महाकुंभक्षेत्री आग लागलेल्या घटनास्थळी सनातन संस्थेच्या साधकांचे प्रशासनास साहाय्य !

सनातनच्या साधकांनी गर्दी नियंत्रित करून साहित्य हालवण्यास साहाय्य केले !

आग लागलेल्या ठिकाणी गर्दी नियंत्रित करतांना सनातनचे साधक

प्रयागराज, २० जानेवारी (वार्ता.) – महाकुंभक्षेत्रातील सेक्टर १९ मधील शास्त्री पुलाच्या जवळ असलेल्या तंबूंमध्ये १९ जानेवारी या दिवशी सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत गीत प्रेसच्या २०० तंबूंचा कोळसा झाला. सनातन संस्थेचे ग्रंथ प्रदर्शनही सेक्टर १९ येथील मोरी मुक्ती मार्गावर आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सनातन संस्थेच्या साधकांनी तात्काळ आग लागलेल्या ठिकाणी जाऊन तेथील अग्नीशमन दल, पोलीस, एन्.डी.आर्.एफ् आणि प्रशासकीय कर्मचारी यांना साहाय्य केले.

आग लागल्यानंतर ती पहाण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीतूनच अग्नीशमन दलाच्या गाड्या येत असतांना त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. या वेळी सनातनच्या साधकांनी भाविकांची झालेली गर्दी नियंत्रित करून अग्नीशमन दलाच्या गाड्यांना वाट मोकळी करून दिली, तसेच त्या परिसरातील वाहतूक सुरळित केली. या वेळी सनातनच्या साधकांनी तंबूतील साहित्य इतरत्र हालवण्यास प्रशासकीय कर्मचार्‍यांना साहाय्य केले.

 

तंबूंना आग लागल्यानंतर १० मिनिटांत अग्नीशमन दलाची गाडी आणि प्रशासकीय अधिकारी पोचले !

प्रशासनाचे कौतुकास्पद कार्य !

आगीमध्ये जळून खाक झालेले तंबू

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा प्रयागराजचा दौरा असल्याने प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांची सर्व पथके सतर्क होती. त्यातच सेक्टर १९ येथे आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर केवळ १० मिनिटांत अग्नीशमन दलाच्या ३२ गाड्या आणि १६० सैनिक, त्यांचे अधिकारी, उत्तरप्रदेशचे पोलीस, एन्.डी.आर्.एफ्.चे १५४ सैनिक अन् ‘एस्.डी.आर्.एफ्.’चे ५ पथकांतील १२५ सैनिक तातडीने घटनास्थळी पोचले. ५ पोलीस ठाण्यांतील वाहतूक आणि शहर असे एकूण ४२० पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेरले. या वेळी सनातन संस्थेच्या साधकांसह इतर स्वयंसेवी संस्थेच्या लोकांचेही साहाय्य मिळाले. या सर्वांनी आगीपासून भाविकांना दूर केले. त्यानंतर साहित्य सुरक्षित स्थळी हालवले. रुग्णवाहिकाही आल्या होत्या. या घटनेत जसप्रीत सिंह नावाचे गृहस्थ घायाळ झाले होते. त्यांना त्वरित रुग्णालयात नेण्यात आले. मेळा क्षेत्रातील रुग्णालयांना सतर्क रहाण्यास सांगण्यात आले. भाविकांची गर्दी अधिक होऊ नये, यासाठी सर्व रस्ते काही वेळेसाठी बंद करण्यात आले होते. अफवा पसरू नये म्हणून अग्नीशमन दलाचे अधिकारी आणि महाकुंभ मेळ्याचे अधिकारी यांनी प्रसारमाध्यमांना घटनेची सर्व माहिती देऊन अफवांपासून सावध रहाण्याचे आवाहन केले. प्रशासकीय अधिकार्‍यांनी तत्परतेने दाखवलेल्या कृतीमुळे भाविकांमधून अधिकारी आणि कर्मचारी यांचे कौतुक केले.

Leave a Comment