेकाला झाकतात.

 

६. कामरूपी शत्रूचा नाश कसा करावा ?

इंद्रियांना श्रेष्ठ म्हणतात. इंद्रियांहून मन श्रेष्ठ आहे, मनाहून बुद्धी श्रेष्ठ आहे. बुद्धीच्याही पलीकडे आहे, तो आपला आत्मा आहे, हे जाणावे आणि कामरूपी (परिशिष्ट क्र. १, सूत्र ५) दुर्धर शत्रूचा नाश करावा.

विवेचन : कर्म करून स्वभावदोष घालवण्याची युक्ती

अ. सामान्य मनुष्य कामनापूर्तीसाठी कर्म करतो, तर कर्मयोगी कामनानिवृत्तीसाठी कर्म करतो.
आ. कर्मयोगात कर्मे इतरांसाठी केली, तर तो आपल्यासाठी योग होतो.
इ. कर्मयोगात शरीर दुसर्‍यांच्या सेवेसाठी उपयोगात आणल्याने अहंता, तसेच आपल्या वस्तू अन् धन दुसर्‍यांच्या सेवेसाठी उपयोगी आणल्याने ममता नष्ट होते. निष्काम सेवा केल्याने अनुराग आणि द्वेष जातात.

 

७.साधना

अ. कर्म (फळ) ईश्‍वराला अर्पण करायचे. असे केल्याने कर्माचे पाप-पुण्य रूपी बंधन निर्माण होत नाही.

आ. कर्म इतरांसाठी करायचे. दुसर्‍यांना लाभ पोहोचवण्यासाठी किंवा त्यांची सेवा करण्यासाठी करायचे.

इ. कर्म करायचेच; पण त्याच्या फळाची आसक्ती पूर्णपणे सोडून करायचे.

ई. प्रकृतीच्या गुणांमुळे कर्मे घडतात. त्यांचा कर्ता आपण नाही, हे लक्षात ठेवून कर्मे करायची.

उ. इंद्रियांचे नियमन करून काम आणि क्रोध यांचा नाश करायचा.

 

८. फळ – आसक्तीरहित कर्म केल्याने परमेश्‍वराची प्राप्ती होणे

तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर ।
असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पूरुषः ॥ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ३, श्‍लोक १९

अर्थ : म्हणून कर्मफळांची आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे; कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने (चित्तशुद्धी होऊन पुढे) त्याला परमेश्‍वराची प्राप्ती होते.

 

९. या अध्यायाला कर्मयोग हे नाव असण्याचे कारण

इतर अध्यायांपेक्षा या अध्यायात कर्मयोगाचे सखोल विवेचन असल्याने याचे नाव कर्मयोग आहे. या अध्यायात सांगितल्यानुसार कर्मे केल्याने ईश्‍वराशी जुडले जातो, म्हणजे ईश्‍वराशी योग होतो.

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

– अनंत बाळाजी आठवले, बी.ई. (सिव्हिल), शीव, मुंबई. (१०.१२.२०१३)

संदर्भ : सनातन-निर्मित आगामी ग्रंथ ‘गीताज्ञानदर्शन’

Leave a Comment