राजस्थानमधील जैसलमेर आणि सोजत येथे ‘बालक-पालक परिचय सोहळ्या’चे आयोजन
जैसलमेर/सोजत (राजस्थान) – सनातन संस्थेने जैसलमेर आणि सोजत येथे बालसंस्कार वर्गातील मुले अन् त्यांचे पालक यांच्यासाठी ‘बालक-पालक परिचय सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले. जैसलमेर येथील कार्यक्रमात बालसंस्कार वर्गातील मुलांनी ‘बालसंस्कार वर्गात मिळालेल्या शिक्षणामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक पालट झाले आहेत’, असे मनोगत व्यक्त केले. या वेळी पालकांनीही मनोगत व्यक्त करतांना ‘बालसंस्कार वर्गात प्रवेश घेतल्यानंतर मुलांच्या स्वभावात, वागण्यात आणि विचारसरणीत उल्लेखनीय पालट झाले आहेत’, असे सांगितले. या कार्यक्रमाला हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांची ‘ऑनलाईन’ वंदनीय उपस्थिती लाभली.
जैसलमेर येथील कार्यक्रमात श्री. किरण कबाडी यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला, तर रिना भरडिया यांनी ‘मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवण्यात पालकांची भूमिका आणि प्रयत्न’, यांविषयी मार्गदर्शन केले. सोजत येथे सनातनच्या सौ. अर्चना लढ्ढा यांनी ‘सुसंस्कृत मुलांचे संगोपन करण्यात पालकांची भूमिका’, याविषयी मार्गदर्शन केले.