कुंभपर्व ! प्रत्येक १२ वर्षांनी येणारे हे पर्व हिंदूंसाठी महत्त्वाच्या पर्वांपैकी एक !! १२ कुंभपर्व झाल्यानंतर येणारे पर्व हे ‘महाकुंभपर्व’ असते. हाच योग १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत प्रयागराज येथे आला आहे. यानिमित्त देशभरातील साधू-संत प्रयागक्षेत्री आले आहेत. त्यात सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (सद्गुरुद्वयी) यांनी २१ आणि २२ जानेवारी २०२५ या दिवशी तीर्थराज प्रयागराजचा दौरा केला. त्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. हा दौरा दैवी आणि ऐतिहासिक ठरला. त्याविषयी संक्षिप्त स्वरूपात जाणून घेऊया.
– श्री. नीलेश कुलकर्णी
आखाड्यांच्या भेटी ठरल्या वैशिष्ट्यपूर्ण !

सद्गुरुद्वयींनी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत रवींद्रपुरीजी महाराज यांची त्यांच्या कुंभक्षेत्रातील सेक्टर २० मध्ये असलेल्या ‘श्री पंचायती निरंजनी आखाड्या’त जाऊन भेट घेतली. या वेळी आखाड्यातील इतर भाविक आणि सेवक यांच्या चेहर्यावर ‘या कुणी तरी वेगळ्याच आणि दैवी आहेत’, असा भाव दिसत होता. या वेळी दोन्ही सद्गुरुद्वयींनी आखाड्याचा परिसर फिरून तेथे चालणार्या आध्यात्मिक कार्याविषयी जिज्ञासेने जाणून घेतले.
यासह त्यांनी ‘आनंद आखाड्या’त जाऊन आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर अनंत विभूषित श्री श्री १००८ स्वामी बालकानंदगिरी महाराज यांचीही भेट घेतली.
हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उदात्त हेतूने त्रिवेणी संगमावर संकल्पपूजन !
श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे २१ जानेवारी या दिवशी कुंभक्षेत्री आगमन झाले. त्यांच्या हस्ते विश्वकल्याणासाठी भारतात हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे, तसेच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना दीर्घायुरारोग्य लाभावे, या उद्देशाने तीर्थराज प्रयागराज येथील महाकुंभपर्वात गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या पवित्र त्रिवेणी संगमावर संकल्पपूजन आणि प्रार्थना करण्यात आली. याप्रसंगी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ, सनातनचे धर्मप्रचारक पू. प्रदीप खेमका, त्यांची पत्नी पू. (सौ.) सुनीता खेमका यांची वंदनीय उपस्थिती होती. त्रिवेणी संगमावर ज्याप्रमाणे भाविक गंगा, यमुना आणि सरस्वती यांना स्वतःच्या उत्कर्षाचे साकडे घालतात, त्याप्रमाणे या संतद्वयींनी हिंदु राष्ट्र रूपी समस्त हिंदूंच्या कल्याणाचे साकडे घातले !
महाकुंभपर्वातील ऐतिहासिक क्षण : ‘हिंदु राष्ट्र पदयात्रा’

२२ जानेवारीला काढण्यात आलेली ‘हिंदु राष्ट्र पदयात्रा’ आणि त्यात रथारूढ सद्गुरुद्वयींचा सहभाग, हा महाकुंभपर्वातील ऐतिहासिक क्षण ठरला. अनेकांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या वर्ष २०२२ मध्ये काढण्यात आलेल्या दिव्य रथोत्सवाची आठवण झाली. रथारूढ सद्गुरुद्वयी अत्यंत तेजस्वी दिसत होत्या. त्यांचे दैवी तेज पाहूनच पदयात्रेतील मार्गावर अनेक भाविकांसह साधूही कुठलीही ओळख नसतांनाही हात जोडून त्यांना मनोभावे नमस्कार करत होते. या संतद्वयीसुद्धा त्यांना हात जोडून नमस्कार करत होत्या. रिक्शा, बस आदींमधील प्रवासीही सद्गुरुद्वयींची छायाचित्रे काढत होते. या रथोत्सवाच्या मार्गावर येणार्या आखाड्यांच्या बाहेर असलेले साधू-संत, नागा साधू आदी हात उंचावून ‘हिंदु राष्ट्रा’चा जयघोष करत होते. एकूणच ही ऐतिहासिक पदयात्रा ब्राह्म आणि क्षात्र तेजाचे प्रतीक ठरली !
सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी सद्गुरुद्वयींना ‘याचि देही, याची डोळा’ पाहिल्यावर आनंदित झालेले साधक !

