महर्षि गृत्समदऋषी आणि त्यांनी थेऊर येथे स्थापन केलेला चिंतामणि (अष्टविनायकांपैकी एक गणपति) !
विदर्भामध्ये वाचनकवी नावाचे अत्यंत प्रतिभासंपन्न ऋषी होते. त्यांच्या पत्नीचे नाव मुकुंदा होते. मुकुंदा अतिशय सुंदर होती. एक दिवस कुंडिणपूर येथील तत्कालिन राजा रुक्मागंध विदर्भात शिकार करण्यासाठी आला. मध्यान्ही तहान लागली; म्हणून तो वाचनकवींच्या आश्रमात पाणी पिण्यासाठी आला. महर्षि आश्रमात नव्हते. मुकुंदा एकटीच होती. राजाचे अनुपम सौदर्य पाहून मुकुंदा त्याच्यावर भाळली आणि तिने आपली विक्षिप्त इच्छा राजाजवळ प्रगट केली. राजाला ते पटले नाही. पाणी न घेता राजा आश्रमातून चालता झाला. त्यामुळे मुकुंदा क्रोधीत झाली आणि तिने राजाला शाप दिला की, तू कुष्ठरोगी होशील ! राजा क्षणात कुष्ठरोगाने ग्रस्त झाला; पण तरीही तिच्या इच्छेला न जुमानता कर्मगतीला दोष देत राजा तिथून निघून गेला. (पुढे महर्षि नारदमुनी यांनी त्याला चिंतामणि कुंडातील जलाने रोगमुक्त केले.)
इकडे आश्रमात कामाग्नीने विव्हळणार्या मुकुंदेला पाहून आणि एका अलौकिक व्यक्तीच्या जन्माचा मुहूर्त आहे, हे ध्यानात घेऊन देवराज इंद्राने मुकुंदेच्या ठायी बीजारोपण केले. त्यापासून झालेली संतती म्हणजे महर्षि गृत्समद ऋषी होय. अर्थात् या प्रकाराची महर्षि वाचनकवींना किंवा महर्षि गृत्समदांना काहीही कल्पना नव्हती; पण पुढे गृत्समद तारुण्यात मगध देशात गेले. मगध राजाच्या दरबारात गृत्समद यांनी आपल्या बुद्धी सामर्थ्याने सर्व अभ्यांगंतांचा पराभव केला. त्यांची ही महती विदर्भातील दुसरे ऋषी अत्री यांना सहन झाली नाही. ते क्षणात उसळून बोलले, अरे रुक्मानंद पुत्र तू ! तुला वादविवादाचा अधिकार नाही ! अत्रिऋषींचे हे बोल गृत्समदांना पुष्कळ लागले. ते तडक घरी आले आणि त्यांनी आईला आपल्या जन्माची कहाणी विचारली. आई मुकुंदेने भीतीपोटी मुलाला सर्व वृत्तांत कथन केला. गृत्समदांनी क्रोधाने आईला शाप दिला, तू जन्मोजन्मी कंटकीवृक्ष होशील, तुझ्या सहवासात कोणताही पक्षी रहाणार नाही. नंतर आत्महत्येचा विचार करून गुत्समद देहविसर्जित करणार, त्याच क्षणी आकाशवाणी झाली, गृत्समदा, देहत्याग करू नकोस, तू इंद्रपुत्र आहेस, देवराज इंद्र रुक्मांगदाच्या वेशात आले होते. तू क्षत्रिय पुत्र नसून देवपुत्र आहेस. असा देहपात करण्यासाठी तुझे अवतार कार्य नाही. तू गणेशाची आराधना कर.
आकाशवाणीद्वारे झालेल्या आदेशाने महर्षि गृत्समदांनी विदर्भ सोडून पुणे जिल्ह्यात थेऊर येथे कार्यभूमी म्हणून निवडली आणि तप:श्चर्येला प्रारंभ केला.
बारा वर्षांच्या तप:श्चर्येनंतर भगवान गणेश प्रकट झाला आणि त्याने महर्षि गृत्समद यांना अनेक वरदाने दिली. त्याच ठिकाणी महर्षि गृत्समदांनी श्री गणेशाची स्थापना केली. श्री क्षेत्र थेऊर (जिल्हा पुणे) येथे स्थापलेल्या श्री गणेशाचे नावही चिंतामणि हेच आहे. हे क्षेत्र आज अष्टविनायकांपैकी एक प्रसिद्ध क्षेत्र आहे.
महर्षि गृत्समद यांनी लावलेले शोध
महर्षि गृत्समद हे एक थोर संशोधक होते. कापसाची पेरणी करणे, त्यापासून कापूस मिळवणे आणि कापसापासून वस्त्र बनवणे, हा गृत्समदांचा महत्त्वपूर्ण शोध आहे. आजही कळंब परिसरातील जमीन कापसाकरिता सुपिक नसतांनाही तिथे मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन होते. स्त्री गर्भावर चंद्राचा आणि चंद्रकिरणांचा प्रभाव पडतो, असाही एक शोध महर्षि गृत्समद यांनी लावला. गणितीय + चिन्हाचाही शोध त्यांनीच लावला आहे. गणित शास्त्रात त्या काळात केवळ बेरीज आणि वजाबाकी या दोनच क्रिया होत्या. महर्षि गृत्समद यांनी गुणाकार आणि भागाकार या क्रिया शोधून काढल्या. बेरजेच्या तत्त्वाचे उन्नत रूप म्हणजे गुणाकार आणि वजाबाकीच्याच प्रक्रियेचे सुलभ रूप म्हणजे भागाकार हे दाखवून महर्षि गृत्समंदांनी गणितशास्त्रात आमुलाग्र क्रांतीच घडवून आणली.