पेढांबे (ता. चिपळूण) येथे ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात जनजागृतीसाठी व्याख्यान

चिपळूण २८ जानेवारी (वार्ता.) – हिंदूंच्या महिला आणि युवती यांना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे शारीरिक आणि मानसिक शोषण करून जीवन उद्ध्वस्त केले जात आहे. हे एक हिंदूंचा वंश संपवण्याचे षड्यंत्र असून धर्माचे शिक्षण न दिल्यामुळेच हिंदु युवती धर्मांधांच्या वासनांना बळी पडत आहेत, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तालुक्यातील पेढांबे येथे ‘हिंदु नारी तू रणरागिणी हो ’ या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपिठावर भाजप रत्नागिरी जिल्हा चिटणीस श्री. विनोद भुरण उपस्थित होते.
सद्गुरु स्वाती खाडये पुढे म्हणाल्या की, आज घराघरांत टीव्ही आणि भ्रमणभाष यांमुळे पाश्चात्त्य कुसंस्कारांचे अंधानुकरण केले जात आहे. आपल्या मुली अंगप्रदर्शन करणारे कपडे घालतात, याला आधुनिकतेच्या नावाखाली त्यांचे पालकच पाठिंबा देतात, हे दुर्दैव आहे. हिंदु संस्कृती पालन करण्याचे संस्कार नष्ट होत असून भावी पिढीला स्वधर्माचे पालन करणे म्हणजे काय ? हेच कळत नाही. यावर उपाय म्हणजे हिंदूंनी धर्माचे शिक्षण घेणे अनिवार्य आहे. हिंदु जनजागृती समिती त्या दृष्टीने प्रयत्न करत आहे, त्याचा लाभ हिंदूंनी घ्यायला हवा.
‘लव्ह जिहाद’च्या विरोधात व्यापक जनजागृती करणे आवश्यक ! – विनोद भुरण, भाजप रत्नागिरी जिल्हा चिटणीस
एखाद्या भागात ‘लव्ह जिहाद’च्या घटना घडल्यावर तेथील हिंदु समाज त्याविषयी संवेदनशीलता दाखवत नाही. खोट्या भाईचार्याला बळी पडतो. यामुळे हिंदु जनतेत ‘लव्ह जिहाद’ विरोधात व्यापक जनजागृती करणे आवश्यक आहे, असे मनोगत भाजपचे रत्नागिरी जिल्हा चिटणीस श्री. विनोद भुरण यांनी व्यक्त केले.
हिंदु पालकांनी स्वतःच्या मुलींशी संवाद साधून प्रतिदिन त्यांच्या दिवसभरातील घराबाहेरील आचरणाचा आढावा घेणे आवश्यक ठरते, असेही त्यांनी सुचवले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे श्री. सचिन सकपाळ यांनी केले. खडपोली येथील श्रीमती रेश्मा लक्ष्मण पवार, सौ. मेधा विजय जठार, सरपंच सौ. सारिका संतोष भुवड, श्री. वैजनाथ बापट, पेढांबे येथील सरपंच सौ. गायत्री गणेश कुळे श्री सुकाई देवस्थानाचे विश्वस्त श्री. प्रकाश राणे, ह.भ.प. विनायक सकपाळ, पिंपळी बुद्रुक येथील सरपंच सौ. स्मिता संतोष राजवीर, पिंपळी खुर्द येथील श्री. सदानंद कडव, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे संयोजक श्री. अमित जोशी, गोरक्षक श्री. विक्रम जोशी, समितीचे श्री सुरेश शिंदे आदींसह हिंदु बांधवांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला.