भक्तांच्या मनात भाव आणि भक्ती निर्माण करणारा श्री चिंतामणीचा महिमा !

भक्तांच्या मनात भाव आणि भक्ती निर्माण करणारा कळंब (जिल्हा यवतमाळ) येथील प्रसिद्ध श्री चिंतामणीचा महिमा !

श्री चिंतामणि
श्री चिंतामणि

यवतमाळ-नागपूर राज्य महामार्गावर यवतमाळपासून २३ कि.मी. अंतरावर श्री क्षेत्र कळंब गावातील प्रसिद्ध श्री चिंतामणि मंदिर हे लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या प्रसिद्ध श्री चिंतामणि मंदिराविषयी, तसेच श्री चिंतामणीची आख्यायिका जाणून घेऊया.
हिंदु संस्कृतीत कोणत्याही शुभकार्याचा आरंभ किंवा कोणत्याही देवतेची पूजा करतांना प्रथम श्री गणपतिपूजन करतात, तसेच तो विघ्नहर्ता असल्याने लोकनाट्यापासून विवाहापर्यंत, तसेच गृहप्रवेशादी सर्व विधींच्या आरंभी श्री गणेशपूजन केले जाते. अशा श्री गणपतीची अनेक स्थाने प्रसिद्ध आहेत. यातील एका स्थानाविषयी आपण येथे जाणून घेणार आहोत.

 

१. श्री चिंतामणि मंदिराची माहिती आणि मूर्तीचे वैशिष्ट्य

हे मंदिर कळंब येथील भूभागापासून ३५ फूट खाली आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत डाव्या बाजूला २९ पायर्‍या उतरून खाली गेल्यावर समोरच श्री गणेशकुंड आहे. श्री गणेशकुंडाच्या समोरच मुख्य गाभार्‍यात देवेंद्रवरद श्री चिंतामणीची नयनरम्य आणि अनुपम सुंदर मूर्ती आहे. देवराज इंद्र आणि इतर असंख्य भक्तांवर कृपा करणारी देवता, अशी श्री चिंतामणीदेवाची ख्याती आहे. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती दक्षिणाभिमुख आहे. देवराज इंद्र उत्तरेकडे तोंडवळा करून तप:श्‍चर्येला बसला आणि त्याच्यासमोर श्री गणेश प्रकट झाला. त्याच ठिकाणी आणि त्याच स्वरूपात मूर्तीची स्थापना झाली असल्याने या मूर्तीचे मुख दक्षिणेकडे असावे, असे सांगितले जाते. मूर्तीच्या दोन्ही बाजूला दोन शंकराच्या पिंडी आहेत, तसेच श्री नग्नभैरव शिवपिंड आहे.

याच अष्टकोनी कुंडात प्रत्येक १२ वर्षांनी गंगा येते. कुंडातील पाण्याची पातळी वाढते आणि समोर असलेल्या गाभार्‍यातील श्रीचरणांचा स्पर्श झाला, की कुंडातील पाणी आपोआप ओसरू लागते.

भूभागापासून ३५ फूट खाली असलेले कळंब येथील श्री चिंतामणि मंदिर
भूभागापासून ३५ फूट खाली असलेले कळंब येथील श्री चिंतामणि मंदिर

मंदिराच्या प्रवेशद्वारात पुरातन चौमुखी गणेशमूर्ती आहे. या मूर्तीचे वैशिष्ट्ये म्हणजे एकाच शिळेमध्ये चारही दिशेला चार गणेशमुखे असून प्रत्येक मूर्तीचे हात एकमेकांत मिसळलेले आहेत. गावच्या उत्तरेकडे प्राचीन गढीत खोदकाम करतांना ही मूर्ती सापडली, असे म्हणतात. हे मंदिर कुणी, केव्हा आणि कसे बांधले, याचा उल्लेख मिळत नाही.

 

२. देवराज इंद्राने चिंतामणीची स्थापना करण्यामागील आख्यायिका

श्री गणेशपुराण आणि श्रीमद् मुद्गल पुराण या दोन्ही पुराणांमध्ये कळंब या क्षेत्राचा उल्लेख आढळून येतो. त्यापैकी मुद्गल पुराणातील कथा विस्तृत स्वरूपात असून तिचा सारांश पुढीलप्रमाणे आहे.