कुंभक्षेत्री अध्यात्माचा प्रसार व्हावा, हिंदूंना धर्मशिक्षण मिळावे आणि हिंदूंमध्ये हिंदु राष्ट्राविषयी जागृती व्हावी, या उद्देशांनी ‘सनातन संस्था वाराणसी’ अन् ‘सनातन संस्था गोवा’ या संस्थांच्या वतीने भव्य ग्रंथ आणि फलक प्रदर्शन लावण्यात आले आहे. सद्गुरुद्वयींनी २२ जानेवारीला या प्रदर्शनाला भेट दिली. सद्गुरुद्वयींचे आगमन होणार, हे कळताच साधक वेगळ्या भावविश्वात गेले. आजपर्यंत ज्यांच्याविषयी आपण ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांमधून वाचत होतो, त्यांचे प्रत्यक्ष दर्शन होणार असल्याने साधकांमध्ये आनंदीआनंद निर्माण झाला. सद्गुरुद्वयींचे प्रदर्शनस्थळी आगमन होताच अनेक साधकांचे हात जोडले जाऊन डोळ्यांत भावाश्रू तरळले. अनेक साधकांच्या चेहर्यावरचे भाव त्यांच्या मनातील भावना प्रकट करणारे होते. सर्व साधक निःशब्द होऊन सद्गुरुद्वयींचे भावपूर्ण दर्शन घेत होते. सद्गुरुद्वयींनीही साधकांशी सहजतेने आणि आपुलकीने संवाद साधण्यास आरंभ केला. साधकांची विचारपूस केली. यामुळे साधक आणखी कृतकृतार्थ झाले. यानंतर सद्गुरुद्वयींनी प्रदर्शनस्थळी लावलेले ग्रंथ आणि फलक यांचे अवलोकन केले. या प्रत्येक ठिकाणी त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या साधकांशी अनौपचारिक संवाद साधला. अनेकांना ‘सेवा करतांना आनंद मिळत आहे ना ?’, असे विचारले, ‘जणू त्यांना प्रत्येक साधक सेवेच्या माध्यमातून साधनेच्या पुढच्या टप्प्यात जायला हवा’, अशीच तळमळ होती.

सद्गुरुद्वयींच्या केवळ दर्शनमात्रे अनेकांच्या उत्साहात वाढ झाली, त्यांचे मन प्रफुल्लित झाले. यानंतर त्यांनी फिरते ग्रंथप्रदर्शन असणार्या ‘ई-रिक्शा’चे अवलोकन करून त्यातील बारकावे जिज्ञासेने जाणून घेतले. यानंतर त्या प्रदर्शनस्थळी ठेवण्यात आलेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या छायाचित्रासमोर आल्या आणि त्यांनी भावपूर्ण नमस्कार केला. यासह सद्गुरुद्वयींनी या प्रदर्शनाच्या मागील बाजूस असलेल्या साधकांच्या निवासव्यवस्थेचीही पहाणी केली. अशाच प्रकारे हिंदु जनजागृती समिती आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय यांच्या प्रदर्शनांनाही सद्गुरुद्वयींनी भेट दिली. संतद्वयींच्या दर्शनामुळे विविध राज्यांतून महाकुंभपर्वात येऊन सेवा करणार्या साधकांचा आनंद द्विगुणित झाला आणि साधकांसाठी ही भेट खर्या अर्थाने महापर्व ठरली !
– श्री. नीलेश कुलकर्णी, विशेष प्रतिनिधी, सनातन प्रभात, प्रयागराज.
सद्गुरुद्वयींनी अक्षय्यवटाचे दर्शन घेतल्याचा भावविभोर करणारा क्षण !

जो या पृथ्वीच्या उत्पत्तीपासून उभा आहे आणि प्रलयातही जो नष्ट होत नाही, अशा अतीप्राचीन दैवी अक्षय्यवटाचे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी दर्शन घेतले. ‘पृथ्वीच्या प्रलयाच्या वेळी भगवान श्रीविष्णु याच अक्षय्यवटाच्या पानावर शिशुरूपात जाऊन वास करतात’, अशी मान्यता आहे. यासह ‘अक्षय्यवटाच्या केवळ दर्शनमात्रे मोक्षप्राप्ती होते’, अशीही हिंदूंची श्रद्धा आहे. अशा दैवी वृक्षाचे सद्गुरुद्वयींनी दर्शन घेतल्याचा क्षण भावविभोर करणारा होता.
हिंदूऐक्याचा आविष्कार : सद्गुरुद्वयींची ‘विश्व हिंदु परिषदे’च्या शिबिराला भेट !

