सनातन धर्म सोप्या भाषेत समजून घेण्याची भाविकांना अनमोल संधी !
प्रयागराज – सनातन धर्म, संस्कृति आणि परंपरांचा वैज्ञानिक आणि आध्यात्मिक आधार समजावून देणारे ‘सनातन संस्कृति प्रदर्शन’ प्रयागराज येथील कुंभमेळ्यात आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन १२ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत सनातन संस्था शिबीर, सेक्टर ९, गंगेश्वर महादेव मार्ग, प्रयागराज येथे सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत खुले राहील. सनातन धर्मविषयी सोप्या भाषेत माहिती देणार्या या प्रदर्शनाला कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांनी भेट द्यावी, असे आवाहन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
हिंदु राष्ट्राविषयी जागृतीची आवश्यकता : या वेळी श्री. राजहंस म्हणाले, “कुंभमेळा हा कोट्यवधी भाविकांच्या भक्तीचा महामेळा आहे; मात्र अनेकांना सनातन धर्म, संस्कृति आणि परंपरा यांमागील शास्त्र माहिती नसल्यामुळे त्याचा अपेक्षित आध्यात्मिक लाभ होत नाही. सध्या कॉन्व्हेंट शाळेत बायबल आणि मदरशांमध्ये कुराण शिकविले जाते; परंतु सामान्य हिंदूंना त्यांच्या धर्मासंबंधी ज्ञान देणारी कोणतीही व्यवस्था नाही. यामुळे ‘सनातन धर्म म्हणजे काय ?’, ‘त्याचे आचरण कसे करावे ?’, हे हिंदूंना माहिती नाही. धार्मिक कृती श्रद्धेने आणि योग्य प्रकारे केली गेली, तर त्याचा अध्यात्मिक लाभ जास्त होतो, तसेच भारत स्वाभाविक हिंदु राष्ट्र आहे. सनातन धर्मीयांची हिंदु राष्ट्राची कल्पना विश्व कल्याणासाठी आहे. हिंदु राष्ट्राचे लक्ष्यच मुळी विश्वशांती आहे, या उद्देशाने ‘सनातन संस्कृति प्रदर्शना’चे आयोजन केले आहे.’’
प्रदर्शनाची वैशिष्ट्ये : ‘तीर्थमहिमा कक्ष’ अन् ‘हिंदु राष्ट्र बोध कक्ष’: सनातन संस्थेच्या साधक श्री. संजय सिंह यांनी प्रदर्शनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करताना सांगितले की, सनातन संस्था २००१ च्या कुंभमेळ्यापासून सातत्याने अशा प्रदर्शनांच्या माध्यमातून जागृती करत आहे. ‘तीर्थमहिमा’ आणि ‘हिंदु राष्ट्र बोध’ या दोन स्वतंत्र कक्षांद्वारे भाविकांना मार्गदर्शन केले जाईल. ‘तीर्थमहिमा कक्ष’: येथे २ श्राद्धक्षेत्रे, ३ त्रिस्थळी यात्रेची स्थाने, ४ कुंभक्षेत्रे आणि ७ मोक्षपुरी यांची महत्त्वपूर्ण माहिती दिली जाईल. ‘हिंदु राष्ट्र बोध कक्ष’: येथे हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेविषयी निर्माण होणारे आक्षेप आणि त्यांची शास्त्रशुद्ध उत्तरे दिली जातील.
ग्रंथप्रदर्शन आणि माहिती पुस्तिकांचा समावेश : सनातन धर्म, अध्यात्म, साधना आणि राष्ट्रहित यांवर आधारित सनातन संस्थेच्या अनेक ग्रंथांचे प्रदर्शन येथे असेल. भाविकांना धर्मशास्त्र समजावून सांगण्यासाठी विशेष ग्रंथ, फलक आणि व्हिडिओ यांच्या माध्यमातून माहिती दिली जाईल.
सनातन संस्थेच्या साधिका सौ. धनश्री केळशीकर यांनी सांगितले की, “भाविकांना सनातन धर्माचे महत्त्व, त्याचा अध्यात्मिक लाभ आणि परंपरांचे वैज्ञानिक आधार समजावून घेण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरेल. भाविकांनी प्रदर्शनाला भेट देऊन याचा लाभ घ्यावा.”46