सनातनचा रामनाथी (गोवा) येथील आश्रम पहायला मिळणे, हे हिंदूंसाठी मोठे भाग्यच !

आश्रमातील आदरातिथ्य आणि नम्रता पाहून शीण दूर होणे

२९.१२.२०१३ या दिवशी मी माझ्या कुटुंबासह सनातन आश्रमामध्ये प्रवेश केला. तेथील आदरातिथ्य आणि नम्रता पाहून अन् अनुभवून आमचा प्रवासातील शीण त्वरित गेला.

 

सनातनच्या आश्रमाविषयी अनभिज्ञ किंवा अपसमज
असल्यामुळे तो पहाण्यासाठी न येणे, हे हिंदूंचे दुर्भाग्यच !

५२ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मला या ठिकाणी येण्याचा योग यावा, याचाच अर्थ माझ्यासारख्या असंख्य लोकांना सनातन संस्था आणि सनातन आश्रम यांविषयी माहिती नाही आणि जरी माहिती असली, तरी अपसमजामुळे या संस्थेत किंवा आश्रमांत येण्याचा विचार कोणी करत नाही, हे आपल्या हिंदू म्हणून जन्माला आलेल्यांचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल.

 

अध्यात्मप्रसार ही काळाची आवश्यकता !

आमच्यावर असलेले दिवंगत माता-पित्यांचे संस्कार आणि नियमित आध्यात्मिक ग्रंथ वाचन यांमुळे अनुभवलेले आत्मस्वरूप आणि आत्मज्ञान यांचे वर्णन शब्दांच्या पलीकडे आहे. अध्यात्मप्रसारासाठी वैयक्तिक पातळीवर सामाजिक प्रयत्न होऊ लागल्यावर मना-मनात परिवर्तन घडेल आणि तीच आजच्या काळाची आवश्यकता आहे.

 

व्यवस्थापनाचे मनःपूर्वक आभार ! जय हिंद ! जय सनातन !

– डॉ. प्रल्हाद रा. चव्हाण, तारापूर, मुंबई. (३१.१२.२०१३)

 

सध्याच्या काळात साधक मंडळी एकत्र राहून सेवावृत्तीने कर्म करत आहेत, हे पाहून आनंद वाटला !

मी आपल्या आश्रमाविषयी ऐकून होतो; परंतु आज प्रत्यक्ष येऊन पहाणे झाले. अत्यंत समाधान वाटले. येथील स्वच्छता, टापटीप, नीटनेटकेपणा, विनयशील आदरातिथ्य इत्यादी गोष्टींमुळे अगदी भारावून गेलो. आताच्या काळात इतकी साधक मंडळी एकत्र राहून सेवावृत्तीने कर्म करत आहेत, हे पाहून आनंद वाटला. स्वधर्माचे, सनातन धर्माचे कार्य तळमळीने आणि आदराने करणार्‍या या संस्थेचा उत्तरोत्तर उत्कर्ष होवो. सर्वांना ईश्‍वरकृपेचा लाभ होवो, अशी ईश्‍वर चरणी प्रार्थना !

– वेदमूर्ती श्री. गणेश अनंत साळस्कर, राजापूर, जि. रत्नागिरी.

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’

Leave a Comment