महाकुंभ मेळा २०२५ येथील हिंदु राष्ट्र पदयात्रेत सनातन संस्था सहभागी !

हिंदु राष्ट्राचे प्रेरणास्रोत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी डावीकडून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ तथा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती !

प्रयागराज, २२ जानेवारी (वार्ता.) : अयोध्या येथे श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा स्थापना सोहळ्याला २२ जानेवारी २०२५ या दिवशी १ वर्ष पूर्ण झाल्याच्या शुभप्रसंगी हिंदु राष्ट्राच्या मागणीसाठी येथे ‘हिंदु राष्ट्र पदयात्रा’ काढण्यात आली. याद्वारे संपूर्ण कुंभक्षेत्री हिंदु राष्ट्राचा हुंकार घुमला.

सेक्टर १९ मधील मोरी-मुक्ती मार्ग चौकातून दुपारी २.४५ वाजता या पदयात्रेला आरंभ झाला. या पदयात्रेत हिंदु राष्ट्र स्थापनेचे प्रेरणास्त्रोत आणि सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ तथा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या विशेष रथात विराजमान होत्या. या प्रसंगी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समितीचे उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक सद्गुरु नीलेश सिंगबाळ, सनातनचे धर्मप्रचारक पू. प्रदीप खेमका, तसेच त्यांची पत्नी पू. (सौ.) सुनीता खेमका यांची वंदनीय उपस्थिती होती. यासह या पदयात्रेत अनेक आध्यात्मिक संस्था, हिंदुत्वनिष्ठ संघटना, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे अधिवक्ता, हिंदुत्वनिष्ठ आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आरंभी येथील सनातनच्या ग्रंथप्रदर्शन स्थळी वाराणसी येथील ‘स्वामी करपात्रीजी महाराज धर्मसंघ शिक्षण मंडळा’चे महामंत्री श्री. जगजीतन पांडये यांच्या हस्ते धर्मध्वजाचे पूजन करण्यात आले. याचे पौरोहित्य श्री. जयेश कापशीकर यांनी केले. यानंतर येथून चालू झालेली ही पदयात्रा संगम लोवर मार्ग, काली मार्ग येथून मोरी मार्गाने जाऊन पुन्हा मोरी-मुक्ती चौकात समाप्त झाली. या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड समन्वयक श्री. सुनील घनवट अन् हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश तथा बिहार या राज्यांचे समन्वयक श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी हेही उपस्थित होते.

पदयात्रेमुळे कुंभक्षेत्र झाले भगवेमय !

पदयात्रेत सहभागी धर्मप्रेमींनी धारण केलेली भगवी वस्त्रे, हातात धरलेले भगवे ध्वज, आसमंत दुमदुमुन सोडणारा हिंदु राष्ट्राचा उद्घोष आदींमुळे संपूर्ण कुंभक्षेत्र भगवेमय बनले होते. या वेळी उपस्थितांनी ‘जय श्रीराम, हिंदु राष्ट्राचा विजय असो’, ‘लाना होगा लाना होगा, हिंदु राष्ट्र लाना होगा’, ‘जो हिंदु हित का काम करेगा, वही देशपर राज करेगा’, ‘हर हर महादेव’, ‘गंगामाता की जय हो’ आदी उत्स्फूर्त घोषणा दिल्या. ही पदयात्रा हिंदु राष्ट्र स्थापनेची ग्वाही देणारी ठरली.

Hindu Rashtra Padyatra by Hindu Janajagruti Samiti | Uniting Hindus at #Mahakumbh2025 ‪@hindujagruti‬

महाकुंभक्षेत्री झाला हिंदु राष्ट्राचा जयघोष ।

अखिल विश्‍वात स्थापन होईल कल्याणकारी हिंदु राष्ट्र ॥

चला, अनुभवू महाकुंभक्षेत्रातील हिंदु राष्ट्राप्रीत्यर्थची दिव्य पदयात्रा !

मोक्षनगरीतील हिंदु राष्ट्राच्या जयघोषाने ।
दुमदुमले पृथ्वी, आकाश आणि स्वर्ग ॥

पदयात्रा नव्हे, हे मार्गक्रमण साधू-संतांचे ।
सच्चिदानंद परब्रह्माच्या संकल्पासाठीच्या पूर्तीचे ॥

हिंदु राष्ट्राचे प्रेरणास्थान सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची फुलांनी सजवलेली प्रतिमा ! रस्त्याच्या दुतर्फा असणारे साधू-संत, तसेच भाविक प्रतिमेला नमस्कार करत होते !
पदयात्रेच्या आरंभी धर्मध्वजाला भावपूर्ण नमस्कार करतांना उजवीकडून श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सद्गुरु नीलेश सिंगबाळ आणि सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे
उत्स्फूर्तपणे घोषणा देतांना साधू, स्वामी भरतानंद महाराज आणि शेजारी श्री. सुनिल घनवट
हिंदु राष्ट्र पदयात्रेतील सहभागी साधक आणि धर्मप्रेमी

‘समुद्रमंथनाच्या वेळी समस्त ब्रह्मांडाच्या कल्याणासाठी ज्याप्रमाणे अमृत देवतांकडे असणे आवश्यक होते, त्याचप्रमाणे अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी हिंदूंचे हिंदु राष्ट्र असणे आवश्यक आहे’, असाच जणू संदेश या पदयात्रेतून देण्यात आला !

महाकुंभात आयोजित हिंदु राष्ट्र पदयात्रेतील वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रे !

