सातारा, २३ जानेवारी (वार्ता.) – येथील शाहूपुरी, खिंडवाडी आणि क्षेत्र माऊली या ठिकाणी सनातन संस्थेने बालक-पालक मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला बालक आणि पालक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या मेळाव्याला प्रारंभ झाला. या मेळाव्याचा लाभ ७७ बालक आणि २० पालक यांनी घेतला.
सनातन संस्थेने गतवर्षी एप्रिलमध्ये या बालसंस्कार वर्गांना प्रारंभ केला होता. या सर्वच बालसंस्कारवर्गांचा एकत्रित बालक-पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. क्षेत्र माहुली येथील मेळाव्यामध्ये प्राध्यापिका सौ. भक्ती डफळे आणि सौ. मनीषा बोराटे यांनी, खिंडवाडी येथील मेळाव्यामध्ये सौ. विद्या कदम आणि श्रीमती लता झुंजुर्णे यांनी, तर शाहूपुरी येथील मेळाव्यामध्ये सौ. वैशाली घाडगे आणि सौ. सई मोरे यांनी बालकांना मार्गदर्शन केले. सनातन संस्थेच्या पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी उपस्थित बालक आणि पालक यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन केले. बालसंस्कारवर्ग घेण्याचा उद्देश, तसेच संस्कारक्षम भावी पिढी निर्माण होण्यासाठी करायचे प्रयत्न, राष्ट्र आणि धर्म यांसाठी बालकांमध्ये आवश्यक असणारे गुण यांविषयी मान्यवरांनी बालक आणि पालक यांना मार्गदर्शन केले.
उपस्थित पालकांचे अभिप्राय
वर्गाला उपस्थित असलेल्या पालकांनी पुढील अभिप्राय दिला. बालसंस्कारवर्गामध्ये सहभागी झालेल्या बालकांमध्ये पालट झाले आहेत. ते आता घरी नियमित स्तोत्रपठण आणि मंत्रपठण करत आहेत. बालकांमध्ये चांगल्या सवयी जाणवू लागल्या आहेत. बालसंस्कारवर्गामुळे मुलांमधील आत्मविश्वास, नियोजन कौशल्य, नेतृत्वगुण, तसेच सहकार्याची वृत्ती वाढली आहे. आम्ही त्यांच्याकडून स्तोत्र, मंत्र पठण करून घेण्यास अल्प पडत आहोत. सनातनचे बालसंस्कार वर्ग प्रतिदिन घ्यायला हवेत.