विहिंपचे मुंबईच्या धर्माचार्य विभागाचे प्रमुख श्री. नवलकिशोर पुराणिक यांनी दूरभाषद्वारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना (सद्गुरुद्वयींना) विहिंपच्या शिबिरामध्ये (पेंडॉलमध्ये) येण्याचे आमंत्रण दिले होते. ‘विहिंपचे संत संमेलन होणार आहे, त्यात सद्गुरुद्वयींनी उपस्थित रहावे’, अशी श्री. पुराणिक यांची इच्छा होती. गेल्या वर्षी अयोध्येतील श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी विहिंपच्या कोकण प्रांताच्या पदाधिकार्यांची सद्गुरुद्वयींशी जवळीक झाली होती. त्यामुळे त्यांची भेट घेण्यासाठी सद्गुरुद्वयींनी विहिंपच्या शिबिराला भेट दिली. या वेळी धर्माचार्य विभागाच्या पदाधिकार्यांनी अतिशय प्रेमाने आणि आपुलकीने स्वागत केले. यासह विहिंपचा शिबिरातील परिसर दाखवला. सद्गुरुद्वयींनी संत निवास, कार्यकर्ते निवास, वैशिष्ट्यपूर्ण अन्नपूर्णा कक्ष, कार्यालय, चिकित्सालय, प्रसिद्धी कक्ष, संत संमेलनाचा भव्य मंडप इत्यादी पाहून त्या मागील विचार समजून घेतला. ही भेट हिंदूऐक्याचा आविष्कार दर्शवणारी होती.
सद्गुरुद्वयींची आनंद आखाड्याला भेट : एक भावपूर्ण क्षण !

सनातनच्या गुरुपरंपरेतील आनंद आखाडा, आदि शंकराचार्यांचा कृपाशीर्वाद तयाला ।
सनातनच्या सद्गुरुद्वयी मातृपीठाला भेट देती, आचार्य महामंडलेश्वर यांचा आशीर्वाद घेती ॥
सनातन संस्थेची गुरुपरंपरा ही शंकराचार्यांचे शिष्य तोटकाचार्य यांच्यापासून निर्माण झालेल्या आनंद आखाड्यापासूनची आहे. श्रीमद् चंद्रशेखरानंद परमहंस, श्री अनंतानंद साईश (श्री चंद्रशेखरानंद परमहंस यांचे शिष्य), श्री भोलानंद (श्री भुरानंद) महाराज आणि संत भक्तराज महाराज (श्री अनंतानंद साईश यांचे शिष्य, आखाडा परंपरेनुसार संत भक्तराज महाराज यांचे नाव श्री नित्यानंद महाराज असे आहे.), प.पू, रामानंद महाराज, प.पू. अच्युतानंद महाराज आणि प.पू. डॉ. आठवले (संत भक्तराज महाराज यांचे शिष्य), अशी गुरुपरंपरा आहे. त्यामुळे आखाडा परंपरेत सनातन संस्था ही आनंद आखाड्याच्या अंतर्गत येते. त्यामुळे मातृपीठाला भेट देण्यासाठी प.पू. डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी (सद्गुरुद्वयींनी) सध्याचे आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर अनंत विभूषित श्री श्री १००८ स्वामी बालकानंदगिरी यांची भेट घेतली आणि त्यांना सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला भेट देण्याचे आमंत्रण दिले. सद्गुरुद्वयींना भेटून स्वामी बालकानंदगिरी यांना फार आनंद झाला आणि त्यांनी सनातनच्या कार्याला भरभरून आशीर्वाद दिला.
आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंदगिरिजी महाराज यांच्या ‘प्रभुप्रेमी संघ शिबिरा’तील व्यवस्थेचे जिज्ञासेने अवलोकन !