१. पदयात्रेच्या वेळी हिंदु राष्ट्राचे प्रेरणास्थान सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा जयघोष करण्यात आला, तसेच त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

२. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ तथा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या  फुलांनी सुशोभित केलेल्या एका रथात विराजमान झाल्या होत्या. रथाच्या पुढे ४ अश्‍वांची प्रतिमा होती. रथाच्या वरच्या भागात सात्त्विक फुलांनी सजवलेली छत्री होती. त्यावर श्री हनुमंताचे चित्र लावले होते.

३. रस्त्याच्या दुतर्फा असणारे अनेक साधू-संत, तसेच भाविक हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चित्राचे अन् श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ तथा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना हात जोडून भावपूर्ण नमस्कार करत होते. रथात विराजमान असलेल्या दोन्ही संतही सर्वांना भावपूर्ण नमस्कार करत होत्या.

४. रथाच्या वर असलेले श्री हनुमंताचे छायाचित्र आणि त्यावर असलेला ध्वज हे  पदयात्रेचे आकर्षण ठरले. रथावर लावलेला ध्वज झुकला होता जणू तो श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजलीकाकू यांना आशीर्वाद देत होता !

५. पदयात्रेतील वाटेवर असणार्‍या विविध आखाड्यांच्या समोर पदयात्रा येताच तेथील संतांना उद्घोषणा करून वंदन करण्यात येत होते.

६. मार्गात अनेक साधू-संत, नागा साधू पदयात्रेत सहभागी झालेल्यांना हात उंच करून आशीर्वाद दिला.

७. हिंदूंच्या संरक्षणासाठी लढणारे धर्मेश फाऊंडेशनचे पदाधिकारी उस्फूर्तपणे पदयात्रेत सहभागी झाले होते.

८. काही संत, मार्गातील काही धर्मप्रेमी पदयात्रेत काही काळ सहभागी झाले होते.

९. वाहतुकीला कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी प्रारंभीपासून ते शेवटपर्यंत दोरीने पदयात्रेचे नियमन करण्यात आले होते.

१०. मार्गातील शेकडो नागरिकांनी पदयात्रेची छायाचित्रे काढली. पदयात्रेचे चित्रीकरण केले, तर अनेकांनी पदयात्रेसमवेत सेल्फी (वैशिष्ट्यपूर्ण प्रसंगासमवेत स्वतःच स्वतःचे छायाचित्र काढणे) काढली.

११. ‘हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, यासाठी पदयात्रेच्या शेवटी कुंभस्थित देवता आणि ऋषिमुनी यांच्या चरणी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.

१२. या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या रथासमोर साधिका रामधुनवर भावपूर्ण टाळ वाजवत होत्या.

१३. रथाच्या मालकाने या रथाला ‘पांडव’ असे नाव दिले होते, तसेच रथावर गदा आदी चित्रे लावली होती.

हिंदु राष्ट्राची स्थापनेचा संकल्प लवकरच फलद्रुप होईल ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे म्हणाले की, हिंदु धर्म ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ची शिकवण देतो. अशा धर्माला राज्यघटनेद्वारे अधिकृत संरक्षण मिळण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक आहे. ही मागणी विश्‍वकल्याणासाठी कार्यरत असलेल्या हिंदु संस्कृतीला जिवंत ठेवण्यासाठी आहे. महाकुंभपर्वाकडे पूर्ण जगाचे लक्ष आहे. त्यामुळे या पदयात्रेच्या माध्यमातून हिंदु संत, महंत, देश-विदेशांतील हिंदु समाज यांच्या मनातील हिंदु राष्ट्राची मागणी आम्ही सरकारपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. संतांच्या सान्निध्यात कुंभसारख्या महत्त्वपूर्ण पर्वावर प्रयागराजसारख्या धार्मिक नगरीत केलेली हिंदु राष्ट्राची स्थापनेचा संकल्प स्वप्न लवकरच फलद्रुप होईल, अशी आमची श्रद्धा आहे.

उपस्थित मान्यवर !

१. श्री श्री १००८ महामंडलेश्‍वर राहुलदासजी महाराज, भाग्यनगर, तेलंगाणा
२. श्री श्री १००८ महंत नारायणदासजी महाराज, पुणे
३. श्री श्री १००८ महामंडलेश्‍वर रामदासजी काठिया महाराज, इंदूर
४. स्वामी भारतानंद सरस्वती महाराज, महामंत्री, अखिल भारतीय संत समिती, महाराष्ट्र प्रदेश
५. जाग्रत आचार्य, शिवपुरी, मध्यप्रदेश
६. श्री. बलवीर मिल्खा, पंजाब
७. श्री. ब्रिजभूषण सैनी, राष्ट्रीय अध्यक्ष, देवसेना

घोषणाफलक ठरले लक्षवेधी !

या पदयात्रेत ‘सनातन धर्म की जय हो, भारत हिन्दू राष्ट्र हो; सुरक्षित हिन्दू बलशाली देश, यही हिन्दू राष्ट्र का उद्देश; १०० करोड हिन्दुओ की पुकार, हिन्दू राष्ट्र हमारा अधिकार; करने मां-बहनों का संरक्षण, करो हिन्दू राष्ट्र का समर्थन; मंदिरों का करने उत्थान, करे हिन्दू राष्ट्र का निर्माण; हर घर भगवे का जयगान, हिन्दू राष्ट्र बने हिन्दुस्थान; गौ, गंगा और गीता का हो सम्मान, हिन्दु राष्ट्र का करें निर्माण; सेक्युलरिजम का षडयंत्र, अंत करेगा हिन्दू राष्ट्र का मंत्र; धर्मनिरपेक्षता का ढोंग छोडो, हिन्दु राष्ट्र हेतु हिन्दु जोडो; असे धरण्यात आलेले विविध घोषणाफलक लक्षवेधी ठरले.

Leave a Comment