एकदा ब्रह्मदेवाने एक अभूतपूर्व लावण्यावती स्त्री निर्माण केली. तिचे नाव देवी अहिल्या होते. देव, दानव, यक्ष, किन्नर, गंधर्व, नाग, राक्षस आदी सगळेच तिच्या सौंदर्याने मोहित झाले. ती आपल्याला मिळावी, या अभिलाषेने ते ब्रह्मदेवाकडे प्रार्थना करू लागले. शेवटी ब्रह्मदेवाने एक पण घोषित केला, जो कोणी प्रथम पृथ्वीप्रदक्षिणा करून येईल, त्यालाच अहिल्या प्रदान करण्यात येईल. हे ऐकून सर्वजण आपापल्या वाहनानिशी वेगाने निघाले. ही वार्ता आर्यावर्तात रहाणार्‍या महर्षि गौतम यांच्या कानावर गेली. त्यांच्या आश्रमात त्याच वेळी एक गाय प्रसूत होत होती. प्रसूतीशील गाईला प्रदक्षिणा घातल्यास पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य मिळते या शास्त्रवचनाचा आधार घेत त्यांनी त्या अर्धप्रसूत गोमातेस प्रदक्षिणा घातली आणि ब्रह्मदेवाकडे जाऊन देवी अहिल्येला मागणी घातली. शास्त्राचा आधार असल्याने त्या समयसूचक ऋषीवरास ब्रह्मदेवाने आपली कन्या यथाविधी सत्कारपूर्वक प्रदान केली. पृथ्वी प्रदक्षिणेस गेलेला देवराज इंद्र सर्वांत प्रथम पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण करून आला; पण उपयोग काय ? इंद्र अत्यंत खिन्न झाला. आता सरळ नाही, तर कपटाने मी अहिल्येला प्राप्त करीन, असा आत्मविनाशी विचार इंद्राच्या मनात आला आणि त्याने एक दिवस महर्षि गौतम आश्रमात नाहीत, अशी वेळ साधून महर्षि गौतम यांच्या वेशात जाऊन अहिल्येशी दुराचार केला. ही गोष्ट महर्षि गौतम यांच्या लक्षात येताच त्यांनी क्रोधीत होऊन इंद्राला शाप दिला, तू शतक्षतीयुक्त महारोगी होशील. देवराज इंद्र पुष्कळ घाबरला. त्याने देवगुरु बृहस्पतींना विनंती केली. देवगुरु बृहस्पती इंद्रासह महर्षि गौतम यांना शरण गेले आणि क्षमा मागितली. महर्षि गौतमांनी इंद्रास क्षमा करून त्यास गणेश षडाक्षर मंत्राचा उपदेश केला आणि विदर्भात कळंबक्षेत्रात जाऊन श्री चिंतामणीची तप:श्‍चर्या करण्यास सांगितले.

इंद्राच्या तप:श्‍चर्येने भगवान श्री गणेश प्रकट झाला. त्याने आपल्या हातातील अंकुशाने तेथे एक कुंड निर्माण केले. त्या कुंडातील पाण्याने इंद्र रोगमुक्त झाला. इंद्राने तेथेच श्री चिंतामणीची स्थापना केली. तेच हे प्रसिद्ध श्री क्षेत्र कळंब होय.

 

३. श्री चिंतामणि मंदिरातील श्री गणेशकुंडात होणारे पावन गंगेचे आगमन

श्री चिंतामणीच्या मूर्तीसमोर श्री गणेशकुंड आहे. हे गणेशकुंड आणि २० मीटर अंतरावर असलेली मंदिराच्या आवारातील विहीर यांच्या पाण्याची पातळी वेगवेगळी आहे. श्री चिंतामणीच्या पूजेसाठी देवराज इंद्राने पूर्वी गंगा आणली होती. त्याचा प्रत्यय आजही येतो. दर बारा-तेरा वर्षांनी तेथे पावन गंगा अवतरते. त्यामुळे श्री गणेशकुंडातील पाण्याची पातळी वाढू लागते. काही दिवसांत गंगेला श्री चिंतामणीच्या चरणांचा स्पर्श झाला की, पाण्याची पातळी आपोआप न्यून होऊ लागते. अशा घटना वर्ष १९१८,१९३३, १९४८, १९५८, १९७०, १९८३ आणि १९९५ या वर्षी घडल्या आहेत. आतापर्यंत श्री गणेशकुंडात पावन गंगा अवतरणाचा कालावधी १२ वर्षे असला, तरी त्यात थोडाफार फरक दिसून आला आहे.

कळंब क्षेत्री श्री चिंतामणि देवतेची स्थापना देवराज इंद्राने केली आहे. त्यामागील कथा अशा प्रकारे आहे. देवराज इंद्र गौतमऋषींच्या शापापासून मुक्त झाल्याने तेथेच त्यांनी श्री चिंतामणी गणेशाची स्थापना केली आणि पूजनासाठी पृथ्वीवरील पाणी कसे वापरावे या विचाराने त्याने प्रत्यक्ष स्वर्गातून गंगेलाच आवाहन केले. पूजन पूर्ण झाल्यावर तिला आज्ञा केली की, दर बारा वर्षांनी श्री प्रभूला स्नान घालत रहावे. तेव्हापासून ही गंगा अवतरते, अशी आख्यायिका गंगा आगमनाबाबत सांगितली जाते.

गंगा प्रकट होते, त्या काळात महाराष्ट्र आणि इतर राज्यांतील चिंतामणिभक्त श्री चिंतामणि आणि गंगा यांच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने येतात.

भक्तांच्या हाकेला धावणार्‍या आणि त्यांच्या चिंतेचे हरण करणार्‍या या श्री चिंतामणीच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !

संदर्भ : महिमा चिंतामणीचा, लेखक : डॉ. गोपाल पाटील

 

चिंतामणि या नावाचा अर्थ

क्षिप्त, मूढ, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुढ अशा चित्ताच्या पाच भूमिका आहेत. त्यांना प्रकाशित करणारा, तो चिंतामणि होय. चिंतामणीच्या भजनाने चित्तपंचकाचा नाश होऊन पूर्ण शांतीचा लाभ होतो. ही उपपत्ति मुद्गलपुराणात दिलेली आहे.

 

राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यातील अडथळे दूर होऊन हिंदु
राष्ट्राची स्थापना होण्यासाठी श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना करूया !

हे बुद्धीदात्या आणि विघ्नहर्त्या श्री गणेशा, राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यासाठी आम्हाला बुद्धी अन् शक्ती दे. या कार्यात येणार्‍या संकटांचे निवारण कर ! हे श्री गणेशा, तू प्राणशक्ती देणारा आहेस. दिवसभर उत्साहाने कार्य करता येण्यासाठी सर्वांना शक्ती दे. तुझ्या कृपेने समस्त हिंदू संघटित होऊन लवकरच हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ दे, हीच तुझ्या चरणी अनन्यभावे प्रार्थना !

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’

Leave a Comment