राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी आयुष्य समर्पित करणारे वैदिक गणिताचे जनक अन् पुरीपिठाचे १४३ वे पिठाधीश्वर श्री भारती कृष्णतीर्थजी महाराज !
श्री भारती कृष्णतीर्थजी महाराज यांनी राष्ट्र आणि धर्म यांसाठी केलेल्या कार्याविषयीची माहिती पुढे देत आहे.
१. जन्म, शिक्षण आणि नोकरी
प.पू. जगद्गुरु शंकराचार्य श्री भारती कृष्णतीर्थजी यांचे नाव वेंकटरमण होते. त्यांचा जन्म १४.३.१८८४ या दिवशी तामिळनाडूमधील तिन्निएकेल्लि येथे झाला. जुलै १८९९ मध्ये त्यांनी सरस्वती ही पदवी प्राप्त केली. त्यांनी रोचेस्टर, न्यूयॉर्क येथील अमेरिकन कॉलेज ऑफ कॉमर्स यांच्या मुंबई केंद्रातून संस्कृत, इंग्रजी, इतिहास, तत्त्वज्ञान, विज्ञान आणि गणित या ६ विषयांत पदव्युत्तर पदव्या प्राप्त केल्या होत्या.
ते बडोदा येथील विद्यालयात गणित आणि विज्ञान या विषयांचे प्राध्यापक होते. त्यानंतर त्यांनी आंध्रप्रदेशमधील राजामुंदरी या नॅशनल महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून पद भूषवले.
२. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग
ख्रिस्ताब्द १९०५ मध्ये ते बंगालमध्ये चालू झालेली स्वातंत्र्य चळवळ आणि दक्षिण आफ्रिकेतील भारतियांच्या समस्या या मोहिमांत सहभागी झाले. तेव्हा त्या मोहिमांत त्यांच्यासह श्री. अरविंद घोष आणि श्री. गोपाळकृष्ण गोखले हेही सहभागी होते. ख्रिस्ताब्द १९०८ मध्ये डॉ. अॅनी बेझंट यांनी त्यांची दक्षिण भारताचे व्यवस्थापक आणि पालनकर्ता अधिकारी म्हणून नियुक्ती केली.
३. साधनेचा प्रारंभ
३ अ. आत्मसाक्षात्कारासाठी साधना करण्याची आवश्यकता लक्षात आल्यावर अध्यात्माकडे वळणे
मानवता धर्मासाठी आपले आयुष्य अर्पण करण्याची त्यांची उत्कट इच्छा होती; परंतु आत्मसाक्षात्कार झाल्याविना हे कार्य होऊ शकणार नाही, याची त्यांना जाणीव झाली. त्यांनी ख्रिस्ताब्द १९०९ मध्ये शृंगेरी मठात श्री शंकराचार्य श्री सच्चिदानंद शिव अभिनव नरसिंह सरस्वती यांच्या चरणी आश्रय घेतला.
ख्रिस्ताब्द १९११ ते १९१८ या काळात त्यांनी ध्यानधारणा, वेद, सत्य आणि ज्ञान यांच्या स्वरूपाविषयीच्या तत्त्वज्ञानावर सखोल चिंतन केले अन् एक तपस्वी म्हणून आपले जीवन व्यतीत केले. त्यानंतर त्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन वेदांत साधना, अभ्यास आणि आध्यात्मिक प्रगती यांसाठी समर्पित केले.
३ आ. अथर्ववेदातील गणिती सूत्रांचा संदर्भ स्पष्ट करून वैदिक गणितास पुनरुज्जीवन देणे
त्यांनी गणित सूत्र आणि गणिताचे सोपे नियम यांवर आधारित संकलन केले. वैदिक गणित ही त्यांनी गणित विषयाला आणि त्याच्या संशोधनाला दिलेली अमूल्य देणगी आहे. त्यांनी अथर्ववेदातील गणिती सूत्रांचा संदर्भ स्पष्ट करून वैदिक गणितास पुनरुज्जीवन दिले. त्यांनी गणितीची सर्व समावेशक अशी १६ सूत्रे शोधून काढली. ही सूत्रे अंकगणित, बीजगणित, भूमिती, त्रिकोणमिती, भौतिकशास्त्र, योजना, त्रिकोणभूमिती, कॅल्क्युलस आदींसाठी उपयुक्त आहेत.
४. संन्यासदीक्षा आणि त्यानंतर केलेले कार्य
४ अ. संन्यासदीक्षा मिळून श्री भारती कृष्णतीर्थ असे नामकरण होणे
आणि द्वारका पिठाच्या प्रमुखपदी नियुक्ती होणे
जुलै १९१९ मघ्ये श्री त्रिविक्रम तीर्थजी यांनी श्री वेंकटरमण सरस्वती यांना वाराणसी येथे संन्यासदीक्षा दिली आणि त्यांचे श्री भारती कृष्णतीर्थ असे नामकरण करण्यात आले. ते वैदिक तत्त्वांचे कट्टर अनुयायी होते. ख्रिस्ताब्द १९२१ मध्ये त्यांना श्री त्रिविक्रम तीर्थजी यांनी द्वारका पिठाचे प्रमुख म्हणून नियुक्त केले. तेव्हापासून त्यांनी भारतभर प्रवचने करण्यास प्रारंभ केला.
४ आ. पुरी येथील गोवर्धन मठाचे शंकराचार्य म्हणून नियुक्ती !