संपूर्ण कुंभमेळ्यात २० एकर परिसरात पसरलेले जुना आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंदगिरिजी महाराज यांचे ‘प्रभुप्रेमी संघ शिबीर’ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे. या शिबिराचे व्यवस्थापक श्री. एस्. एम्. तुलश्याम यांनी सद्गुरुद्वयींना संपूर्ण शिबीर दाखवले. शिबिरातील मंदिरे, प्रवचन कक्ष, निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, कार्यालय, चिकित्सालय, विक्री केंद्र इत्यादींची रचना आणि त्यामागील सूक्ष्म विचार त्यांनी सांगितल्यानंतर ‘सहस्रो
लोकांची एकाच वेळी व्यवस्था कशी केली जाते ?’, हे यातून लक्षात आले.
‘इस्कॉन’च्या भव्य अन्नपूर्णा कक्षाला दिलेली भेट ठरली अविस्मरणीय !

या वर्षी ‘इस्कॉन’ या आध्यात्मिक संस्थेने सुप्रसिद्ध अशा ‘अदानी उद्योग समुहा’च्या साहाय्याने ‘मेगा किचन’ (भव्य अन्नपूर्णा कक्ष) उभारले आहे. या माध्यमातून प्रतिदिन ३५ ते ५० सहस्र भाविकांना महाप्रसाद दिला जात आहे. या ‘मेगा किचन’ची रचना समजून घेण्याच्या दृष्टीने सद्गुरुद्वयींनी ‘इस्कॉन’च्या शिबिराला भेट दिली.

‘इस्कॉन’चे भरूच, गुजरात येथील प्रमुख डॉ. मुरलीधर दास यांनी सद्गुरुद्वयींचे स्वागत केले, तसेच त्यांना इस्कॉनच्या शिबिरातील श्रीकृष्ण मंदिर, भागवद् कथेतील देखावे, अन्नपूर्णा छत्र, तसेच ‘मेगा किचन’ यांची सविस्तर माहिती सांगितली. डॉ. दास म्हणाले, ‘‘इस्कॉन’चे भक्त सनातनची सात्त्विक उत्पादने नियमित वापरतात. अशी उत्पादने कुठेच मिळत नाहीत. याचा भारतभर प्रसार होण्यासाठी आम्ही तुम्हाला साहाय्य करू.’’
‘सनातन, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि हिंदु राष्ट्र’, हाही दैवी त्रिवेणी संगमच !

आज सर्वत्र ‘सनातन’चा उद्घोष चालू आहे. महाकुंभक्षेत्री ‘सनातन’ हा शब्द पावलोपावली कानी पडत आहे. आज हिंदुत्वनिष्ठ संस्था, संघटना, धार्मिक- आध्यात्मिक संस्था आदी सर्वांच्याच मुखी ‘सनातन धर्म’, ‘सनातन राष्ट्र’, ‘सनातन संस्कृती’, असे शब्द पदोपदी आहेत. ‘सनातन’ या शब्दाने हिंदूंना जणू एक नवी उभारी मिळत आहे. ‘सनातन संस्थे’चे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ३४ वर्षांपूर्वीच, म्हणजे वर्ष १९९० मध्ये ‘सनातन भारतीय संस्कृती संस्था’ या नावाने संस्थेची स्थापना करून जनमानसावर ‘सनातन’ शब्दाचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व बिंबवले. विशेष म्हणजे त्या काळी, म्हणजे ३४ वर्षांपूर्वी ‘सनातन’ म्हणजे ‘बुरसटलेले’ असा अर्थ रूढ होता. त्या काळी हा शब्द उच्चारणेही कमीपणाचे मानले जाई. कुणी त्याचा फारसा वापर करत नसत. त्यातच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘सनातन’चा खरा अर्थ समाजाला समजावून सांगितला. परिणामस्वरूप आज ‘सनातन’ हा शब्द हिंदूंच्या जीवनाचा अविभाज्य अंग बनत चालला आहे. ‘हिंदूंच्या मनात आणि हृदयात ‘सनातन’चा झेंडा रोवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे या पृथ्वीवर लोककल्याणकारी हिंदु राष्ट्राचाही झेंडा रोवतील’, अशी सनातनच्या साधकांची दृढ श्रद्धा आहे !
ज्याप्रमाणे गंगा, यमुना आणि सरस्वती या त्रिवेणी संगमाचे महत्त्व कालातीत आहे, त्याप्रमाणे ‘सनातन, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि हिंदु राष्ट्र’, या दैवी त्रिवेणी संगमाचे महत्त्व युगानुयुगे राहील ! त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी सद्गुद्वयींचा प्रयागराजचा दैवी दौरा, ही त्याचीच प्रचीती आहे. अशा महान तीन अवतारी गुरूंच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती थोडीच आहे !