ख्रिस्ताब्द १९२५ मध्ये त्यांची ओडिशा राज्यातील पुरी येथील गोवर्धन मठाचे शंकराचार्य म्हणून नियुक्ती झाली. कोट्यवधी हिंदूंचे नेतृत्व करणारे आध्यात्मिक अधिकारी आणि धर्मगुरु या नात्याने तेव्हाचे राज्यकर्ते त्यांचा समादेश घेत असत.
४ इ. धर्माचा प्रसार करण्यासाठी ३५ वर्षे जगभर भ्रमंती करणे
गोवर्धन मठाचे शंकराचार्य झाल्यानंतर त्यांनी शांतता, एकोपा आणि बंधुत्व या मूल्यांचा अन् सनातन धर्माचा प्रसार करण्यासाठी ३५ वर्षे जगभरात भ्रमण केले. या कालावधीत त्यांनी भारतीय संस्कृती आणि १४, १५ अन् १६ व्या शतकांतील भारतीय विद्येचे पुनरुज्जीवन करण्याचे पुष्कळ कार्य केले.
४ ई. श्री भारती कृष्णतीर्थ यांनी विविध विषयांवर केलेले विपुल लिखाण आणि केलेली सेवा !
एक धर्मगुरु या नात्याने त्यांनी विज्ञान, गणित, जागतिक शांतता आणि सामाजिक सलोखा या विषयांवर विपुल लिखाण केले. ख्रिस्ताब्द १९५३ मध्ये त्यांनी नागपूर येथे श्री विश्व पुनर्निर्माण संघ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेत भारताचे सरन्यायधीश श्री. सिन्हा यांनी अध्यक्ष म्हणून, तर माजी केंद्रीय वित्तमंत्री डॉ. सी.डी. देशमुख यांनी उपाध्यक्ष म्हणून सेवा केली.
४ उ. धर्मप्रसारासाठी अमेरिका आणि इंग्लंड येथे जाऊन विविध विषयांवर प्रवचने करणे
आद्य शंकाराचार्यांची सहस्रो वर्षांची परंपरा असलेल्या पिठाधीश्वरांनी धर्मप्रसारासाठी ख्रिस्ताब्द १९५८ मध्ये परदेश दौरा केला. परमानंद योगानंद यांनी स्थापन केलेल्या सेल्फ रिअलायझेशन फेलोशिप या संस्थेचे निमंत्रण स्वीकारून त्यांनी ३ मास (महिने) अमेरिका आणि इंग्लंड या देशांचा दौरा केला. त्यांनी तेथील विद्यापिठे आणि संस्था यांच्या सहस्रो विद्यार्थ्यांसमोर विविध विषयांवर प्रवचने केली.
५. देहत्याग
ख्रिस्ताब्द १९६० मध्ये त्यांनी मुंबई येथे देहत्याग केला.
५ अ. शंकराचार्यांच्या भक्तांनी वैदिक अभ्यासासाठी एका शाखेला आरंभ करणे
मुंबईचे प्रसिद्ध उद्योगपती श्री. अरविंद मफतलाल आणि शंकराचार्य यांचे भक्त यांनी ख्रिस्ताब्द १९६५ मध्ये बनारस हिंदु विश्वविद्यापिठात वैदिक अभ्यासासाठी एक शाखा आरंभ केली.
६. देशाला अधोगतीकडे नेणार्या पुढार्यांचा उदोउदो करणारे आणि देश अन् धर्म यांसाठी आपल्या आयुष्याचे समर्पण करणार्या शंकराचार्यांच्या समाधीकडे दुर्लक्ष करणारे काँग्रेस शासन !
त्यांची समाधी मुंबईतील मलबार हिलमधील बाणगंगेजवळ आहे. दुर्दैवाने हे समाधीस्थळ अत्यंत दुर्लक्षित आणि दयनीय अवस्थेत आहे. महात्मा गांधी, नेहरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींची समाधीस्थळे सुशोभित करून प्रेक्षणीय बनवण्यात आली आहेत. आयुष्यभर जनतेची पिळवणूक करून घोटाळे करणार्या सध्याच्या राजकीय पुढार्यांचे पुतळेही चौकाचौकात उभारले जातात. क्रूरकर्मा अफझलखानाची कबर आता प्रार्थना आणि नवस बोलण्याचे स्थळ बनले आहे; मात्र स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेणारे, वैदिक गणिताचे जनक, आद्य शंकराचार्यांचे उत्तराधिकारी, पुरीपिठाचे १४३ वे पिठाधीश्वर, जगात सनातन वैदिक धर्माचा प्रसार करणारे सर्वोच्च धर्मगुरु प.पू. जगद्गुरु शंकराचार्य श्री भारती कृष्णतीर्थजी महाराज यांच्या समाधीस्थळाकडे दुर्लक्ष करून शासन आणि हिंदूंनी अक्षम्य पाप केले आहे. या समाधीचे लवकरात लवकर पुनरुत्थान होऊन हिंदु राष्ट्र निर्माण होवो, हीच श्रीकृष्णचरणी प्रार्थना आहे.
– श्री. शिवाजी वटकर, हिंदू जनजागृती समिती (२.२.२०१४)
(मुसलमानांच्या मशिदी आणि ख्रिस्त्यांचे चर्च यांच्या संदर्भात काँग्रेसने अशीच भूमिका घेतली असती का ? हिंदू सहिष्णू असल्यानेच त्यांचे फावते. – संकलक)